नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : संकटाची चाहूल ४

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

संकटाची चाहूल ३   संकटाची चाहूल ५

धनंजयने घेतलेल्या सभेमुळे अनेक नागांचे मतपरिवर्तन झाले होते. इतकी वर्षे अनंताला साथ देणारे बरेचशे नाग धनंजयच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्याच्या बाजूने झाले होते. धनंजयने त्या सभेत मांडलेले विचार, त्याची मते वाऱ्याच्या वेगाने नागलोकात सर्वत्र पसरली. धनंजयने त्यांना दाखवलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी बऱ्याच नागांनी कसलाही विचार न करता धनंजयला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे धनंजयची बाजू आता मजबूत झाली होती.

हे सर्व घडून गेल्यावर अनंताला ह्या गोष्टीची खूप उशिरा खबर मिळाली. आतापर्यंत धनंजयने नागलोकातील अर्ध्यापेक्षा जास्त नागांना गुप्तपणे आपल्या बाजूने वळवले होते. धनंजयला जेव्हा आपल्या वाढलेल्या सामर्थ्याची जाणीव झाली, तेव्हा त्याने अनंताला युद्धासाठी आवाहन दिले. अनंताने ते आवाहन स्विकारले. पण त्याच्या आधी त्याने धनंजयला एक संदेश पाठवला होता. त्या संदेशाचा आशय असा होता. ‘जर नागलोकातील नाग आपापसातील मतभेदामुळे, आपापसात सत्तेसाठी किंवा इतर कोणत्याही स्वार्थासाठी लढू लागले, तर ते स्वतःच आपल्या विनाशाचे कारण बनतील. आपल्या दोघांच्याही बाजुने युद्ध करणाऱ्या नागांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे आपले युद्ध झाले तर, मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होईल. त्यामुळे तुला जर आपल्या पित्याच्या मृत्युचा, माझ्याशी सूड घ्यायचा असेल, तर आपण द्वंद्व युद्ध करूया. ज्याने इतर निरपराध नागांचा मृत्यु टाळता येईल.’

धनंजयने अनंताचे द्वंद्व युद्धाचे आवाहन स्विकारले. दोघांमध्ये युद्ध सुरु झाले. अनंताने युद्धात धनंजयबरोबर निकराचा लढा दिला. पण तो त्याच्या समोर फार काळ टिकू शकला नाही. धनंजयने अनंताचे मस्तक धडावेगळे केले आणि स्वतःला नागांचा नवीन राजा म्हणून घोषित केले ज्यांना हे मान्य नसेल, त्यांनी त्याच्याशी युद्ध करावे. असे आवाहनही केले परंतू त्याच्या शक्ती सामर्थ्याला घाबरुन कोणीही त्याचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही. धनंजयने राजदरबारातील अनंताच्या मित्र नागांना बंदिवान केले आणि कारागृहात टाकले. कारण अनंताची साथ देणारे हे नाग कधीही आपल्या विरोधात जाऊ शकतील. जी गोष्ट आपल्यासाठी घातक ठरू शकते हे त्याला चांगलेच ठाऊक होते. त्यानंतर त्याने आपल्या विश्वासातील नागांना राजदरबारात महत्वाच्या पदांवर नियुक्त केले. त्यामुळे राजदरबारात आता जल्लोषाचे वातावरण झाले होते.
. . .