भूतकथा भाग ४
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

भूतकथा भाग ४ : ७ रात्रीस खेळ चाले ३-३

भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.

६ रात्रीस खेळ चाले २-३   ८ दरवाजा उघडू नका १-२

(ही गोष्ट संपूर्णपणे काल्पनिक आहे .नाव स्थान इत्यादी गोष्टींमध्ये कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

रात्री बारा ते तीन एवढी वेळ सोडली तर तिथे काहीही अशुभ घडत नाही .सर्व काही आलबेल असते .याची त्याने छान  जाहिरात केली होती .आतापर्यंत नकळत  झालेल्या  निगेटिव जाहिरातींमुळे, सर्व प्रकल्प पुरा झाल्यावर, तिथे चांगल्यापैकी गर्दी होणार होती .शहरात येणारे पर्यटकही या जागेला आवर्जून भेट देणार होते .

अशुभ शक्तीच्या येथे एकेकाळी असणार्‍या अस्तित्वाची जाहिरात करून पैसा कसा मिळवावा हे तो बिल्डर जाणत होता. 

त्यांच्या जागेवरील आक्रमणामुळे अशुभ शक्ती नक्कीच चिडल्या होत्या.त्यांच्या सामर्थ्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे ते काहीही करू शकत नव्हते. त्या शक्ती सामर्थ्य मिळवण्याचा प्रयत्न करीत होत्या . किंबहुना त्यांनी ते सामर्थ्य मिळविले होते .ते योग्य संधीची वाट पाहत होते . या लोकांना काही ना काही त्रास दिल्याशिवाय ते गप्प बसणार नव्हते .त्यांना संतुष्ट करणे गरजेचे होते.

याची  कल्पना बिल्डरला नव्हती .त्याचप्रमाणे ज्यानी येथे जागा विकत घेतल्या होत्या त्यांनाही नव्हती.

थोड्याच दिवसांत त्यांना त्या अशुभ शक्तीनी जास्त सामर्थ्य मिळविलेले लक्षात येणार होते.आता त्यांची वेळेची मर्यादा वाढली होती. 

त्यांचे समाधान झाल्याशिवाय, त्यांचे संतुष्टीकरण झाल्याशिवाय, ही जागा ते सोडणार नव्हते.  हे सर्वांच्या लक्षात येणार होते .

प्रकल्पाचे उद्घाटन एका राजकीय पुढाऱ्याच्या हातून झाले .मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट ,कॉन्फरन्स हॉल, सर्व व्यवस्थित चालू झाले .रेस्टॉरंट कित्येक वेळा बारानंतर चालू असे.नाटक तर दीड दोन वाजेपर्यंत चालू असे . पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, बारा वाजता वीज जाईल ,काळोख पसरेल, अशी भीती वाटत होती .प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही.प्रकल्पाची वास्तुशांत तर मोठ्या धडाक्यात झाली होती .  मंत्रोच्चारण धार्मिक विधी इत्यादींमध्ये कुठेही कमतरता ठेविली नव्हती .या सर्व धार्मिक विधीमुळे त्या अशुभ शक्ती येथून निघून गेल्या असे वाटू लागले होते .

अशुभ शक्तीनी रात्री बारा वाजता काळोख केला तर गडबडून जाऊ नये यासाठी चारी बाजूनी त्या शापित जागेच्या बाहेरून संपूर्ण प्रकल्पावर  प्रकाशाचे झोत सोडले होते .त्यामुळे प्रकल्पाची शोभा वाढली होती .प्रकाश झोत सोडण्याचा आणखी एक हेतू होता.  समजा प्रकल्पात त्या अदृश्य शक्तीमुळे  किंवा आणखी कोणत्या अन्य कारणामुळे काळोख झाला, तर या प्रकाशामुळे कोणतीही गडबड न होता  लोकांना  व्यवस्थित दिसले असते.त्यांना बाहेर पडण्यात कोणतीही अडचण आली नसती.गर्दी गडबड गोंधळ चेंगराचेंगरी टळली असती .

सर्व काही व्यवस्थित चालू असताना एके दिवशी चमत्कार झाला .रात्री बारा वाजता रेस्टॉरंट फिरण्याचे थांबले .रेस्टॉरंटमध्ये काळोख झाला .काहीतरी तांत्रिक समस्या असावी असा प्रथम समज होता .कारण बाकी सर्वत्र वीज व्यवस्थित होती .सर्वकाही प्रकाशमान होते तेथील कार्यक्रम व्यवस्थित चालले होते .

रात्री बारा वाजता त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये विशेष गर्दी नव्हती .होते त्या लोकांना व्यवस्थित बाहेर काढण्यात आले .पहाटे तीन वाजता आपोआप रेस्टॉरंट स्वतः भोवती फिरू लागले .त्याच वेळी सर्वांना या अदृश्य शक्ती अजून येथे अस्तित्वात आहेत  याची जाणीव झाली.

या दिवसापासून रेस्टॉरंटची वेळ रात्री अकरापर्यंतच ठेवण्यात आली.  दहानंतर कोणालाही आत प्रवेश दिला जात नसे.याचा हेतू रात्री साडेअकरापर्यंत सर्व ग्राहक निश्चितपणे निघून जातील .बाराच्या आत रेस्टॉरंट रिकामे होईल .त्या अशुभ शक्तीना गोंधळ घालण्यास  संधी मिळणार नाही .

या सर्वांचा रेस्टॉरंटच्या उत्पनावर फारमोठा वाईट परिणाम झाला .पूर्वी लोक रात्री दीड दोन वाजेपर्यंत रेस्टॉरंटमध्ये असत.आता दहानंतर रेस्टॉरंट बंद केल्यामुळे ग्राहक संख्या एकदम पन्नास टक्क्यांवर आली.लोक इतर रेस्टॉरंटकडे जाऊ लागले .

एक दिवस रेस्टॉरंट फिरण्याचे रात्री दहालाच थांबले.वीज गेली .असे वारंवार आणि केव्हाही होऊ लागल्यामुळे रात्रीचे रेस्टॉरंट बंद करावे लागले .

एक दिवस नाट्यगृहात हॅम्लेट नाटकाचा प्रयोग चालू होता .हॅम्लेटला त्याच्या बापाचे भूत त्याचा खून कसा झाला ते सांगते.आपल्या चुलत्याने आपल्या बापाचा म्हणजेच त्याच्या सख्ख्या भावाचा खून केला हे हॅम्लेटला कळते.त्यानंतर पुढे बरेच काही नाटक आहे . त्या दिवशी हे कळल्याबरोबर हॅम्लेट त्याच्या  चुलत्यावर ,जो आता राजा होता, चालून गेला .खोट्या सुर्‍याच्या ऐवजी त्याच्याजवळ खरा सुरा होता.हॅम्लेटच्या हातून चुलता, खून होता होता वाचला . हॅम्लेटचे काम करणाऱ्या नटाला आवरावे लागले .त्याच्या अंगात अदृश्य शक्तीनी प्रवेश केलेला असल्यामुळे तो कुणाला आवरत नव्हता.सर्व नाटकाचा बट्ट्याबोळ झाला.सर्वत्र गोंधळ उडाला.आणि हे रात्री दहा वाजता झाले . याचा अर्थ पूर्वी रात्री बाराला त्या शक्ती कार्यरत होत असत .त्यापूर्वी त्या शक्तीना काहीही करता येत नसे.आता त्यांची शक्ती, त्यांचे सामर्थ्य, त्यांच्या मर्यादा, विस्तार पावल्या होत्या .रात्रीच्या कोणत्याही वेळी त्या कुठेही गोंधळ घालू शकत होत्या .

एका रात्री सिनेमागृहातील प्रोजेक्शन बंद पडले . कोणताही तांत्रिक दोष नसताना प्रोजेक्शन बंद पडले होते .सिनेमागृहाच्या मालकाला लोकांचे पैसे परत करावे लागले .प्रेक्षकांनी गोंधळ घातला मोडतोड केली. ते नुकसान वेगळेच .

एक दिवस मॉलच्या एका विभागाला अकस्मात आग लागली .आग प्रतिबंधक यंत्रणा व्यवस्थित असल्यामुळे आग पसरू शकली नाही .ही आग इतर कारणांनी लागली की त्या अशुभ शक्तीचा हा प्रताप होता ते कळू शकले नाही .

कुठेही काही गडबड झाली की त्या अशुभ शक्तींनी हे केले असा समज पसरत असे.

केव्हाही कुठेही दिवे आपोआप बंद होत असत . कधी कधी दिव्यांची उघडझाप होत असे.कधी लिफ्ट अचानक मध्येच बंद पडत .एकदा महत्त्वाची सभा कॉन्फरन्स हॉलमध्ये चालली होती .ध्वनियंत्रणा अकस्मात बंद पडली .कोणताही तांत्रिक दोष नव्हता .जरा वेळाने वीज गेली .सभा अर्ध्यावर गुंडाळावी लागली .

अदृश्य शक्तींचे सामर्थ्य आता वाढले होते.  त्यांना वेळेचे बंधन राहिले नव्हते .फक्त दिवसा त्या काहीही करू शकत नव्हत्या.एकदा सूर्यास्त झाला की पुन्हा सूर्योदयापर्यंत त्या काहीही करू शकत होत्या. संपूर्ण प्रकल्पातील वीज केव्हाही घालवणे .प्रकल्पाच्या निरनिराळ्या विभागातील वीज हवी तेव्हा बंद करणे .दिव्यांची उघडझाप करणे .अकस्मात कुठेही आग लावणे. टॉयलेट किंवा इतर कुठलेही दरवाजे लॉक करणे. किल्ली लावूनही ते न उघडणे. असा सर्व गोंधळ चालला होता .

थोडक्यात त्या जागेच्या चतु:सीमेत त्या शक्ती रात्री केव्हाही काहीही कुठेही करू शकत होत्या .

याचा परिणाम सर्वांच्या उत्पन्नावर झाला .नाट्यगृहात कुणीही नाटक करायला तयार होईना. मॉलमध्ये विशेष कुणी येत नाहीसे झाले .तीच स्थिती रेस्टॉरंट व सिनेमागृहांची झाली.फक्त दिवसा सर्व काही व्यवस्थित असे .सूर्यास्ताबरोबर सर्व काही बंद करावे लागे.

ती जागा बदनाम झाली .काहीतरी तातडीने केल्याशिवाय प्रत्येकाचा व्यवसाय पुन्हा प्रस्थापित होणार नव्हता.केलेली सर्व गुंतवणूक फुकट जाणार होती .केवळ दिवसाच व्यवसाय होणार होता.अफवांमुळे त्यावरही परिणाम झाला होता .

बिल्डरला व इतर व्यावसायिकांना उगीच या जागेच्या भानगडीत पडलो असे वाटू लागले.

ज्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता अशी सर्व मंडळी शेवटी एका नामांकित ज्योतिषाकडे गेली.हा ज्योतिषी प्रश्नकुंडली मांडून भविष्य तर सांगत असेच  परंतु काही उपायही सुचवीत असे.

त्याने अरिष्ट दूर नक्की होईल असे सांगितले .

तो म्हणाला ,अश्या  शक्ती या बर्‍याच  वेळा एखाद्या लहान मुलासारख्या असतात.त्यांची समजूत काढावी लागते .

काही वेळा त्यांची वर्तणूक एखाद्या अहंकारी व्यक्तीसारखी असते.अहंकारी व्यक्तीला त्याच्या अहंकाराला ठेच लागली तर सहन होत नाही .आपला मान रुबाब अहंकार जपण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार असतो .कोणत्याही मार्गाने त्याच्या अहंकारावर फुंकर घातला, त्याला मान दिला, तर तो लगेच शांत होतो. या शक्तींचेही तसेच आहे.

मी तुम्हाला एक साधा सोपा उपाय सुचवितो.त्याने त्या शक्ती शांत होतील .त्यांच्या अहंकाराला कुरवाळले जाईल.त्यांचे समाधान होईल .

ज्योतिषाने काही आकडेमोड केली. नंतर प्रत्यक्ष ती जागा पाहिली.त्या जागेच्या आग्नेय  कोपऱ्यांमध्ये त्याने एक काटकोनचौकोन काढला.त्या चौकोनावर  एक मिनी चर्च बांधण्यास सांगितले. चर्चमध्ये असतात त्या सर्व गोष्टी काटेकोरपणे तिथे लहान स्वरुपात असाव्यात असेही त्याने आवर्जून सांगितले .

चर्च  बांधून  झाल्यावर तेथे एक मेणबत्ती सतत प्रज्वलित ठेवावी.

दररोज तिथे एक मोठा केक नेवैद्य  म्हणून नेऊन  ठेवावा.

दर रविवारी तिथे  सात केक नेवैद्य  म्हणून ठेवावेत.  

त्या चर्चला एक व्यवस्थित कंपाउंड असावे.

एका फादरकडून त्या चर्चची देखभाल केली जावी . तिथे रविवारी प्रार्थना म्हटली जावी .

असे केल्यामुळे ते आत्मे शांत होतील. त्यांचा अहंकार सुखावेल .

ते प्रकल्पाच्या कार्यांमध्ये कोणतेही अडथळे आणणार नाहीत.

मॉल, नाट्यगृह, सिनेथिएटर्स, कॉन्फरन्स हॉल, रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट, लिफ्ट,इत्यादी सर्व चोवीस तास तुमच्या मर्जीप्रमाणे व्यवस्थित चालतील .

त्या ज्योतिषाचार्यांनी  सांगितल्याप्रमाणे सर्व काही करण्यात आले .एका फादरची चर्चच्या  देखभालीसाठी नेमणूक करण्यात आली.

*तेव्हापासून तो प्रकल्प व्यवस्थित सुरू आहे . प्रेक्षक, पर्यटक,ग्राहक ,सर्वांचा ओघ पूर्वीप्रमाणे चालू झाला आहे .*

* आता काहीही  समस्या शिल्लक राहिलेली नाही*  

शहरात आलेले पर्यटक आवर्जून त्या चर्चला भेट देतात आणि नंतर ओघानेच मॉल रेस्टॉरंट वगैरेलाही भेट देतात.

पर्यटन संस्था कटाक्षाने एक दिवस किंवा अर्धा दिवस या प्रकल्पासाठी राखून ठेवतात .

*सर्वांना या प्रकल्पाबद्दलची एक छोटीशी पुस्तिकाही देतात.*

*त्याचबरोबर  पर्यटकांना  घोस्टच्या कथा रंगवून सांगितल्या जातात. चविष्टपणे त्या ऐकल्या जातात.*

(समाप्त)

२५/१२/२०१९ ©प्रभाकर पटवर्धन

. . .