नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : अपहरणाचे रहस्य १

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

स्वप्न की सत्य? २   अपहरणाचे रहस्य २

त्या दिवशी रात्री मित्राची हाक ऐकून अचानकपणे घराबाहेर पडलेल्या प्रकाशचे, नागांनीच मानवी रूप धारण करून अपहरण केले होते, हे आत्तापर्यंत स्पष्ट झाले होते. पण अपहरणानंतर प्रकाशबरोबर नेमके काय घडले होते, हे अजूनही प्रकाश आणि नागतपस्वी यांच्या खेरीज दुसऱ्या कोणालाही माहिती नव्हते.

हजारो वर्षांपूर्वी नागलोक सोडलेल्या अनंताचा नातू मानवी रूपातील नाग असल्याचे, इच्छाधारी नागांना नुकतेच समजले होते. त्यामागचे कारणही तसेच होते. प्रकाशच्या लहानपणीच नागतपस्वींनी त्याच्या दिव्य शक्तींना त्याच्या शरीरातील सप्तचक्रांमध्ये बंदिस्त केले होते. त्यामुळे इतकी वर्षे तो एका सामान्य व्यक्तीसारखेच जीवन जगत होता. पण आता तो जवळपास तेवीस वर्षांचा झाला होता. त्याच्या शरीरातील बंदिस्त शक्ती आता त्याच्या सप्तचक्रांमधून बाहेर येण्याचा मार्ग शोधू लागली होती. साहजिकच त्या अद्भूत शक्तींची स्पंदने नागलोकांपर्यंत पोहोचू लागली होती. प्रकाश हा नागमणी घेऊन मनुष्य रुपात जन्मलेला दिव्य नाग असल्याचेही नागांच्या राजाला त्याच्या प्रधान नागऋषीकडून समजले होते. त्यासाठी त्याने प्रकाशच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी काही नागांना मनुष्यरूप धारण करून काही काळ पृथ्वीवरच वास्तव्य करण्यास सांगितले होते. ज्यावेळी त्यांना प्रकाशच तो नाग असल्याची खात्री पटली त्यावेळी नागांकडून त्याचे अपहरण करण्यात आले.

प्रकाशला शोधण्यासाठी नागलोकातून आलेल्या नागांनी मानवी रुपात राहून अत्यंत गुप्तपणे प्रकाशचा शोध सुरु ठेवला होता. ‘प्रकाश अनंताबरोबर किंवा त्याच्या मुलाबरोबर म्हणजेच मोहनबरोबर राहत असावा’ असे सुरुवातीला त्यांना वाटले होते. परंतु बराच काळ शोध घेतल्यावरही तो त्या दोघांकडेही सापडला नाही. म्हणून ते हताश होऊन नागलोकी परतले. काहीही झाले, तरी त्या अर्धनागमनुष्याला शोधून त्याला नागराजाकडे घेऊन जायचे  त्यांनी ठरवले होते. परंतु पृथ्वीवर आल्यावर मात्र त्यांना ह्या कामात अपयश आले होते. नागलोकात परतल्यावर त्यांनी नागराजच्या आदेशावरून प्रकाशला शोधण्यासाठी नागऋषींची मदत घेतली. नागऋषींना पृथ्वीवरील प्रकाशीची स्पंदने जाणवत होती.  त्यांनीच त्या नागांना प्रकाशचा पत्ता सांगितला होता.

पृथ्वीवर परतल्यावर नागांनी बऱ्याच दिवसांपासून प्रकाशवर पाळत ठेवली होती. त्यांचे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असायचे. पण प्रकाशच्या वागणुकीवरून तो नाग असेल असे त्यांना वाटत नव्हते. म्हणून त्यांनी तो खरोखर नाग आहे, की नाही या गोष्टीचे परीक्षण करायचे ठरविले.

अपहरणाच्या दिवशी प्रकाशला स्टेशनपासून त्याच्या घरी सोडायला आलेला रिक्षावाला मानवी रूपातील इच्छाधारी नाग होता. नागांना पटकन संताप येतो. त्यामुळे जर प्रकाश नाग असेल तर त्याच्या समोर त्याला संताप येणारे वर्तन केले तर तो आपल्यावर संतापेल मग त्याचा त्याच्या शक्तींवरील ताबा सुटेल आणि आपोआपच सत्य बाहेर पडेल. असे त्यांना वाटत होते. त्यामुळे तो मानवी रूपातील नाग असलेला रिक्षावाला त्या दिवशी प्रकाशला राग येईल असे वर्तन करत होता. पण प्रकाशच्या बाबतीत मात्र तसे काहीच घडले नव्हते. त्या दिवशी त्याला रिक्षावाल्याचा राग आला होता, पण त्याचा त्याच्या शक्तींवरील ताबा सुटला नव्हता. या उलट तो इतर मनुष्याप्रमाणे त्याच्याशी मारामारी करू लागला. जी कुठल्याही मनुष्यासाठी स्वाभाविक प्रतिक्रिया होती. काही केल्या सत्य त्यांच्या नजरेसमोर येत नव्हते. पण नागऋषींनी मात्र तोच अर्धनागमनुष्य असल्याचे सांगितले होते. म्हणून मग त्यांनी त्याच्या अपहरणाची योजना बनवून त्याला आपल्याबरोबर नागलोकी नेले.
. . .