नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : मोहनचे रहस्य

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

युद्धाची तयारी ८   हिमालयात आगमन...१

वसंत नुकताच मोहनच्या बंगल्यावरून निघून गेला होता. आता तिथे फक्त प्रकाश आणि मोहनच होते.

"प्रकाश, आज मी तुला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे." असे बोलून मोहनने प्रकाशला आपल्या समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले.

"प्रकाश, मला माहित आहे, आजवर तू एका सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगत आला आहेस. तशी ती आमचीच इच्छा होती. मला माहिती आहे, ज्या दिवशी तुझे अपहरण झाले, तुझ्या जीवनात तुला सतत अद्भुत गोष्टींचा अनुभव येऊ लागला आहे. ज्या कुठल्याही मनुष्यासाठी अविश्वसनीय आहेत. तू पूर्णपणे मनुष्य नाहीस आणि पूर्णपणे नागही नाहीस; तरीही मनुष्य आणि नागांचे बरेचसे गुण तुझ्यामध्ये आहेत. तुझ्याकडे मनुष्याचे शरीर आणि नागांची अद्भुत शक्ती आहे. हे तर तू जाणतोसच. पण त्याचबरोबर तुझ्याकडे नागवंशातील दिव्य नागमणी सुद्धा आहे. जो अत्यंत दुर्मिळ आहे. लाखो वर्षांमधून एकदा तुझ्यासारख्या नागांचा जन्म होतो. ज्याच्या शक्तींची तुलना, इतर नागांशी करता येऊच शकत नाही. तू एकटाच हजारो इच्छाधारी नागांचा सामना करू शकतोस. या गोष्टीवरून तुला तुझ्या शक्तींचा अंदाज येईल आणि त्यापेक्षाही महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या अंगी नागांच्या इतक्या अद्भुत शक्ती असूनही, तुझा मनुष्यरूपात जन्म झाला, म्हणूनच नागलोकातील इच्छाधारी नाग तुला आपला शत्रू समजू लागले आहेत. कारण कदाचित तू आपल्या दिव्यशक्ती सामर्थ्याच्या बळावर, नागलोकावर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करशील आणि इतर मनुष्यांनाही आपल्याबरोबर घेऊन, नागलोकावर आक्रमण करशील आणि मग, त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील. अशी भीती नागराजच्या मनात आहे. तुझ्यामुळे त्याची सत्ता धोक्यात येईल. या भीतीपोटीच त्याने तुझे अपहरण करून तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ज्या नागतपस्वींनी आम्हाला वेळोवेळी सहाय्य केलं त्यांना त्याने मृत्युदंड दिला. म्हणूनच तुझ्या आजोबांना नागलोकी जावे लागले.” इतके बोलून तो थोडा थांबला.

“पण या सर्व गोष्टी तर मला माहितचं आहेत, मग?” प्रकाशने विचारले.

“हो, पण हि गोष्ट इथेच संपत नाही…” (मोहन)

“म्हणजे? अजूनही काही रहस्ये आहेत तर….” (प्रकाश)

“हो, आणि ती रहस्ये आज मी तुला सांगणार आहे.” मोहन म्हणाला तसे प्रकाशने आपले कान टवकारले. काही क्षण थांबून, मोहन पुन्हा बोलू लागला.

“लाखो वर्षांपूर्वी जेव्हा या पृथ्वीवर जीवांची उत्पत्ती झाली तेव्हा मनुष्याबरोबर इतरही जीवांची उत्पत्ती झाली होती. प्रत्येक जिवाने विभिन्न योनीत जन्म घेतल्याने त्यांना फक्त आपापल्या प्रजातीचे महत्व वाटू लागले. आजवर ह्या पृथ्वीवर मनुष्य, देव, दैत्य, दानव, राक्षस, गरुड, नाग, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा, विद्याधर, भूत-प्रेत, पिशाच्च, वानर अशा  विभिन्न योनीतील जीव निर्माण झाले. कालांतराने ते विविध लोकात विविध ठिकाणी राहू लागले. देवी-देवता स्वर्गात राहू लागले. त्यांच्या बरोबरच अस्परा, गंधर्व आणि यक्ष यांना सुद्धा स्वर्गातच स्थान मिळाले. स्वर्गातही विविध लोक आहेत. त्यातही विविध स्तर आहेत. जिथे ह्या सर्वांना आपापल्या पात्रतेनुसार स्थान मिळाले. गरुडांनी पृथ्वीवर राहून आकाशात आपली सत्ता स्थापन केली. दानव, दैत्य, राक्षस यांच्याबरोबरच नागांनाही पाताळात राहण्यासाठी स्थान दिले गेले. त्याचप्रमाणे विद्याधर, भूत-पिशाच यांनी आपापल्या कर्मगतीप्रमाणे त्रैलोक्यात आपले स्थान मिळवले म्हणजेच त्यांचे पृथ्वीवरही गुप्तरुपाने वास्तव्य आहे. पण तरीही प्रत्यक्षपणे मनुष्याचेच या पृथ्वीलोकावर अधिपत्य आहे. आजवर कित्येक सजीवांच्या प्रजाती ह्या पृथ्वीवर उदयास आल्या आणि नष्टही झाल्या. परंतु मनुष्याने फार काळ ह्या ग्रहावर आपले अस्तित्व टिकवून ठेवले. मनुष्याने पृथ्वीवरील बऱ्याचशा सजीवांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याने आपल्या सोयीप्रमाणे एक-एक सजीव प्रजातीला आपल्याजवळ केले आणि वेळप्रसंगी दुरही केले. थोडक्यात मनुष्याने पृथ्वीवरील आपली सत्ता टिकविण्यसाठी या सर्व गोष्टी केल्या. मनुष्याच्या मते पृथ्वीवर फक्त त्याच्या आणि इतर प्राणी, पक्षी आणि कीटक यांसारख्या जीवाचे अस्तित्व आहे. पण ते तितके सत्य नाही. देवता, गंधर्व, अप्सरा आणि यक्ष स्वर्गात जरी राहत असले, तरी ते सुद्धा गुप्तपणे पृथ्वीवर भ्रमण करत असतात. त्याचप्रमाणे अनेक भूत-प्रेत, पिशाच, विध्याधर मनुष्याच्या अवती-भोवती गुप्तरूपाने वास करतात. पण मनुष्याला याची जाणीव नसते. त्याचप्रमाणे ह्या पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे सर्व योनीतील जीव आपल्या मुळ रुपात मुक्तपणे वास करतात.”

“जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळी मी मनुष्य म्हणूनच जन्माला आलो होतो. पण तरीही माझ्यातही नागवंशातल्या बऱ्याचशा शक्ती आल्या होत्या. पण त्या शक्ती तुझ्या शक्तीइतक्या प्रखर नव्हत्या. त्या सुप्त अवस्थेत होत्या. हे माझ्या वडिलांनी ओळखले होते. त्याचवेळी माझ्या वडिलांनी आपल्या मंत्रशक्तींनी माझ्या शरीरातील शक्तींना योग्यप्रकारे नियंत्रित करण्याची विद्या माझ्यामध्ये प्रविष्ट केली. त्यामुळे खूप लहानपणीच मी माझ्या नागशक्ती नियंत्रित करू शकलो. पण तुझ्याबाबतीत तसे घडणे शक्य नव्हते. तुझ्या शरीरातील प्रचंड शक्तींना नियंत्रित करणे इतके सोपे काम नव्हते. त्यामुळे त्यावेळी त्यांना मंत्राच्या सहाय्याने तुझ्याच शरीरात कैद करून ठेवणेच योग्य होते. पण आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे तुला तुझ्या नागशक्तींना व्यवस्थित नियंत्रित करता आले पाहिजे. त्यासाठी तुला त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एका योग्य गुरूची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच तुझ्या त्या गुरूची निवड मी स्वतः केली आहे.”

“मी फार-फारतर पाच वर्षाचा असेन, तेव्हा माझे वडील मला हिमालयात घेऊन गेले. तिथे एक फार मोठी प्राचीन गुहा आहे, जिथे ह्या पृथ्वीची मर्यादा संपते आणि एका वेगळ्याच विश्वाची सुरुवात होते, त्या गुप्त ठिकाणी मी पृथ्वीच्या काळचक्राप्रमाणे तब्बल पन्नास वर्षे राहिलो. तिथे व्यतीत केलेला प्रत्येक दिवस अविस्मरणीय होता. तिथेच मला माझ्या जीवनाचे खरे रहस्य समजले. ज्या ठिकाणी आजही देवता, दैत्य, नाग, भूत-पिशाच, यक्ष, विद्यादार, योगी मनुष्य, ऋषी आणि न जाणो कित्येक जीव वास करतात. ते ठिकाण इतके गुप्त आहे की, मनुष्याला त्याचा कधीच पत्ता लागू शकत नाही. ते ठिकाण म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यांचा संगम आहे. जिथे प्रत्येक प्रजातीमधील जीव इतर प्रजातीमधील जीवांचा आदर करतो. जिथे सर्व मिळून मिसळून राहतात. कारण त्या सर्वांचे एकच ध्येय असते. ते म्हणजे स्वतःची ओळख करून घेऊन, अध्यात्मिक प्रगती करणे. तिथल्या कित्येक जीवांना विविध प्रकारच्या  सिद्धी प्राप्त असतात, प्रत्येकाकडे विविध शक्ती असूनही तिथल्या कोणत्याही जीवाला एकमेकांशी स्पर्धा करावीशी वाटत नाही. कारण तेथील प्रत्येक जीवाला इतर जीवांचे वेगळे असे महत्व जाणून, त्यांचा आदर करणे शिकवले जाते. प्रत्येक जीवाच्या शक्ती आणि उर्जा जरी भिन्न असल्या, तरी त्या सर्वांचे ध्येय मात्र एकच असल्याने ते तिथे एकोप्याने राहतात. तिथे प्रत्येक योनीतील जीवांचा एक गुरु असतो. जो त्यांच्या प्रजातीचे नेतृत्व करतो आणि इतरही प्रजातींच्या जीवाला आपले ध्येय पूर्ण करण्यास मदत करतो. त्या ठिकाणी सिद्ध गुरुंच्या सानिध्यात प्रत्येक शिष्याला त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य प्रशिक्षण दिले जाते.”

“मला जर लहानपणी तिथे नेले गेले नसते, तर कदाचित मी सुद्धा एका मतिभ्रष्ट शक्तिशाली जीवाप्रमाणेच वागलो असतो. माझ्याही मनात आपल्या शक्तींचा गर्व असला असता आणि मग मी इथे पृथ्वीवर मनुष्याबरोबर इतकी वर्षे शांततेत जगूच शकलो नसतो.”

“माझे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ज्यावेळी मी माझ्या गुरुंच्या आज्ञेप्रमाणे पृथ्वीवर परतलो, त्यावेळी मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण माझ्या बरोबर खेळणारी, बागडणारी इथली मुले त्यावेळी वृद्ध झाली होती. त्यांची दुसरी पिढी देखील माझ्यापेक्षा प्रौढ होती. ज्यावेळी मी तिथे गेलो, त्यावेळी मी पाच वर्षांचा होतो. आणि जेव्हा मी इथे परतलो तेव्हा मी दहा वर्षांचा झालो होतो. पण त्या दरम्यान इथे पृथ्वीवर पन्नास वर्षे उलटून गेली होती. कारण ते गुप्त ठिकाण या त्रिमितीच्या पलीकडचे असल्याने तिथे काळाचा परिणाम अत्यंत संथ गतीने होतो. म्हणून पन्नास वर्षात माझे वय फक्त पाच वर्षांनी वाढले होते.”

“इथे परतल्यानंतर माझ्या वडिलांनी मला आमची खरी ओळख लपवण्यासाठी दुसऱ्या एका गावात नेले. मग आम्ही तिथे वास्तव्य करू लागलो. तिथेच माझी आणि वसंतची ओळख झाली आणि वसंतच्या रुपात मला माझा जिवलग मनुष्य मित्र भेटला. बराच काळ आम्ही एकत्र व्यतीत केला. त्यामुळेच तर मी मनुष्यांना नीट समजून घेऊ शकलो. त्याने नंतर तुला इतकी वर्षे स्वतःच्या मुलाप्रमाणेच नीट सांभाळले ज्यामुळे तू आज माझ्यासमोर जिवंत आहेस.”

अशाप्रकारे मोहनने आपल्या जीवनातील बरीचशी रहस्ये प्रकाशला सांगितली होती. त्यामुळे प्रकाश आश्चर्यचकित होईल किंवा त्याबद्दल अजून काही प्रश्न विचारेल असे मोहनला वाटत होते, पण तिथे तसे काहीच घडले नव्हते. सहस्त्रार चक्र जागृत झाल्याचेचं हे सर्व परिणाम असावेत, हे आता मोहनच्या लक्षात आले होते.
. . .