नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : संकटाची चाहूल २

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

संकटाची चाहूल १   संकटाची चाहूल ३

वीस वर्षांमध्ये नागलोकातील स्थिती पूर्णपणे बदलली होती. नागराजच्या मृत्युनंतर, अनंता कुशलतापूर्वक आपले राजाचे दायित्व सांभाळत होता. त्याच्या शासन काळात, नाग प्रजा अत्यंत सुखी होती. नागलोकातील बहुसंख्य नागांना अनंताच्या सामर्थ्यावर आणि योग्यतेवर विश्वास होता. नागराजच्या मृत्युनंतर त्याच्या मित्र नागांची अवस्था दयनीय झाली होती. नागराजच्या काळात त्यांना, राजदरबारात आश्रय होता, जो अनंताने त्यांच्याकडून हिरावून घेतला आणि त्यांच्यावर नागलोकातील इतर कामे सोपवून त्यांच्या जागी दुसऱ्या नागांची राजदरबारातील विविध पदांवर नेमणूक केली. त्यामुळे ते दुखावले गेले होते. नागराजचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या बाजूने लढणारे इतर इच्छाधारी नागही मारले गेले होते. पण त्यांचे वंशज अजुनही जिवंत होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नागराजचा पुत्र धनंजय आता मोठा झाला होता. ज्यावेळी अनंताने त्याच्या पित्याची हत्या केली, त्यावेळी तो लहान होता. अनंताने राज्यकारभार आपल्या हाती घेतल्यावर, त्याने नागराजच्या पत्नीला आणि तिच्या शंभर नागमुलांना राज्यातून निष्कासित केले होते. कारण नागराणीनेही नागराजच्या दुष्कृत्यात अप्रत्यक्षपणे त्याची साथ दिली होती.

अनंताने नागराणीला तिच्या मुलांसोबत राज्यातून निष्कासित केल्याचा अपमान ती अद्याप आपल्या मनात साठवून होती. तो अपमान सहज-सहजी पचवणे तिच्यासाठी शक्य नव्हते. ह्या अपमानाचा आणि आपल्या पतीच्या मृत्युचा सुड घेण्याची, ती वाट बघत होती. ‘अनंताला मारून नागराजपदी आपल्या ज्येष्ठ पुत्राची नेमणूक व्हावी’ असा तिचा मानस होता. त्यासाठी तिने नागराजच्या जवळच्या मित्रांना, अनंताशी झालेल्या युद्धामध्ये मारल्या गेलेल्या नागांच्या वंशजांना एकत्र केले होते.

नागराणीने पंचवीस वर्षापूर्वी शंभर अंडी दिली होती. त्यातील ऐंशी अंड्यांमधून नागांचा, सतरा अंड्यांमधून नागिणींचा आणि तीन अंड्यांमधून नपूसंक नागांचा जन्म झाला होता. ‘धनंजय’ हा तिचा ज्येष्ठ नागपुत्र होता. ‘आपला हा पुत्र आपल्या पित्याच्या हत्येचा आणि मातेच्या अपमानाचा सूड नक्कीच घेईल’ याची तीला खात्री होती. आतापर्यंत नागराणीने जवळपास पाच हजार नागांना आपल्या बाजूने लढण्यासाठी संघटित केले होते. तिच्या नियंत्रणाखाली असलेल्या सामर्थ्यवान इच्छाधारी नागांच्या विशेष प्रशिक्षणाद्वारे तिने त्या नागांना युद्धासाठी तयार केले होते. हे सर्व काम तिने इतक्या गुप्तपणे केले होते की, अनंताला त्याची कल्पनाही नव्हती.

नागराजचा ज्येष्ठ पुत्र धनंजय महाविद्वान आणि अतुल पराक्रमी होता. त्याच्याकडे दिव्य शस्त्रांचेही ज्ञान होते.  लहानपणापासूनच त्याला मायावी युद्धे खेळण्याचे प्रशिक्षण मिळाले होते. आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेण्याची त्याच्या मनातील भावना दिवसेंदिवस अधिकच प्रबळ होत होती. काहीही करुन त्याला, अनंताला संपवायचे होते. अनंता नागलोकाचा राजा असल्याने, त्याच्या सेवेत भरपूर सैन्य होते. त्यामुळे त्याला मारणे सोपे काम नव्हते. भविष्यात आपल्याला अनंताशी युद्ध करावे लागेल, याच उद्देशाने धनंजयने, कठोर परिश्रम घेऊन दिव्य शस्त्रांचे ज्ञान आत्मसात केले होते.

नागलोकात लवकरच युद्धाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत होती. अनंताच्या राजदरबारात घडणाऱ्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर नागराणी आतापर्यंत लक्ष ठेऊन होती. त्यासाठी तिने आपल्या विश्वासातील काही चतूर नागांना राजदरबारात, सेवक म्हणून पाठवले होते. हे नाग राजदरबारात सेवक म्हणून विविध कामे करीत होते. त्यामुळे तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर त्यांचे लक्ष असायचे. नागराणीने राजदरबारी पेरलेले हे नाग म्हणजे तिचे दुसरे डोळेच होते. नागराणीने त्या नागांच्या सहाय्याने राजदरबारातील बऱ्याचशा इतर नागांनाही आपल्या बाजुने लढण्यासाठी, त्यांची मने वळवली होती. त्यासाठी तीने "धनंजय राजा झाल्यानंतर, तुम्हाला राजदरबारातील प्रमुख पदे दिली जातील." असे अमीष त्यांना दाखवले होते. उच्चपदाच्या लालसेपोटी दरबारातील आणि नागसैन्यातील जवळ-जवळ पंधरा हजार नागसेवक आणि नागसैनिक त्यांच्या बाजूने झाले होते. तरीही अनंताच्या बाजूने अजुन जवळपास पंचवीस-तीस हजार नाग होते; जे अनंताच्या बाजुने लढण्यासाठी सदैव तत्पर होते आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे लाखोंच्या संख्येने असलेल्या, नागप्रजेचा ‘अनंताला’ पाठिंबा होता. त्यामुळे युद्धाची पुर्वतयारी न करता, जर नागराणीने नागराज अनंता विरुद्ध बंद पुकारून त्याच्याशी युद्ध केले असते, तर त्याच्याजवळील सैन्यापुढे आणि नागप्रजेपुढे आपला जास्तकाळ टिकाव लागणार नाही, हे नागराणी ओळखून होती. म्हणूनच ती आतापर्यंत शांत बसली होती.
. . .