भूतकथा भाग २
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

भूतकथा भाग २ : ०४ भुताची खुन्नस १-२

भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.

०३ समंध २-२   ०५ भुताची खुन्नस २-२

(ही गोष्ट काल्पनिक आहे .नाव स्थळ इत्यादीबद्दल साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

नावावरून गोष्ट कोकणातील आहे हे आपण ओळखले असेलच . रामभाऊ व सदाभाऊ हे जानी मित्र.त्यांची घरे शेजारी शेजारी होती.शेजारी असल्यामुळे शाळेत जाण्याअगोदरही त्यांची मैत्री होती.दोघे लंगोटी घालीत नव्हते तेव्हापासून एकमेकांना ओळखत होते . दोघेही बरोबरच शाळेत गेले .त्याकाळी गावात शाळा नव्हती .दुसऱ्या गावातील शाळेत चालत जावे लागे.सातवीपर्यंत दोघेही शिकले आणि नंतर शाळा सोडून दिली .

शाळा सोडण्याचे कारण म्हणजे आठवीपासून शाळा शहरात होती.तिथे जाऊन चार वर्षे राहावे लागणार होते .त्यावेळी अकरावीनंतर एसएससी परीक्षा असे.दोघांच्याही घरची भरपूर शेती व कलमे असल्यामुळे नोकरी करण्याची त्याना गरज नव्हती .किंबहुना ते नोकरी करण्यासाठी गेले असते तर घरच्या इस्टेटीकडे कुणी पाहायचे असा प्रश्न पडला असता. आंब्यांना सोन्याचा भाव येत होता .आंबे हे नगद पैसा देणारे उत्पन्नाचे साधन होते. शेती कुळांकडे सोपविणे धोक्याचे होते.कसणाराच शेत खाऊन बसला असता.शेती स्वतः करणे आवश्यक होते .दोघांचीही यथावकाश लग्ने झाली.त्यांची मैत्री अभेद्य होती.कोणत्याही कारणावरून त्यांच्यात कधीही वितुष्ट आले नाही .

काळानुरूप गावात शाळा आली .गावापर्यंत रस्ता झाला .बहुतेक सर्व गावे  रस्त्याने जोडली गेली.रामभाऊंच्या स्वतःच्या कलमांच्या दोन बागा होत्या.कलमे दुसऱ्या कुणाला आंबे काढण्यासाठी देण्याऐवजी स्वतःच आंबे काढून जर मुंबईला पाठविले तर पैसे जास्त मिळतील अशा कल्पनेने  आंबे स्वतः पाठविण्याला सुरुवात केली. बऱ्यापैकी पैसे मिळायला सुरुवात झाल्यानंतर आपण दुसऱ्याचीही कलमे आंबे पाठवण्यासाठी केली तर धंदाही होईल चार पैसेही मिळतील अशी कल्पना त्यांच्या मनात आली.त्यानी एक जीप घेतली चार गडी कायमचे नोकरीवर ठेवले.दूर दूरची कलमे करून जीपमधून जाऊन आंबे काढून ते पाठविण्यास सुरुवात केली.

एवढे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे इथेच त्यांची गजाभाऊंशी युद्धाची ठिणगी पडली .त्यांच्याच गावातील गजाभाऊ हे पहिल्यापासून आंबे पाठविण्याचा धंदा करीत असत.स्वाभाविक आंब्याच्या बागा आंबे काढण्यासाठी घेताना दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली.रामभाऊ गजाभाऊंच्या ठरलेल्या बागा आपण करणार नाही असे कटाक्षाने पाहात असत.गावात राहून उगीच एकमेकाची वैर नको अशी भावना त्यामागे होती .स्पर्धा म्हणजे वैर नव्हे .जो जास्त पैसे देईल त्याला बागेचा मालक आपली कलमे आंबे काढण्यासाठी देणार .व्यवहार सरळ होता.स्पर्धेमध्ये गैर काहीच नव्हते .

परंतु दुर्दैवाने गजाभाऊ सरळ नव्हते .लांडी लबाडी त्यांच्या पांचवीला पुजलेली होती .बागेच्या मालकाला कर्जाऊ पैसे देणे .त्याच्याकडून व्याज वसूल झाले नाही तर कलमे व्याजाच्या पोटी आपल्याकडे घेणे .कर्जदाराने फारच कुरकुर केली तर त्याला व्याज कापून घेऊन थोडीशी रक्कम  देणे .तो कर्ज फेडू शकत नसेल तर बाग आपल्या मालकीची करून घेणे असे त्यांचे उद्योग चालत असत .सावकारी करत करत त्यांनी अनेक बागा व अनेक जमिनी आपल्या ताब्यात हळूहळू घेतल्या होत्या.हा त्यांचा उद्योग त्यांच्या वडिलांच्या वेळेपासून चाललेला होता.हळूहळू गजाभाऊंचे वडील व आता गजाभाऊ चांगलेच मालदार असामी बनले होते.

त्यांच्याशी शक्यतो स्पर्धा जरी रामभाऊ टाळत असले तरी एकाच धंद्यात असल्यामुळे केव्हा ना केव्हा स्पर्धा करावी लागणार होती .आणि ती वेळ लवकरच आली .काही बागा एका देवस्थान ट्रस्टच्या होत्या .टेंडर काढून त्या बागा सीझनमध्ये आंबे काढण्यासाठी दिल्या जात असत.आत्तापर्यंत देवस्थानच्या विश्वस्तांच्या सहकार्याने गजाभाऊ दोन तीन टेंडर्स भरत.ही टेंडर्स त्यांच्याच इसमानी भरलेली असत.अशाप्रकारे सर्व काही कायदेशीर दाखवून कमी किमतीत त्या बागा गजाभाऊ स्वतः दरवर्षी करीत असत .

या वर्षी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये बदल झाले होते .त्यांनी जाहिरात देऊन टेंडर्स मागविली होती . गजाभाऊंची हातचलाखी येथे चालणार नव्हती. देवस्थानच्या बागा बऱ्याच असल्यामुळे आपणही टेंडर का भरू नये असा विचार रामभाऊंच्या मनात आला .थोडक्यात रामभाऊनी टेंडर भरले.ते पास झाले आणि त्या वर्षी त्या बागा रामभाऊना आंबे काढण्यासाठी मिळाल्या.गजाभाऊनी ही गोष्ट खेळीमेळीने न घेता जरा जास्तच वक्रतेने घेतली.एका गावातील असून रामभाऊंनी आपल्याला मुद्दाम खाली पाहण्यासाठी जास्त रकमेचे टेंडर भरले व आपला अपमान केला अशी काहींशी  समजूत त्यांनी करून घेतली.

आपण मोठे आंब्याचे व्यापारी .हा कोण रामभाऊ ?आपल्या थोड्याबहुत मक्तेदारीच्या धंद्यांमध्ये हा कानामागून आला आणि तिखट झाला असा काहीसा गैरसमज त्यांनी करून घेतला .रामभाऊंशी त्यांनी उभा दावा धरला.रामभाऊही काही कमी नव्हते .त्यांनी गजाभाऊंशी स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न केला होता.परंतु तो अयशस्वी झाला .गजाभाऊंनी उगीचच्या उगीच त्यांच्याशी वैर धरले.

मग रामभाऊनी पुढील धोरण अवलंबिले.जशास तसे. वाघ म्हटला तरी खातो. वाघोबा म्हटले तरी खातो. मग वाघ्या का म्हणू नये .रामभाऊंचे हे धोरण गजाभाऊना मुळीच आवडले नाही.मुळात त्यांनी अनिष्ट स्पर्धा सुरू केली होती .मुळात ते वाकड्यात शिरले होते .त्यांनी उगीचच रामभाऊ  आपल्याला डिवचतात असा गैरसमज करून घेतला होता.उगीचच्या उगीच दोघांमधील वैर वाढत गेले .खरे पाहिले तर केवळ गजाभाऊ वैर करीत होते.रामभाऊ शक्यतो त्यांना टाळत असत .

ग्रामपंचायतीमध्येही रामभाऊंनी एखादा मुद्दा मांडला तर त्याला गजाभाऊ केवळ विरोधासाठी विरोध करीत.निवडणुकीमध्ये ज्या बाजूला रामभाऊ असत त्याच्या विरुद्ध पार्टीत गजाभाऊ असत.

एक दिवस गजाभाऊ काहीतरी निमित्त होऊन वारले.मरताना त्याच्या डोक्यात दुर्दैवाने रामभाऊंचाच विषय होता.त्याला कसे खाली पाहायला लावता येईल. त्याला कसे नेस्तनाबूत करता येईल.अशा विचारात असताना त्यांचा मृत्यू झाला.मृत्यूसमयी जर एखादी तीव्र इच्छा मनात असेल तर  ती व्यक्ती भूतयोनीत जावून आपली इच्छा पूर्ण करून घेते.असा एक समज आहे .तर काही जण दुसरा जन्म, पुढचा जन्म,त्या इच्छापूर्तीसाठी घेतात असे म्हणतात.खरे खोटे तो दयाघन प्रभूच जाणे. आता गजाभाऊ रामभाऊंचे काय करणार ते देवच जाणे .

(क्रमशः)

१३/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

. . .