नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : भविष्य धोक्यात आहे! १

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

संकटाची चाहूल ५   भविष्य धोक्यात आहे! २

तीन दिवसांपासून प्रकाशने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. तसा तो रोज रात्री ध्यानधारणा करत असे. पण हल्ली बरीच वर्षे त्याने अशाप्रकारची इतके दिवस चालणारी ध्यानसाधना केली नव्हती. ‘सलग तीन दिवसांपासून प्रकाश ध्यान-धारणा करत आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचे कारण असणार.’ हे मोहनला माहित होते. त्यामुळे त्याने अद्याप प्रकाशला ध्यानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नव्हता. चौथ्या दिवशी, सकाळी प्रकाश ध्यानातून बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा खूप गंभीर दिसत होता. मोहनला त्यामागचे कारण माहित नसल्यामुळे, त्याने प्रकाशला त्याबद्दल विचारणा केली त्यावर...

"नागराजच्या पुत्राने आजोबांशी युद्ध करून, त्यांना यमलोकी पोहोचवले आहे आणि आता तो इतर नागांसह पृथ्वीवर येण्याची तयारी करत आहे. त्याने नागलोकातील बर्याचशा नागांना आपल्या बाजूने वळविले आहे. त्यांच्यासह पृथ्वीवर येऊन मनुष्य प्रजातींचा संहार घडवून आणण्याची, त्या सर्वांची इच्छा आहे." अशाप्रकारे प्रकाशने ध्यानाच्या माध्यमातून बघितलेल्या म्हणजेच नागलोकी घडलेल्या सर्व घटनांचे वर्णन मोहनसमोर केले.

बऱ्याच वर्षांपूर्वी त्याला पडलेल्या भयंकर स्वप्नाचा खरा अर्थ त्यादिवशी प्रकाशच्या लक्षात आला होता. नागतपस्वींचे त्यावेळचे म्हणणे खरे ठरले होते. ते एक सुचक स्वप्न होते. कदाचित म्हणूनच बऱ्याचदा त्याला, ते एकच स्वप्न सारखे सारखे पडत होते.

"जर नागांनी पृथ्वीवर आक्रमण केले, तर कदाचित मनुष्य प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येईल. नाहीतर मनुष्य सदैव नागांचा गुलाम म्हणून ओळखला जाईल. पण मी तसे होऊ देणार नाही. मला त्या धनंजयला पृथ्वीवर येण्यापासून रोखले पाहिजे." प्रकाश गंभीरपणे बोलला.

"परंतु प्रकाश, तुला भविष्यात घडणाऱ्या घटनांची फार पूर्वीच चाहूल लागली होती आणि आतातर नागलोकी तशी तयारी सुद्धा सुरु झालेली आहे. म्हणजेच भविष्यात काय घडणार हे आधीच ठरलेले आहे, मग तू भविष्य कसे काय बदलवू शकणार आहेस? मला तर आता हे सर्व घडण्यापासून रोखणे अशक्य वाटत आहे." मोहन उदासपणे म्हणाला.

"नाही. जोपर्यंत एखादी घटना घडत नाही, तोपर्यंत तिचे घडणे, किंवा न घडणे तिच्या वर्तमानातील स्थितीवर अवलंबून असते; सुदैवाने आपल्याला भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागली आहे. त्यामुळे वर्तमानात जर आपण त्या घटनांमागचे मूळ कारण नष्ट करू शकलो, तर भविष्यात घडणाऱ्या सर्व घटनाही आपोआपच रोखल्या जातील. त्यासाठी मला नागलोकांत जाऊन धनंजयला आणि त्याच्या बरोबरच इतर नागांना पृथ्वीवर येण्यापासून रोखावे लागेल."

"प्रकाश, तू अद्भूत शक्तींचा स्वामी असलेला सामर्थ्यवान नाग आहेस, परंतु तू एकटाच त्या सामना करू शकत नाहीस." मोहन म्हणाला. त्यावर प्रकाशने किंचित स्मित केले आणि तो बोलू लागला, "मला त्यांचा सामना करावाच लागणार नाही, मला फक्त त्यांचे मतपरिवर्तन करायचे आहे, नागलोकातून, पृथ्वीवर येण्यासाठी एकाच गुप्त मार्ग आहे, जो फार कमी नागांना माहित आहे. आजवर ही रहस्ये फक्त ठराविक नागांना आणि राजांनाच माहित होती. धनंजयचा पिता नागराज असल्याने त्यांच्या कुटुंबियांना ही रहस्ये समजू शकली; पण जर ही रहस्ये सर्वांना समजली, तर त्याचे दुष्परिणाम धनंजयलाच भोगावे लागतील. हे जर मी त्याला पटवून देऊ शकलो, तर आपले काम आपोआपच सोपे होईल." "परंतु ते कसे काय शक्य आहे?" मोहनने विचारले.

"सोपे आहे, जर सर्व नागांना गुप्त मार्गाची रहस्ये समजली आणि ते पृथ्वीवर आले तर, धनंजयच्या म्हणण्याप्रमाणे ते मनुष्यांची कत्तल सुरु करतील आणि आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या शरीराचा वापर करू लागतील, आणि जर धनंजयचे बोलणे सत्य असेल, तर असे केल्याने त्यांची नागशक्ती झपाट्याने विकसित होईल. नागांचे सामर्थ्य कैक पटींनी वाढल्यामुळे, त्यांच्यात अहंकारही झपाट्याने वाढेल आणि ते अविचारी बनतील. मग कुठलाच नाग कुठल्याच नागाच्या नियंत्रणात राहणे पसंत करणार नाही, ज्याला त्याला मीच श्रेष्ठ असे वाटू लागेल. त्यामुळे ते धनंजयचे आदेशसुद्धा मानणार नाहीत. त्यांच्या वाढलेल्या शक्तीसामर्थ्यामुळे ज्याला त्याला नागराज व्हावेसे वाटेल. अशाने धनंजयची सत्ता धोक्यात येईल आणि मग त्यांची आपापसात युद्धे होऊन, त्यांचा सर्वनाश होईल. या सर्व गोष्टी आता फक्त धनंजयच्या लक्षात आणून द्याव्या लागतील. गुप्त मार्गाची रहस्ये समजणे इतर नागांच्या जरी हिताचे असले तरी ते धनंजयच्या अहिताचे ठरणार आहे आणि मला वाटत नाही की नागप्रजातीच्या हितासाठी धनंजयला आपली सत्ता आपल्या हातातून घालवणे आवडेल आणि जरी त्याने नागप्रजातीच्या हितासाठी गुप्तमार्गाची रहस्ये सर्व नागांसाठी खुली केली, तर मनुष्याशी युद्ध करणे इतके सोपे नाही. आज वैज्ञानिक प्रगतीमुळे मनुष्याकडे अनेक प्रभावी शस्त्रे आहेत. ज्यांचा वापर, ते नागांच्या विरोधात करू शकतील. याच मनुष्याने अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यासारखी विनाशक शस्त्रे बनवली आहेत. हे कदाचित त्या नागांना ठाऊक नसावे. काहीही झाले तरी युद्धामुळे नागांची आणि मनुष्यांची जिवितहानी होणार आहे, जे मला मान्य नाही, म्हणूनच मला आता त्वरित नागलोकी जावे लागेल." इतके बोलून प्रकाश शांत झाला.

मोहन अजूनही थोडा अस्वस्थ दिसत होता. अशा परिस्थितीत काय करावे? हे त्याला सुचत नव्हते. आजवर तो मनुष्याप्रमाणे जीवन जगात आला होता. पण तरीही तो सुद्धा एक नागच होता. म्हणून त्याच्या मनात दोन्ही प्रजातीविषयी सारखीच सहानभूती होती. नाग काय आणि मनुष्य काय, दोन्ही स्वार्थीच. मग अशावेळी साथ कोणाची द्यावी? असा प्रश्न त्याच्या मनात होता. काहीवेळ कसला तरी विचार करून तो प्रकाशला म्हणाला, "प्रकाश, मला वाटते अशा वेळी आपण हिमालयात गुप्तपणे वास्तव्य करणाऱ्या ‘प्रत्यूष स्वामींचे’ सहाय्य घेतले पाहिजे. कारण आता ही गोष्ट दोन प्रजातींमधील स्वातंत्र्याचा प्रश्न बनली आहे."

"नाही पिताश्री, मला तसे वाटत नाही. प्रत्यूष स्वामींच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न दोन प्रजातींचा किंवा दोन लोकांमधील जीवांचा नसून, हा प्रश्न दोन वृत्तींचा आहे. मला आठवते, प्रत्यूष स्वामींनी सांगितले होते की, हे युद्ध दोन प्रवृत्तींमधील युद्ध असेल. यामध्ये स्वार्थी जीव आपल्या स्वार्थासाठी इतर निरपराध जीवांचा बळी घेतील. मग तो जीव मनुष्य असू शकतो किंवा नागही असू शकतो. त्यामुळे बाह्य जगात हे युद्ध निर्माण होण्याआधीच त्याची सुरुवात प्रत्येक जीवांच्या मनात होते. जे युद्ध चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींमधील युद्ध असते. मनातील याच सुष्म युद्धाचे परिणाम नंतर बाह्य जगात होणाऱ्या विध्वंसक युद्धाच्या स्वरुपात दिसू लागतात." प्रकाशला प्रत्यूष स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आजही लक्षात होत्या. म्हणून मोहनला बरे वाटले. आता त्याला त्याच्या या कार्यात यश मिळावे अशी मनोकामना तो करू लागला.

"तुम्हाला माझी चिंता करण्याची सध्यातरी गरज नाही. हा, पण जर नाग पृथ्वीवर येण्यात यशस्वी झाले, तर मात्र प्रत्यूषस्वामींच्या सहाय्याची आवश्यकता भासू शकते. मला आता निघायला हवे." इतके बोलून त्याने आपले डोळे मिटले. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला आणि क्षणार्धात तिथून अदृश्य झाला.
. . .