भूतकथा भाग ४
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

भूतकथा भाग ४ : २ घात (भाग१)

भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.

१ रमाअक्काचे भूत   ३ घात (भाग२)

मी येथे खुर्चीत आरामशीर बसलो आहे .घरात बरीच मंडळी गंभीर चेहरे करून का बसली आहेत कळत नाही. गावातील बरीच नातेवाईक मंडळी जमा झालेली आहेत .माझे कॉलेजातील मित्र मैत्रिणीही नेहमीसारखे गप्पागोष्टी न करता स्तब्ध उभे आहेत .माझी आई सारखी रडत आहे तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळत आहेत .बाबा अगदी रडण्याच्या बेतात आहेत त्यांनी मोठ्या कष्टाने आपले अश्रू आवरून धरले आहेत.बन्या आणि बनी माझा धाकटा भाऊ आणि बहीण कावरेबावरे चेहरे करून उभे आहेत .मला आईचे अश्रू पहावत नाहीत .मी हळूच उठतो आणि आईकडे जाऊ लागतो .आईचे डोळे पुसावेत तिला तू का रडत आहेस असे विचारावे असे मला वाटते .एवढ्यात समोरून कुणीतरी लगबगीने भरभर येतो .तो माझ्यावर आदळू नये म्हणून मी चटकन बाजूला होतो .तरीही त्याची एक बाजू माझ्या खांद्यावर जोरात आदळते .पण मला काहीच होत नाही तो माझ्या खांद्यातून आरपार निघून जातो .जवळच समोर टेबल असते त्याच्या पलीकडे आई बसलेली आहे .मी सरळ आईजवळ जातो .अरेच्या मी टेबलातून आरपार निघून कसा काय गेलो?आईजवळ कुणीतरी उताणे झोपलेले आहे .त्याच्या अंगावर पांघरूण आहे .अरेच्चा याचा चेहरा तर माझ्यासारखाच दिसतो .हा मी तर नाही मी बाहेर कसा काय हिंडत आहे ?मला सगळे हळूहळू आठवत आहे .मी कॉलेजमधून स्कूटरवर घरी येण्यासाठी निघालो होतो .वाटेत एक ट्रक मला जोरात कट मारून पुढे निघून गेला.मी स्कूटरसकट डिव्हायडरवर जाऊन आपटलो. डोक्यात एक प्रचंड कळ उठली .त्यानंतर मी जागा झालो तेव्हा या खुर्चीत आरामशीर बसलो होतो .

आता मला हळूहळू सर्व उलगडा होऊ लागला आहे .मी मेलो आहे.मला अॅक्सिडेंट झाला होता .माझी मैत्रीण परी मुला मुलींच्या घोळक्यात उभी आहे . तिचा चेहरा अत्यंत केविलवाणा  झालेला आहे .जवळच मुलांच्या घोळक्यांमध्ये  राजन उभा आहे .तो रडण्याचा आव आणीत आहे हे मला सहज समजले .अांतून त्याला आनंदाच्या व समाधानाच्या उकळ्या फुटत आहेत.हे मला कसे समजले ते विचारू नका .बहुधा मेल्यानंतर मला दैवी शक्ती प्राप्त झाली असावी .सर्वांच्या  नाही परंतु काही जणांच्या मनात काय चालले आहे ते मला, कसे माहित नाही परंतु कळत आहे.खरा कोण खोटा कोण हे मला प्रत्येकाकडे बघून लगेच समजत आहे . राजन खोटा आहे हे मला लगेच लक्षात आले.अर्थात ते मला अगोदरपासून माहित होतेच. परंतु आता मला त्याचा संशय येऊ लागला आहे .त्याला कारणही तसेच आहे.त्याची पार्श्वभूमीच तशी आहे. त्याचे माझे व परीचे संबंध यातून याशिवाय आणखी काही निष्पन्न होणे कठीण होते.मला सर्व काही सुरुवातीपासून सांगितले पाहिजे .

एवढ्यात राजन् व त्याचा मित्र निघाले .मी ताबडतोब त्यांच्या मागे निघालो.नाहीतरी इथे थांबून माझा काहीच उपयोग नव्हता .मी कुणाला दिसत नव्हतो.मी कोणाचे अश्रू पुसू शकत नव्हतो.मी माझ्या देहात शिरण्याचा प्रयत्न केला परंतू मला आत जाता येत नव्हते.मला वाटेल त्यावेळी माझ्या घरी मी येऊ शकत होतो .राजन कुठे जातो काय करतो ते पाहणे मला जास्त महत्त्वाचे वाटले .

परी व मी लहानपणापासून एकत्र शाळेत शिकत होतो.आमच्या मध्ये निखळ मैत्री होती .दहावीला आमच्या ट्युशन्सही एकाच सरांकडे होत्या. होत्या.एकमेकांना नोट्स देणे एकमेकांना अभ्यासात मदत करणे हे आम्ही अकरावी बारावीला करत होतो.दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो .परी नावाप्रमाणे सुंदर होती .आम्ही दोघे सायन्सला होतो तर राजन हा कॉमर्समध्ये होता.त्याचे मित्र वर्तुळ मोठे होते .ते सर्व गुंडगिरी करण्यात व मुलींना छेडण्यात आघाडीवर असत. राजन राजकीय पुढाऱ्याचा मुलगा होता .त्यांची गुंडगिरी त्यामुळेच इतर खपवून घेत असत .एक दिवस परी कॉलेजमधून घरी जात असताना त्याने तिचा मोटरसायकलवरून पाठलाग केला .त्याने तिचे घर बघून ठेविले .तिच्या कॉलेजला ट्यूशनला जाण्याच्या येण्याच्या वेळा त्याने पाहून ठेविल्या .माझ्या येण्या जाण्याचा मार्ग वेगळा होता .मी परी राहात होती त्याच्या विरुद्ध दिशेला राहात होतो .परीकडे जाऊन तिच्या बरोबर कॉलेजला येणे मला शक्य होत नसे .तरीही मी शक्य असेल त्या त्या वेळी तिच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करीत असे .मी जेव्हा जेव्हा तिच्या बरोबर असे त्या त्या वेळी तो परीला त्रास देत नसे .परी वेळोवेळी मला सर्व सांगत असे .जोपर्यंत तो तिला प्रत्यक्ष काही त्रास देत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच करता येत नव्हते .एक दिवस त्याने मोटारसायकल तिच्या स्कूटर पुढे आडवी घालून तिचा मोबाईल नंबर विचारला .ती बिचारी अगोदरच घाबरलेली होती .त्याने असा प्रकार केल्यावर ती जागच्या जागी थरथरू लागली .त्यावेळी तो बाजूला झाला कारण लोक जमू लागले होते .असे वारंवार होऊ लागल्यावर आमच्या सहनशक्तीचा अंत झाला .

मी लहानपणापासूनच थोडा थोराड अंगाचा होतो .व्यायामाची गोडी लहानपणापासून असल्यामुळे मला सर्व वेल बिल्ट म्हणून म्हणत असत. सावळा असलो तरी मी दिसण्याला आकर्षक होतो .मुली माझ्याकडे पटकन आकृष्ट होत असत .मी बुजरा असल्यामुळे कोणाकडेही लक्ष देत नसे .मुलींशी काय बोलावे कसे बोलावे मला काहीच कळत नसे.कुणी बोलण्याचा प्रयत्न केला तरी मी तिथून निघून जात असे .परीची गोष्ट वेगळी होती.लहानपणापासून आम्ही एकाच शाळेत शिकत होतो . त्यामुळे मोठेपणीही एकमेकांजवळ मोकळेपणाने बोलणे आम्हाला शक्य होत असे .फार नसले तरी माझेही दोन चार मित्र होते. मी एक दिवस राजनला धडा शिकविण्याचे ठरविले .त्याच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने मी परीच्या मागे स्कूटरवर लक्ष ठेवून राहू लागलो .एक दिवस त्याने तिला छेडल्यावर मी पटकन पुढे आलो .मला असा अकस्मात आलेला पाहून तो चांगलाच दचकला .मी त्याला जरब बसेल अशा शब्दात पुन्हा असे होता कामा नये म्हणून सांगितले .आठ पंधरा दिवस ठीक गेले.त्या दिवशी परीला घरी जाण्याला रात्र झाली होती.तिच्या सरानी जादा क्लास घेतला होता .थंडीचे दिवस होते .तिच्या घराचा रस्ता ती गावापासून लांब राहात असल्यामुळे जरा सुनसानच असे.त्याने अकस्मात तिला थांबवून तिचा हात धरला . तिला सांगितले कि त्या माकडाला सांग  तो माझे काहीही करू शकत नाही .माझ्या वाटेला गेलास तर खबरदार  परिणाम चांगला होणार नाही .असा दम देऊन तो निघून गेला .परीने त्याच रात्री ही हकीगत मला फोनवर सांगितली . आता मात्र डोक्यावरून पाणी गेले होते .जर काही केले नाही तर तो आणखीच चेकाळणार होता .दुसऱ्या दिवशी मी त्याला पकडून जाब विचारला .त्याने तू तिचा कोण लागतो म्हणून उलट मलाच दम देण्याचा प्रयत्न केला.शब्दाने शब्द वाढत गेला आणि मी त्याचा हात मुरगळून त्याला एक जोरकस ठोसा लगावला .तो भेलकांडत जाउन रस्त्यावर आपटला .त्याने दात ओठ खात मी तुला बघून घेईल म्हणून सांगितले .अरे जा तुला जे काही करायचे असेल ते कर म्हणून मी त्याला आणखी एक ठोसा लगावला.

ही हकीकत ऐकल्यावर माझे मित्र झाले ते बरे झाले नाही असे म्हणाले .तो याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. जपून राहा असेही त्यांनी मला सांगितले .मी परीला सर्व हकीकत तिच्या वडिलांना सांगण्यास सांगितले. शक्य तर पोलिस कम्प्लेंट करा म्हणूनही तिला सांगितले .परंतु तिच्या वडिलानी राजनच्या वडिलांचा राजकीय प्रभाव व गुंडगिरी यामुळे विशेष काही साध्य होणार नाही .तूच जपून राहा असे उलट परीला सांगितले .तिचे वडील अगदीच मवाळ व  भित्रे निघाले .मला तर राजनविरुद्ध पोलिस कम्प्लेंट, कॉलेजमध्ये प्रिन्सिपल जवळ कम्प्लेंट,  वगैते काहीच करता येत नव्हते .मी तिचा नात्याने कुणीच नव्हतो.

मी राजनच्या वडिलांना एक निनावी पत्र लिहिले .त्यामध्ये राजन कसा कॉलेजमध्ये वर्तन करतो .त्याचे मुलींशी वर्तन कसे आहे .कदाचित  त्याला या त्याच्या वागणुकीमुळे दगा पोचण्याचा संभव आहे .निवडणुका जवळ येत आहेत .विरोधी पक्षाला हे कळले तर त्याचा उपयोग करून तुम्हाला बदनाम केले जाईल. तरी आपण त्याला चार समजुतीचे शब्द सांगावेत. आपल्या हितासाठी हे सांगत आहे .अशा मजकुराचे पत्र लिहिले .त्यामध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता .मला आशा होती की त्याचे वडील जरी गुंडगिरीत प्रवीण असले तरी ते वेळीच आपल्या मुलाला चार समजुतीचे शब्द सांगून नियंत्रणात ठेवतील.पुढे काय झाले माहीत नाही वडिलांनी दुर्लक्ष केले किंवा वडिलांनी चार उपदेशाचे शब्द सांगूनही त्याने ऐकले नाही .परीला त्रास देणे सुरूच राहिले .मी माझ्या ओळखीने पोलिसांमध्ये त्याच्या विरुद्ध काही तरी कारवाई करा त्याचा त्रास देणे थांबेल असे पाहा असे सांगण्याचा प्रयत्न केला .परंतू पोलिसांकडून मलाच उलट सल्ला मिळाला की तुम्ही या भानगडीत न पडलेले बरे .त्याच्या वडिलांचे हात  वरपर्यंत पोचलेले आहेत .तो काहीही करू शकतो. आम्हाला आमची पोस्ट टिकविली  पाहिजे .तुम्हीच जपून राहा . साम दाम दंड भेद कोणत्यांना कोणत्या मार्गाने त्याचा त्रास होणार नाही असे करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता .सर्वच मार्ग खुंटलेले दिसत होते.मलाच पुनः  काहीतरी करणे भाग होते.मग मी एक दिवस त्याच्या मित्रांना भेटून राजनला समजाविण्यास सांगितले .त्याचाही काही परिणाम झाला नाही .तिचे वडील मुलीला तू गप्प राहा जपून राहा म्हणून सांगत होते.पोलीस मलाच उलट या भानगडीत पडू नका म्हणून सांगत होते.तिच्या वडिलांना निनावी पत्र लिहून काहीही परिणाम दिसत नव्हता .मला माझ्या अगतिकतेबद्दलचा राग अनावर झाला होता.अन्याय होत आहे आणि त्याचा प्रतिकार न करता सगळे जण घाबरून चुप्प बसून आहेत हे मला सहन होत नव्हते .

शेवटी एक दिवस मी त्याला एकांतात गाठून बुकलून काढला.पुन्हा परीच्या वाटेला गेलास तर तुझा पाय मोडून ठेवीन म्हणून त्याला दम दिला आणि  नंतर चारसहा दिवसांनी मी कॉलेजवरून घरी येत असताना मला ट्रकने कट मारून उडविले .पुढची सर्व हकीगत तुम्हाला माहितच आहे

राजन नक्राश्रू ढाळून आमच्या घरातून निघाल्यावर मी त्याच्या बरोबरच पाठोपाठ निघालो.मला झालेल्या अपघातांमागे राजनचा हात असलाच पाहिजे असा मला दाट संशय होता.मी तर मेलो होतो .माझ्या परीला सुरक्षित बघितल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नव्हती.मी हलका झालो आहे .मला हवेतल्या हवेत उडता येत आहे.हे केव्हाच माझ्या लक्षात आले होते .राजन बाहेर पडल्याबरोबर त्यांच्या खांद्यावर बसून लगेच निघालो.राजन व त्याच्या मित्राने मोटारसायकल सुरू केली .मी त्यांच्या पुढ्यात पेट्रोल टाकीवर बसलो.मी कुणालाही दिसत नाही हे आता माझ्या लक्षात आले आहे.मोटारसायकलवरही मी एकाच जागी बसून नव्हतो .केव्हा राजनच्या खांद्यावर केव्हा त्याच्या डोक्यावर केव्हा त्याच्या  मित्राच्या खांद्यावर केव्हा टाकीवर तर केव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या गतीने हवेतून उडत असा माझा चाळा चालला होता.मला माझ्या क्षमता समजून घ्यायच्या होत्या. राजन गावाबाहेर निघाला होता .

सुमारे वीस किलोमीटर  गावाबाहेर गेल्यावर तिथे एक धाबा आहे.त्या धाब्यासमोर एक ट्रक उभा होता .मला उडविणारा तो हाच ट्रक हे माझ्या कसे कोण जाणे पण लक्षात आले .ट्रक ड्रायव्हर धाब्यावर काहीतरी खात बसला होता .राजन व त्याचा मित्र त्याच्या पुढ्यात जाऊन बसले.त्या ड्रायव्हरने काम फत्ते झाले म्हणून राजनला सांगितले .त्यावर राजन मी आता तिकडूनच येत आहे असे म्हणाला.राजनने एक पैशाची गड्डी काढून त्याच्या हातात ठेवली.ड्रायव्हरने पुरे पन्नास हजार आहेत ना म्हणून विचारले.  यावर राजनने विश्वास नसेल तर मोजून बघा म्हणून  सांगितले .ड्रायव्हरने ती गड्डी  तशीच आपल्या खिशात टाकली.राजन व त्याचा मित्र लगेच मोटारसायकलवर  परत निघाले.माझ्या अंगाचा तिळपापड झाला होता .मी राजनला एक जोरदार ठोसा मारण्याचा प्रयत्न केला .परंतु तो ठोसा त्याला लागलाच नाही माझा हात त्याच्या डोक्यातून आरपार गेला .मला कितीही वाटले तरी मी त्याचा सूड आहे अशा स्थितीत घेऊ शकत नव्हतो .कसा सूड घ्यावा हे मला कळत नव्हते .त्याचा सूड घेतल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नव्हती .

(अपूर्ण पुढच्या भागात )

३१/१२/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

. . .