भवानी तलवारीचे रहस्य : रत्नागिरीची देवराई आणि महाराजांचे हेर
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी त्याचा काही एक संबंध नाही. केवळ मनोरंजन हा एकाच हेतू ह्या कथेमागे आहे.
महाराजांना भवानी मातेने तलवार दिली अशी एक कथा आहे. अर्थातच देवी वगैरे प्रकट कधी होत नसते अशी आजच्या काळांत लोकांची समजूत असल्याने, ही कथा एक अलकांरिक दृष्टीकोनातून सांगितली जाते असेच इतिहासकार मानतात. प्रत्यक्षांत महाराजांचा सारा सापेक्ष हा "श्रीं ची इच्छा" म्हणूनच होता हे मात्र निर्विवाद सत्य आहे. इतिहासाच्या प्रवाहांत सत्याचे दगड गुळमुळीत होतात. त्याचप्रमाणे भवानी मातेच्या तलवारीचे रहस्य एक दंतकथा म्हणूनच अस्तित्वात आहे.
१६४६ सालची गोष्ट आहे. गोविंद देशपांडे, तानाजी भोसले अन् एकोजी असे एक विशेष त्रिकुट महाराजांनी रत्नागिरी प्रांतांत पाठवले. गोविंद देशपांडे प्रख्यात तलवारबाज म्हणून प्रसिद्ध होते. तोरणा किल्याच्या लढाईत त्यांनी तेवीस म्लेंछ सैनिकांना यमसदनी पाठविण्याचा पराक्रम केला होता. तानाजी हा मूळचा शिकारी. कुठल्याही जंगलात सावलीप्रमाणे वावर करत जनावरे मारणं हा त्याचा गुण महाराजांनी हेरला होता. एकोजी हा ५० वर्षांचा म्हातारा पण संपूर्ण महाराष्ट्र त्याने पहिला होता. महाराजांनी असे हे त्रिकुट आदिलशहाच्या रत्नागिरीत का बरे पाठवले होते ?
भाल्या खवीस ह्या महाभयानक डाकूने महाराष्ट्रांत चांगलेच नाव कमविले होते. अनेक धनिकांना आणि गरिबांना लुटत हा डाकू महाराष्ट्रभर आपली दहशत पसरवत होता. ह्याच्या टोळीत मुले आणि महिलासुद्धा होत्या. असा हा भल्या खविस रत्नागिरीत पोचलाय अशी बातमी हेरांनी महाराजाना दिली. भाल्याच्या टोळीवर हल्ला केला तर त्याचा खजिना आणि मुलुखाच्या जनतेची दुवासुद्धा मिळेल हा महाराजांचा मनसुबा होता. सुमारे तीस लोकांच्या ह्या टोळीवर नजर ठेवावी म्हणून महाराजांनी ह्या त्रिकुटाला रत्नागिरीत पाठविले होते. भाल्याच्या खजिन्याचा पत्ता मिळविणे, शक्य असेल तर त्यांच्या पुढील ठावठिकाणा प्राप्त करणे आणि त्याच्या शक्तीचा अंदाज घेणे हे विशेष काम हे त्रिकुट पार पाडेल असे महाराजांना वाटले होते.
सलग नऊ दिवस घोडदौड करत गोविंद देशपांडेच्या नेतृत्वाखाली हा चमू रत्नागिरीत पोचला. भाल्या खविस कुठे आहे हे माहीत करणे अवघड नव्हते. खेद गावात फुंगी नदीच्या किनाऱ्यावर तानाजीने तीसेक लोकांच्या वास्तव्याच्या खुणा असलेली एक जागा बघितली, तेथपासून एखाद्या वाघाने सावजाचा माग काढावा त्याप्रमाणे तानाजी भाल्याचा माग काढत गेला. रत्नागिरी शहराच्या वेशीवर आदिशक्ती देवीचे भग्न मंदिर होते, त्यामागे जिथे कोणीच माणूस फिरण्याची छाती करत नसे अशा एका देवराईत भाल्या आपला तळ ठोकून आहे असा कयास तानाजीने केला.
संध्याकाळचे ४ वाजले होते, सूर्यास्तास अजून अवकाश होता. भाल्याचा तळ बघून , नक्की किती माणसे आहेत, बरोबर काही खजिना वगैरे आहे का ? इत्यादी माहिती काढून घेण्यासाठी देशपांडेंनी तानाजीला देवराईत जाण्याचा आदेश दिला. एकदा शत्रूच्या संख्येचा अंदाज आला की एकोजींना त्या माहिती सकट माघारी पाठवायचे हा देशपांडेचा मनसुबा होता. आदिशक्ती देवीच्या मंदिराच्या मागे तिन्ही स्वार लपून राहिले. तानाजीने घोडा मागेच सोडून दिला व पायीच लपत छपत तो देवराईत आत गेला. संध्याकाळचे ६ वाजत आले सूर्य अस्ताला जाऊ लागला तरी तानाजीचा पत्ता नव्हता. एकोजीची अस्वस्थता देशपांडेना जाणवत होती. म्हातारा उगाच घाबरतोय असे त्यांना वाटत होते. सूर्य मावळला , रात्रीच्या अंधारात दूरूनच एक आकृती पळत येताना दिसत होती . ह्या पद्धतीने पळत येणारा माणूस तानाजी असू शकत नव्हता, कदाचित शत्रूला आपली चाहूल लागली असेल ह्या जाणीवेने देशपांडेनी आपली तलवार बाहेर काढली. एकोजी तलवार चालवण्यात विशेष नव्हता पण त्याने सुद्धा येणाऱ्या संकटाला ओळखून आपली तलवार काढली. शत्रूला चाहूल लागली असेल तर उगाच तलवारीला तलवार भिडवण्याऐवजी काढता पाय घेणे शहाणपणाचे होते , पण गोविंद देशपांडेसारख्या बहादूराला आपले शहाणपण चालणार नाही हे सुद्धा एकोजी ओळखून होता. जशी आकृती जवळ आली तसे हा शत्रू नसून आपलाच तानाजी आहे हे स्पष्ट झाले.
चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता, त्याला धाप लागली होती आणि घामाने त्याचे उत्तरीय चिंब भिजले होते.
"मूर्खा, असा जोराने पळून आला तर कुणी बघितले असते, तू की भूत-बित बघितले काई?" सरदार देशपांडे त्याच्यावर खेकसला.
"सगळे मेले आहेत. भाल्या खवीस आणि त्याचे एकूण ४३ साथीदार आत मरून पडले आहेत. स्त्रिया, मुले सगळे. काहींचे गळे कापले गेले आहेत तर काहींचे सर्व अवयव. खूपच भयानक दृश्य आहे. हे कुणी माणसाने करणे शक्यच नाही" तानाजी घाबरलेल्या स्थितीत सांगत होता.
"कुणी मारले त्यांना? कुणी जखमी वगैरे होता का?" एकोजीने विचारले.
"ठाऊक नाही! पण हे मनुष्याने केलेलं काम वाटत नाही. " तानाजी बोलता झाला.
"हा! काहीतरी बरळू नकोस. हे लोक मेले तर चांगलेच आहे. चल आत जाऊन पाहू की नक्की काय झाले आहे. कुणी वाचला असेल तर त्यांच्या मारेकऱ्याचा पत्ता सुद्धा लागेल" असे म्हणत गोविंदने आपल्या घोड्याला पुढे दामटले. घोडा हळूहळू देवराईच्या दिशेने चालू लागला.
"आम्हाला फक्त टोळीचा पत्ता काढायचा हुकुम होता, त्याची तामील आम्ही केली आहे, आता उगाच आत जायची गरज नाही" एकोजीने सरदाराचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तानाजीला एवढा घाबरलेला त्याने पहिला नव्हता त्याशिवाय वातावरणात एक वेगळीच शक्ती एकोजीला जाणवत होती.
"हुकुम मला होता, तुम्हा दोघांचा हुकुम मी देईन. भीती वाटते तर दोघेजण मंदिरात थांबा पण ह्या घाबरटाची माहिती बरोबर नसेल तर मी स्वतः त्याचा शिरच्छेद करीन" गोविंद शांत स्वरांत बोलला. तानाजी आणि एकोजीने वाद घालण्यात अर्थ नाही हे ओळखून आपले घोडे आपल्या सरदाराच्या मागे चालविले.
देवराईची झाडे फार जुनी होती, घोड्यांना जाण्यासाठी फारच छोटी वाट होती. वातावरणात एक विशिष्ट प्रकारचे धुके दाटले होते. घोडे जंगल आणि दऱ्याखोऱ्यांतून प्रवासासाठी खास पद्धतीने तयार केले होते पण ह्या देवराईमध्ये घोडे पुढे जाण्यास कचरत होते.
"देवराईमध्ये यक्ष असतात असे माझी आई नेहमी सांगायची" तानाजी हळूच बोलला. "पोरा, स्त्रीच्या स्तनावर तोंड असताना ती जे काही सांगते त्यावर माणसाने कधीच विश्वास ठेऊ नये " एकोजीने दबलेल्या आवाजांत पण थोड्याश्या उपहासानेच तानाजीला टोला हांडला.
तानाजी अजून सावरला नव्हता. काही मिनिटात ते एका सपाट जागेवर पोचले दूरून काही तंबू दिसत होते,पण माणसांचा लवलेश नव्हता. "हीच जागा आहे का रे ?"गोविंदने विचारले. "होय इथेच सारी मृत शरीरं होती". मग "मला का बरे दिसत नाहीत ?" एकोजीने विचारले.
तिघे जण घोड्यावरून उतरले. पायीच चालत तंबूजवळ गेले. कुठेच माणसे दिसत नव्हती.
"इथेच तर होती सगळी शरीरं" तानाजी वेड्यासारखा इकडे तिकडे पळत बोलत होता. "मला वाटते ह्याला कुणीतरी झपाटले आहे " एकोजीने हळूच गोविंदच्या कानात सांगितले.
"भाल्या खविस इथे नाही तर कुठे आहे? हा कदाचित आमच्यासाठी रचलेला सापळा तर नाही?” गोविंदने तालावर म्यानातून बाहेर काढत एकोजीला प्रश्न केला. नेहमी एकदम आत्मविश्वासाने बोलणाऱ्या आपल्या सरदाराच्या मनांत काही तरी शंका उत्पन्न झाली आहे हे एकोजीने ताडले. त्यानेसुद्धा आपली तलवार बाहेर काढली. का कुणास ठाऊक पण आज आपण ह्या देवराईतून जिवंत बाहेर जाणार नाही असं त्याला मनातून वाटायला लागलं.
तानाजी इकडे तिकडे वेड्यासारखा पळत होता, एकाठिकाणी साप चावल्यासारखी त्याने उडी मारली, नंतर वाकून काहीतरी उचललं. गोविंद आणि एकोजी पळत त्याचा जवळ गेले. तानाजीच्या हातांत रक्ताने ओथंबलेली आतडी होती. मातीत मिसळून त्यांचा रंग तपकिरी झाला होता पण रक्त ताजे होते. तिघांनी भयानेच एकमेकांकडे पाहिले. त्या क्षणी त्यांच्यात वय, हुद्दा इत्यादी काहीही फरक नव्हता. जणू काही "भय" ह्या एका दुव्याने तिघेही जण एकत्र बांधले गेले होते.
पण तानाजीचे डोळे अचानक बदलले, आपल्या मागे कुणीतरी आहे ही जाणीव गोविंदला झाली व त्याने मागे वळून बघितले. ७ फुटांची एक आकृती पुढे आली, तिघेही काही करतील ह्याआधीच त्या माणसाचा हात फिरला व एकोजीचे शीर क्षणार्धात धडावेगळे झाले. सगळीकडे रक्ताचा सडा पडला.
तानाजी भीतीनी पूर्णपणे थिजला होता पण गोविंद देशपांडे घाबरणाऱ्यांपैकी नव्हता. त्या आकृतीचा पुढील वार गोविंदने आपल्या तलवारीने सहज पेलला. गोविंदने मागे उडी घेतली व आपल्या शत्रूचा अंदाज घेतला. हा माणूस भाल्या खविस नव्हता, तोंडावरून तर हा माणूस १०० वर्षांचा म्हातारा वाटत होता पण अंगातील ताकद महामानवी होती. त्वचा थोडी निळसर होती व अंगावर काहीही वस्त्र नव्हते. गोविंदने त्याची तलवार निरखून पाहिली. गंज लागलेल्या जुनाट तलवारीसारखी ती तलवार वाटत होती पण मागच्या वारात ती तलवार अजिबात जुनी वाटली नव्हती.
ताकदीच्या बाबतीत आपला पडाव जास्त वेळ लागणार नाही हे गोविंदने ओळखले. सर्व हिंमत पणाला लावून गोविंद वेगाने आपल्या शत्रूवर चालून गेला, काही क्षणातच चारी बाजूने तलवारीचे प्रहार करीत गोविंद चारी दिशांत फिरत होता. कुठल्याच माणसाला अशा वेगांत फिरताना तानाजीने बघितले नव्हते. पण गोंविंदचा प्रत्येक वार त्या महामानवाने सहज झेलला. पुढच्याच क्षणी गोविंदची तलवार त्याच्या गळ्याला चाटून गेली, पण ती त्याचीच चाल होती. आपल्या दुसऱ्या हाताने त्याने गोविंदचे केस पकडले होते. पुढच्या क्षणी गोविंदाचा तलवार पकडलेला हात शरीरापासून वेगळा झाला. वेदनेने गोविंदचा आक्रोश सुरु झाला. मृत्यू समोर दिसून गोविंद आपल्या गुढग्यावर बसला , त्यानंतर तानाजीच्या डोळ्यांसमोर गोविंदचा सुद्धा शिरच्छेद झाला .
पुढे काय झाले तानाजीला समजले नाही. त्याला जाग आली तेंव्हा तो एका बैलगाडीच्या मागे होता. त्याचे हात-पाय बांधलेले होते, त्याने हलकेच डोळे उघडून पहिले तर महाराजांचे मावळे बाजूला घोड्यावर चालत होते.