passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
अंगात येणे : शास्त्रीय गूढ
अनेक धार्मिक ठिकाणी, विशेषतः जी देवळे "स्वयंभू" किंवा "जागृत" मानली जातात तेथे अनेक भक्तांच्या "अंगात" येते. बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते.
हा प्रकार नेमका काय आहे? याचा खुलासा पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने करता येईल काय? ही काही अज्ञात, गूढ शास्त्र यामागे लपले आहे? अनेकजणांचे या संदर्भातले अनुभव वेगवेगळे आहेत. सर्वसामान्यपणे ज्या गोष्टींचा खुलासा करता येणार नाही अशा गोष्टीही यात असतात. उदाहरणार्थ एका अंगात आलेल्या बाईची प्रकृती इतकी अशक्त, दुबळी होती की तिला धड उभेही राहता येत नव्हते. अशा बाईने दोन-दोन, तीन-तीन तास मोठमोठ्याने हुंकार देत, शरीराची वेगवान हलचाल करत देवीचे कडक इशारे सुनवावेत हे कसे शक्य आहे? काही अडाणी बायकांच्या अंगात येते आणि त्या पुर्णपणे परक्या भाषेत बोलायला लागतात, हे कसे?
अंगात आलेली बाई दहा-दहा जणांना आवरत नाही हे कसे होते हा सुद्धा नेहमी पडणारा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे एखादया गुळगुळीत खांबावर सरसर चढून जाणारी "झपाटलेली" बाई हेसुद्धा लोकांच्या आच्शर्याचे विषय आहेत. आणि या गोष्टींचा खुलासा विज्ञान करू शकणार नाही असे अनेकजणांना वाटते. आमावस्या किंवा पोर्णिमा अशाच दिवशी अंगात का येते या ही प्रश्नाचे उत्तर विज्ञानाला देता येणार नाही असा त्यांचा समज असतो.या सर्व शंका, समज-गैरसमजाचे निराकरण करून "अंगात येणे" या कृतीचा शास्त्रीय अन्वयार्थ लावता येतो हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळेच अशा संकल्पनांना बळ मिळाले आहे.
. . .