भूतकथा भाग ४
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

भूतकथा भाग ४ : ५ रात्रीस खेळ चाले १-३

भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.

४ घात (भाग३)   ६ रात्रीस खेळ चाले २-३

(  ही गोष्ट संपूर्णपणे काल्पनिक आहे .नाव स्थान इत्यादी गोष्टींमध्ये कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

शहर आडवे आणि उभे वाढत होते.जमिनीला सोन्याचा भाव येत होता .ज्यांनी पूर्वी काही शेकडो रुपयांत जमिनी घेतल्या किंवा ज्यांच्या वडिलोपार्जित जमिनी होत्या ते आता कोट्याधीश झाले होते .अकस्मात त्यांची गणना सधन वर्गात होऊ लागली होती. शहराचा मध्यभाग हळूहळू  सरकत पश्चिमेला जात होता.शहराची वाढ पश्चिम दिशेने होत होती .नवीन नवीन निवासी संकुले व व्यापारी संकुले उभी राहत होती .या सर्व गर्दीमध्ये एक फार फार मोठा प्लॉट रिकामा होता .दोन चारशे फ्लॅट असलेले एखादे स्वयंपूर्ण  निवासी संकुल किंवा फार मोठा मॉल उभा राहील एवढी ही जागा होती .

ही जागा कुणाची होती त्याची  कुणालाही कल्पना नव्हती.  त्याबद्दल अनेक अफवा कहाण्या किंवा वदंता होत्या .

फार जुन्या काळी येथे एक राजवाड्यासारखा  मोठा वाडा होता .पूर्वीच्या जुन्या पद्धतीप्रमाणे तिथे एक संयुक्त कुटुंब  राहात होते.त्यांची जमीनदारी होती .चुलत भावंडांमध्ये भांडणे झाली .पाच सहा वाटे पडले . वाड्याच्या निरनिराळ्या भागात ही कुटुंबे राहू लागली. कुणाकडून कसे काय माहित नाही, एके दिवशी अन्नातून सर्वांना विषबाधा झाली .सर्वजण मरून पडले .त्यांच्या इच्छा आशा आकांक्षा तश्याच राहिल्या.त्यातील काही आत्मे तिथेच  घुटमळत राहिले.रात्री बारानंतर तो वाडा जागृत होतो. ती माणसे जागृत होतात.तिथे त्यांचे तांडव चालते.जर त्या आवारात कुणी गेला तर त्याला ते सोडीत नाहीत.हमरस्त्यावरुन येणार्‍या जाणाऱ्याला किंवा आसपासच्या  इमारतीतून राहणाऱ्यांना केव्हा केव्हा ते सर्व तांडव  दिसते.काही जणांनी त्या बाजूच्या खिडक्या कायमच्या बंद करून घेतल्या आहेत. 

तर काही जणांनी त्या बाजूला काळे पडदे लावले आहेत.

तर काही जण भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे म्हणून न घाबरता, खिडक्या उघड्या ठेवतात .आम्हाला कधीही काहीही दिसले नाही असे अभिमानाने सांगतात.हे सर्व मनाचे खेळ आहेत .त्या बाजूने वारा छान येतो,खिडक्या बंद करून,काळे पडदे लावून, आपण उगाच गुदमरतो, चला हवा येऊ द्या  असेही  काही जणांचे म्हणणे आहे.

आणखी एक कहाणी अशी सांगितली जाते .फार जुन्या काळी येथे ख्रिश्चनांचे कब्रस्तान होते.सर्व जागा कबरीनी व्याप्त झाल्यामुळे आणखी कुठेतरी जागा विकत घेऊन त्या  जागेचा कब्रस्तान म्हणून वापर सुरू झाला .काळाच्या ओघात थडगी नष्ट झाली. भूकंपामुळे,पावसाने, जमिनीमध्ये सर्व थडगी खोलवर खचली गेली .आता ही जागा मोकळी दिसते .परंतु त्या कबरीतील थडग्यातील आत्मे येथे आहेत आणि रात्री बारानंतर ते दिसतात.ते येथे फिरत असतात .ही जागा पछाडलेली आहे .

काही जण ख्रिश्चनांच्या कब्रस्तानाऐवजी मुस्लिमांचे कब्रस्तान येथे होते असे म्हणतात.बाकी सर्व कहाणी वरीलप्रमाणेच सांगतात.

हिंदूंचे स्मशान येथे एके काळी होते असेही काही जण मानतात .

येथे दर्गा होता. पीरबाबा होता. कुणाची तरी समाधी होती. काळाच्या ओघात भूकंपामुळे ते सर्व नष्ट झाले असेही काही जणांचे मत होते .

एका बाबतीत सर्वांचे एकमत होते .ही जागा भारलेली आहे. डेंजर आहे. येथे रात्री बारानंतर काय काय प्रकार दिसतात.

येथे कुणीही जाऊ नये.उगीच विषाची परीक्षा कशाला.  

या जागेबद्दल काहीही अफवा कहाण्या असूदेत.  निरनिराळ्या बिल्डरांच्या डोळ्यात ही जागा सलत होती हे नाकारता येणार नाही .इथे किती कोटींचा बारदाना उभा करता येईल व त्यातून किती कोटी मिळतील  याबद्दल निरनिराळ्या जणांचे निरनिराळे आडाखे होते .

भव्य निवासी संकुल बांधावे .जॉगिंग, स्विमिंग, प्रार्थना जागा ,जिम व योगासाठी जागा , देऊळ, ज्येष्ठांसाठी क्लब,जिथे सर्व प्रकारची खेळणी असतील अशी लहान मुलांसाठी खेळण्याची जागा,नेहमीच्या गरजेच्या वस्तू मिळण्यासाठी दुकाने,बँक,अशा सर्व सोयी येथे असाव्यात .थोडक्यात येथे स्वयंपूर्ण वसाहत उभी करावी .येथून स्टेशनपर्यंत जाण्यासाठी बसेस रिक्षा यांची सोय असावी .असे काही जणांचे स्वप्न होते .

काही जणांना येथे सर्व प्रकारच्या ऑफिसिससाठी जागा बांधून उपलब्ध करून द्याव्यात असे वाटत होते .सामान्यतः ऑफिसेस संध्याकाळी बंद होत असल्यामुळे रात्री येथे काहीही घडत असो किंवा नसो त्याचा उपसर्ग कुणाला होणार नाही.असा विचार या योजनेमागे होता .

काही जणांना येथे फाइव्ह स्टार हॉटेल सुरू करावे असे वाटत होते .भूत बित सब झूट आहे. एकदा जागा विकसित झाली की असलीच तरी  सर्व भूते पळून जातील.

मॉल, रेस्टॉरंट्स, मल्टी स्टोरी अनेक सिनेमागृहे, नाट्यगृह,इत्यादी रचना करावी,असे काही बिल्डर्सला वाटत होते .

भव्य व्यापारी संकुल उभे करावे असे काही जणांना वाटत होते .

ही जागा मिळविण्यासाठी बिल्डर्स मंडळींमध्ये स्पर्धा होती .

ज्याला ही जागा मिळेल तो घरावर सोनेरी कौले घालील  असे  थोडे बहुत विनोदाने थोडेबहुत गंभीरपणे  म्हटले जात असे.

कुणीही  खरेदी करायची झाल्यास प्रथम ही जागा कुणाची असा प्रश्न होता .ही जागा चर्चची असे कांही म्हणत.कांहीजण मशिदीची म्हणत.मुस्लीमांपैकी शिया, सुनी, खोजा ,सुफी,अश्या  कुणातरी संस्थेची  ती जागा आहे असेही समजले जात असे.

एका पारशी कुटुंबाची ती जागा आहे. सध्या त्या कुटुंबाचे वारस परदेशात राहतात असेही काही जण सांगत.

बिल्डर लोकांनी सरकारी खात्यात जाऊन त्या जागेची मालकी कुणाकडे आहे याचा शोध घेण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला .कुणालाही रेकॉर्ड सापडत नव्हते .योग्य विश्वसनीय कागदपत्र मिळाल्याशिवाय जागा खरेदी करणे योग्य नव्हते.एखादा त्या जागेचे मीच मालक म्हणून काही लाख, कोटी,घेऊन जायचा आणि जागा दुसऱ्याच कुणाची तरी असायची. कोर्टात केस गेल्यावर पैसे अडकून पडायचे .बांधकाम अर्धवट राहायचे .  यासाठी पूर्ण छाननी अंती बिल्डर लोक ती जागा खरेदी करणार होते .

केवळ मालकाचा शोध लागत नसल्यामुळे ती जागा शहराच्या मध्यभागी, मोक्याच्या ठिकाणी,रिकामी तशीच कित्येक वर्षे पडून होती.आसपासच्या जागा विकसित झाल्या ही मात्र तशीच पडून होती.  

शेवटी ती जागा चर्चच्या मालकीची आहे असे सिद्ध झाले.आणि एका बिल्डरने ती जागा  भरपूर मोबदला देवून चर्चकडून विकत घेतली.त्यातील व्हाईट किती व ब्लॅक किती याबदलही निरनिराळया  कहाण्या होत्या . मालकी हक्काची पक्की माहिती मिळवण्यासाठी सरकारी बाबूंना किती गेले ते बिल्डरलाच माहिती.

शेवटी एका नामांकित बिल्डरने ही जागा खरेदी करून बांधकामाला सुरुवात केली .   

येणारे जाणारे आसपास राहणारे पाया खोदण्याचे काम चालू असताना पाहात होते.बाहेर चंद्रमहाल आणि बिल्डरचे त्याखाली नाव व पत्ता एवढीच पाटी होती.

येथे नक्की काय बांधण्यात येणार आहे याबद्दल चर्चा सुरू झाल्या .चंद्र महाल या नावावरून मॉल, थिएटर्स, निवासी संकुल, ऑफिसेस, इत्यादी काहीही असू शकेल असे वाटत होते.काही रिकामटेकडे तेथील इंजिनिअर्सना,बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना ,ब्ल्यू प्रिंट घेऊन इकडे तिकडे फिरणाऱ्या काही मुकादमांना ,येथे काय बांधत आहेत याबद्दल विचारणा करीत होते.

कुणी प्रश्न उडवून लावीत .कुणी ते सिक्रेट आहे असे सांगत .कुणी मॉल, कुणी थिएटर्स, कुणी निवासी संकुल, कुणी ऑफिसेस ,कुणी काहीही उत्तर देत असे.  एकंदरीत गोंधळाचे वातावरण तसेच होते .

काहीतरी भव्य काम होणार असे वाटत होते .मोठ्या मोठ्या यंत्रांनी खोदाईचे काम चालू होते .वीस फुटापेक्षा खोल काम गेल्यावर आतून काही प्रमाणात कबरीचे दगड इत्यादी निघण्याला सुरुवात झाली.येथे ख्रिश्चनांची  प्रेते पुरली होती याचा पुरावा मिळण्याला सुरुवात झाली .प्रेतांचे सांगाडे मिळत. त्यांच्या गळ्यात किंवा सांगाड्यावर क्रूस ठेवलेला आढळे.जी व्यक्ती मृत पावली त्याच्या श्रीमंती प्रमाणे, स्टेटसप्रमाणे, साध्या लोखंडापासून सोन्यापर्यंत सर्व प्रकारचे क्रूस मिळत होते.

ही माहिती बिल्डरने अतिशय गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला .कारण ख्रिश्चनांच्या भावना दुखावल्या जाण्याचा संभव होता .त्यांचा मोर्चा आला असता.त्यानी वरिष्ठ पातळीवरून काम थांबविण्याचे प्रयत्न केले असते.  कदाचित  बिल्डरला आपले काम बंद करावे लागले असते. त्याचे चर्चला दिलेले पैसे अडकून पडले असते.आता पर्यंत खोदकाम व इतर गोष्टींमध्ये जो पैसा गुंतविला तोही अडकून पडला असता. केस कोर्टात न्यावी लागली असती त्यामध्येही पैसा गेला असता .जागा विकसीत करून त्यातून जो नफा मिळाला असता तो मिळाला नसता.कोर्टाच्या निकालाप्रमाणे  सर्व जागा चर्चला परत करावी लागली असती.पैशापरी पैसा गेला आणि मनस्ताप मिळाला असे म्हणावे लागले असते.एकूणच सर्व अशुद्ध व अवघड होऊन बसले असते.  

बहुतेक सर्व सांगाडे पूर्णपणे मातीत मिसळले होते .त्यांचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व,व्यक्तिमत्त्व, राहिले नव्हते

फार जुनाट कब्रस्तान असल्यामुळे बहुतेक थडगी विखुरली  गेली होती.बहुतेक सर्व काही मातीत मिसळले होते.आणखी शंभर वर्षे गेली असती तर इथे कब्रस्तान होते याचा मागमूसही राहिला नसता .जी काही थोडी बहुत हाडे, सांगाडे, मिळाले ते रातोरात गायब करण्यात आले.काम करणार्‍याना विकत घेऊन,पैसा चारून व दहशतीचा वापर करून बातमी बाहेर पसरणार नाही याची काळजी घेण्यात आली . 

कुणी काही ऐकले नाही. कुणी काही पाहिले नाही.डोळ्यावर काळी पट्टी व कानात स्टॉपर्स टाकण्यात आले होते.

परंतु ते कब्रस्तान होते. तेथे अगोदरही आत्म्यांचा निवास होता. काही आत्मे  रात्री बारानंतर  जागृत होत होते .त्यांचा नाच धिंगाणा चालत होता.बिल्डरने व त्याच्या काम करणाऱ्या माणसानी त्यांच्या जागेवर आक्रमण केले होते.  ते बिल्डरला सोडणार नव्हते. ते बिल्डरच्या काम करणाऱ्या माणसांना काही ना काही चमत्कार दाखविणार होते.

एवढेच नवे तर चंद्रप्रकाश प्रकल्प पूर्ण झाल्यावरही ते त्यातील लोकांना व त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना सोडणार नव्हते.

ही गोष्ट मात्र त्या बिल्डरला  ,काम करणाऱ्या  व पुढे जागा विकत घेणाऱ्या लोकांना  माहीत नव्हती.

जेव्हां त्यांना अमानवी अनुभव येऊ लागतील, त्याना आश्चर्यजनक गोष्टी दिसू लागतील,विचित्र अनुभव येऊ लागतील , तेव्हाच त्यांना आपण या भानगडीत कशाला पडलो असा पश्चाताप होणार होता .परंतू नंतर त्याचा काही विशेष उपयोग नव्हता .

(क्रमशः)

२३/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

. . .