नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : स्वप्न की सत्य? १

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

शोध सुरु आहे... २   स्वप्न की सत्य? २

मोहनने प्रकाशला त्याचे आजोबा ‘अनंता’ आणि नागतपस्वींची ओळख करून दिली. अनंताला बघताच त्याच्या मनातील, त्याच्या बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या. ज्या व्यक्तीला त्याने त्याच्या गावी, मंदिरात ध्यान करताना बघितले होते. आज तीच व्यक्ती पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसत होती. लहानपणी त्याने त्या मंदिरात ध्यान करताना, ज्या व्यक्तीला बघितले होते, तीच व्यक्ती त्याचे आजोबा असल्याचे सत्य त्याला आज समजले होते.

नागमणी घेऊन जन्माला आलेला प्रकाश हा दिव्य नाग होता. त्यामुळे त्याला पडलेल्या स्वप्नाचा नक्कीच काहीतरी गुढ अर्थ असणार याची अनंताला खात्री पटली होती.

प्रकाशला पडलेले स्वप्न ऐकुन नागतपस्वींनी आपले डोळे विस्फूरले होते. प्रकाशला पडलेले ते भयानक स्वप्न, निव्वळ एक स्वप्न नसून ते एक सुचक स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. स्वप्नात त्याने जी आटलेली नदी बघितली त्या नदीचा संबंध नागलोक व पृथ्वीलोक यांना जोडणाऱ्या गुप्तमार्गाशी असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती नदी आटणे ही फार मोठी चिंतेची बाब आहे. हे त्यांनी स्पष्ट केले. कारण नदी आटल्यामुळे नागलोक व पृथ्वीलोकाला जोडणारा गुप्त मार्ग सर्व नागांसाठी खुला होणार होता. त्यामुळे सर्व नागांचा, पृथ्वीवरील प्रवेश पुन्हा सहज शक्य होणार होता.  

प्रकाशला स्वप्नात हजारोंच्या संख्येने धावणारे रेडे दिसले होते. ते मनुष्याचे नागलोकावरील आक्रमणाचे प्रतिक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळी नागांमध्ये आपापसातील भांडणे वाढून त्यांच्यात असंतोषाची स्थिती निर्माण होईल त्यावेळी मनुष्य त्याचा फायदा घेऊन नागलोकावर आक्रमण करेल. डोळे, कान, नाक, तोंड नसलेली ती माणसे यमदूताचे प्रतिक होते. ज्यावेळी माणसामधील मानवी गुणांचा ह्रास होऊ लागेल, त्यावेळी आपोआपच त्यांच्यात राक्षसी प्रवृत्तींची वाढ होईल आणि मग मनुष्यच यमदूत बनून संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचे कारण बनेल. असे होणे विधिलिखितच असल्याचे त्यांनी सांगितले पण या सर्व गोष्टी कशासाठी घडतील? त्यामागचे कारण काय? हे मात्र त्यांनी सांगितले नव्हते.
. . .