passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
अंगात येणे : अंधश्रद्धेचे भूत
अनेक धार्मिक ठिकाणी, विशेषतः जी देवळे "स्वयंभू" किंवा "जागृत" मानली जातात तेथे अनेक भक्तांच्या "अंगात" येते. बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते.
"अंगात येणे" या प्रकारातील भ्रामक कल्पनांचा कितीही पर्दाफाश झाला तरी समाजमनावरील त्याची मोहिनी कमी होत नाही. याचे मुख्य कारण असे की त्यावर उपचार करण्याच्या मिषाने धंदा करणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आजही समाजात वावरतो. वैद्यकीय क्षेत्रात अनिष्ट प्रवृत्ती बळावल्या आहेत त्याचाही परिणाम म्हणजे अध्यात्मिक विचारांचा फैलाव वाढत आहे. त्यामुळेच शंभर-दीडशे वर्षांपासून बुद्धिप्रामाण्य, वैज्ञानिक चिकित्सा आणि बुद्धिवादाचा झेंडा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलन हा विषय अजूनही कोपऱ्यातच आहे. जादूटोणा विरोधी कायदा वर्षानुवर्षे फक्त चर्चेतच आहे. तो मंजूर होऊ शकत नाही. उलट अनेक देवदेवता, जत्रा, यात्रा, उत्सव आणि उरूस यातून देवभोळेपणा वाढत असून परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी असहाय्यपणे देवळापुढे रांगा लावण्याची पराभूत मानसिकता वाढत आहे. हे भूत अंगातून उतरविण्याची मोठी गरज आहे.
. . .