गूढकथा भाग ५
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

गूढकथा भाग ५ : ९ विलक्षण १-२

मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.

८ भुताटकीचे बेट २-२   १० विलक्षण २-२

आम्ही मित्रमंडळीनी  कुठेतरी ट्रिप काढण्याचे ठरविले होते.अनेक ठिकाणांबद्दल चर्चा झाल्या .शेवटी भीमाशंकरला जावे असे ठरविण्यात आले .आमच्यापैकी काही जण जंगलप्रेमी होते .त्यांना भीमाशंकरच्या दाट जंगलात फिरायचे होते ,त्यांना जंगल सफारीमध्ये रस होता .काही जण देवभक्त होते, त्यांना भीमाशंकरचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग पाहायचे होते .त्याला नमस्कार अभिषेक इत्यादीमध्ये त्यांना रस होता .काहींना  हॉटेलमध्ये राहून धमाल करण्यात रस होता .काहींना अवे फ्रॉम द मॅडनिंग  क्राऊड एवढेच हवे होते .भीमाशंकर किंवा आणखी काही त्यांना कुठलेही स्थळ चालले असते. काहींना भीमाशंकर येथील प्रसिद्ध शेकरू पाहायचे होते.शेकरू हा खार या जातीतील एक प्राणी आहे .महाराष्ट्र राज्याने त्याला महाराष्ट्र राज्य प्राणी म्हणून मान्यता दिली आहे .काहीना फोटोग्राफीमध्ये रस होता .

असे आम्ही सर्व हौशे गवशे  नवशे एकसाथ भीमाशंकरला चार दिवसांसाठी धम्माल करायला निघालो होतो .भीमाशंकर येथील एका हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केले होते .मित्रमंडळींमध्ये ज्यांच्याजवळ यूएसव्ही गाड्या होत्या त्यातील  तीन गाड्या घेऊन आम्ही सर्व निघालो.आम्ही एकूण सोळाजण होतो.प्रथम सर्वजण ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला गेलो .कमी जास्त भाविक सर्वजण सामान्यपणे असतातच .दर्शन अभिषेक प्रदक्षिणा इत्यादी सर्व व्यवस्थित झाले . आमच्यातील काही शिवभक्ताना तिथे पुन्हा यायचे होते .त्या परिसरात बसून जमल्यास भीमाशंकर ज्योतिर्लिंगापुढे बसून शिव उपासना करायची होती .

नंतर मित्रांचे त्यांच्या आवडी निवडीनुसार गट पडले .पुनश्च भीमाशंकर ,फोटोग्राफी, जंगल सफारी,शेकरू इ.आम्ही पाच सहा जण जंगल सफारीसाठी सकाळी सकाळीच हॉटेलमधून बाहेर पडलो .पाठीवरील सॅकमध्ये पाणी खाद्यपदार्थ टॉवेल इत्यादी गोष्टी होत्या .गप्पा गोष्टी करीत हास्यविनोद करीत आमचे जंगल पर्यटन चालले होते.

फिरता फिरता काहीजण शेकरू पाहायला एका दिशेने गेले .कुणीतरी त्यांना या भागात शेकरू जास्त करून आढळतात असे सांगितले होते .काही जण दुसऱ्या दिशेने फोटोग्राफीसाठी,तिकडे जास्त आकर्षक सौंदर्यस्थळे आहेत असे कळले म्हणून तिकडे गेले .गेल्या वाटेने परत यायचे आणि एका विशिष्ट ठिकाणी सर्वानी जमायचे असे ठरले होते .सर्व जण एकत्र आल्यावर नंतर जंगलातून बाहेर पडायचे असेही ठरले होते .

आम्हाला फोटोग्राफीमध्ये विशेष रस नव्हता.अर्थात आम्ही फोटो काढीत होतोच.पण ते साध्या मोबाईलवर  हाय डेफिनेशन कॅमेराने नव्हे.शेकरू दिसले तर आम्ही पाहणार होतो, त्याचे फोटोही काढणार होतो ,परंतु ते दिसेलच अशी खात्री नव्हती . फोटोत दिसणार्‍या  शेकरूवर आम्ही तसे समाधानी होतो.आम्हाला नुसते भटकायचे होते .इतरांबरोबर अडखळत अडखळत थांबत थांबत प्रवास करावा लागला असता . गप्पा मारीत मारीत आम्ही दोघेजण जंगलात चाललो होतो.मध्यंतरी आम्ही सॅकबॅगमधून खाऊ काढून  च्याउ म्याउ केले.  दुपार टळून गेली होती .आकाशात ढगानी गर्दी करण्याला सुरुवात केली.जोरदार पाऊस येणार असे वाटू लागले होते  म्हणून आम्ही परतीच्या वाटेला लागलो .आम्ही झपाझप चालत होतो. शक्य तितक्या लवकर पावसाअगोदर आम्हाला ठरलेल्या जागी जाऊन थांबायचे होते. जंगलात दाट झाडीमुळे आधीच प्रकाश कमी त्यात असे अंधारून आलेले त्यामुळे चार वाजता संध्याकाळचे सहा वाजले आहेत असे वाटत होते . तेवढ्यात पाऊस जोरात सुरू झाला .पावसाळी दिवस नसल्यामुळे आमच्या जवळ रेनकोट इत्यादी काहीही नव्हते .एका झाडाखाली आम्ही आश्रय घेतला .थोड्याच वेळात झाडावरून पाणी आमच्या अंगावर पडू लागले.जंगलातील एखाद्या झोपडीत आश्रय घ्यावा अन्यथा आपण भिजून चिप्प होणार असा रंग दिसू लागला .

आम्ही इकडे तिकडे पाहात होतो तेवढ्यात झाडीतून पलीकडे आम्हाला एक मोठा वाडा दिसला .काही वेळापूर्वी आम्ही या रस्त्याने गेलो त्यावेळी तो आम्हाला दिसला नव्हता.गप्पांच्या नादात आमचे तिकडे लक्ष गेले नसावे .दाट झाडी पलीकडे तो होता. आत्ता आम्ही सहारा शोधीत  असल्यामुळेच तो दिसला असावा . तोपर्यंत बऱ्यापैकी काळोख पडला होता .आम्ही दोघे जण धावत धावत त्या वाड्यांपर्यंत गेलो.वाड्याला एक दणकट कम्पाऊंड होते .सुदैवाने फाटकाला कुलूप नव्हते .येथे जंगलात एवढा मोठा वाडा कसा आला ?हा वाडा रिकामा आहे की त्यात कुणी माणसे रहात आहेत?इथे काही धोका तर नसेल ना ? इत्यादी  कसलाही विचार न करता फाटक उघडून आत शिरलो.सोसाट्याचा वारा ,तुफान पाऊस आणि हुडहुडी भरवणारा गारठा, यांनी आम्ही हैराण झालो होतो .आम्हाला कुठेतरी आश्रय हवा होता .वाड्यामध्ये दिवे लागले होते .सर्व खिडक्या बंद होत्या .खिडक्यांच्या काचातून अंधुक प्रकाश बाहेर येत होता.त्याअर्थी वाड्यात कुणीतरी राहात होते .

आम्ही दरवाज्यावर जोरात थापा मारल्या.आत संपूर्ण शांतता होती .आतून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला.वाड्यात दिवे लागलेले होते. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता.त्याअर्थी आत एक किंवा अनेक माणसे नक्की होती.परंतु कुणीही दरवाजा उघडायला येत नव्हते .आतून माणसांचा सासेदही येत नव्हता .कुत्राही भुंकण्याचा थांबला होता.आम्ही दरवाज्यावर पुन्हा जोराजोरात थापा मारल्या .कुत्र्याने पुन्हा भुंकण्याला सुरुवात केली.दरवाजा जुन्या पद्धतीचा होता .त्याला आतून अडसर असावेत .कदाचित  एक किंवा अनेक लोखंडी पट्ट्याही असाव्यात.बाहेर कोण आले ते पाहण्यासाठी त्याला एक छोटीसी  खिडकीही होती. पुन्हा दरवाज्यात जोरजोरात ठोकल्यावर आतून कुणीतरी  दरवाजाकडे येत आहे असे वाटले.खिडकीवर असलेली पट्टी दूर करण्यात आली .आतून दोन डोळे आमच्याकडे निरखून पाहात होते .त्याचे समाधान झाल्यावर त्याने आतून अडसर काढले आणि दरवाजा उघडला .त्याने लगेच आत या  म्हणून सूचना केली .

आम्ही आत गेल्यावर घाईघाईने त्याने दरवाजा लावून घेतला .जणू काही आमच्या पाठोपाठ कुणीतरी आत घुसण्यासाठी टपलेलेच होते. दरवाजा उघडणारा मुलगा पंचवीस वर्षांचा तरुण होता .समोरच एक पन्नास वर्षांची व्यक्ती हातात बंदूक घेऊन उभी होती .ती बंदूक त्याने आमच्यावर रोखलेली होती .त्याचे स्नायू पिळदार होते .चेहरा राकट होता .भरघोस मिश्या होत्या . त्याच्याकडे बघून कुणीही दचकेल असे त्याचे व्यक्तिमत्त्व होते.आम्ही दचकलो आणि त्याने रोखलेली बंदूक पाहून चटकन हात वरती केले .आमच्या चेहऱ्यावरील भीती पाहून त्याला हसू आवरेना .त्याने बंदूक खाली केली आणि या पावणं असे तो म्हणाला . आपणावर कुणीतरी हल्ला करणार आहे आणी आपण त्यावर प्रतिहल्ला करणार  आहोत असा त्याचा आव होता. दरवाज्याशेजारी आणखी एक तरुण मुलगा उभा होता.त्याच्या हातात पल्लेदार धारदार तलवार होती .दरवाजा उघडणाऱ्या मुलाच्या हातातही तशीच तलवार होती. तरवारी घेणारे ते दोघे भाऊ असावेत .हातात बंदूक असलेले त्यांचे वडील असावेत.एका कोपऱ्यात तीन बायका थरथर कापत उभ्या होत्या .त्यांच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती दिसत होती .त्या तीन बायकांतील वयस्क स्त्री त्या मुलाची आई असावी व दोन तरुण मुली त्या दोघांच्या पत्नी असाव्यात हे सहज लक्षात येत होते .त्या सर्वांचा आव त्यांच्यावर कुणीतरी आक्रमण करणार आहे असा होता.कमी जास्त प्रमाणात सर्वच मंडळी भेदरलेली होती .ती मंडळी अशी का घाबरलेली आहे ते आमच्या लक्षात येत नव्हते.इतक्या मजबूत वाड्यात शस्त्र हाती असताना एवढे घाबरण्याचे काय कारण होते ?

आम्हाला खूप भूक लागली होती .आमच्या पाठीवरील सॅकमध्ये खाण्याचे पदार्थ होते .आपणच एकट्याने ते कसे खावेत अश्या  विचारात आम्ही होतो.जेवणाची वेळ होती हे लोक कदाचित आपल्याला जेवायला देतील असाही विचार मनात अाला .त्या सर्वांना देता येतील इतके खाद्यपदार्थ आमच्याजवळ नव्हते.आणि आपण एकट्यानेच त्यांच्यासमोर खावे असे आम्हाला वाटत नव्हते .एवढा मोठा भव्य वाडा असताना या बाहेरच्या हॉलमध्ये ही सर्व मंडळी का गोळा झाली होती ते आमच्या लक्षात येत नव्हते .त्या बायका जेवण करायला जातील असे आम्हाला वाटत होते.एक तास तसाच गेला.कुणीही हलण्याचे चिन्ह नव्हते .आम्हाला कुणी पाणीही विचारले नाही.त्या सर्वांच्या मध्ये तो कुत्रा बसला होता .शिकार करणारा निर्भय धनगरी असा तो कुत्रा होता . आम्ही दरवाज्यावर थाप मारली त्यावेळी तोच भुंकला होता. 

सामान्यत: कुत्रा घराबाहेर असतो.तो भुंकून सर्वांना सावध करीत असतो.त्याला वाटणाऱ्या संशयास्पद व्यक्तींवर  हल्ला करीत असतो.घराचे रक्षण करीत असतो . इथे तर हा कुत्रा सर्वांच्या संरक्षणात होता.आम्हाला ती गोष्ट विचित्र वाटली .

आमच्या मनातील संभ्रम त्या वयस्क मनुष्याच्या लक्षात आला .तो काहीतरी बोलण्याला सुरुवात करणार   तेवढ्यात त्या कुत्र्याने जमिनीला तोंड लावून भयानक स्वरात रडण्याला सुरुवात केली.कुत्री भुंकू लागली ,रडू व ओरडू लागली, भयानक स्वरात केकाटू व विव्हळू लागली,म्हणजे  अंगावर कसा काटा उभा राहतो तो तुम्ही अनुभवलेला असेलच.त्या कुत्र्याच्या रडण्याचा आवाज वाड्यात घुमत होता .आतून आणखी एक कुत्रा आला आणि तोही रडू लागला .

आमच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला .काही तरी भयानक संकटाची चाहूल लागत आहे असे आम्हाला वाटले .

कशाला आम्हाला हा वाडा दिसला? उगीचच आम्ही येथे आश्रयाला आलो .आता पश्चाताप करून काही उपयोग नव्हता . सकाळशिवाय वाड्यातून बाहेर पडणे शक्य नव्हते. 

आम्ही मुकाट्याने त्या वयस्क गृहस्थाचे बोलणे ऐकू लागलो.

(क्रमशः)

१३/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

. . .