संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||
danger bhut
पंढरीची वारी करणारा तो वारकरी. विठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन त्याच्या दर्शनाच्या ओढीनं सलग अठरा दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपुरी जाणारा तो वारकरी.
कपाळावर गोपीचंदनाचा टिळा किंवा उभं गंध, गळय़ात तुळशीमाळा, हातात टाळ, झांजा किंवा चिपळय़ा, खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर पांढरी टोपी, मुंडासं किंवा पटकुरं बांधून हाती वीणा धारण केलेला वारकरी सहज ओळखता येतो. हे वारकरी जातपात, उच्च-नीच भेदभाव मानत नाहीत. अठरापगड समाजाचे लोक पांडुरंगाच्या ओढीनं वारीत सामील होतात. भक्ती, परमार्थ, प्रपंच यांचा मुक्त आविष्कार या आषाढी वारीत दिसतो. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर। नामाचा गजर सोडू नये। हे वारकरी पंथाचं ब्रीद आहे. तर ‘राम-कृष्ण-हरी’हा संप्रदायाचा जागरमंत्र आहे. विठू माऊलीप्रती असलेला भक्तिभाव आणि श्रद्धेच्या भरभक्कम पायावर उभा असलेला हा वारकरी संप्रदाय भागवतधर्म आणि माळकरी पंथ म्हणूनही ओळखला जातो. वारकरी संप्रदायाचं विठ्ठल हे आराध्य दैवत. हृदयामध्ये पांडुरंगाविषयी भक्ती, प्रीती आणि निष्ठा जागवणा-या या संप्रदायाची प्रगटचिन्हं निरनिराळी आहेत.
वारीमध्ये प्रामुख्याने गळय़ात तुळशीमाळा घातलेले वारकरी दिसतात. विठ्ठलाला तुळस अतिशय प्रिय असल्याचं मानलं जातं. समुद्रमंथनाच्यावेळी जे अमृत निघालं त्यातले काही थेंब जमिनीवर सांडले आणि त्यातूनच तुळस निर्माण झाली. हीच तुळस ब्रह्मानं विष्णूला दिली असा उल्लेख पुराणात आहे. विष्णूस्वरूप विठ्ठलालाही गळय़ात तुळशीच्या माळा घालणं प्रिय आहे. त्यामुळेच तुळशीच्या खोडापासून तयार केलेल्या तुळशीमाळा वारकरी गळय़ात घालतात तर काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सामील होतात.
कपाळावरचा चंदनाचा टिळा सर्वाचंच लक्ष वेधून घेतो. श्रीकृष्ण चिंतनात सर्वस्व अर्पण करणा-या गोपींना जेव्हा श्रीकृष्ण अवतार समाप्तीची वार्ता कळली तेव्हा शोकाकुल गोपींनी द्वारकेजवळच्या एका तलावात आपले देह झोकून दिले. श्रीकृष्णभक्तीनं, निस्वार्थ बुद्धीनं, निस्सिम प्रेमानं सुगंधित झालेले ते अचेतन देह तलावातल्या मातीत मिसळले. गोपींच्या त्या समर्पित देहाचं चंदन झालं, अशी आख्यायिका आहे. गोपीतलावातून सापडणारी त्याग प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक बनलेली ही माती वारकरी भक्तिभावानं माथ्यावर लावतात. ही माती म्हणजेच ‘गोपीचंदन.’
वारकरी संप्रदायात टाळकरींना अतिशय महत्त्व आहे. दोन टाळांच्या आघातामधून होणारा नाद वातावरणाला भारून टाकतो आणि त्याला टाळय़ांची साथ मिळाली की, ब्रह्मनंदाचा साक्षात्कार होतो. ही टाळी जणू द्वैतातून अद्वैत कसं साधायचं हेच शिकवते.
वैदिकयुगात भगवा ध्वज अथवा पताका ही धर्माची प्रतीकं म्हणून वापरली गेली. वारक-यांच्या खांद्यावर अभिमानानं फडफडणारी भगवी पताका जणू संसारातल्या वैराग्यभावनेचं प्रतीक आहे. वारकरी संप्रदायात या भगव्या पताकांना विशेष स्थान आहे.
भजन-कीर्तनात तल्लीन झालेला वारकरी लक्ष वेधून घेतो. टाळ-मृदंगाच्या गजरात आपल्या प्रिय देवतेचं गुणगान गाणं म्हणजे भजन. तर संप्रदायात कीर्तनाला निरुपण म्हणतात. भगवंताचं नामस्मरण, नामगजर, खेळे, फुगडय़ा अशा विविध पद्धतीनं भक्तिभाव व्यक्त केला जातो. चंद्रभागेच्या वाळवंटात जेव्हा हा खेळ रंगतो तेव्हा तो नकळतपणे क्रोध, अहंभाव अशा षडरिपूंना पायाखाली गाडून टाकतो, असं तुकोबा म्हणतात.
टाळकी, पंखवाजवादक, पताकाधारी, विणेकरी अशांचा या वारकरी संप्रदायात समावेश होतो. वीणाधारी वारकरी हा दिंडींचा प्रमुख असतो.
ऊन-पावसाची तमा न बाळगता मजल-दरमजल करीत आलेले हे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपुरी दाखल होतात. प्रथम चंद्रभागेत स्नान करून डोळाभर माऊलीचं दर्शन घेतात. दुस-या दिवशी काल्याचं भजन-कीर्तन झालं की, पांडुरंगाला हृदयात साठवून तृप्त मनानं परतीच्या प्रवासाला निघतात. धन्य ते वारकरी!! धन्य तो वारकरी संप्रदाय!!!
Courtesy : Collected Sources..!!!
. . .