भूतकथा भाग ४
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

भूतकथा भाग ४ : ८ दरवाजा उघडू नका १-२

भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.

७ रात्रीस खेळ चाले ३-३   ९ दरवाजा उघडू नका २-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

~चारूशीला~

माझे नाव चारुशीला .माझ्या मैत्रिणीचे नाव सुशीला.मला सर्वजण चारू नावाने हाक मारतात.तर सुशीलेला सर्वजण शीला म्हणून हाक मारतात.आम्ही जरी दूर राहात असलो,आमची घरे एकमेकांपासून दूर असली , तरी आमची मैत्री घट्ट आहे .बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत आम्ही बरोबरच आहोत.दोघांची एकच बालवाडी एकच शाळा आणि दोघांचे  एकच महाविद्यालय.त्यामुळे आम्ही नेहमी बरोबरच असतो.मी शास्त्र शाखेकडे जावे असे आई वडिलांचे मत होते.मला कॉमर्स शाखेकडे जायचे होते .शीला कॉमर्स घेणार होती.ती तुझी जिवलग मैत्रीण कॉमर्स घेत आहे म्हणून तर तू कॉमर्स घेत नाहीस असे मला माझ्या आईने विचारले .त्यावर मी हसत हसत नाही असे सांगितले .तरीही कुठे तरी दोघींनी एकच शाखा घ्यावी असा विचारच प्रभावी होता यात शंका नाही .त्यामुळे आम्हा दोघींना  एकमेकांबरोबर राहता येणार होते.

शीलाच्या मामेबहिणीचे लग्न होते .लग्नाला चार दिवस तिच्या आई वडिलांना जाणे अर्थातच अत्यावश्यक होते .त्याचवेळी आमची युनव्हर्सिटीची परीक्षा होती . शीलाच्या मनात  लग्नाला जावे असे कितीही असले तरी ती जाऊ शकणार नव्हती .काय करावे असा प्रश्न निर्माण झाला . शीलाचे दूरचे नातेवाईक गावातच रहात होते .त्यांच्याकडे जाऊन चार दिवस शीलाचे आईवडील येईपर्यंत रहाणे हा  एक पर्याय होता .परंतु शीला तिथे जावून राहायला तयार नव्हती.माझ्याकडे ये असे मी तिला सांगत होते. परंतू आमची जागा लहान असल्यामुळे सगळय़ांनाच अडचण झाली असती .मीच तिच्याकडे अनेकदा अभ्यासासाठी जात होते.मी शीलाकडे अनेकदा रात्री राहण्यासाठीही जात असे .तिला स्वतंत्र बेडरूम होती .शेवटी शीलाने तिच्या घरीच राहावे .मी तिच्या सोबतीसाठी तिच्या बरोबर राहावे.जेवणाचा डबा बाहेरून मागवावा असे ठरले .तिचे आईवडील लग्नासाठी निघून गेले.माझा बाडबिस्तरा घेऊन मी चार दिवस तिच्याकडे राहण्यासाठी गेले.

शीलाचा बंगला  गावातील वस्तीपासून थोडा दूर आहे . आमचा जेवणाचा डबा गावातून येत होता .दोन दिवस व्यवस्थित गेले .दोन पेपरही तेवढ्यात झाले होते.रात्रीचा जेवणाचा डबा लवकर सात साडेसात पर्यंत आणून द्यावा असे सांगितले होते.त्याप्रमाणे डबा येत असे.तिसऱ्या दिवशी आठ वाजले तरी डबा आला नाही .आम्हाला दुसऱ्या दिवशी पेपर होता .आम्ही अभ्यासात गुंगून गेलो होतो.डबा न आल्याचे आमच्या नऊ वाजता लक्षात आले. आता स्कूटरवरून गावात जाणे किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जावून जेवणे असे दोन पर्याय होते .आमच्या गावात अजून पार्सल सर्व्हिस चालू झाली नव्हती .नाहीतर एखाद्या रेस्टॉरंटमधून काहीतरी मागवून आम्ही जेवलो असतो .ज्या काकूंकडून डबा येत असे त्याना फोन करून झाला.काही अपरिहार्य कारणांमुळे त्या डबा पोचवू शकत नव्हत्या. एक दोनदा त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला होता.परंतु फोन लागला नव्हता.दुसऱ्या आकस्मिक तातडीच्या कामात व्यस्त असल्यामुळे नंतर त्या फोन करायलाही विसरल्या होत्या.

आता घरातच जसे जमेल तसे काहीतरी शिजवून करणे आम्हाला क्रमप्राप्त होते .घरात मॅगी नूडल्स होत्याच.ब्रेड बटरही आणलेला होता. तेव्हा नूडल्स व टोस्ट करून खावे असे आम्ही ठरविले .आमची बेडरूम वरच्या मजल्यावर होती .आम्ही अभ्यासात गुंग झालो होतो .एवढा अभ्यास पूर्ण झाला की मगच नूडल्स व टोस्ट  करून खावे असे आम्ही ठरविले . संध्याकाळी पाचसहा वाजता काहीतरी खाल्लेले असल्यामुळे  भूकही लागली नाही. जवळजवळ रात्री बारा वाजता आम्ही खाली किचनमध्ये आलो .मॅगी व टोस्ट करण्याच्या कामांमध्ये आम्ही दोघी व्यस्त झालो होतो.घडय़ाळाकडे  आमचे लक्षही नव्हते.

एवढ्यात बाहेरच्या  दरवाज्यावरील बेल कुणीतरी वाजविली.रात्रीच्या शांततेत तो आवाज फारच मोठा वाटला .आम्ही दोघी जागच्या जागी स्तब्ध झालो .अकस्मात बेल वाजल्यामुळे आम्ही दचकलो होतो .बेल वाजल्यावर किंवा कुणीतरी दरवाजा ठोठावल्यावर जावून दरवाजा उघडणे ही आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असते .त्याप्रमाणे मी जाण्यासाठी निघाले .शीलाने माझा हात घट्ट धरला .तोंडावर बोट ठेवले .मान हलवून दरवाजा उघडू नको असे सांगितले.नंतर हळूच स्पष्ट आवाजात ती म्हणाली .तुझे घडय़ाळाकडे लक्ष आहे काय ?रात्रीचे बारा वाजले आहेत. ही वेळ वाईट असते .कोणत्याही परिस्थितीत रात्री बारा नंतर दरवाजा उघडायचा नाही असे बाबांनी व आईनेही बजावून बजावून सांगितले आहे .रामण्णाच्या कथा सर्वत्र सांगितल्या जातात .त्या तुलाही माहित आहेत .गावाबाहेर सर्व बंगले व सोसायटी यामध्ये रामण्णाची दहशत आहे .आपला त्यावर  विश्वास नाही हे खरे.परंतु उगीच विषाची परीक्षा कशाला ?बाहेर रामण्णा नसेल कशावरून ?दरवाजा उघडला तर तो आत येईल .नंतर आपले काय होईल ते सांगता येत नाही .

+++

रामण्णा हा कुणी दाक्षिणात्य नव्हता.तो मवालीही नव्हता.ते एक भूत होते .त्याला रामण्णा नाव कां पडले ती एक अाख्यायिका  होती .सुमारे वर्षभर झाले असेल.तोपर्यंत कुणालाही रामण्णाचे  नाव  माहित नव्हते. गावातून एक रस्ता हायवेला जाऊन मिळत होता.त्या रस्त्यावर एक पिंपळाचे झाड होते .रस्ता पिंपळाखालून जात होता.एक दिवस त्या रस्त्याने जाणारा कुणीतरी दमल्यामुळे विश्रांती  घेण्यासाठी पिंपळाच्या पारावर बसला.त्यावेळी अकस्मात त्याच्या पुढ्यात एक खेडूत येऊन उभा राहिला .खाली धोतर पायात चपला अंगरखा डोक्याला मुंडासे असा त्याचा अवतार होता.कुणीतरी खेडूत कामासाठी आला असेल असे वाटसरूला वाटले.तो खेडूत वाटसरूच्या शेजारी येऊन बसला.दोघांमध्ये काहीही बोलणे झाले नाही .वाटसरूने पाव्हण्याला नाव विचारले.त्याने त्याचे नाव रामण्णा सांगितले.कुठून आला असे विचारता इथूनच असे तो म्हणाला.राहता कुठे असे विचारता त्याने वर बोट दाखवले.वर म्हणजे झाडावर की आकाशात वाटसरूला काहीच कळेना.पाहुणा बहुधा थोडा सिर फिरा आहे असे वाटसरूला वाटले.त्याने त्याच्याशी पुढे बोलणे टाळले. विश्रांती झाल्यावर वाटसरू आपल्या वाटेने निघाला .मी तुमच्याबरोबर आलो तर चालेल का म्हणून त्याने विचारले.हो म्हणताच ती आकृती धूसर होऊन वाटसरूच्या शरीरात शिरली.वाटसरू रस्त्याने वेडय़ासारखे चाळे करीत चालला होता. भेटेल त्याला तो मी रामण्णा असे सांगत होता .त्याच्या ओळखीचा एक माणूस भेटला .त्यालाही त्याने मी रामण्णा असे सांगितले .अहो तुम्ही तर माझ्या गावचे हरीराम त्याला ओळखणारा म्हणाला . त्यावर तो नाही नाही मी रामण्णा मी रामण्णा असे ओरडत राहिला.त्याला भेटलेला त्याच्या गावचा गावकरी तालीमबाज होता .त्याच्या गळ्यात मारुती असलेले लॉकेट होते.हायवेवर त्यांच्या गावाला जाणारी बस होती.बसमध्ये चढायला रामण्णा तयार होत नव्हता.त्या तालिमबाज माणसाने त्याचा हात धरला.व त्याला बसमध्ये चढवण्याचा प्रयत्न केला .पिंपळाच्या पारापासून गावातील दोघेजण त्यांच्या मागून बसने जाण्यासाठी येत होते.त्यांनी वाटसरू बरोबर असलेला रामण्णा धूम्ररूपाने वाटसरूच्या शरीरात शिरताना पाहिला होता.तेव्हापासून तो मी रामण्णा मी रामण्णा असे प्रत्येकाला सांगत होता, तेही त्यांनी ऐकिले पाहिले होते.हरीरामच्या शरीरातून  त्याला बाहेर पडतानाही त्यांना जाणवला होता .

त्यांनी गावात सर्वांना पिंपळाच्या झाडावर रामण्णा राहतो. आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिला असे सांगितले.त्यांना तो कुठे दिसला, कसा दिसला,इत्यादी माहिती ते रंगवून सांगत असत.तेव्हापासून गावात पिंपळाच्या झाडावर रामण्णा राहतो अशी बातमी सर्वत्र प्रसृत झाली.

त्यानंतर रामण्णा इकडे दिसला रामण्णा तिकडे दिसला अशा बातम्या येऊ लागल्या .प्रत्यक्षात त्याने कुणालाही काहीही केले नाही.एक दिवस एका बंगल्याचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज झाला. बेल न वाजवता उगीचच कोणीतरी दरवाजा कां ठोठावत आहेत असे बंगल्यातील कुणीतरी म्हणाले.लगेच बेल वाजवल्याचा आवाज आला.बेल वाजवणे इतके लगेच होते की जसे काही बोलणे बाहेर ऐकू गेले होते आणि म्हणून त्याने दरवाजा ठोठावण्याचे बंद करून बेल वाजवली होती.बाहेरच्या दरवाज्याला जाळीदार संरक्षक दरवाजा होताच.तसेच खिडकीतून बाहेर कोण आले आहे तेही पाहण्याची सोय होती.खिडकीतून पाहता दरवाजाबाहेर कुणीच नव्हते .मात्र बेल वाजत होती. दरवाजा ठोठावला जात होता.जशी काही कुणाला तरी आत येण्याची घाई झाली होती. कुणीतरी घड्याळात पाहून अरे बारा वाजले आपल्या लक्षातच आले नाही असे म्हणाले.

*रात्री बारा वाजल्यावर किंवा नंतर बंगल्याचे, ब्लॉकचे, दरवाजे ठोठावण्याचे किंवा बेल वाजल्याचे आवाज येऊ लागले.*

*बाहेर मात्र कुणीही नसे.  बाहेर जे कुणी होते ते दरवाजा उघडल्याशिवाय आंत येऊ शकत नव्हते.*

*कुणीतरी रात्री रामण्णा दरवाजे ठोठावतो बेल वाजवतो अशी पुडी सोडून दिली.*

*खरेच रामण्णा होता की आणखी कुणी होते ते माहीत नाही .*

*रामण्णा खरेच अस्तित्वात होता की नुसती हूल होती तेही कुणाला खात्रीलायक  माहीत नव्हते.* 

*कांही जणांकडे  जाळीचा दरवाजा ( संरक्षक दरवाजा) होता.आतील दरवाजा उघडल्यावर संरक्षण दरवाजातून बाहेर कोण आले आहे ते दिसत असे .बेल वाजत असे, दरवाजा कोणीतरी ठोठावेत असे, परंतू बाहेर कुणीही नसे.*    

(क्रमशः)

२५/९/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

. . .