गूढकथा भाग ५
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

गूढकथा भाग ५ : ६ कब्रस्तानातील खजिना २-२

मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.

५ कब्रस्तानातील खजिना १-२   ७ भुताटकीचे बेट १-२

प्रत्येक गावात रामसिंग व लक्ष्मणसिंग यांची वर्णने सांगून ते फरार झालेले आहेत त्यांना पकडून चावडीवर हजर केल्यास पाचशे मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील अशी दवंडी पिटण्यात आली.

प्रतापसिंग व भवानीसिंग काही दिवसांनी पूर्ण बरे झाले.तरीही त्यांनी अगोदरच ठरविल्याप्रमाणे प्रताप सिंह एका पायाने लंगडण्याचे नाटक करू लागला .तर भवानी सिंग एका हाताला लकवा मारला आहे असे नाटक करू लागला. अर्थातच दोघेही सैन्यात काम करण्यास असमर्थ ठरले .त्यांना सैन्यातून निवृत्त करण्यात आले .ते दोघेही त्यांच्या खेडेगावी जाण्यासाठी निघाले .रामपूर या गावाचे दोघेही रहिवासी होते .आपल्या गावात जाऊन त्यांनी खजिना मिळविण्यासाठी  काहीही हालचाल केली नाही .केवळ प्रामाणिकपणे जेवढे जमेल तेवढे शेतीचे काम करीत राहिले. पाय व हात दुखावल्याचे नाटक चालूच होते .त्यांच्या गावातील पाटलाने त्याप्रमाणे राजाकडे अहवाल पाठविला.ते नाटक करीत आहेत की काय असा जो थोडासा संशय होता तो पूर्णपणे दूर झाला.

पावसाळा संपल्यावर तोपर्यंत आठ दहा महिने झाले होते, कुठेतरी काम शोधण्याच्या बहाण्याने ते दोघेही बाहेर पडले .तेथून निघाल्यावर जिथे त्यांनी खजिना व त्यांचे साथीदार रामसिंग व लक्ष्मणसिंग यांना  पुरले होते त्या  कब्रस्तानात आले.  खजिना व त्या दोघांना पुरताना त्यानी एक काळजी घेतली होती.कब्रस्तानात तीन कबरींजवळ लगेच खजिना ,रामसिंग व लक्ष्मण सिंग यांना पुरले होते.नवीन प्रेत पुरताना ते प्रेत एका कबरीपासून काही एका अंतरावर पुरण्याची पद्धत होती.दोन कबरीमधून व्यवस्थित फिरता यावे हा त्यामागचा हेतू होता. कबरीलगत खजिना ,रामसिंग अाणि लक्ष्मण सिंग यांची प्रेते पुरण्याचे कारण  म्हणजे नवीन कबर खणताना खजिना किंवा रामसिंग व लक्ष्मणसिंग यांची प्रेते सापडू नयेत हे होते . त्यांनी आपण कुठे खजिना पुरला आहे यासाठी खुणाही ठेविल्या होत्या.      

कब्रस्तानात आल्यावर त्यांनी खुणा पाहून खजिन्याची जागा निश्चित केली आणि नंतर  खजिन्याची पेटी बाहेर काढण्यासाठी खणण्याला सुरुवात केली.एक दोन कुदळीचे घाव मारतात ना मारतात तोच त्यांना कुणीतरी उचलून दूर फेकून दिले . प्रतापसिंग जमिनीवर आदळला तर भवानीसिंग एका कबरीवर जावून आदळला .ते इतके जोराने आपटले होते की त्यांना काही वेळ हालचाल करता येत नव्हती.आपल्याला कुणी उचलून फेकले ते त्यांना कळेना.तेवढ्यात त्यांच्या कानावर रामसिंगचा आवाज आला .

~तुम्ही आम्हाला ठार मारून खजिना मिळविण्यात यश मिळविले .खजिना व आम्हा दोघांना येथे व्यवस्थित पुरले .राजालाही तुम्ही फसविले .परंतु तुम्हाला हा खजिना प्राप्त करून घेता येणार नाही .

~नंतर रामसिंग व लक्ष्मण सिंग या दोघांचा एकत्रित आवाज त्यांच्या कानावर आला .

~तुम्ही अप्रामाणिक आहात. आम्ही या खजिन्याचे रक्षण करीत आहोत .  हा खजिना राजाचा आहे तो राजालाच मिळाला पाहिजे .दुसरा कुणीही तो घेऊ शकत नाही .~

रामसिंग व लक्ष्मण सिंह या दोघांचा ओळखीचा आवाज ऐकून प्रतापसिग व भवानीसिंग  दोघेही हादरले.  त्याना कळून चुकले की ते दोघे भूत होऊन खजिन्याचे रक्षण  करीत आहेत .त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आपल्याला खजिना मिळणार नाही .त्यांनी एका मांत्रिकाची मदत घेण्याचे ठरविले .मांत्रिकाला सांगायचे काय हा प्रश्न होता .तोही त्यांनी कौशल्याने सोडविला .

आम्ही कब्रस्तानातून जात होतो त्यावेळी आम्हाला दोन भुतांचा त्रास झाला.ती भुते आम्हाला नेहमी त्रास देत असतात.आम्हाला धड झोपू देत नाहीत किंवा धड जेवू देत नाहीत.मांत्रिकाला त्यांनी कब्रस्तान दाखविले .त्या कब्रस्तानात जावून मांत्रिकाने निरीक्षण केले.व नंतर प्रत्येकाला एक मंतरलेला दोरा दिला.तो दोरा हातामध्ये बांधून ते पुन्हा कब्रस्तानात गेले.तरीही त्यांना रामसिंग व लक्ष्मणसिंग खजिना पुरलेली जमीन उकरू देत नव्हते.त्यांनी खणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना लगेच  उचलून फेकून दिले जाई.शेवटी हताश होऊन ते दोघेही आपल्या गावी परत आले.

एवढ्या कालावधीमध्ये त्या भुतांना जास्त सामर्थ्य प्राप्त झाले होते .कब्रस्तान सोडून ते कुठेही फिरू शकत होते.एक दिवस राजा झोपलेला असताना त्याच्या स्वप्नात ते दोघेही आले .त्यांनी आपण अप्रामाणिक नसून प्रतापसिंग व भवानीसिंग हे अप्रामाणिक आहेत त्यांनी अाम्हा दोघांना ठार मारून खजिना कब्रस्तानात लपवून ठेविला आहे असे सांगितले .आमच्यावर अप्रामाणिकपणाचा डाग लागल्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत असे ते सांगत होते.

राजाला आपल्याला उगीचच स्वप्न पडले असेल म्हणून त्याने तिकडे दुर्लक्ष केले .परंतु राजाला रोज तेच स्वप्न पडू लागले.तिसऱ्या दिवशी ते स्वप्न पडले व त्याबरोबरच कब्रस्तानही राजाला दिसले.चौथ्या दिवशी कब्रस्तानात खजिना नक्की कुठे पुरला आहे ती जागाही त्याला स्वप्नात दिसली.आता मात्र स्वप्नाकडे दुर्लक्ष करायचे नाही असे राजाने ठरविले .बरोबर काही सैनिक घेऊन ज्या वाटेने खजिना येत होता त्या रस्त्याने तो निघाला.त्याला वाटेवर कब्रस्तान लागले .स्वप्नातील हेच ते कब्रस्तान म्हणून त्याने ओळखले .जिथे खजिना पुरला होता ती जागाही त्याने स्वप्नात अगोदरच पाहिलेली असल्यामुळे  ओळखली.

त्या जागी खणण्यास त्याने बरोबरच्या सैनिकांना सांगितले .तीन चार हात खणल्यावर त्यांना खजिन्याची पेटी मिळाली.ती पेटी घेऊन सर्वजण राजधानीला आले.

काही सैनिकांना त्याने प्रतापसिंग व भवानीसिंग यांना पकडून आणण्यासाठी पाठविले.चाबकाचे पाचपंचवीस फटके बसताच त्या दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केला .

त्यांनी रामसिंग व लक्ष्मणसिंग यांना कुठे पुरले आहे तेही दाखविले.

*त्यांची केवळ हाडे राहिली होती.ती गोळा करून त्यांना विधिवत मंत्राग्नी  देण्यात आला.*

*प्रतापसिंग व भवानी सिंग यांचा शिरच्छेद  करण्यात आला.*

*त्यानंतर पुन्हा कधीही कुणालाही रामसिंग व लक्ष्मणसिंग यांचा त्रास झाला नाही.*

*राजधानीमध्ये रामसिंग व लक्ष्मणसिंग या दोघांची  समाधी बांधण्यात आली .*

*प्रामाणिकपणाचे ज्वलंत उदाहरण म्हणून त्या समाधींकडे बोट दाखविले जाते.*

*प्रतापगड या राजधानीच्या शहरांमध्ये अजूनही त्या समाधी आहेत.*  

*  प्रामाणिकपणाचा आदर्श म्हणून त्या समाधीस्थळाचा निर्देश दिला जातो .लोक त्यांचे आदराने दर्शनही घेतात.*

(समाप्त)

३०/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

. . .