संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..
danger bhut
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. भाग २ रा ....रुपकुंड
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...
भाग २ रा...
आग्रा नगरात डच लोकांचे एक व्यापारी केंद्र होते, त्या संस्थेचे नाव होते ’डच ईस्ट इंडिया कंपनी’, सन १६२० ते १६२९ या काळात फ्रान्सेस्को पेलेल्सेरेट हा डच अधिकारी त्या केंद्रात होता. सन १६२६ मध्ये त्यांने आपल्या वरिष्ठांना आग्र्यासंबंधित माहिती कळवण्यासाठी जो अहवाल तयार केला होता, त्या अहवालाप्रमाणे आग्रा शहराची लांबी रुंदीच्या मानाने खुपच जास्त आहे. बहुतेक धनिक लोकांचे शोभिवंत राजवाडे नदीतीरालगतच आहेत. ह्या मनोहर नदीतटाची लांबी सहा कोस म्हणजे १०॥ ब्रिटिश मैल आहे, तेवड्या अंतरात बहादुरशहा, राजा भोज, इब्राहिमखान, रस्तुर कंदहारी, राजा किसनदास, इतियादखान, शाहजादा खानम, गुलझार बेगम, ख्वाजा मुहम्मद ठक्कर, ख्वाजा बन्सी, वझीरखान, झोएमपुरा म्हणजे अकबराच्या अनेक विधवा स्त्रिया ज्यात राहात ते प्रशस्त आवार, एतबारखान, बगारखान, मिर्जा अबुसहगल, आसफखान, एतमाद उद्दौला, ख्वाजा अब्दुल हसन, रझिया सुलतान बेगम, ह्यानंतर किल्ला, किल्ल्यानंतर नख्खास नावाची एक मोठी मंडई आहे. त्याच्या पलिकडे पुन्हा काही मोठ्या मानकऱ्यांचे वाडे आहेत, ते असे मिर्जा अब्दुल्ला, आघानुर, जहानखान, मिर्जा करीम, राजा बेतसिंह, कैलासवासी राजा मानसिंग, राजा माधवसिंग ह्यांच्या मोठ्या मोठ्या हवेल्या आहेत.
ह्या अहवालावरुन तरी एक गोष्ट नक्की होते, की त्यासुमारास कैलासवासी राजा मानसिंगांचा ऐश्वर्यसंपन्न राजवाडा आग्र्यात होता, पण बादशहाने मुमताझसाठी बांधायला घेतलेल्या ताजमहालाचा यात अजिबात उल्लेख नाही.
शहाजहान हा सन १६२८ मध्ये जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचा जीव घेऊन त्याने ती सत्ता बळकावली असं म्हणतात. अशी अनेक युद्धे करायला लागल्यामुळे त्याचा खजिना जवळ जवळ संपत आला होता, मग तो लवकरात लवकर भरण्यासाठी शहाजहानच्या सुपिक डोक्यात एक भयंकर योजना शिजू लागली. जयपूरचा राणा मोघलांचा मांडलिक होता, शिवाय जयपूर घराण्याचे आग्र्यात फार मोठे ऐश्वर्यसंपन्न निवासस्थान होते असा उल्लेख तत्कालिन पत्रांतुन मिळतो. त्या निवासस्थानास ‘मानसिंह महल’ असे तत्कालिन नाव होते, ह्या निवासस्थानी राजा मानसिंह यांच्या कारकिर्दित मयुर सिंहासन, शिवलिंगाभोवती रत्नजडीत सोन्याचा कठडा, चांदीची द्वारे, शिवलिंगावर सतत जलाभिषेक होत रहावा या साठी बसवलेला सोन्याचा घट, संगमरवरी जाळीत जडवलेली अनेक अतिमौल्यवान रत्ने व त्यावर लोंबणाऱ्या टपोऱ्या मोत्यांच्या माळा असा झगमगाट होता. एवढी अफाट संपत्ती कोणत्यातरी सहज पटणाऱ्या कारणामुळे हस्तगत करुन आपला स्वार्थ साधावा अशी भयानक योजना बादशहा शहाजहानच्या मनात घोळू लागली. हे जर साध्य झालेच तर एका बाणात दोन पक्षी मारण्याचा बेत सहज जमणार होता, एक म्हणजे शाही खजाना पुन्हा तुडुंब भरणार होता, आणि दुसरे म्हणजे एका धनाढ्य हिंदु राजाला नाडल्याचे आंतरिक समाधान.
ह्या सर्व राजकारणामागे एक गोष्ट अशीही असू शकेल, की जयपूर शहर हे आग्र्यापासून ३०० – ३५० मैल लांब आहे, एवढ्या दुरुन आग्र्यातील आपल्या ऐश्वर्यसंपन्न नेत्रदिपक राजमहालाचे संरक्षण करण्याइतके सैन्यबळ जयपूर घराण्याकडे नसावे, किंवा आग्र्यातील मोघल राजवटीत आपल्या या मौल्यवान हवेलीचे आपल्या बळावर संरक्षण करण्याचे मनोधैर्यही कदाचीत या घराण्यातील लोकांकडे नसावे. पाच पिढ्यांपासून मोघलांच्या दरबारी खोट्या मानसन्मानाने उभे रहाणारे हे राजपुत , त्यांच्यावर स्वत:ची कितीही पिळवणुक झाली तरी मुकाट्यानी सहन करण्याशिवाय दुसरा काहीही पर्यायच नसे किंवा आपला घोर अपमान होतो आहे हे त्यांच्या ध्यानीही येत नसावे.
शहाजहानने आपल्या मनात घोळत असलेल्या बेताला अंजाम देण्याचे ठरवले, त्यानुसार मुमताझची प्रेतयात्रा आग्र्यात पोहोचताच मोघली सेनेने आग्र्यातील तेजोमहालयाला वेढा घातला, त्याच्या वरच्या खोल्यांतून चुल पेटवुन स्वयंपाक केला, पाण्याचे हंडे तापवले आणि त्या वरच्या मजल्याचे छत पार धुरकटुन टाकले ( हे धुरकटलेले छत आजही दिसते ). तशाच वेढलेल्या अवस्थेत मुघली सैन्याने संगमरवरी मजल्यातील मध्यवर्ती अष्टकोनी कक्षात असलेले शिवलिंग उपटुन काढले आणि तेथेच चर करुन त्यात शिवलिंग पुरुन टाकले आणि त्यावर मुमताझची कबर बनवुन त्यावर तिचे नाव कोरवले, त्याचबरोबर संगमरवरी चौथऱ्याच्या तळाशी असलेल्या कक्षातले शिवलिंगही तिथेच पुरुन टाकले असावे.
आपल्याला ताजमहालात मुमताझच्या नावाची दोन थडगी दिसतात, एक संगमरवरी मजल्यात आणि दुसरे त्याच थडग्याच्या बरोबर खाली तळमजल्याच्या खोलीत. असं म्हणतात की इस्लाम धर्माचा संस्थापक मुहंमद याने मरताना सांगितले की, मरणोपरांत त्याचे थडगे वगैरे न बनवता, त्याचे शरीर पुरुन टाकावे व त्यावरील जमिन सपाट करुन टाकावी, ज्यायोगे त्याच्या दफनस्थानाचा मागमुसही लागु नये. बादशहा इस्लाम धर्माचा कडवा अनुयायी होता, तर त्याने आपल्या बायकोची एकावर एक अशी दोन दोन थडगी का बांधवली? हिंदुस्थानाचा सम्राट म्हणवणाऱ्या बादशहाने असे धर्माविरुद्ध काम कसे काय केले?
तेजोमहालय ही इमारत सात मजली असून पैकी चार मजले संगमरवरात आहेत, आणि त्याखालचे तीन मजले लाल दगडांचे आहेत. ह्या सातही मजल्यावरच्या भिंती जाडजुड विटांच्या असून त्यांचा पृष्ठभाग संगमरवरी किंवा लाल शिळांनी सजवलेला आहे. ह्या संगमरवरी चौथऱ्यात शेकडो खोल्या असाव्यात हे त्यातील दर्शनी भागातून दिसणाऱ्या कमानींच्या रांगांवरुन समजते. लांबीच्या बाजुला सुमारे ३० कमानी आणि रुंदीच्या बाजुला सुमारे २० कमानी धरल्या, संगमरवरी चौथऱ्याच्या आतच सुमारे ६०० खोल्यां़ची तरतुद आहे. त्यातुन खालचे तीन लालदगडांचे मजले आणखिनच लांबरुंद असल्याने एकुण ह्या इमारतीत सर्व मिळून हजार – दीड हजार कक्ष सहज बसतील. ह्या इतक्या अवाढव्य संगमरवरी व लाल दगडी भव्य तेजोमहालयाची निर्मिती करणे तर लांबच, बादशहाने ह्या सुंदर महालयाची अक्षरश: लुट केली, पार पार दैना केली. जी काही संपत्ती होती, ती सर्वच्या सर्व ( मोत्याच्या सरी, चांदी / सोन्याचे घट, चांदीची दारे, सोन्याचा रत्नजडीत कठडा, जाळीतील रत्ने आणि मयुर सिंहासन ) लुटून नेले आणि मोघली खजिन्यात जमा केले. प्रत्येक मजल्याच्या मध्यवर्ती कक्षाची भुमी फोडुन त्यात चर खणुन एक एक छोटे थडगे उभारले. तत्पष्चात त्या अवाढव्य महालात चपरासी, हुजुरे, मुजावर, फकीर, इमाम, शिपाई, भिकारी वगैरेंनी आपापले संसार थाटू नयेत म्हणून विटा, चुना, दगड, माती या सामानांचे ढीगच्या ढीग मागवून हजारो मजदूर कामाला लावुन त्या सातमजली तेजोमहालयातील हजार – दीड हजार खोल्या, दालने, जिने, खिडक्या वगैरे विटांनी बंद करुन टाकले.
ह्या गोष्टीचे वर्णन टॅव्हर्नियर, बर्नियर सारख्या समकालिन परदेशीय प्रवाशांनीही करुन ठेवले आहे, त्यांच्या नोंदींप्रमाणे, हजारो मजूर काम करताना दिसत होते, चांदीची द्वारे व सोन्याचे कठडे यांचे ढीगच्या ढीग पडलेले दिसत आहेत, प्रत्येक मजल्यावर खोदकाम सुरु असून त्यात छोटी छोटी थडगी उभारली जात आहेत, मध्यभागी मुमताझबेगमचे थडगे सुंदर प्रकारे सजवण्याचे काम सुरु आहे, पण…… प्रत्यक्षात मात्र काय चालले होते, तर हजारो मजूर काम नक्कीच करत होते, पण कुठले काम, तर चांदीची द्वारे व सोन्याचे कठडे यासह अनेक मौल्यवान गोष्टी तेजोमहालयातुन उपटुन काढून बादशहाचा खजीना भरण्याचे काम. प्रत्येक मजल्यावर खोदकाम नक्कीच सुरु होते, पण ते खोदकाम म्हणजे जमीनीत चर खणून त्यात देवीदेवतांच्या बहुमोल मुर्ती चिणण्यासाठी लागणारे खोदकाम सुरु होते, तेथेच छोटी छोटी थडगी उभारण्याचे काम सुरु होते. मुमताझच्या थडग्यावर चहुबाजुने वेलबुट्टी कोरण्याचे काम सुरु होते. बाकी काही म्हणा, परदेशीय प्रवासी वर्णने फारच अचुक करतात, त्यांनी नोंदलेला मजकुराचा एकुण एक शब्द संपुर्णपणे खरा आहे.
मुमताझच्या कबरीवर शहाजहानच्या पडत असलेल्या अश्रुंमागचे ऐतिहासिक सत्य म्हणजे तेजोमहालाच्या दोन मध्यवर्ती कक्षात जी शिवलिंगे होती, त्यावर साखळदंडाने एक एक घट टांगुन ठेवलेला असे, हे घट चांदीचे व सोन्याचे बनवलेले असत, ते ज्या साखळीवर टांगुन ठेवले असत, ती साखळी आजही दिसून येते, ती साखळी मुमताझच्या थडक्याच्या बरोब्बर वरती आहे, थडग्याच्या जागी शिवलिंग होते, त्यावर त्या सोन्याचांदीच्या घटातून अखंड पाणी ठिपकत राहुन महादेवाला थेंबाथेंबाने अभिषेक होत रहावा अशी व्यवस्था राजपुत सम्राटांनी केलेली होती. बादशहाने घट काढून नेले, शिवलिंगाच्या जागी थडगे बनवले, तरी त्या स्थानावर थेंब थेंब पाणी ठिबकत रहाते असा लोकांचा समज आहे, आणि कालांतराने थेंबाथेंबाने होणाऱ्या अभिषेकाच्या पाण्याचे रुपांतर शहाजहानच्या अश्रुंमध्ये झाले.
ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे हात कोपरापासून कलम केल्याबाबतही असेच काही तरी असावे ( कदाचित निव्वळ लोणकढी थाप असावी ), बादशहाला तेजोमहालयामधील अपरंपार संपत्ती लवकरात लवकर लुटून आपल्या खजीन्यात भरायची होती, त्यासाठी त्याला हवे होते प्रचंड मनुष्यबळ. मग तो मुसलमान असो नाही तर हिंदु असो, जो कोणी माणूस, वृद्ध, स्त्री, पुरुष, लहान मुले त्याच्या सैनिकांच्या कबजात येई, त्याला बळजबरीने ह्या कामावर लावले जात असे, राजीखुषीने नाही मानले तर जबरदस्तीने, दहशत बसवुन, चाबकाचे फटके मारुन, उपाशी ठेवुन, लाथाबुक्क्यांनी मारुन, येनकेनप्रकारेण प्रत्येकाला या कामासाठी जुंपले असावे. अशा या बळजबरीतुन, मारामारीतुन, कोणी एखाद-दुसरे हिंदु ह्र्दय ह्या येवढ्या सुप्रसिद्ध राजमहालाची नासधुस करताना जर बंड करुन उठले असेल, तर बाकीच्यांवर कमालीची दहशत बसवण्यासाठी त्याचे हात कोपरापासून कलम केलेही असतील.
शहाजहान बादशहाने जर खरचं ताजमहाल बांधला असता, तर तशी नोंद समकालीन बखरींमध्येही विशेषत: ‘बादशहानामा’ मध्ये तरी हवीच हवी. या विषयी बादशहानामामधे असलेली नोंद पाहूया, ( खंड १ पृष्ट ४०२ आणि ४०३ )
” …………. शुक्रवार १५ जमालदुल अव्वल ह्या दिवशी मरहूम मुमताझ-उल-झमानीचा मृतदेह जो काही काळ जमिनीत (बुऱ्हाणपुरात) पुरला होता, त्याची ( जमिनीतुन उकरुन ) प्रेतयात्रा सुरु झाली, महंमद शहासुजा बहादुर वझीरखान व मृत राणीचे मनोगत जाणणारी तिची दासी सातुन्निसा खानम ह्यांचेसह ते बेगमेचे शव अकबराबाद (आग्रा) नगरात पोहोचले. त्या प्रेतयात्रेत फकीर व अन्य गोरगरीबांसाठी नाणी उधळण्यात आली. (प्रेतयात्रा कसली, मरणोपरांत बेगमेचा देह पुन्हा उकरुन काढणे, आणि इच्छित स्थळी आणवणे याला ‘धिंड’ हा शब्द जास्त समर्पक आहे).”
“मुमताझला (पुन्हा आग्र्यात) पुरण्यासाठी जे स्थान निश्चित केले होते ते म्हणजे नगराच्या दक्षिण भागात असलेले एक सुंदर विस्तिर्ण उद्यान होय, ह्या उद्यानात ’मानसिंह महल’ नावाचा एक राजवाडा होता. राणा मानसिंगांचा नातु मिर्झा राजा जयसिंग याच्या मालकीचा तो राजवाडा आहे. मुमताझला तेथे पुरण्याचे ठरले. त्या साठी बादशहाने मिर्झा राजाकडून ती जमीन विकत घेतली, व त्याच्या बदल्यात त्याला आग्र्यातील काही जमीन दिली.”
“जमादुल सानिया १६ या दिवशी मुमताझचे शव आग्र्यात येऊन पोहोचले. पुढल्या वर्षी ते पुरण्यात आले. शाही आज्ञेनुसार अधिकाऱ्यांनी अद्वितीय सौंदर्याच्या त्या घुमटाच्छादित गगनचुंबी इमारतीत मुमताझचे शव पुरले. त्या इमारतीची भव्यता हे शहाजहानच्या महान साम्राज्यशक्तीचे द्योतक आहे. उत्तम कारागिरांच्या देखरेखीत शव पुरण्याचे कार्य संपन्न झाले. एकूण खर्च चाळीस लाख रुपये आला.”
बादशहानामामधील या उताऱ्यात ताजमहाल हा शब्द कुठेही आलेला नाही, तसेच मुमताझचे प्रेत निदान एक वर्ष तरी पुरले जाण्याची वाट पहात होते हे नक्की. या वरुन मुमताझच्या मृत्युनंतर शहाजहानचा प्रचंड दु:ख झाले असावे, आणि म्हणून त्याने ताजमहाल बांधायला काढला असावा असे कुठेही वाटत नाही, कारण ज्या वेळेला बुऱ्हाणपुरात बेगमेचा मृत्यु झाला त्या वेळी, तिला प्राथमिक बुऱ्हाणपुरात पुरले त्यावेळी, तिचे प्रेत उकरुन काढले त्यावेळी आणि आग्र्यात आणुन तिला पुन्हा पुरले त्यावेळीही बादशहा स्वत: कधीच हजर नव्हता. त्याशिवाय बादशहानामा मध्ये वर्णन केल्याप्रमाणे पुरण्यासाठी निवडलेले स्थान ‘सब्ज जमिनी’ म्हणजे हिरवेगार उद्यान व त्यावरील ‘इमारत-ए-आलिशान’ किंवा ‘गुंबझे-मंझिले राजा मानसिंह’ म्हणजे मानसिंहाचा अद्वितीय सौंदर्याचा घुमटाच्छादित राजवाडा म्हणवणाऱ्या इमारतीत मुमताझला पुरले हे स्पष्ट आहे.
- ३ रा पुढील भाग उद्या...
संदर्भ : medhakanitkar blog
. . .