नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : अपहरण ५

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

अपहरण ४   अपहरण ६

सकाळ झाली होती. सूर्याची किरणे आता डोळ्यावर येऊ लागली होती. रात्री उशीरा झोपलेल्या वसंतरावांना जाग आली. त्यांचे लक्ष घड्याळाकडे गेले. सकाळचे आठ वाजले होते. त्यांची पत्नी व इतर कुटुंबीय अजूनही झोपलेलेच होते. वसंतराव आता उठून बसले होते. सगळ्यांना शांतपणे झोपलेले बघून त्यांना थोडे आश्चर्य वाटले. दररोज त्यांच्या अगोदर उठून कामाला लागणारी, त्यांची पत्नी लतासुद्धा अजून झोपेतच होती. तिचा सुद्धा रात्रभर प्रकाशचा विचार करुन पहाटेच डोळा लागला असावा, असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी तिला जागे न करता, सर्वांसाठी चहा तयार केला. आणि मग ते सर्वांना हाक मारुन झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करू लागले.

मोहनच्या हाका ऐकून, घरातील इतर सर्वजण झोपेतून उठले. पण त्यांची पत्नी अजुनही गाढ झोपेतच होती. म्हणून त्यांनी तिला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला तसा वसंतरावांना.....क्षणार्धात झटका बसला. पायाखालची जमीन सरकावी आणि जमीन फाटून त्यात आपण रुतत जावे, अशीच काहीशी त्यांच्या मनाची धारणा झाली. जसे कोणीतरी आपल्याला खाली खेचत आहे असे त्यांना वाटू लागले. अचानक त्यांचे डोके जड झाले. त्यांना भोवळ येऊन ते त्याच ठिकाणी खाली बसले. आता लताला उठवण्याचा प्रयत्न करणे त्यांनी थांबवले होते. एका क्षणात त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता. त्याचे कारणही तसेच होते. त्यांच्या प्रिय पत्नीचा ‘लताचा’ मृत्यू झाला होता. तीच्या शरीराला हात लावताच त्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली होती. त्यांच्या वागण्यात क्षणार्धात झालेल्या बदलाची घरातील इतरांनाही जाणीव झाली होती. वसंतरावांच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव आणि त्यांचे लताच्या शेजारी असे शांतपणे बसून राहण्यामुळे इतरांनाही सौम्य धक्का बसला होता. तितक्यात वसंतच्या वहिनीने ‘शैलाने’ लताला हात लावून पाहिले. तिचे थंड व स्थिर झालेले शरीर, त्यात प्राण नसल्याचे दर्शवत होते. लताचा असा अचानकपणे मृत्यू व्हावा अशी कल्पनाही तिला सहन होणारी नव्हती. तिला रडू आले. ह्या क्षणी तिला आपल्या भावनांना आवर घालणे शक्यच झाले नसते.

वसंतरावांच्या भावाचे ‘संदीपचे’ शैलाशी लग्न झाले आणि तीला लताच्या रुपाने एक मैत्रीणच मिळाली. इतकी वर्ष लताने तिच्या प्रत्येक सुख-दु:खात तिची साथ दिली होती. प्रकाशच्या बेपत्ता असण्याची बातमी समजताच संदीप आणि शैला वसंतरावांच्या घरी आले होते. अशा प्रसंगी शैलाच्या तिथे येण्यामुळे लताला थोडे बरे वाटले होते. प्रकाशच्या हरवण्यामुळे लताची मानसिक स्थिती ठिक नसताना, तिला शैलामुळे थोडा आधार वाटू लागला होता. पण तरीही मनातून ती पूर्णपणे खचून गेली होती; ज्याचा पत्ता तिने इतरांना लागून दिला नाही. अशा स्थितीत दोघी जावा एकमेकींना आधार देऊन आपले दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करत होत्या.

संदीप आणि शैलाचे लग्न होऊन बरीच वर्ष झाली होती तरी त्यांना अद्याप मुलं नव्हते. त्यामुळे प्रकाश त्यांना आपल्या मुलाप्रमाणेच होता. त्या दोघांचाही प्रकाशवर खुप जीव होता. आधीच प्रकाशच्या बेपत्ता असण्यामुळे सर्वच बेचैन होते आणि आता तर लताच्या जाण्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

हृदयविकाराने लाताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रकाशच्या हरवण्यामुळे, त्याचा विचार करुन-करुन तीच्या मनावर भरपूर मानसिक ताण निर्माण झाला होता. हा ताण-तणाव तिला सहन न झाल्यामुळे त्याचे रुपांतर हृदयविकारामध्ये झाले आणि त्यातच दुर्देवाने तिचा मृत्यू झाला.

लताच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली. सगळे नातेवाईक आणि आजूबाजूची लोकं वसंतरावांच्या घरी जमा झाली होती. वसंतराव एका कोपऱ्यात उभे राहून खिन्न मनाने... लताच्या अंत्यसंस्काराची सुरु झालेली तयारी शांतपणे बघत होते. ह्या प्रसंगी कुणाशीही बोलण्याची त्यांची इच्छा नव्हती. तितक्यात तिथे जमलेल्या लोकांची अचानक कूजबूज वाढू लागली. म्हणून त्यांच्या बाजूला बसलेला त्यांचा भाऊ संदीप उठून उभा राहिला आणि घराबाहेर कोणी आले आहे का? हे पाहू लागला. समोर पोलिस उभे असल्याचे त्याला दिसले. सर्वांना बाजुला करुन, ते थेट वसंतरावांच्या दिशेनेच चालत आले होते. घरात जमलेली गर्दी बघून घरात काहीतरी मोठी घटना घडल्याची त्यांना आधीच चाहूल लागली होती. पण तसे न दर्शवता त्यांनी त्याबद्दल विचारणा केली. वसंतरावांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. खरेतर ते पोलिस प्रकाशच्या प्रकरणाबाबत काही चौकशी करण्यासाठी तिथे आले होते. पण तिथे घडलेल्या दु:खद घटनेमुळे आणि वसंतरावांची मानसिक स्थिती पाहून “आम्ही उद्या परत येऊ” असे सांगून ते निघून गेले.

घरात जमलेली गर्दी, त्यातच पोलिसांची भर, कालपासून झोपेतून न उठलेली आई ह्या सर्व गोष्टींमुळे वसंतरावांची मोठी मुलगी ‘रिया’ थोडी भयभीत झाली होती. पण तरीही घरी सुरु असलेल्या या सर्व गोष्टी तिला समजण्या पलिकडच्या होत्या. रिया लहानपणापासूनच मतिमंद होती. जरी तिच्या शरीराची वाढ इतर मुलींप्रमाणेच होत असली, तरी पण तिच्या बौद्धिक क्षमतेत मात्र वाढच होत नव्हती, त्यामुळे आपला भाऊ चार दिवसांपासून बेपत्ता आहे. काल हृदयविकाराने तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. ह्या सर्व गोष्टी तिला न समजणाऱ्या होत्या. ती एकटीच काहीतरी बडबडत होती. घरातील सर्वांना तिच्या वागण्याची सवय असल्यामुळे तिच्या वागण्याकडे कोणी फारसे लक्ष न देता ते सर्व अंत्यसंस्काराची तयारी पुन्हा करू लागले.
. . .