भुताळी जहाज
स्पार्टाकस Updated: 15 April 2021 07:30 IST

भुताळी जहाज : ओरँग मेडान

अमानवीय आणि अतिंद्रीय शक्तींबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आपल्याला आलेल्या अनुभवांचं शास्त्रीय स्पष्टीकरण करणं हे कधीकधी अशक्यं होतं आणि रुढार्थाने त्याचं भूतं-खेतं किंवा 'बाहेरचं' असं वर्गीकरण केलं जातं. अर्थात अमानवीय अनुभवांच्या ज्या कहाण्या सांगितल्या जातात त्या प्रत्यक्षात कितपत खर्‍या असतात आणि कोणाच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडलेल्या असतात हा भाग अलाहिदा. गेल्या कित्येक शतकांपासून मानवाने सप्तसागरांत संचार केला आहे. या संचारासाठी वापरण्यात आलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांनी सागराचा तळही गाठलेला आहे. या जहाजांपैकी काही जहाजांवरील खलाशांच्या नशीबी असे अनेक विस्मयकारक आणि उकल न होण्यासारखे अनुभव आले आहेत ज्यांचं कोणत्याही शास्त्रीय कसोटीवर समर्पक असं स्पष्टीकरण मिळालेलं नाही. अशाच काही घटनांचा मागोवा घेणारी ही मालीका.

विचक्रॅफ्ट   जोयिता

आफ्रीकेच्या पूर्व किनार्‍यापासून ते पार ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत आणि दक्षिणेला पार अंटार्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेला सागर म्हणजे हिंदी महासागर! त्याच्या काठांवर असलेल्या अनेक चित्र-विचित्र देशांइतकाच गूढ! अनेकविध संस्कृती या सागराच्या किनार्‍याने नांदताना दिसतात. पृथ्वीवरील तिसर्‍या क्रमांकाचा महासागर असलेला हिंदी महासागर जहाजं, विमानं आणि माणसांना कोणतीही खूण न ठेवता गायब करण्यात मात्रं इतर महासागरांइतकाच पराक्रमी आहे!

१९४७ च्या जून महिन्यात मलेशिया आणि सुमात्रा यांच्या दरम्यान असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीतून एका जहाजाचा मदतीसाठी आक्रोश करणारा संदेश मिळाला.

"सर्व अधिकारी मरण पावले आहेत. कॅप्टनदेखिल मरण पावला आहे. चार्टरुम आणि ब्रिजवर प्रेतं पडली आहेत! बहुतेक सर्वजण मरण पावले असावे!"

या संदेशानंतर काही क्षण मोर्स कोडमध्ये संदेश पाठवण्याच्या प्रयत्नात सुरु असलेली खडखड ऐकू आली. शेवटी,

"आता मी ही मरतो आहे!"

या वाक्यानंतर भीषण शांतता पसरली!

दोन अमेरीकन जहाजांनी आणि किनार्‍यावर असलेल्या ब्रिटीश आणि डच अधिकार्‍यांनी हा संदेश पकडला. हा संदेश साधारणतः कोणत्या भागातून आला असावा याचा अंदाज घेतल्यावर मलाक्काच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणार्‍या 'ओरँग मेडान' या डच जहाजावरुन हा संदेश पाठवण्यात आला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला. ब्रिटीश आणि डच अधिकार्‍यांनी त्या प्रदेशातील सर्व जहाजांना ओरँग मेडानच्या मदतीला जाण्याची सूचना केली.

हा संदेश मिळताच ओरँग मेडानच्या मदतीसाठी अनेक जहाजांनी आपला मार्ग बदलला. यापैकी सर्वात जवळचं जहाज होतं ते म्हणजे सिल्व्हर स्टार! मूळ ग्रेस कंपनीच्या मालकीचं असलेलं सॅन्टा सेसिलीया जहाज अमेरी़कन सरकारने ताब्यात घेतल्यावर १९४६ मध्ये त्याचं सिल्व्हर स्टार असं नामकरण केलं होतं.

काही तासातच सिल्व्हर स्टार ओरँग मेडानच्या जवळ आलं. जहाजाजवळ पोहोचल्यावर सिल्व्हर स्टारने ओरँग मेडानला रेडीओसंदेश पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकाही संदेशाला उत्तर मिळालं नाही. दुर्बीणीतून निरीक्षण केल्यावरही नेमकं काय झालं आहे याचा पत्ता लागत नव्हता. डेकवर माणसांची प्रेतं विखुरली असावीत, परंतु इतक्या अंतरावरुन काहीच दिसत नव्हतं.

सिल्व्हर स्टारच्या कॅप्टनने अखेर आपल्या खलाशांची एक तुकडी ओरँग मेडानवर पाठवण्याचा निर्णय घेतला. एका लहानशा बोटीतून काही खलाशी आणि अधिकारी ओरँग मेडानच्या दिशेने निघाले.

आपली बोट ओरँग मेडानला बांधून सिल्व्हर स्टारवरील नाविक ओरँग मेडानवर चढले. जहाजावर पाय ठेवताच त्यांना जबरदस्त हादरा बसला.

ओरँग मेडान हे संपूर्ण जहाज म्हणजे एक तरंगती शवपेटी बनलं होतं!

डेकवर डच खलाशांच्या प्रेतांचा खच पडला होता. त्यांचे डोळे विस्फारलेले होते. मुठी वळलेल्या होत्या. वेदनेने आणि भयाने त्यांचे चेहरे पिळवटून गेलेले दिसत होते. संपूर्णपणे अज्ञात आणि भीतीदायक रुपात समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूमुळे त्यांची ही अवस्था झाली होती हे उघड होतं. जहाजावरील भला दांडगा कुत्राही मृतावस्थेत डेकवर पडला होता!

जहाजाच्या ब्रिजवर कॅप्टनचा मृतदेह आढळून आला. त्याच्या आजूबाजूला काही अधिकारी इतस्ततः पडलेले होते. चार्टरुम मध्ये आणि जहाजाच्या सुकाणूजवळही प्रेतं पडलेली होती.

रेडीओरुममध्ये रेडीओ ऑपरेटर रेडीओवर झुकलेल्या अवस्थेत आढळून आला. तोच शेवटपर्यंत जिवंत असावा! त्याची बोटं संदेश देण्याच्या किल्लीवर टेकलेली होती. शेवटचा संदेश पाठवल्यावर काही क्षणांतच त्यालाही मृत्यूने गाठलं असावं!

डेकच्या खाली इंजिनरुममध्येही अनेक प्रेतं आढळून आली. डेकवरील मृतदेहांप्रमाणेच सर्वांचे चेहरे भीतीयुक्त वेदनेने पिळवटलेले दिसत होते. इंजिनरुम आणि बाहेरील तापमानातील फरक मात्रं जाणवण्याइतका होता. बाहेर ११० अंश फॅरनहीट (४३ अंश सेल्सीयस) असतानाही इंजिनरूममध्ये मात्रं अनैसर्गीक गारवा जाणवत होता!

जहाजावरील सर्व माणसं मृतावस्थेत आढळली असली तरी जहाजाचं मात्रं अजिबात नुकसान झालेलं नव्हतं असं आढळून आलं.

सिल्व्हर स्टारच्या कॅप्टनने ओरँग मेडान ओढत नेण्याचा निर्णय घेतला. बंदरावर पोहोचल्यावरच खलाशांच्या मृत्यूला नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत झाली होती हे कळू शकणार होतं.

जहाज ओढून नेण्यासाठी दोरखंड तयार करण्यात आले. परंतु ते ओरँग मेडानला बांधण्यापूर्वीच सामान ठेवण्याच्या ४ क्रमांकाच्या कोठारातून धूर येत असल्याचं लक्षात आलं! जहाजाचा बॉयलर सुरू नसल्याने त्यावर विद्युतपुरवठा खंडीत झाला होता. आगप्रतिबंधक साधनांनी जहाजावर लागलेली आग आटोक्यात येईना! ओरँग मेडानवर असलेल्या सिल्व्हर स्टारवरील खलाशांना जहाज सोडून आपल्या जहाजावर परतणं हा एकच मार्ग शिल्लक होता. अन्यथा त्यांचेही प्राण संकटात आले असते.

सिल्व्हर स्टारवरील खलाशांनी घाईघाईने आपल्या बोटीत उड्या टाकल्या आणि ओरँग मेडानपासून झपाट्याने दूर जाण्याचा ते प्रयत्न करू लागले. ते जेमतेम आपल्या जहाजावर पोहोचत नाहीत तोच....

ओरँग मेडानवर जबरदस्त स्फोट झाला!

या स्फोटाचा दणका एवढा जोरदार होता, की ओरँग मेडान संपूर्ण पाण्यावर उचललं गेलं आणि जोरात उभंच्या उभं पाण्यावर आदळलं! काही मिनीटांतच पाठीमागच्या बाजूने संपूर्ण जहाज पाण्याखाली गेलं.

ओरँग मेडानच्या अस्तित्वाची कोणतीही खूण शिल्लक राहीली नाही!

जहाजावरील खलाशांच्या गूढ मृत्यूमागे काही रहस्यं असलं तर जहाजाबरोबर ते देखील सागराच्या तळाशी गेलं होतं!

ओरँग मेडानवर नेमकं काय झालं होतं?

*************

अनेक संशोधकांनी या घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून जे समोर आलं ते आणखीनच विचित्रं होतं.

अ‍ॅमस्टरडॅम इथल्या डच जहाजांच्या रेकॉर्ड्स मध्ये ओरँग मेडानचं नावच नव्हतं!
जहाजाच्या अस्तित्वाचा पुरावाच तिथे उपलब्धं नव्हता!

अनेक संशोधकांच्या मते ओरँग मेडान या नावाची व्युत्पत्ती ही सुमात्रा बेटाशी संबंधीत आहे. १९४७ इंडोनेशीया हा 'डच ईस्ट इंडीज' या नावाने ओळखला जात होता. साहजिकच सुमात्रा बेटावरही डचांचा ताबा होता. इंडोनेशीयन भाषेत 'ओरँग' याचा अर्थ माणूस असा होतो, तर मेडान हे सुमात्रा बेटावरील सर्वात मोठं शहर होतं! त्या अर्थाने मेडानचा माणूस (मॅन ऑफ मेडान) असा जहाजाच्या नावाचा अर्थ निघतो. परंतु सुमात्रा इथल्या जहाजांच्या नोंदीतही ओरँग मेडानची कोणतीही नोंद आढ़ळत नाही!

१९५४ मध्ये जर्मन नाविक ऑटॉ मेल्के याने ओरँग मेडानविषयी एक छोटीशी पुस्तिका प्रदर्शीत केली. यात ओरँग मेडान ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गाचं तपशीलवार वर्णन केलं होतं. त्याचप्रमाणे ओरँग मेडानचं वजन, इंजिन क्षमता आणि कॅप्टनचं नावही त्यात नमूद करण्यात आलेलं होतं. ओरँग मेडनच्या दुर्घटनेची जून १९४७ ही तारीखही प्रथम मेल्केच्या पुस्तिकेतच नमूद करण्यात आलेली होती. मेल्केला ही सर्व माहीती सिल्व्हर स्टारवरील एका खलाशाकडून मिळाली होती. ४ क्रमांकाच्या ज्या कोठारात आग भडकल्याने अखेर ओरँग मेडानवर स्फोट झाला त्यात अत्यंत धोकादायक रासायनिक पदार्थांची वाहतूक करण्यात येत असल्याची मेल्केने नोंद केली होती.

ओरँग मेडानवर अनेक वर्ष संशोधन करणार्‍या रॉय बेन्टनच्या मते ओरँग मेडानवर पोटॅशियम सायनाईड आणि नायट्रोग्लिसरीनची चोरटी वाहतूक करण्यात येत होती. ही दोन्ही रसायनं एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी प्रयोगशाळेतही अतिशय काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत समुद्रातील जहाजावर ही रसायनं एकत्र ठेवली गेल्यास अनर्थ ओढवणार हे उघड होतं.

बेन्टनच्या मते ओरँग मेडानवरुन दुसर्‍या महायुध्दात जपानी शास्त्रज्ञांनी शोधलेल्या विध्वंसक जैविक अस्त्रांची वाहतूक करण्यात येत असल्याचीही शक्यता होती!

जपानी शास्त्रज्ञ शिरो इशी याच्या नेतृत्वाखालील तुकडीने युनिट ७३१ या नावाने एका प्रयोगशाळेची उभारणी केली होती. दुसर्‍या महायुध्दातील जर्मन डॉक्टर मेंगलच्या अघोरी प्रयोगांच्या जोडीने इथे जपानी शास्त्रज्ञांनीही अनेक विकृत प्रयोग केले होते. जिवंत चिनी नागरीकांच्या या प्रयोगांसाठी गिनीपीग सारखा वापर करण्यात आला होता. युनिट ७३१ चा मुख्य भर हा रासायनिक आणि जैविक अस्त्रे निर्माण करण्यावर आणि त्याचे माणसांवर होणारे परिणाम तपासून पाहण्यावर होता!

दुसर्‍या महायुध्दाच्या अखेरीस जनरल डग्लस मॅकआर्थरने शिरो इशीची ही प्रयोगशाळा ताब्यात घेऊन उध्वस्त केली. शिरो इशीवर मात्रं कोणताही आरोप ठेवण्यात आला नाही! रशियन अधिकार्‍यांनी इतर जपानी युध्दगुन्हेगारांप्रमाणे टोकीयो ट्रायब्युनसमोर इशीवर खटला चालवण्याचा आग्रह धरला. परंतु अमेरीकन लष्कराने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आपण केलेलं सर्व संशोधन सुटकेच्या मोबदल्यात अमेरीकन सरकारच्या ताब्यात देण्याची इशीने तयारी दाखवली होती. अमेरीकन सरकारला इशीवर खटला चालवण्याऐवजी अमेरीकेला त्याच्या संशोधनात जास्तं रस होता!

इशीने अमेरीकन सरकारच्या ताब्यात दिलेली रासायनिक आणि जैविक अस्त्रे ओरँग मेडानमधून वाहून नेली जात होती का? डच जहाजावरुन या अस्त्रांची अमेरीकेला वाहतूक होत असल्याचं जगजाहीर झालं असतं तर दोस्त राष्ट्रांना जगात तोंड दाखवण्यास जागा राहीली नसती.

ओरँग मेडानविषयी कोणतेही कागदपत्रं आणि नोंदी नसल्याचं हेच तर कारण नसावं?

ही धोकादायक रासायनिक अस्त्रं पोटॅशियम सायनाईड आणि नायट्रोग्लिसरीनच्या संपर्कात आल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याची कल्पनाही करणं अशक्यं आहे. ओरँग मेडानवरील खलाशांचे वेदनेने पिळवटून गेलेले चेहरे हा याचाच परिपाक होता का?

ओरँग मेडानवरील रहस्याचा मागोवा घेणार्‍यांनी उडत्या तबकडयांमुळे हा प्रकार झाला होता असाही तर्क मांडला. मिथेन वायूचा स्फोट, बॉयलरमधील बिघाडामुळे कार्बन मोनॉक्साईड मुळे विषबाधा असेही तर्क मांडण्यात आले, परंतु नेमकं कोणतंही स्पष्टीकरण कोणालाही देता आलं नाही.

ओरँग मेडानविषयी कोणतंही रेकॉर्ड उपलब्धं नसल्याने अशी काही नौकाच अस्तित्वात नव्हती आणि सिल्व्हर स्टारवरील खलाशांनी ही लोणकढी थाप मारली होती असंही आग्रही प्रतिपादन करण्यात आलं. ओरँग मेडानवरुन रासायनिक आणि जैविक शस्त्रांची वाहतूक केली जात असल्यास हा व्यापक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत एका जहाजाचं रेकॉर्ड गायब करणं हे किती कठीण काम होतं?

अमेरीकन कोस्टगार्डने ओरँग मेडानविषयी सिल्व्हर स्टारवरील खलाशांनी दिलेली बातमी खरी होती याची पुष्टी केली होती. मात्रं मेल्केची पुस्तिका प्रदर्शीत झाल्यावर सिल्व्हर स्टारवरील कॅप्टनसह सर्व माणसांचाही कोणाशी फारसा संपर्क आला नाही!

ओरँग मेडानवर नेमकं काय झालं हे मात्रं कधीच कळू शकणार नाही!

संदर्भ :-

Ghost Ships - रिचर्ड वायनर
A Cargo of Death - रॉय बेन्टन
Invisible Horizons - व्हिन्सेंट गॅडीस
Strangest of All - फ्रँक एडवर्डस
The Case For the UFO - मॉरीस जेसप

. . .