भूतकथा भाग २ : ०५ भुताची खुन्नस २-२
भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.
(ही गोष्ट काल्पनिक आहे .नाव स्थळ इत्यादीबद्दल साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
मृत्यूसमयी जर एखादी तीव्र इच्छा मनात असेल तर ती व्यक्ती भूतयोनीत जावून आपली इच्छा पूर्ण करून घेते.असा एक समज आहे .तर काही जण दुसरा जन्म ,पुढचा जन्म, त्या इच्छापूर्तीसाठी घेतात असे म्हणतात.खरे खोटे तो दयाघन प्रभूच जाणे.
गजाभाऊ जाऊन एखादा महिना झाला असेल.रामभाऊ गाढ झोपले होते. एवढ्यात त्यांना कुणीतरी हलवून जागे केले .त्यांचे परममित्र सदाभाऊ शेजारी उभे होते .उन्हाळा असल्यामुळे रामभाऊ अंगणात वाऱ्यावर झोपले होते .उठून बसल्यावर रामभाऊनी सदाभाऊना विचारले अरे इतक्या रात्रीचा तू का आलास?त्यावर सदाभाऊ म्हणाले. आपला परम मित्र जनार्दन वारला.आत्ताच रात्री चिठी घेऊन गडी माझ्याकडे आला.सकाळीच त्याचे और्ध्वदेहिक करणार आहेत .आपल्याला रात्रीच्या रात्री लगेच गेले पाहिजे .रामभाऊ किल्ली घेऊन दरवाजा उघडण्यासाठी निघाले .घरातील कुणाला त्रास नको म्हणून ते दरवाजाला बाहेरून कुलूप लावून अंगणात उघड्यावर वाऱ्यावर झोपत असत.उन्हाळयात घरात झोपणे उकाड्यामुळे व घामामुळे असह्य होत असे.बाकी सर्व जरी घरात झोपत असले तरी ते एकटेच बाहेर उघड्यावर झोपत.ते अति धैर्यशील होते. भीती हा शब्द त्यांच्या कोषात नव्हता.ते स्वतःला रामभक्त हनुमान समजत .त्यांच्या धीटपणाच्या कितीतरी कथा पंचक्रोशीत सांगितल्या जात असत .भूत, वाघ, डुक्कर, तरस, दरोडेखोर, दारुडे, गुंड, या सर्वांना ते निधड्या छातीने सामोरे जात व त्यांना नामोहरम करीत असत, असा त्यांचा लौकिक होता .आत जावून त्यांनी शर्ट घातला. काठी घेतली .बायकोला उठवून कुठे जात आहे व कां जात आहे ते सांगितले.त्यांच्या पत्नीने किती वाजेपर्यंत याल म्हणून विचारले असता दुपारपर्यंत येतो. आतून कडी लावून घे असे सांगून ते सदाभाऊंबरोबर निघाले.
दोघेही बालपणापासूनचे मित्र असल्यामुळे त्यांच्या संभाषणात कुठलाही संकोच नसे .जनार्दनचा गाव मुख्य रस्त्यापासून जरा आडवाटेला होता.थोड्याच वेळात मुख्यरस्ता सोडून ते आडवाटेने जाण्यासाठी निघाले.जनार्दनच्या आठवणी काढत गप्पा मारीत ते पायरस्त्याने चालत होते .पायवाटेवर ते एकामागून एक असे चालत होते.सदाभाऊ पुढे तर रामभाऊ मागे होते .
एकाएकी रामभाऊंना सदाभाऊ वेगळेच वाटू लागले.त्यांना हा आपला नेहमीचा सदा नाही अशी एक प्रकारची जाणीव होऊ लागली.ते चांदण्यांच्या अंधुक प्रकाशात पुढे चालणार्या सदाला पाहात होते.त्यांना पुढे चालणारा सदा नसून दुसराच कुणीतरी आहे असा भास होऊ लागला.केव्हां तो सदा वाटे तर केव्हा तो वेगळाच कुणीतरी वाटे.नीट निरखून पाहता तो त्यांना गजा आहे असे लक्षात आले .गजा तर मेला. आपल्याला बोलवण्यासाठी सदा आला. हा काय घोळ आहे काही लक्षात येईना .पुढे चालणार्याचे पाय मध्येच दिसत मध्येच नाहीसे होऊ लागले.आवाज घोगरा येऊ लागला .मध्येच पाय दिसत मध्येच पाय दिसत नसत .मध्येच पाय खूप उंच होत तर मध्येच खूप आखूड होत .मध्येच पाय सुलटे दिसत तर मध्येच उलटे दिसत.रामभाऊंना घाबरविण्यासाठी हा चाळा चालला होता .
त्यांना आतून एकदम जाणीव झाली.हा गजा आहे. गजा तर मेला.हे गजाचे भूत आहे.हा आपल्यावर सूड उगवण्यासाठी आला आहे .आपल्यावर सूड उगवल्याशिवाय हा जाणार नाही .सुरुवातीला भीतीने त्यांच्या अंगाला कंप सुटला .पण तरी ते रामभाऊ होते .रामाचे,बलभीम हनुमानाचे एकनिष्ठ भक्त होते.त्यांच्या भोवती रामनामाचे अभेद्य कवच होते.ते नेमाने गुरुवारी दत्ताची आरती करीत असत .गुरुवारचा व शनिवारचा त्यांचा उपास असे.ते तसे कणखर होते .
त्यांच्या मनात क्षणात हे सगळे विचार उमटून गेले.अश्या प्रसंगी जो घाबरला तो संपला हे त्यांना माहीत होते.मनुष्य भीतीपोटीच कित्येक वेळा अर्धमेला होतो तर काही वेळा हृदयविकाराने मरतो .प्रसंगाला धैर्याने तोंड दिले पाहिजे .हे मनाचे युद्ध आहे .जर मन कणखर असेल तर त्याला कोणतेही भूत काहीही करू शकत नाही.कोणतेही भूत आपल्या शक्तीने प्रथम दुसऱ्यांच्या मनावर ताबा मिळविते . आणि नंतर ते त्याचा खुळखुळा करून टाकते.आपण त्याच्या कह्यात जाता कामा नये .
गजाभाउंच्या त्या भुताने जणूकाही रामभाऊंच्या मनातील विचार ओळखले.ते भूत एकदम गर्रकन फिरले.दोन हात कमरेवर ठेवून रामभाऊंसमोर उभे ठाकले.एखाद्या राक्षसपार्ट्यासारखे गडगडाटी हास्य करीत ते म्हणाले तू आता संपला.तू माझ्या सारख्या प्रतिष्ठित माणसाशी स्पर्धा केलीस.माझ्या आड आलास.माझ्या वाटेला गेलास .मी तुला आता संपविल्याशिवाय राहणार नाही .मी तुला खाणार .असे म्हणून त्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले .
रामभाऊना माहित होते की ही मनाची लढाई आहे.कमकुवत मनाचा एक क्षण कि हे भूत आपल्यावर पगडा बसवील.नंतर त्याला उलथवून टाकणे कठीण जाईल .त्यांनी प्रभू रामाचे व हनुमानाचे स्मरण केले.दत्तगुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणली .
आणि ते गरजले तू माझे जिवंत असताना काहीही करू शकला नाहीस आणि आता जरी पाशवी शक्ती तुझ्याजवळ असली तरीही तू काहीही करू शकत नाहीस.पाशवी शक्तीला दैवी शक्ती पुढे नेहमीच हार खावी लागते .तू मुकाटय़ाने माझ्या पुढ्यातून निघून जा.पुन्हा मला केव्हाही तोंड दाखवू नकोस .कोणत्याही रूपाने माझ्या पुढे येऊ नकोस .त्याचा काहीही उपयोग होणार नाही .तू कधीही मला काहीही करू शकत नाहीस.माझ्या भोवती रामभक्तीचे अभेद्य कवच आहे .साक्षात हनुमान माझा पाठीराखा आहे . दत्तप्रभूंचा माझ्यावर वरदहस्त आहे .तू मला जरा जरी स्पर्श केला तरी तू जळून खाक होशील .
यावर गजाभाऊंचे भूत जरा दचकले परंतु त्याने माघार घेतली नाही.एक पाऊल पुढे येऊन त्याने रामभाऊंची गर्दन पकडण्याचा प्रयत्न केला .रामभाऊंची गर्दन पकडून त्यांना उचलण्याचा त्याचा विचार असावा.गर्दन दाबून त्यांना ठार मारण्याचा त्याचा विचार असावा.
परंतु रामभाऊंच्या मानेला त्या भुताचा हात लागताच आगीचा चटका बसल्यासारखा त्याने झटक्यात हात काढून घेतला .रामभाऊंभोवती आगीचे एक अभेद्य कवच त्या भुताला दिसू लागले.गजाभाऊ रामभाऊंभोवती वेगाने फिरू लागले.क्षणात ते लहान मोठे होऊ लागले.ते वेगाने आपली रूपे बदलू लागले.कधी हिंस्र व्याघ्र, तर कधी हिंस्र सिंह,क्षणात अजगर, तर क्षणात अक्राळविक्राळ वटवाघूळ,त्याचा हेतू ते घाबरतील आणि त्यांच्या मनावर आपला कब्जा बसेल असा होता.
*परंतु रामभाऊ तेवढ्याच ताठपणे तेवढ्याच कणखरपणे त्याच्या पुढे उभे होते.*
*शेवटी आपले काहीच चालत नाही असे त्या भुताच्या लक्षात आले.*
*जो पर्यंत आपण त्याच्या मनावर कब्जा बसवत नाही तोपर्यंत सर्व काही व्यर्थ आहे हे त्याच्या लक्षात आले*
*शेवटी दमून हताश होऊन त्याने एक मोठी आरोळी ठोकली.*
*क्षणार्धात ते अंतर्धान पावले*
*त्यानंतर पुन्हा केव्हाही त्याने रामभाऊना दर्शन दिले नाही.*
(समाप्त)
१३/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन