प्रसाद सुधीर शिर्के
Updated: 15 April 2021 07:30 IST
नागमणी एक रहस्य : तिच्या स्मृती ४
नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.
प्रकाश रात्रीपासूनच ध्यान धारणेसाठी बसला होता. सकाळचे नऊ वाजले होते, तरी तो अजून ध्यानातून बाहेर आला नव्हता. तितक्यातच घराची बेल वाजली. मोहनने दरवाजा उघडला. दरवाजाच्या बाहेर दोन पोलीस अधिकारी उभे होते. मोहनने त्यांना आत बोलावले तसे ते दोघे घराच्या आत येऊन बसले. ध्यानधारणा करणाऱ्या प्रकाशचे नेत्र आपोआपच उघडले गेले. जणू त्याला कसलीतरी चाहूल लागली असावी. तो आपल्या खोलीतून बाहेर आला. त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक किरण होती. ती नुकतीच पुन्हा आपल्या पदावर रुजू झाली होती. ज्यावेळी मोहनराव खासदार होते, त्यावेळी घडलेल्या एका प्रकरणाचा शोध घेण्याचे कार्य तिच्यावर सोपवण्यात आले होते. त्याच संदर्भात मोहनरावांची चौकशी करण्यासाठी ती आपल्या सहकार्यांसोबत त्यांच्या घरी आली होती. तिला पाहताच क्षणी प्रकाशच्या मनातील तिच्या स्मृती जागृत झाल्या. त्या दिवसानंतर चौकशी निमित्त ती बऱ्याचदा त्यांच्या घरी आली होती. तिला पाहताच क्षणी प्रकाशच्या मनातील तिच्या स्मृती जागृत झाल्या. त्या दिवसानंतर चौकशीनिमित्त ती बऱ्याचदा त्यांच्या घरी येऊ लागली होती. त्यामुळे तिची आणि प्रकाशची चांगली ओळख झाली. दोन-तीन महिन्यांत तिचे शोधकार्य संपले आणि तिचे मोहनच्या घरी येणे-जाणेही थांबले. तेव्हा, न राहवून प्रकाशने एके दिवशी तिची भेट घेतली आणि आपल्या मनातील तिच्याविषयीचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त केले. काही दिवस विचार करून तिने प्रकाशला आपला होकार कळवला. मोहनरावांना किरण सुन म्हणून पसंत होती. त्यानंतर काही महिन्यात प्रकाश आणि किरणचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर प्रकाश आणि किरणचा सुखाचा संसार सुरु झाला. प्रकाशने किरणसाठी आपली दिनचर्या बदलली होती. आता तो एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगू लागला होता. सकाळी तो मोहनबरोबर कामात व्यस्त असे आणि सुट्टीच्या दिवशी वेळात वेळ काढून तो धनंजयला दिलेले वाचन पूर्ण कार्यासाठी पापी मनुष्यांना पकडून त्यांना धनंजयच्या स्वाधीन करत असे. आपली ओळख किरणपासून लपवण्याकरीता हल्ली तो रात्री अपरात्री ध्यान धारणाही करत नसे.
. . .