संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : एका अप्सरेच्या मुली
danger bhut
एका अप्सरेच्या मुलीने दिला होता भारताच्या सम्राटाला जन्म
प्राचीन काळापासून भारतीय इतिहासामध्ये रोचक प्रेमकथा प्रचलित आहेत. परंतु एक प्रेमकथा अतिप्राचीन काळाशी संबंधित असून याविषयी फार कमी लोकांना माहिती असावे. ही कथा शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमाची आहे.
शकुंतला आणि दुष्यंत एक अशा प्रेमी युगुलाच्या रुपात प्रस्तुत झाले आहेत की, यांचे सुरुवातीला मिलन नंतर विभक्त आणि शेवटी पुन्हा एकत्रित झाले. महाकवी कालिदास यांनी शकुंतलावर एक विश्वविख्यात नाटक ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’सुद्धा लिहिले आहे. या नाटकामध्ये दोघांच्याही प्रेमकथेतील प्रत्येक पैलूवर सखोल विचार करण्यात आला आहे.
प्राचीन काळी विश्वामित्र ऋषी एका जंगलामध्ये तपश्चर्येत लीन होते. त्याची कठोर तपश्चर्या पाहून स्वर्गाचे राजा इंद्रदेव चिंताग्रस्त झाले. त्यांना भीती वाटू लागली की, विश्वामित्रांची तपश्चर्या यशस्वी झाली तर ते स्वर्गावर अधिराज्य करतील. त्यामुळे इंद्रदेवाने विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या भंग करण्याचा निश्चय केला. विश्वामित्र ऋषी तपश्चर्येमध्ये अत्यंत लीन झाल्यामुळे त्याचे तप भंग करणे खूप कठीण काम होते. शेवटी इंद्रदेवाने त्यांचे तप भंग करण्यासाठी मेनका नावाच्या अप्सरेची मदत घेतली.
अत्यंत सुंदर, मधुर आवाज आणि बहारदार नृत्य करणार्या मेनका अप्सरेच्या सौंदर्याकडे आजपर्यंत कोणीही दुर्लक्ष करू शकले नव्हते. हाच विचार करून इंद्रदेवाने मेनकेला पृथ्वीवर पाठवले. विश्वामित्र ऋषीसमोर जाताच मेनकेने नृत्य करण्यास सुरुवात केली. अप्सरेच्या मंजुळ आवाजाने ऋषींची तपश्चर्या भंग झाली. डोळे उघडल्यानंतर त्यांच्यासमोर सौंदर्याने भरलेली मेनका नृत्य करत असताना त्यांना दिसली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यातून मेनकेने एक सुंदर मुलीला जन्म दिला.
मुलीला जन्म देताच मेनकेचा पृथ्वीवर राहण्याचा काळ पूर्ण झाला होता. दोघांनी एकमताने नवजात मुलीला कण्व ऋषींच्या आश्रमात रात्रीच्या वेळी सोडून दिले. मोठी झाल्यानंतर ही मुलगी शकुंतला नावाने ओळखली जाऊ लागली. शकुंतलाचे पालनपोषण कण्व ऋषींच्या आश्रमात योग्य पद्धतीने झाले. आता शकुंतला यौवनावस्थेमध्ये आली होती. ती दिसला खूपच सुंदर होती. एक दिवशी त्या राज्याचा राजा दुष्यंत शिकार करताना सैनिकांसोबत कण्व ऋषींच्या आश्रमात पोहोचला. तेथे दुष्यंत राजाची भेट शकुंतलाशी झाली. या दोघांच्या मिलनाचे वर्णन महाकवी कालिदास यांच्या नाटकाच्या पहिल्या भागात करण्यात आले आहे.
राजा दुष्यंत शकुंतलाच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनी जंगलात जाऊन गंधर्व विवाह केला. लग्नानंतर राजा दुष्यंत शकुंतलाला आश्रमात सोडून गेले आणि आठवण स्वरुपात एक अंगठी दिली. तसेच लवकर परत येण्याचे वचन दिले, परंतु महिने उलटून गेले तरी दुष्यंत राजाचा कोणताही निरोपसुद्धा आला नाही. राजा दुष्यंत परत येउन शकुंतलाला राणी बनवून महालात घेऊन जाणार होते.
एके दिवशी दुष्यंत राजाच्या विरहामध्ये बुडालेल्या शकुंतलेला तिच्याजावळून दुर्वासा ऋषी गेल्याचेही समजले नाही. शकुंतलाने आपल्याला दुर्लक्षित केल्याचे पाहून ऋषी दुर्वासा तिच्यावर क्रोधीत झाले. त्यांनी तिला शाप दिला की, " तू ज्या व्यक्तीच्या विचारांमध्ये एवढी मग्न झाली होतीस, तो व्यक्ती तुझ्यासमोर आल्यानंतर तुला ओळखसुद्धा देणार नाही"
हे ऐकून शकुंतला रडू लागली आणि दुर्वासा ऋषीकडे क्षमायाचना करू लागली. त्यानंतर दुर्वासा ऋषी म्हणाले की, त्याने तुला दिलेली अंगठी तू त्याला दाखवलीस तर तो तुला ओळखू शकेल. शकुंतलाला मुलीप्रमाणे मानणार्या कण्व ऋषींनी तिला महालात पाठवण्याचा विचार केला.
त्यावेळी शकुंतला गरोदर होती परंतु याची सूचना बाळाचे वडील म्हणजे राजा दुष्यंतला नव्हती. राजा दुष्यंतने दिलेली अंगठी सोबत घेऊन शकुंतला महालाकडे निघाली. नदी पार करत असताना शकुंतलेच्या हातामधील अंगठी नदीमध्ये पडली. अंगठी नदीमध्ये पडल्यामुळे शकुंतला विचारात पडली की, आता राजा दुष्यंत मला कसे ओळखणार. परतू तरीही ती दुष्यंत राजाच्या दरबारात पोहोचली. त्यानंतर शकुंतलाला जी भीती होती तेच घडले. दुर्वासा ऋषीच्या शापामुळे राजा दुष्यंतने तिला ओळखण्यास स्पष्ट नकार दिला. पतीने ओळख न दिल्यामुळे शकुंतला दरबारातून निघून गेली आणि जंगलात राहू लागली. तिथे तिने एका मुलाला जन्म दिला.
या मुलाचे नाव शकुंतलाने 'भरत' असे ठेवले. शकुंतलाने भरतचे पालनपोषण जंगलातच केले. जंगलातील स्वच्छ वातावरणामुळे भरत निरोगी आणि ताकदवान झाला. परंतु शकुंतलाच्या नेहमी वाटायचे की, आपल्या मुलाला वडिलांचा आशीर्वाद मिळावा.
दुसरीकडे राजा दुष्यंतच्या दरबारात एक मासेमारी करणारा कोळी आला. त्याला या माशाच्या पोटामध्ये राजघराण्याची अंगठी मिळाली. ती अंगठी घेऊन तो दुष्यंत राजाकडे आला. अंगठी पाहताच दुष्यंत राजाला शकुंतलाचे स्मरण झाले. काही वेळानंतर राजाला आठवले की, शकुंतला दरबारात आली होती, परंतु ते तिला ओळखू शकले नाहीत. सेवकांनी सांगितले की, ती गरोदर होती आणि येथून जंगलाकडे निघून गेली. राजाने लगेच काही सैनिक जंगलाच्या दिशेने पाठवले. त्यानंतर एक स्त्री आपल्या बालकासह जगलात वास्तव्यास असल्याची सूचना राजाला मिळाली. शकुंतला आणि मुलाच्या भेटीसाठी राजा लगेच जंगलाकडे निघाला.
जंगलात पोहोचताच राजाला एक लहान मुलगा दिसला. तो वाघ, सिहासोबत खेळण्यात मग्न होता. हे दृश्य पाहून राजा दुष्यंत चकित झाला आणि त्याने मुलाला उचलून घेतले. एका अनोळखी मनुष्याने आपल्याला उचलले पाहून मुलगा घाबरून आई..आई म्हणत ओरडू लागला. भरतचा आवाज ऐकून शकुंतला झोपडीतून बाहेर आली.
आपल्या मुलाला राजा दुष्यंतच्या हातामध्ये पाहून शकुंतलाला खूप आनंद झाला. अशाप्रकारे राजा दुष्यंत आणि शकुंतलेचे पुन्हा एकदा मिलन झाले. त्यानंतर राजा दुष्यंत पत्नी आणि मुलाला घेऊन महालात गेले. त्यांनी आपल्या मुलाला सर्वप्रकरचे शिक्षण दिले. राजा दुष्यंतनंतर भरत सत्तेवर विराजमान होऊन सम्राट भरत नावाने प्रसिद्ध झाला. सम्राट भरतने एकाच राज्याला साम्राज्याचे रूप दिले होते. पुढे चालून यांच्याच नावावर 'भारत' देशाचे नाव पडले.
. . .