भवानी तलवारीचे रहस्य : गुरुदेव समर्थ
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी त्याचा काही एक संबंध नाही. केवळ मनोरंजन हा एकाच हेतू ह्या कथेमागे आहे.
"दार उघडा…." वरून आरोळी ऐकू आली आणि दरवान लोकांनी तोरणा किल्याचे दरवाजे उघडायला सुरवात केली. ६ घोडेस्वार वेगाने आंत दाखल झाले. घोडे आणि स्वार धुळीने माखले होते आणि जरी पटका जवळ जवळ फाटून गेला होता. स्वागत करण्यासाठी किल्लेदार स्वतः पुढे आला. दुर्गभट्ट आपले धोतर सांभाळत पळत पळत आले. किल्ल्यांतील सेवक सुद्धा थोड्या कुतूहल पूर्वक स्वारा कडे पाहू लागले. कोंढाणा किल्ला हाती आलाय हि बातमी आधीच पोचली होती, पण हे स्वार आणखीन काही माहिती आणताहेत हे सर्वांनाच जाणून घ्यायचे होते.
"अरे आईसाहेब कुठे आहेत ? तुला सांगितले होते न त्यांना सुचित करायला ? " दुर्गप्रमुख आपल्या सेवकावर खेकसले. "माहिती कधीच पाठवली होती हुजूर." सेवक सदानंद थोड्या ओशाळवाण्या आवाजाने बोलता झाला.
प्रमुख स्वार घोड्यावरून उतरला. दुर्गप्रमुखानी त्याला तत्काळ ओळखले, हंबीरराव पाचपुतेना कोण ओळखत नव्हता ? ६ फूट उंची असलेल्या हंबीररावाना सर्वच जन दचकून असत. इतर सरदार मंडळी प्रमाणे हंबीरराव कधीही किल्ल्यात, महालात दिसत नसत सदैव आपल्या घोड्यावरून ते रयत भर फिरत असत. एक लढाईत हंबीर रावांनी ५६ लोकांना एकहाती ठार मारले होते, शेवटी आपली तलवार मोडली असता त्यांनी आपल्या हाताने म्लेञ्चाचे डोके फोडले होते. सनकी म्हणूनच त्यांना इतर सरदार ओळखत असत. पण त्यांची स्वामी भक्ती मात्र अतुलनीय होती. हा माणूस आपल्या महाराजासाठी कुठल्याही थराला जायील ह्यांत शंका नव्हती .
हंबीर राव घोड्यावरून उतरून हलकेच चालत आले. त्यांच्या पाठोपाठ आणखीन दोघे सैनिक चालत आले. दुर्ग प्रमुखांनी इतर स्वारांच्या नजरेत खिन्नता पाहीली. वास्तविक म्हणजे असे अचानक स्वार पाठवणे त्यांना अपेक्षित नव्हते. कोंढाणा सर केला म्हणजे सर्वानीच आनंदित असायला पाहिजे होते.
हंबीर रावांनी कमरेच्या पट्यातून एक पत्र बाहेर काढले. इतर स्वार फारच चिंताग्रस्त वाटत होते. "नमस्कार हंबीरराव युद्ध भूमी सोडून इथे कुठे ? काय प्रयोजन आहे ? " दुर्ग प्रमुखांनी वातावरण हलके करण्याच्या हेतूने विचारले. दुरूनच भट्ट आपली तुंदिलतनू सावरत येत होते. "महाराजांचा खास हुकुम आहे" हंबीर रावांनी आपले पत्र दुर्ग्प्रमुखनच्या हातात दिले.
किल्ल्या वरची सेवक मंडळी, पहारेकरी इत्यादी आपले काम सोडून हंबीर राव आणि दुर्गप्रमुखां कडे बघत होते. भट्ट दुर्ग प्रमुख जवळ येवून थांबले.
दुर्ग प्रमुखांनी पत्र हातांत घेतले आणि ते वाचू लागले. सर्व जन बारकाईने त्यांच्याकडे पाहत होते. दुर्गप्रमुखांच्या चेहेर्यावर आधी आश्चर्य आणि नंतर विलक्षण रागाचे भाव चेहेर्यावर उमटले. भट्ट सुद्धा दुर्ग प्रमुखांचा चेहेरा पाहून कावरे बावरे झाले.
"हंबीर ? डोके ठिकाणावर तर आहे ना ? ह्याचा अर्थ काय आहे ? हि कसली दगाबाजी आहे ? " दुर्ग प्रमुख ओरडले. त्यांचा आवाज ऐकून काही पहारेकरी तत्काळ पुढे सरसावले. हंबीर मात्र तसूभर सुद्धा हलले नाही. भट्टानी पत्र आपल्या हातात घेवून वाचले. "शिव शिव … ? हंबीर काय आहे हे ? आई साहेबाना अटक करून नजर कैदित ठेवण्याचा महाराजांचा आदेश? महाराज असा आदेश देवू तरी कसा शकतात ? "
भट्टाचे हे बोल ऐकून सेवक मंडळीत एकच धांदल उडाली. "महाराजांचा आदेश आहे, आणि कुठल्याही अवस्थतेंत पार पडण्याचा माझा मनसुबा आहे. तुमच्या ह्या फुटकळ सैनिकांना कापण्याचा माझा अजीबत उद्धेश नाही दुर्ग प्रमुख."
"मला विश्वास वाटत नाही कि हा महराजांचा आदेश असेल. ह्यांत नक्कीच काही दगाबाजी आहे … " दुर्ग प्रमुख बोलले.
दुर्ग प्रमुखांच्या रक्षकांनी आपल्या तलवारीच्या मुठीवर हाथ ठेवले. हंबीर राव तटस्थ पाणे उभे उठे पण त्याचें इतर सैनिक मात्र घाबरून पाहत होते.
"नाही दुर्ग प्रमुख . . . . माझ्या मुलाला मी ओळखते त्याने आणखीन काही पत्र पाठवले असते तरच मला आश्चर्य वाटले असते " आई साहेब दरवाज्यातून बाहेर येत बोलल्या .
पहारेकरी, आजूबाजूला काम करणरे सेवक, भट्ट सर्वच आश्चर्याने पाहत होते.
"आईसाहेब ? काय बोलताहात तुम्ही ? तुमच्यावर राजद्रोहाचा आरोप आहे. " दुर्ग प्रमुख बोलले.
"दुर्गप्रमुख, स्वामीनिष्ठा दाखवणे म्हणजे राज आज्ञेचे पालन करणे. तुम्ही ते कराल अशी अपेक्षा ठेवते. “ असे म्हणून आई साहेब आपल्या कक्षांत निघाल्या आणि हंबीर आणि त्यांचे सैनिक मागोमाग निघाले. दुर्ग प्रमुख अवाक्क पणे पाहत राहिले.
…..
"गुरुदेव आपण इथे ? " रात्रीच्या अंधारात सुद्धां महाराजांनी आपल्या कक्षांत उपस्थित झालेल्या त्या आकृतीला ओळखले. महाराजांच्या रक्षकांनी भुवया उंचावल्या, एकाने बाहेरील मशाल अंत आणली आणि समर्थांचा तेजोमय चेहेरा उजळून निघाला. महाराजांनी इशारा करतांच रक्षक बाहेर गेले. समर्थ असेच कुठेही उपस्थित होतात हे सर्वांनाच ठावूक होते. रक्षकांनी कितीही सावधानी बाळगली तर आज पर्यंत कोणीही त्यांना अटकाव करू शकला नव्हता.
"काय ऐकतो आम्ही हे महाराज ? स्वतःच्या मातेला नजर कैदेत ? आणि का ? "
"हि माहिती तुम्हाला कशी पोचली ? " महाराजांनी विचारले . काही मोजके लोक सोडल्यास कुणालाही ह्या बातमीचा पत्ता नव्हता. समर्थ नुसतेच हसले.
प्रत्यक्षांत महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटले नाही. जो योगी महाराजांच्या कक्षांत प्रकट होवू शकतो त्याला काहीही अवघड नाही. समर्थांची आणि महाराजांची भेट जुनी होती लहान पण पासूनच समर्थांचा हाथ महाराजावर होता. भट्ट जे नेहमीच फकीर, साधू लोकांपासून महाराजांना दूर ठेवायचे त्यांनी समर्थांना मात्र आदराशिवाय कुठल्याच भावाने पहिले नाही. समर्थ सुद्धा असे तसे साधू नव्हतेच मुळी. त्यांची वाणी तेजस्वी होती आणि शरीर होते एखाद्या योद्ध्य प्रमाणे. दररोज सकाळी १००० दंड बैठका काढल्याशिवाय समर्थ म्हणे कुठे जात नसत, ज्या भागांत म्लेन्चानी उत्पात मांडला होता, जेथे ब्राह्मण लोक शेंडी लपवत असते तेथे समर्थ मात्र शेळ्यांच्या कळपांत वाघाने जावे त्या प्रमाणे संचार करत असत. त्यांचे शिष्य सुद्धा त्यांच्याच सारखे बलवान आणि सरड्या प्रमाणे रंग बदलून समाजात मिसळून राहणारे. समर्थांना सर्व जगाची माहिती असायची. महाराजांना कधीही मानसिक त्रास झाला कि समर्थांची आठवण यायची कारण समर्थ वेगळेच होते, त्यांची दृष्टी वेगळीच होती.
"अरे तुझ्या मातेने काहीही गैर केले नाही, तिने तर उलट रक्ताचा थेंब सुद्धा न सांडता किल्ला जिंकला आणि तू इथे हे सगळे शूर वीर घेवून जीव द्यायला आला होतास." समर्थ आपल्या तेजस्वी वाणीने बोलत होते.
"पण गुरुदेव मातेने दगा केला , शत्रूच्या मुलाला अपहृत केले, अश्या प्रकारच्या योजनेने का आम्ही हिंदू स्वराज्य उभारणार आहोत ? हे धर्म सांगत आहे का ? " महाराजांनी प्रतीप्रश्न केला.
समर्थ काही क्षण अबोल राहिले. काही पावले चालून थे महाराजांच्या बाजूच्या आसनावर बसले. महाराज त्यांचा चेहेरा न्याहाळत होते.
"हे बघ, धर्म म्हणजे काही पुस्तकी ज्ञान नसते, धर्म म्हणजे काही दगडावर ओढलेली अक्षर अशी रेघ नाही ? धर्म पालन म्हणजे प्रवाह आहे, दगडांना भेदून जाणारा, किंवा गरज पडल्यास वळून जाणारा पण शेवटी प्रचंड डोंगरांना सुद्धा नष्ट करणारा प्रवाह. तुला धर्म पालन करायचे आहे नियम पालन नाही. तू नियमांचा गुलाम नाही त्यांचा कृतांत आहेस, तूला अद्लीशाही, मुघलशाही ह्यांचा पूर्ण विध्वंस करायचा आहे, हे काम सोपे नाही आणि त्यासाठी कृष्णाची बुद्धी आणि संहारक शिवाची तटस्थता पाहिजे. तुझ्या मातेने निर्णय घेतला तो पूर्णपणे बरोबर होता, तूच चूक केलीस, तू तानाजीचे बोल मनावर घेतले नाहीस, तू अग्निशिखाचे बोल मनावर घेतले नाहीस. "
"गुरुदेव, मी आपला आदर करतो, कदाचित अग्निशिखाला बंदी बनवून मी चूक सुद्धा केली असेल पण राज आज्ञेचे उल्ह्नगन हा द्रोह आहे. माझा निर्णय बदलणे शक्य नाही मी स्वतः तोरणा किल्यावर जावून आई साहेबांची बाजू ऐकून घेयीन तो पर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर त्यांनी निर्णय घेणे मला मंजूर नाही” महाराज आपल्या नेहमीच्या कठोर आवाजांत बोलले.
"हु" समर्थांनी फक्त एक निराशेचा आवाज काढला.
"मी इथे वेगळ्या कारणासाठी आलो होतो. अग्निशिखा भेटली होती मला, तिने हे पत्र हाती दिले. " समर्थांनी आई साहेबांची सही असलेले पत्र पुढे केले.
महाराजांनी पत्र घेवून वाचले. ते वाचून त्यांचा डोळ्यांत निराशा उत्पन्न झाली. "तर ह्या अग्निशिखा बरोबर आई साहेबांनी अश्या प्रकारचा करार केला होता? हि तर आणखीन मोठी चूक आहे ? ह्यात कसला आहे राजकीय फायदा ? साधू, बैराग्यानं भूत खेतांत विश्वास ठेवणे शोभा देते, राजाना नाही. "
"भूत खेतांत विश्वास नको, पण हेरांच्या बातमीवर तर विश्वास ठेवला पाहिजे ना ? मी सुद्धा जावून आलो रत्नागिरीत. आदिलशहाने दिलावर खानाला १५० शाही योध्या बरोरबर विशेष कामगिरीवर पाठवले होते. त्याचे शव सुद्धा सापडले नाही. अनेक गावातून लोक गायब होत आहे, कितीतरी गावकरी आपल्या पूर्वजांचे गाव सोडून दक्षिणेत जात आहेत." समर्थ बोलत होते आणि महाराज लक्षपूर्वक ऐकत होते.
"आणि अग्निशिखा हे काय प्रकरण आहे ? आमच्या सैनिकांची मुंडकी ती कशाला घेवून फिरत होती ? “ महाराजांनी विचारले.
"काही व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा अतृप्त आत्मे बनून भटकत असतात कारण त्यांची काही तरी इच्छा पूर्ण झाली नसते … " समर्थ बोलत होते पण महाराजांनी त्यांना मध्येच रोखले.
"पण ती तर हाडामासाची व्यक्ती आहे, प्रेतात्मा नव्हे "
"नाही महाराज, अतृप्त आत्मे म्हणजे काही भुते नव्हेत, काही व्यक्ती, कल्पना, ज्ञान असे असते हे कालबाह्य होते, एका कालावधीनंतर जगाला त्यांची किमत नसते पण काही कारणास्तव ह्या व्यक्ती, कल्पना किंवा ज्ञान काही तरी गोष्टीला तग धरून जगात असते. उदाहरणार्थ कोंढाणा जिंकण्यासाठी जे दिव्य द्रव्य आपणास प्राप्त झाले होते ते ज्ञान ह्या जगांत आणि ह्या काळांत अस्तित्वात असणे योग्य नाही काही वर्षांत त्याचा अंत निश्चित आहे. अग्निशिखा आणि तिचे गुरु भैरवनाथ त्या दिव्य अग्नीद्रव्य प्रमाणेच कालबाह्य झाले आहेत, एका काळी महावाराहाचे हे भक्त शक्तिशाली होते, जगाच्या पाठीवर प्रचंड उलथापालथ त्यांनी घडवून आणली होती पण आज त्यांचा समय संपला आहे, पण एक शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते दोघे जिवंत आहेत." समर्थांच्या वाणीतून बोल निघत होते.
"आणि आई साहेबांचा करार म्हणजे त्याची शेवटची इच्छा ? ती प्राप्त करून महावराहाचे हे भक्त काळाच्या उदरांत गडप होतील ? " महाराजांनी प्रश्न केला आणि समर्थांनी मूक पणे मान हलविली.
"पण मला त्याचे काय ? माझा उद्देश कुणाची अध्यात्मिक प्रगती करणे नाही, हिंदू स्वराज्य उभे करणे आहे. त्यात मी माझ्या सैनिकांना की सांगू ? एक लुप्त होणार्या पंथाच्या गुरुवर विश्वास ठेवून एका दंतकथेतील वराह मूर्तीला शोधण्यासाठी आम्ही दक्षिणे कडे जावू? " महाराजनी समर्थांना प्रश्न केला.
"राजा तू आहेस मी नाही, निर्णय तुझा आहे माझा नाही, न्याय बुद्धी तुला वापरायची आहे मला नाही. चारी बाजूने संकटे घेरून आहेत, किल्ल्या बाहेर बख्तियार ठाण मांडून आहे. उत्तरेतून शाहिस्तेखान येत आहे आणि पश्चिमे कडून युसुफ.” समर्थ बोलले.
"बाख्तीयारचा वेढा मोडण्याची पूर्ण तयारी आहे. कोंढाणा लढवणे मुश्किल नाही. शाहिस्तेखान आलाच तर त्याच्याबरोबर बातचीत केली जायील शेवटी आमच्या पेक्षां आदिलशाहीची चिंता त्याला असेल. युसुफ पोष अजून इथवर येण्यास अवकाश आहे पण अशी मोहीम पुंन्हा पुंन्हा करण्याची ताकत आदिलशाहीत नाही. फक्त युसुफ पोष ला आम्ही एकदा रोखले कि आदिलशहिचा अंत निकट आहे.” महाराज योजना स्पष्ट करत आहे.
"बाख्तीयारचा वेढा तोडून राजगड वर हल्ला करायचा माझा उद्धेश होता पण युसुफ चा भावू तोरणा किल्ल्याकडे कूच करत आहे अशी बातमी आहे त्यामुळे पुन्हा मागे जाणे सध्या इष्ट आहे. रत्नागिरीत जे काही चालले आहे त्यावर सुद्धा मी नजर टाकीन, गरज पडल्यास मी अग्निशिखाला आई साहेबांनी दिलेले वचन सुद्धा पूर्ण करायचा विचार करेन पण सध्या तरी माझा त्या दंत कथेवर विश्वास नाही”
"नको ठेवुस विश्वास पण भाल्या खविस च्या खजाण्याचे काय ? स्वराज्य उभारणीस त्याचा प्रचंड फायदा होवू शकतो. " समर्थांनी शेवटचा प्रयत्न केला.
"पण खजाण्याचा काहीही पत्ता नाही. तानाजीला मी त्याच हेतूने पाठवले होते पण खविस चा पत्ता अजून नाही, आपणाला काही ठावूक आहे का? “ महाराजांनी विचारले.
"मला नाही पण भैरवनाथांना ठावूक आहे. त्यांनी अग्नीशिखाला तुझ्या कडे पाठवले होते कारण एका भविष्यवाणीनुसार एक आणि राज्य नसलेला राजाच महावराहाची ती मूर्ती शोधून काढू शकतो. पण दुसर्या बाजून ते स्वतः सैनिकांच्या शोधांत फिरत होते, गोमंतभूमीच्या दक्षिणेला ५००० सैनिकांची एक तुकडी सध्या तळ ठोकून आहे, त्यांचा नायक तक्षक आहे, हे सर्व सैनिक फक्त पैशा साठी लढतात. भैरवनाथ त्यांना खजान्याच्या आशेने उत्तरेंत आणायचा पर्यंत करीत आहेत, हे सर्व सैनिक चक्रीवादळा प्रमाणे आपल्या वाटेंत येणाऱ्या प्रत्येक शत्रूची धूळधाण उडवतात आणि फक्त धना साठी लढतात. हे सैनिक जर मुलुखांत दाखील झाले तर ज्याच्या कडे जास्त धन असेल त्याच्या बाजूने ते लढतील, आता स्वराज्याकडे पैसा असेल कि नाही ह्यावर ते स्वराज्याच्या बाजूने लढतील कि विरुद्ध लढतील हे अवलंबून आहे.”
"तक्षक सैनिकां बद्दल ऐकून ठावूक होते पण ते गोमंतभूमीत पोचले आहेत हि बातमी नवीन आहे. “
"गुरुदेव, मला वाटते दक्षिणेत जाणे कदाचित विधिलिखितच असावे, कोन्धाण्यावर भगवा फडकलाच आहे आता मी तोरण्याकडे कूच करतो आणि तेथूनच पुढील फैसला होईल. “
महाराज बोलले, समर्थांनी काहीही भावना दाखवल्या नाहीत आणि ते महाराजांच्या कक्षा बाहेर निघून गेले. महाराजांनी आपल्या समोर असलेल्या नकाशावर नजर टाकली, जणू काही दैवी योजना त्यांच्या कडे रत्नागिरीत जाण्याची खूण करत होती, पण त्यांच्या बुद्धीला मात्र त्यात काहीही तथ्य वाटत नव्हते.