नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : युद्धाची तयारी ६

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

युद्धाची तयारी ५   युद्धाची तयारी ७

वसंतराव प्रकाशला भेटण्यासाठी आले होते. आधी प्रकाशच्या अचानकपणे हरवण्याचे दुःख, त्यानंतर मुलाच्या काळजीने पत्नी वारल्याचे दुःख, त्यातच लहानपणापासून मतिमंद असलेल्या त्यांच्या मुलीच्या भविष्याची चिंता, त्यांना लता वारल्यापासून अधिकच सतावू लागली होती आणि आता तर प्रकाश त्यांच्यापासून दुरावल्याचे दुःख. यासर्व गोष्टींमुळे ते मनातून खूपच खचले होते. म्हणूनच न राहून ते प्रकाशला भेटायला आले होते.

वसंतला बघताच प्रकाशच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा दिसू लागली. जरी त्याला आपल्या खऱ्याजन्मदात्या पित्याबद्दल कळले असले तरीही, वसंतने इतकी वर्षे त्याला आपल्या मुलासारखे सांभाळले होते, हे तो कधीही विसरू शकणार नव्हता. प्रकाशला वसंतच्या मनःस्थितीचा अंदाज आला होता; त्यामुळे तो वसंतला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. प्रकाशशी बोलून वसंतलाही थोडे बरे वाटले होते. काही काळ का होईना, त्याच्या चेहऱ्यावर थोडे हास्य उमटले. मुलाला भेटल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागले होते.

काहीही झाले तरी वसंत, प्रकाशला आपल्याबरोबर 'आपल्या जुन्या घरी चल' असे सांगण्याइतका स्वार्थी नव्हता. पण प्रकाश त्याच्यापासून दुरावल्याची खंत मात्र त्याच्या मनात होती. जी प्रकाशलाही जाणवत होती. तसे बघायला गेलो तर त्याच्या जीवनाला आता फारसा काही अर्थच उरला नव्हता. त्यामुळे निदान प्रकाश तरी आपल्या बरोबर राहावा, ही साधी अपेक्षा त्याच्या मनात असणे स्वाभाविकच होते. पण मोहन त्याचा अत्यंत जिवलग मित्र होता. त्यामुळे "प्रकाशला माझ्याकडे पाठव" हे तो त्याच्याशी कधीही बोलू शकला नसता. प्रकाशला मोहनच्या मनाच्या स्थितीचा अंदाज होता. पण काहीही झाले, तरी तो एक सामान्य मनुष्य होता. त्यामुळे 'आपण एक नाग आहोत.' हे सत्य प्रकाश त्याला सांगू शकणार नव्हता. म्हणून "मी थोड्या दिवसात आपल्या जुन्या घरी राहायला येईन." असे वचन त्याने वसंतला दिले. थोड्या वेळाने मोहन आपली कामे आटपून परतला. त्याला भेटल्यावर वसंतही आपल्या घरी परतला.
. . .