भूतकथा भाग २
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

भूतकथा भाग २ : ०७ भुतांची बाग २-२

भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.

०६ भुतांची बाग १-२   ०८ भुताटकीची खोली १-३

(ही कथा काल्पनिक आहे कथा नावे  यात साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

एखादा गडग्यावरून उडी मारून आत जाऊ लागला तर तो तिथून फेकला जातो.एखादा अकस्मात उचलून दहा पंधरा फुटावर फेकला गेला तर त्याचे जे काही होईल ते त्या चोराचे होते.कदाचित काही हाडे मोडतात. कदाचित मुका मार बसतो. काही दिवस हॉस्पिटलमध्ये  काढावे लागतात . एखाद्याचे हातपाय मोडून तो जन्माचा अधू होतो.

जर भुतांची मर्जी असेल तर ते त्याला आत येऊ देतात.झाडावर चढून आंबे काढायला लागल्यावर त्याला झाडावरुन ढकलून देतात .झाडावरून पडल्यावर तो लुळापांगळा होतो .

केव्हा केव्हा अांब्यानी भरलेली टोपली झाडावरून ओतून देतात .आंबे दगडावर आपटले की फुकट जातात .

झाडाखाली पिकून गळून पडलेले आंबे जर कुणी उचलू लागला तर त्याला शॉक बसतो .तर केव्हा त्या आंब्यांमध्ये अळ्या सापडतात .

असे असूनही, या गोष्टी माहीत नसलेले किंवा असल्या गोष्टींवर विश्वास नसलेले लोक आत शिरण्याचा चोरी कऱण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर पस्तावतात.

गेले दोन तीन पिढ्या या गोष्टी होत आहेत .दर पाच दहा वर्षांनी एखादा प्रयत्न करतो .आणि जन्माचा पस्तावतो.

आंबे काढण्यासाठी जेव्हा गडी आत जातात तेव्हा खोत त्या भुतांना नारळ देऊन विनंती करतात. नंतरच गडी झाडावर चढतात.

या बागेमध्ये सुमारे पाऊणशे कलमे आहेत .त्याच्यावर चांगले मोठे नंबर एकचे रसाळ हपूस आंबे लागतात.खोताना या बागेची राखण करण्यासाठी हंगामामध्ये कुणीही राखणदार ठेवावा लागत नाही.त्यांची बाग भुतांमुळे संरक्षित आहे .

एकदा एक मांत्रिक मी कोणत्याही भुताना घाबरत नाही.मी त्यांचा बंदोबस्त करतो .मी ज्याचा बंदोबस्त करू शकत नाही अश्या भुताचा जन्म अजून व्हायचा आहे अशी बढाई मारीत गावात आला होता.त्याला गावातील लोकांनी हरभऱ्याच्या झाडावर चढवून त्या बागेत भुतांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविला .तो गुलाल लिंबू कवटी हाडे वगैरे घेऊन त्या बागेत गेला.गावातील लोक तमाशा बघावा त्याप्रमाणे त्याच्याकडे गडग्यापासून दूर उभे राहून आता काय होते ते पाहात होते .त्या मांत्रिकाने मंत्र वगैरे म्हणण्याला सुरुवात केली.त्याने कवटीची साग्रसंगीत पूजा केली .लिंबू कापून त्याच्या फोडी सर्वत्र फेकल्या .गुलाल उधळला .त्याने भुतांना बंद करण्यासाठी तीन बाटल्या आणल्या होत्या.आतापर्यंत त्या भुतांनी मांत्रिकाला काहीही केले नव्हते .मांत्रिक जबरदस्त आहे. हा भुतांचा नक्की बंदोबस्त करतो.असे उद्गार बघ्यातून निघू लागले होते.

एवढ्यात त्या मांत्रिकाने पूजा केलेली कवटी कंपाउंडच्या बाहेर फेकण्यात आली.त्या पाठोपाठ लिंबू हाडे गुलाल वगैरे सर्व साहित्य फेकण्यात आले .त्या मांत्रिकाचा चष्मा काढून कुणीतरी मोडून टाकला .जणूकाही कुणीतरी तो पायाखाली चिरडून टाकीत आहे असे वाटत होते  .मांत्रिकाने काही हाडे आणली होती .त्यातील काही हाडे बाहेर फेकण्यात आली.काही हाडानी त्या मांत्रिकाला मार देण्याला सुरुवात केली.कोणता तरी अदृश्य हात हाडे हातात घेऊन ती मांत्रिकांच्या पाठीवर हातावर पायावर मारीत होता.मांत्रिक पळू पाहात होता परंतु त्याला पळता येत नव्हते. जसे काही कुणीतरी त्या मांत्रिकाला तेथे जखडून टाकले होते.मांत्रिक दोन्ही हातानी बोंबा मारीत होता.त्याचे शरीर मारामुळे काळे निळे पडत होते.अंगावर वळ उठत होते. शरीर सुजत होते .भुतांचे समाधान झाल्यावर त्यांनी त्याला उचलून कम्पाउंड बाहेर फेकून दिला.मांत्रिक त्यानंतर तीन महिने हॉस्पिटलमध्ये होता .त्यानंतर आजतागायत कुणीही तसे धाडस केले नाही.

  मी पत्नी व मुले सानेकाकांची सुरस व चमत्कारिक कथा ऐकत होतो.किती वेळ झाला याचे कोणालाही भान नव्हते .मुले तर आ करून एकमेकांना घट्ट धरून गोष्ट ऐकत होती.

  एकविसाव्या शतकात असे काही असू शकते यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता .अर्थात बागेत जाऊन विषाची परीक्षा घ्यायला कुणीही तयार नव्हता .

  पुढे सानेकाका म्हणाले.खोत त्या बागेतील आंबे काढून पुणे मुंबई येथे पाठवितात. त्यांच्या आंब्याना उत्तम भाव येतो .आज संध्याकाळी आपण विसूखोतांकडे जाऊ.तुला किती पेट्या आंबे पाहिजेत ते सांग .

आम्ही संध्याकाळी विसूखोतांकडे गेलो.त्यांनी आमचे आगतस्वागत छान केले .दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला बागेतील आंबे काढून दहा पेट्या भरून दिल्या.त्यांच्याबरोबर आम्ही बाग बघण्यासाठी गेलो होतो.विसूखोतांनी  झाडावर आंबे काढण्यासाठी गडी चढण्याअगोदर तीन नारळ त्या दगडांसमोर फोडले.विसूखोतांबरोबर आम्ही त्या आंब्याच्या बागेत फेरफटकाही मारला.आम्हाला त्या बागेत काहीही असामान्य  (अॅबनॉर्मल) आढळले नाही.

*सानेकाकानी आमची करमणूक करण्यासाठी एखादी गोष्ट बनवून तर सांगितली नाही ना असे  आम्हाला वाटू लागले .*

*परंतु गावात खरोखरच भुतांची बाग या नावाची विसूखोतांच्या मालकीची बाग होती.*

*आम्ही गावात फिरलो त्यावेळी तशाप्रकारची अफवाही आमच्या कानावर आली *

*दोन दिवस सानेकाकांचा पाहुणचार घेऊन आम्ही पेट्या गाडीवर टाकून भुताच्या बागेची कथा आठवत मुंबईला परत आलो.*

*भुताच्या बागेतील सर्व आंबे रसाळ व चविष्ट होते.*

*आम्ही सर्व, पत्नी मी व मुले आपापल्या मित्रमंडळींमध्ये जेव्हा जेव्हा भुतांच्या गोष्टी निघतात तेव्हा तेव्हा भुताच्या बागेची गोष्ट सांगत असतो.*  

(समाप्त) 

३०/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

. . .