नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : पार्श्वभूमी

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

मनोगत   अपहरण १

पोलिसांनी जराही आवाज न करता धक्का मारून त्या खोलीचे दार उघडले. तसे आतील सर्व दृश्य त्यांच्या दृष्टीसमोर स्पष्ट झाले. आतमध्ये स्मशान शांतता पसरली होती.

या ठिकाणी नेमके काय घडले असावे? बापाने आपल्या मुलाची हत्या का केली असावी? ही बातमी फोनवरून देणारा व्यक्ती कोण असावा? असे कित्येक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले होते. ज्यांची उत्तरे कदाचित आत खुर्चीमध्ये झोपलेल्या व्यक्तीकडेच असावीत. असा अंदाज बांधत पोलिसांनी त्या खोलीत प्रवेश केला.

जमिनीवर सांडलेल्या रक्तात काही अक्षरे कोरलेली होती. पोलिसांनी जवळ जाऊन ती अक्षरे वाचण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेल्या त्या जमिनीवर ‘प्रत्यूषस्वामी’ असे लिहिलेले होते. ती अक्षरे खुर्चीमध्ये झोपलेल्या व्यक्तीनेच आपल्या हाताच्या बोटाने लिहिलेली आहेत, हे त्याच्या हाताच्या एका बोटाला लागलेल्या राक्तावरून अगदीच स्पष्ट झाले होते.

विकी    : "अरे पण ही सर्व कथा या आधीसुद्धा आम्ही ऐकली आहे."

जय     : "पण यावरून हा वेडा आहे हे सिद्ध होत नाही ना?"

विकी    : "माझे आता ठाम मत झाले आहे की, हा कोणी सामान्य व्यक्ती नाही."

जय    : "बरं ठीक आहे. चल बघू आज पण प्रयत्न करून, आज काही वेगळे हाती लागते का?" प्रकाशने त्या खोलीच्या दरवाजाला असलेले टाळे उघडून खोलीचा दरवाजा हळूच उघडला.

तो आतमध्ये शांतपणे बसला होता. जणू तो ध्यानालाच बसला होता अशी त्याची मुद्रा दिसत होती. खोलीचे दार उघडताच त्याचे बंद असलेले डोळे आपोआपच उघडले गेले. आणि त्याच्या मुखातून आपसूकच काही उद्गार बाहेर पडू लागले.

जीवनातील प्रत्येक सत्यामागे
एक असत्य असते आणि
असत्यामागे एक सत्य असते
हे जाणून घेण्यासाठी...
सत्यातील असत्यता आणि
असत्यातील सत्यता जाणणे
आवश्यक असते कारण...
प्रत्येक सत्याच्या मुळाशी,
असत्याची चीड असते.
तरीही शेवटी सत्य काय?
आणि असत्य काय?
सर्वच मनाचे खेळ....

विकी    : "ए बस झाले आता. तुझ्या मनाचे खेळ... थांबव आता आणि नेमके सत्य काय आहे? ते सांग आम्हाला."

विकीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो मिश्किलपणे हसू लागला. "होय, मी सामान्य व्यक्ती नाही निदान आता तरी नाही."

हे ऐकताच विकीचा चेहरा काळवंडला. आपल्या मनातील गोष्टी ह्याला कशा काय माहिती असू शकतील? या विचाराने तो अस्वस्थ झाला होता. "बरं ठिक आहे. मग, आज तरी काही सांगणार आहेस का? त्याने न राहून त्याला प्रश्न केला."

तो     : खरच सांगू? माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल तुमचा? मिश्किलपणे हसत त्याने विचारले.

विकी : का नाही? आता आम्हाला खात्री झाली आहे. तू कोणी सामान्य मनुष्य नाहीस. मग तुझ्या बरोबर घडलेल्या गोष्टीसुद्धा सामान्य नसणार. बरोबर ना?"

तो    : अगदी बरोबर.... आता बरीच समज आली आहे तुम्हांला... म्हणजे आता तुम्हाला कळून चुकले आहे की माझे म्हणणे ऐकून घेण्याशिवाय तुमच्या पुढे दुसरा मार्ग देखील उपलब्ध नाही. चला जाऊ दे या सर्व आधीच्या गोष्टी विसरुन, मी तुम्हांला अजून एक संधी देतो.

विकी    : बरं, मग आता तरी विलंब न करता आम्हांला सर्व काही सविस्तर सांग, कोण आहेस तू?

तो    : "पुन्हा तोच प्रश्न!  माझ्या लहानपणापासून आजवर असा एकही दिवस  गेला नसेल, ज्या दिवशी, ‘मी कोण आहे?" हा प्रश्न मला पडला नसेल.

विकी    :"ए बाबा उगाच वायफळ बडबड करून आम्हांला कोड्यात पाडू नकोस. जे काही आहे ते स्पष्ट बोल. नेमकं काय सांगायचे आहे तुला." तो थोडासा रागाने त्याच्यावर खेकसला.

तो    : "हा..हा..हा....बरं चल ठीक आहे. सगळ सोपं करून सांगतो, तुम्हाला समजेल असं. माझी ओळख बदलणारा घटनाक्रम ज्या दिवशी सुरु झाला, तेव्हापासून ते आतापर्यंतचा माझा संपूर्ण जीवनप्रवास तुम्हाला ऐकवतो. पण तत्पुर्वी माझी एक अट आहे. मी माझी कहाणी सांगत असताना तुम्ही मध्ये–मध्ये एकही शब्द बोलायचा नाही. मीच माझ्या कथेचा एकमेव साक्षीदार असल्यामुळे माझी कथा सांगताना मी, मी नसेन. मी साक्षीदार म्हणूनच तुमच्यासमोर सर्व गोष्टी मांडेन. बघा, त्या तुम्हांला पटतात का? तो पुन्हा एकदा मिश्किलपणे हसला आणि त्याने त्याची कथा सांगायला सुरुवात केली.
. . .