नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : खरी ओळख २

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

खरी ओळख १   खरी ओळख ३

मोहनराव, स्वत:मधेच हरवून ध्यान करणाऱ्या प्रकाशकडे बघत बसले होते. वसंतही तिथेच बसला होता. खरेतर त्याच्या जन्मापासूनच त्यांना तो कुणीतरी दिव्यआत्मा आहे असे वाटायचे आणि शेवटी तेच सत्य होते. प्रकाश हा कुणी सामान्य व्यक्ती नसून तो अर्धनागमनुष्य म्हणून जन्माला आला होता.

त्याच्या जन्मापासून त्याच्या मस्तकावर असलेला नागमणी, ही त्याच्या नाग असल्याची खरी ओळख होती. पण ही गोष्ट त्याचे आजोबा म्हणजे मोहनचे वडील सोडले तर, कोणाच्याही लक्षात आली नव्हती. किंबहुना ही गोष्ट इतर कुणाच्याही समजण्यापलीकडचीच होती. प्रकाशच्या डोक्यावर त्याच्या टाळूच्या मध्यभागी लालसर रंगाची फोडी आली आहे; असेच त्याच्या जन्मानंतर सर्वांना वाटले होते. पण त्याच्या आजोबांना मात्र ती फोडी नसून तो प्राथमिक अवस्थेतील नागमणी असल्याचे केव्हाच लक्षात आले होते. प्रकाश एक वर्षाचा झाल्यावर त्याचे जायवळ केले गेले. त्यावेळी त्याच्या डोक्यावरील फोडीसारखा वाटणारा नागमणी आता, थोडासा स्पष्टच दिसू लागला होता. परंतू, त्यावेळी तो जागृत नसल्याने निस्तेज होता.

प्रकाशचे आजोबाही कोणी सामान्य मनुष्य नसून ते नागवंशातील एक इच्छाधारी नाग होते. जवळपास हजार वर्षापूर्वी त्यांची आणि त्यांच्या भावांची नागलोकातील राजपदासाठी भांडणे झाली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या ‘नागतपस्वी’ ह्या गुरुंच्या आदेशामुळे नागलोकातून पृथ्वीवर यावे लागले. अनंता एक इच्छाधारी नाग असल्यामुळे तो मनुष्याचे स्वरुप धारण करुन, इतर मनुष्यांप्रमाणे पृथ्वीवर राहू लागला. ज्यावेळी पृथ्वीवर नागांचे राज्य होते. त्यावेळचे मनुष्याचे जीवन आणि आताच्या मनुष्याच्या जीवनामध्ये खुप बदल झालेला होता. त्यामुळे काळानुसार बदललेल्या मनुष्याची जीवनपद्धती शिकण्यासाठी त्याला बरीच वर्षे लागली. कालांतराने त्याला मनुष्यस्वरुपाची आणि मनुष्याच्या जीवनपद्धतीची सवय झाली. त्यानंतर त्याने एका सामान्य स्त्रीशी मनुष्याप्रमाणे विवाह केला. त्यांचा मुलगा मोहन हा एक सामान्य  इच्छाधारी नाग होता. पण त्याचा नातू प्रकाश हा दिव्य नागमणी घेऊन जन्माला आलेला, असामान्य शक्ती असलेला इच्छाधारी नाग आहे; हे जेव्हा अनंताला समजले त्याच वेळी त्यांनी गुप्तपणे नागलोकातून नागतपस्वींना बोलावून घेतले आणि त्यांच्या सहाय्याने प्रकाशच्या शरीरातील अद्भुत नागशक्तींना त्याच्या शरीरातील सप्तचक्रांमध्ये आपल्या मंत्रशक्तीने कैद केले.

पृथ्वीवर नागांनी मनुष्यरुपात जन्म घेतल्याची ही पहिलीच घटना नव्हती. धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांचे लहान बंधू लक्ष्मण आणि भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम हे दोघेही शेषनागाचे अवतार होते. परंतू तो काळ आणि आजचा काळ यात हजारो वर्षाचा काळ लोटला गेला होता.

मनुष्यरुपात अद्भूत नागशक्ती आणि दिव्य नागमणी घेऊन जन्माला आलेल्या, आपल्या नातवाबद्दल आज ना उद्या नागलोकातील इतर नागांना समजेल आणि मनुष्यरुपात त्याचा जन्म झाल्याने, त्याला मनुष्याची बुद्धिमता आणि नागांची अद्भूत शक्ती प्राप्त झालेली असल्यामुळे हा अर्धनागमनुष्य आपल्या अद्भूत सामर्थ्य शक्तीमुळे इतर इच्छाधारी नागांपेक्षा श्रेष्ठ ठरेल आणि मग त्याला आपला राजा बनवावे लागेल. या भीतीपोटी ते प्रकाशला आपल्या दिव्य शक्तींची ओळख होण्याआधीच त्याला मारुन टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. अशी शक्यता नागतपस्वींनी प्रकाशच्या जन्मानंतर वर्तविली होती. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी आणि प्रकाशचा पत्ता इतर कुठल्याही नागाला लागू नये, म्हणून त्यांनी प्रकाशच्या नागशक्तींना त्याच्याच शरीरातील सप्तचक्रांमध्ये कैद केले. आणि त्याची ओळख कोणालाही होऊ नये, म्हणूनच त्याच्या सुरक्षिततेसाठी, मोहन प्रकाशला वसंतकडे दत्तक देऊन टाकतो. आणि त्यासाठीच मोहनची पत्नी प्रकाशचा बरोबर सांभाळ करत नाही, असे खोटे कारण मोहनने वसंतसमोर पुढे केले होते.
. . .