गूढकथा भाग ५ : २ स्वप्न संकेत २-२
मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.
चांगली किंवा वाईट दोन्ही प्रकारची स्वप्ने खरी झालेली त्याला माहीत होती .त्याला उगीचच्या उगीच स्वप्ने पडत नसत .स्वप्नाप्रमाणे घटना कधी लगेचच दोन तीन दिवसांत किंवा एखाद्या आठवड्याने घडत असत.त्याला त्याचे स्वप्न स्पष्टपणे आठवत होते.
येथे भूकंप होणार . ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस पडणार. आपण धरण बांधत असलेल्या नदीला महापूर येणार.गावातील चीज वस्तू वाहून जाणार .घरे कोसळणार .धरणावरील बांधकामासाठी येथे उभारलेल्या वस्तीची वाताहात होणार .त्याला स्पष्टपणे भविष्यात घडणाऱ्या घटना दिसत होत्या .
बांधकामावरील साहित्य वाचवावे कसे? तेथील लोकांचे प्राण वाचवावे कसे ? गावातील लोकांचे प्राण व जमेल तेवढी मालमत्ता वाचवावी कशी?याचा तो गंभीरपणे विचार करू लागला.त्याचे स्वप्न भविष्य खरे ठरत असे असा आतापर्यंतचा अनुभव होता.भूकंप होणार पाऊस पडणार पूर येणार याबद्दल त्याची खात्री होती .परंतु हे येथील कंपनीच्या प्रमुखाला पटेल का याचा तो विचार करीत होता .
बांधकामाचे साहित्य मजुरांच्या राहुटी जवळच्या डोंगरावर वाहून न्याव्या असे त्याला वाटत होते.म्हणजे पुरामुळे होणारे नुकसान कमीत कमी झाले असते. मौल्यवान बांधकाम साहित्य सुखरूप राहिले असते .मजूर व कामावरील इतर कर्मचारी यांचे प्राण वाचले असते.
गावातील लोकांची वाताहत होणार हे त्याला स्पष्टपणे दिसत होते.धरणावरील कर्मचारी व सामान याची वाताहत त्याला दिसत होती.परंतु केव्हां हा प्रश्न होता .उद्या,दोन दिवसांनी, की चार दिवसांनी, त्याला माहीत नव्हते .काय करावे त्याला सुचेना .
त्याने आणखी एखादा दिवस थांबण्याचे ठरविले .जर स्वप्नाची पुनरुक्ती झाली तर मात्र काहीतरी करावयाचे त्याने ठरविले .
त्या रात्री त्याला पुन्हा तसेच स्वप्न पडले .यानंतर मात्र तो प्रोजेक्ट प्रमुखाला भेटला .त्याने त्याची दोन रात्री पडलेली स्वप्ने व पूर्वीच्या सर्व स्वप्नांचा इतिहास त्यांना सांगितला.समजा पुढच्या आठ दहा दिवसांत काहीही झाले नाही तर केलेला खर्च फुकट जाईल.मी त्याची जबाबदारी घेतो .परंतु आपण साहित्य व लोकांचे प्राण वाचवूया म्हणून त्याने प्रकल्प प्रमुखाचे मन वळविले .
आता गावातील लोकांना समजावण्याची जबाबदारी त्याच्यावर होती . गावात एक मंदिर होते .तेथे नगारा होता .त्याने जाऊन नगारा बडविण्याला सुरुवात केली.प्रत्येक वेळी मधूही त्याच्या बरोबर होती.तीही मन वळविण्याचे काम करीत असे .त्याला स्वप्नातून भविष्याबद्दल संकेत कसे मिळतात आणि ते कसे खरे होतात त्यांचे अनुभव ती सांगत असे .त्यामुळे त्याच्या बोलण्यावर विश्वास बसण्याला मदत होत असे .नगार्याचा आवाज ऐकून मंदिराजवळ हळूहळू लोक जमले .त्याने सर्वांना त्यांच्या जवळ असलेली चीजवस्तू घेऊन जवळच्या डोंगरावर जावे म्हणून सांगितले .गावात भूकंप होणार आहे. जलप्रलय होणार आहे तरी प्राण वाचवावे .असे आवाहन त्याने मनापासून केले .प्रथम लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले .परंतु त्याने त्याला आतापर्यंत वेळोवेळी पडलेली स्वप्ने कशी खरी होतात ते समजावून सांगितले .हात जोडून त्याने सर्वांना विनंती केली .मधूनेही तिच्या परीने लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
एवढ्यात गावातील कुत्री एकत्र जमून आकाशाकडे पाहून जोरात रडू लागली .पशुपक्षी यांना माणसांपेक्षा लवकर नैसर्गिक संकटाची जाण येते .त्यांना भूगर्भातील हालचाल जाणवते .आणखीही काही सूचना मिळत असतील .परंतु त्याची आपल्याला माहिती नाही .ज्याला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो असे काहीतरी पशुपक्ष्यांजवळ असावे.गोठ्यात बांधलेली जनावरे दाव्यांना हिसके मारू लागली .दावी तोडून ती जनावरे डोंगराकडे पळू लागली.आकाशाकडे पाहून कुत्र्यांचे रडणे जास्त भेसूर झाले.
मधुकरने या सर्व गोष्टी गावातील नागरिकांना समजून सांगितल्या.जे पशुपक्ष्यांना कळते, जे कुत्र्यांना जाणवते, ते आपल्याला कळत जाणवत नाही.तुम्ही सर्व आज घराला कुलूप लावून डोंगरांवर चला .तुमची सर्वात महत्त्वाची मौल्यवान चीजवस्तू जवळ ठेवा .जमेल तेवढा शिधा आपल्याबरोबर घ्या.जलप्रलय झाला नाही, भूकंप झाला नाही, तर चांगलेच आहे.परंतु तसे झाल्यास निदान लोकांचे प्राण आणि महत्त्वाची चीज वस्तू वाचेल .मी या धरणावर इंजिनिअर म्हणून काम करतो हे तुम्हाला माहित आहेच.मी आमच्या प्रकल्प प्रमुखाला सर्व गोष्टी पटवून देऊ शकलो आहे .आम्ही धरणावरील जास्त महत्त्वाची सामुग्री आणि इतर वस्तू डोंगरावर नेल्या आहेत .इतर सर्व सामान डोंगरावर नेण्याची आज बहुधा व्यवस्था होईल .भूकंपामध्ये डोंगरालाही काही हानी होणार नाहीच असे नाही .परंतु आपल्याला इथे जो धोका पोहोचेल त्यापेक्षा तिथे कमी धोका पोचेल .कारण हा डोंगर या गावापासून बराच दूर आहे .इथे भूकंप व जलप्रलय होणार आहे .झाला नाही तर चांगलेच आहे .परंतु झाला तर आपल्या सर्वांचे प्राण धोक्यात येतील .मौल्यवान चीजवस्तूही वाहून जाईल.आपण सर्व योग्य काळजी घेतलीत परंतु नैसर्गिक आपत्ती आली नाही तर उत्तमच आहे .
जेव्हा लोकांनी धरणावरील सर्व सामुग्री व मजूर लांब असलेल्या डोंगरावर जाताना पाहिले.जेव्हा त्यांनी कुत्र्यांचे भेसूर रडणे ऐकिले,गुरे दाव्याला ओढ घेताना पाहिली,जनावरे दावी तोडून आणि ज्यांची दावी सोडली आहेत अशी जनावरे डोंगराकडे जाताना पाहिली,तेव्हा व त्याचप्रमाणे मधुकरच्या व मधूच्या बोलण्यातील सच्चाई त्यांच्या हृदयाला कुठेतरी जाऊन भिडल्यामुळे
गावातील सर्व लोकांनी त्याच दिवशी घरेदारे बंद करून महत्त्वाचे सामान आपल्या जवळ घेऊन आणि चार दिवसांचा शिधा आपल्या जवळ घेऊन डोंगराकडे प्रस्थान केले .
त्याच रात्री मोठ्या प्रमाणात भूकंप झाला .भूकंपापाठोपाठ ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस बरसला .नदीला महापूर आला .भूकंपामध्ये घरेदारे इमारती सर्व आडव्या झाल्या होत्या .प्रचंड प्रमाणात आलेल्या पुराने सर्वकाही वाहून नेले.काही तासात होत्याचे नव्हते झाले .येथे गाव होते याच्या केवळ पुसटश्या खुणा राहिल्या.
लोकांचे प्राण आणि महत्त्वाची चीज वस्तू वाचली .कंपनीची महत्त्वाची यंत्रसामग्री वाचली आणि सर्व मजूर यांचे प्राण वाचले.
मधुकरचा सर्वांनी उदोउदो केला.
लोकांचे प्राण वेळीच वाचविल्याबद्दल सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सत्कार केला .
कंपनीची किंमती महत्त्वाची यंत्रसामुग्री व मजुरांचे प्राण वाचविल्याबद्दल कंपनीकडून मधुकरला मोठे इनाम मिळाले .
* पैसे पदवी वरची पोस्ट यापेक्षा लोकांचे वाचलेले प्राण हे अर्थातच मधुकरच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे होते*
*मधुकरला भविष्यकाळातील संकेत देणारी स्वप्ने का पडतात,कशी पडतात,याबद्दल मनो वैज्ञानिकांचा बराच खल व उहापोह झाला .*
*त्यावरती लेख व चर्चासत्रे झडली.मधुकरच्या अनेक मुलाखती सर्वत्र छापून आल्या.*
*अशी स्वप्ने त्याला का पडतात याबद्दल त्याला खरोखरच माहिती नाही .*
*एक क्वचित प्राप्त होणारा हा एक ईश्वरी कृपाप्रसाद आहे असे म्हटले पाहिजे .*
*कदाचित असे असेल की प्रत्येकाजवळ हा आतला आवाज असतो परंतु तो अापण ऐकत नाही असे असावे*
*नक्की काय आहे हे एक गूढ आहे .*
१४/७/२०१९©प्रभाकर पटवर्धन