भुताळी जहाज
स्पार्टाकस Updated: 15 April 2021 07:30 IST

भुताळी जहाज : कॅरोल ए. डिअरींग

अमानवीय आणि अतिंद्रीय शक्तींबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आपल्याला आलेल्या अनुभवांचं शास्त्रीय स्पष्टीकरण करणं हे कधीकधी अशक्यं होतं आणि रुढार्थाने त्याचं भूतं-खेतं किंवा 'बाहेरचं' असं वर्गीकरण केलं जातं. अर्थात अमानवीय अनुभवांच्या ज्या कहाण्या सांगितल्या जातात त्या प्रत्यक्षात कितपत खर्‍या असतात आणि कोणाच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडलेल्या असतात हा भाग अलाहिदा. गेल्या कित्येक शतकांपासून मानवाने सप्तसागरांत संचार केला आहे. या संचारासाठी वापरण्यात आलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांनी सागराचा तळही गाठलेला आहे. या जहाजांपैकी काही जहाजांवरील खलाशांच्या नशीबी असे अनेक विस्मयकारक आणि उकल न होण्यासारखे अनुभव आले आहेत ज्यांचं कोणत्याही शास्त्रीय कसोटीवर समर्पक असं स्पष्टीकरण मिळालेलं नाही. अशाच काही घटनांचा मागोवा घेणारी ही मालीका.

मेरी सेलेस्टी   बेकीमो!

अमेरीकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील समुद्रकिनारा हा काहीसा गूढ आणि धोकादायक आहे. या भागात थंड तापमानाचा दक्षिणेकडे वाहणारा लॅब्रेडॉर सागरप्रवाह आणि उत्तरेकडे वाहणारा गल्फ स्ट्रीमचा उष्ण प्रवाह एकमेकांत मिसळतात. त्यातच समुद्रकिनार्‍यावरुन येणार्‍या जोरदार वार्‍यामुळे परस्परविरोधी कमी-अधिक दाबाचा हवामानाचे पट्टे तयार होण्यास ही परिस्थिती एकदम अनुकूल असते. याचा परिणाम म्हणून वाळूपासून तयार झालेले अनेक पट्टे (सँडबार्स) इथे पाण्याच्या पृष्ठभागाखाली अगदी थोड्या अंतरावर दडलेले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे नौकानयनाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत जिकीरीचा आहे. अनेक जहाजांचे या जागी बळी गेलेले असल्याने ग्रेव्हयार्ड ऑफ अटलांटीक या नावानेच हा भाग ओळखला जातो.

४ एप्रिल १९१९ मध्ये मैने राज्यातील बाथ बंदरातील शिपयार्डमध्ये एका जहाजाचं जलावतरण करण्यात आलं. २५५ फूट लांबीच्या आणि १८७९ टन वजनाच्या या जहाजाची मालकी जी.जी.डिअरींग कंपनीची होती. डिअरींग कंपनीच्या मालकाने आपल्या मुलाच्या नावावरुन या जहाजाचं नाव ठेवलं होतं.

कॅरोल ए. डिअरींग!

कॅरोल ए. डिअरींग - याचंच नाव जहाजाला देण्यात आलं.

अमेरीकेच्या पूर्व किनार्‍यावरील बंदरांतून दक्षिण अमेरीकेतील बंदरांशी व्यापाराच्या दृष्टीने जहाजाचा वापर करण्याचा कंपनीचा इरादा होता. ५ शिडांच्या या जहाजाच्या बांधणीत ओक आणि पाईनच्या उत्कृष्ट लाकडाचा वापर करण्यात आला होता. अंतर्भाग महोगनी लाकडाने सजवण्यात आला होता. जहाज मुख्यत: मालवाहतूकीच्या दृष्टीने बांधण्यात आलं असलं तरी त्याकाळी इतर जहाजांवर नसलेल्या अनेक आधुनिक सोयी या जहाजावर होत्या. बाथरुममध्ये आधुनिक सोयी करण्यात आल्या होत्या. जहाजावरील केबिन्स विजेच्या दिव्यांनी उजळलेली होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी केबिन्समधील हवा गरम करण्याची सोय होती.

१९ ऑगस्ट १९२० या दिवशी जहाजाने व्हर्जिनीयातील नॉर्फोक बंदरातून ब्राझीलमधील रिओ-दी-जानेरो इथे जाण्यासाठी प्रस्थान केलं. जहाजावर कोळशाच्या गोणी भरण्यात आल्या होत्या. जहाजाच्या मालकीत हिस्सा असलेला विल्यम मेरीट जहाजाचा कॅप्टन होता. मेरीटने आपला मुलगा सीवॉल याची फर्स्ट मेट म्हणून नेमणूक केली. त्याच्याव्यतिरिक्त आणखीन नऊ स्कँडीनेव्हीयन खलाशी जहाजावर होते.

२२ ऑगस्टला जहाजाने व्हर्जिनीयातील न्यूपोर्ट न्यूज बंदर सोडलं. जहाजावरील एक खलाशी पीटर सोरेन्सन याने डेन्मार्कमधील आपल्या कुटुंबियांच्या नावे इथून लिहीलेल्या चिठीत रिओ-दी-जानेरो इथे जाऊन अमेरीकेत परतण्यास दोन महीने लागतील असा अंदाज वर्तवला होता.

ब्राझीलच्या दिशेने जहाज मार्गक्रमणा करत असतानाच कॅप्टन विल्यम मेरीट आजारी पडला. त्याचा आजार बळावल्याने जहाज डेलावेअर राज्यातील लेवीस बंदराकडे वळवण्यात आलं. कॅप्टन मेरीटवर उपचार करण्यासाठी त्याला इथे ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हतं. जहाजावरुन ब्राझीलला जाण्याऐवजी फर्स्ट मेट सीवॉलने आपल्या वडिलांबरोबर लेवीस इथे थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जहाजाला ना कॅप्टन ना फर्स्ट मेट अशी परिस्थिती निर्माण झाली. डिअरींग कंपनीने धावपळ करुन पहिल्या महायुध्दात लढलेला ६६ वर्षांचा अनुभवी दर्यावर्दी विलीस वॉर्मेल याची कॅप्टन म्हणून नेमणूक केली. फर्स्ट मेट म्हणून चार्ल्स मेलीन याची निवड करण्यात आली. ८ सप्टेंबरला जहाजाने अखेर ब्राझीलकडे कूच केलं.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात जहाजाने रिओ-दी-जानेरो गाठलं. जहाजावरील कोळशाच्या गोणी उतरवून झाल्यावर कॅप्टन वॉर्मेलने खलाशांना सुटी दिली. रिओमध्ये वॉर्मेलची आपला जुना मित्रं कॅप्टन गुडवीन याच्याशी गाठ पडली. गप्पांच्या ओघात वॉर्मेलने फर्स्ट मेट मेलीन आणि इतर खलाशांबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. विशेषत: मेलीनच्या वर्तणुकीवर त्याने चांगलीच टीका केली. जहाजावरील इंजिनियर हर्बर्ट बेट्स हाच एक प्रामाणिक आणि भरवशाचा माणूस असल्याचं त्याने गुडवीनपाशी नमूद केलं.

२ डिसेंबरला कॅरोल ए. डिअरींगने ब्राझीलचा किनारा सोडला आणि मैने राज्यातील पोर्टलँड इथे जाण्यासाठी प्रस्थान ठेवलं. कॅप्टन वॉर्मेलने गुडवीनपाशी चिंता व्यक्तं केली असली तरी अद्याप फर्स्ट मेट मेलीनशी त्याचा थेट खटका उडाला नव्हता.

जानेवरीच्या सुरवातीला जहाजाने वेस्ट इंडीजमधील बार्बाडोस बंदर गाठलं. अमेरीकेकडे निघण्यापूर्वी आवश्यक ती सामग्री भरुन घेण्याचा कॅप्टन वॉर्मेलचा इरादा होता. बार्बाडोसमध्ये वॉर्मेलची आपला मित्रं कॅप्टन बंकर याच्याशी पडली. आपल्या खलाशांच्या दिवसेदिवस बिघडत चाललेल्या वागणुकीबद्दल वॉर्मेलने बंकरकडे चिंता व्यक्तं केली. परंतु खलाशी उघड बंड करणार नाहीत अशी त्याची खात्री होती.

बार्बाडोसमध्ये असताना एकदा फर्स्ट मेट चार्ल्स मेलीन दारु पिऊन तर्र झाला. दारुच्या नशेत 'स्नो' या जहाजाचा कॅप्टन ह्यू नॉर्टन याच्याकडे त्याने कॅप्टन वॉर्मेलविषयीची खळखळ व्यक्त केली. कॅप्टनला दृष्टीदोष असल्याने नॅव्हीगेशनचं सर्व काम आपल्यावरच पडत असल्याची त्याने तक्रार केली. तसेच जहाजावरील खलाशांना शिस्तं लावण्याच्या आपल्या कामात कॅप्टन ढवळाढवळ करत असल्याचंही त्याने नमूद केलं. कॅप्टन नॉर्टन, त्याचा फर्स्ट मेट आणि इतर खलाशांसमवेत कॉन्टीनेंटल कॅफेत बसलेला असताना मेलीन संतापाने उद्गारला,

"नॉर्फोकला पोहोचण्यापूर्वीच मी कॅप्टनचा कायमचा बंदोबस्तं करेन! काहीही झालं तरी मी त्याला सोडणार नाही!"

मेलीनच्या या वक्तव्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि त्याला अटक करुन कोठडीत डांबण्यात आलं. कॅप्टन वॉर्मेलच्या कानावर हे गेल्यावर मेलीनविषयी त्याच्या मनात संशय आणि तिरस्कार असतानाही त्याने उदारपणे मेलीनला क्षमा केली आणि त्याची जामिनावर मुक्तता केली. ९ जानेवारी १९२१ ला कॅरोल ए. डिअरींगने बार्बाडोसचा किनारा सोडला आणि व्हर्जिनीयातील हॅम्पटन रोड्सच्या दिशेने कूच केलं.

एस्. एस्. हेवीट हे ४२ खलाशांसह जहाज बार्बाडोसहून अमेरीकेला येण्यास निघालं होतं. या जहाजाचा मार्गही कॅरोल ए. डिअरींगच्या मार्गाशी मिळताजुळता होता. २५ जानेवारी १९२१ या दिवशी या जहाजाकडून शेवटचा संदेश आला. ४२ माणसांसह हे जहाज कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनियरित्या गायब झालं!

व्हर्जिनीयातील केप लुकआऊट इथे एक दिशादर्शक जहाज (लाईटशिप) समुद्रात उभं होतं. (दीपस्तंभांची उभारणी करण्यापूर्वी दिशादर्शनाचं काम करण्यासाठी अशा जहाजांचा उपयोग होत असे). या जहाजाचा कॅप्टन थॉमस जेकबसन आपल्या जहाजाच्या ब्रिजवर उभा असताना त्याला शेजारुन जाणारं एक जहाज दिसलं. जेकबसनने जहाजाचं नाव वाचलं.

कॅरोल ए. डिअरींग!

डिअरींग सुमारे ५ नॉटच्या वेगाने चाललं होतं. डेकवरील एका माणसाने कॅप्टन जेकबसनचं लक्षं वेधून घेतलं.

"केप फिअरच्या दक्षिणेला जोरदार वार्‍यातून मार्ग काढताना जहाजाचे दोन्ही नांगर निकामी झाले आहेत!" तो जेकबसनला म्हणाला, "कृपया कंपनीच्या अधिकार्‍यांना ही माहीती कळवा!"

जेकबसनने त्या माणसाचं नीट निरीक्षण केलं. तो उंचापुरा, कृश माणूस होता. केसांवर तांबूस लालसर छटा होती. त्याच्या पेहरावावरुन अथवा वागण्या-बोलण्यावरुन तो कॅप्टन अथवा कोणी अधिकारी नसावा याबद्दल जेकबसनची खात्री पटली. तो जहाजाच्या पुढच्या क्वार्टरडेकवर उभा होता. जहाजावरील इतर खलाशी त्याच्या आजूबाजूला होते.

कॅप्टन जेकबसनचा नेमका या गोष्टीमुळे गोंधळ उडाला होता. नाविक परंपरेनुसार आणि शिस्तीनुसार खलाशांना क्वार्टरडेकवर जाण्याची परवानगी नसते. असं असतानाही डिअरींगवरील खलाशी क्वार्टरडेकवर कसे काय पोहोचले होते?

... आणि कॅप्टन जेकबसनशी बोलणारा तो माणूस नेमका कोण होता?

जेकबसनचा रेडीओ नादुरुस्त होता. त्यामुळे डिअरींगचे दोन्ही नांगर नादुरुस्त असल्याची बातमी कोणालाही कळवण्यास तो त्यावेळी असमर्थ होता.

कॅरोल ए. डिअरींग पुढे निघून गेल्यावर काही वेळातच एक स्टीमर शेजारून जात असलेली जेकबसनच्या दृष्टीस पडली. रेडीओ बिघडल्याने डिअरींगचे नांगर नादुरुस्त झाल्याचा संदेश स्टीमरमार्फत पाठवण्याचा जेकबसनचा बेत होता. स्टीमरशी संपर्क साधण्याचा जेकबसनने खूप प्रयत्न केला, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही! तत्कालीन आंतरराष्ट्रीय नाविक संकेतानुसार लाईटशीपच्या संदेशाला प्रतिसाद देणं हे बंधनकारक होतं, परंतु हा नियम धाब्यावर बसवून ती स्टीमर कॅरोल ए. डिअरींगच्या पाठोपाठ निघून गेली!

ती स्टीमर नक्की कोणती होती?


जहाजावरील खलाशी नाहीसे होण्यापूर्वी जवळून जाणार्‍या जहाजाने घेतलेला शेवटचा फोटो

३० जानेवारीला क्युबाहून बाल्टीमोरच्या दिशेने जाणार्‍या एस्. एस्. लेक इलॉन या जहाजाचा कॅप्टन हेनरी जॉन्सनला दुपारी साडेतीनच्या सुमाराला समुद्रात दूरवर पाच शिडांचं एक जहाज आढळून आलं. ते जहाज सुमारे ७ मैलांच्या वेगाने मार्गक्रमणा करत होतं. संध्याकाळी पावणेसहाच्या सुमाराला त्या जहाजापासून सुमारे अर्धा मैलांवरुन लेक इलॉन जात असताना जॉन्सनने जहाजाचं नीट निरीक्षण केलं. जहाजाचं नाव वाचता आलं नाही तरी एकूण आकारावरुन ते कॅरोल ए. डिअरींगच असावं अशी त्याची ठाम खात्री झाली. जहाजाची सर्व शिडं उत्तम स्थितीत होती. जहाज केप हॅट्रेसच्या दिशेने मार्गक्रमणा करत होतं.

जॉन्सनने डायमंड शोल्सच्या किनार्‍याजवळ असलेलं दिशादर्शक जहाज साडेआठच्या सुमाराला ओलांडलं. जॉन्सनच्या मतानुसार त्या जहाजावरील टेहळ्याला डायमंड शोल्सचं दिशादर्शक जहाज सहज दिसू शकणार होतं. त्यामुळे केप हॅट्रेसच्या किनार्‍याच्या दिशेने न जाता जहाज खुल्या समुद्राच्या दिशेने नेण्यास खलाशांना भरपूर वेळ मिळू शकणार होता. लेक इलॉनला समांतर इतर दोन जहाजंही उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत होती. त्यामुळे आपला मार्ग चुकल्याचं त्या जहाजावरील खलाशांना सहज ध्यानात येईल अशी जॉन्सनची अपेक्षा होती.

केप हॅट्रेसवरील कोस्टगार्डच्या नोंदीनुसार सूर्यास्तापूर्वी डायमंड शोल्सच्या आसपास कोणतंही जहाज दिसल्याची नोंद नव्हती!

३१ जानेवारीच्या सकाळी साडेसहाच्या सुमाराला केप हॅट्रेसच्या कोस्टगार्ड स्टेशनवरील सी.पी. ब्रॅडी ला किनार्‍याचं निरीक्षण करताना आश्चर्याचा धक्का बसला.

पाच शिडांचं एक जहाज डायमंड शोल्सच्या वाळूच्या पट्ट्यांमध्ये (सँडबार्स) अडकलेलं होतं!

जहाजाची पाचंही शिडं पूर्ण उभारलेल्या स्थितीत होती. मात्रं एखाद्या दलदलीत फसावं तसं ते जहाज जागेवरच अडकलं होतं. आसपासचा समुद्र चांगलाच खवळलेला होता. वार्‍याचा जोरही खूप होता.

कोस्टगार्डने ताबडतोब मदतीसाठी संदेश पाठवला. दोन मोठ्या सर्फबोटी लाटांच्या मार्‍यातून खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या जहाजाच्या दिशेने मार्ग काढू लागल्या. मात्रं जहाजापासून पाव मैलाच्या अंतरापर्यंतच पोहोचण्यात त्यांना यश आलं. जहाज घाईघाईने सोडण्यात आलं असावं असा सर्फ बोटींवरील लोकांनी अंदाज बांधला. जहाजावरील लाईफबोट दिसून येत नव्हती. जहाजावरुन खाली उतरण्यासाठी दोराची शिडी बांधलेली आढळून आली!

१ फेब्रुवारीला विल्मींग्टन इथून कोस्ट गार्डची सेमीनॉल ही कटर पाठवण्यात आली. परंतु जहाजापाशी पोहोचण्यास तिलाही अपयश आलं. सेमीनॉलच्या जोडीला मॅनींग ही कटर आणि फुटलेली जहाजं खेचून आणणारी टगबोट रेस्क्यू या धाडण्यात आल्या, परंतु ३ फेब्रुवारीपर्यंत कोणालाही जहाजावर पाय ठेवता आला नव्हता. दरम्यान डायमंड शोल्समध्ये अडकलेलं जहा कॅरोल ए. डिअरींग असावं अशी बातमी बाथ इथल्या वृत्तपत्रांत प्रसिध्द झाली. परंतु कॅप्टन वॉर्मेलच्या पत्नीचा मात्रं ते जहाज डिअरींग असावं यावर विश्वास नव्हता.

४ फेब्रुवारीला अखेर समुद्र निवळल्यावर मॅनींगने जहाजाशेजारी नांगर टाकला. दरम्यान कोस्टगार्डच्या बोटीही तिथे पोहोचल्या होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमाराला मॅनींगवरील खलाशी जहाजावर चढले.

जहाजाच्या सांगाड्यात पाणी शिरलं होतं. त्यामुळे तळातील केबिन्स पाण्यात गेल्या होत्या. एकाही खलाशाच्या किंवा अधिकार्‍याच्या वैयक्तीक वस्तू जहाजावर आढळल्या नव्हत्या. जहाजाच्या नॅव्हीगेशनसाठी आवश्यक असणारी सामग्री आणि कागदपत्रं गायब होती. सकाळच्या नाष्ट्याच्या तयारीसाठी अन्नपदार्थ ओळीत मांडून ठेवलेले आढळले होते! कॅप्टनच्या केबीनमध्ये तीन वेगवेगळ्या बुटांचे जोड आढळून आले होते! केबीनमधील जास्तीच्या बेडचा वापर झाल्याचं दिसून येत होतं! जहाजाचे नांगर गायब होते. जहाजाचं सुकाणू नादुरुस्तं होतं!

जहाज ओढत किनार्‍यापर्यंत नेणं शक्यं नसल्याचं कोस्टगार्डला दिसून आलं. जहाजावरील वापरण्यास योग्य असलेली सर्व सामग्री काढून घेण्याचा कोस्टगार्डने आदेश दिला. सर्व सामानाबरोबरच जहाजावर आढळलेला एकमेव जिवंत प्राणी - एक मांजर - केप हॅट्रेस इथे आणण्यात आलं. सर्व साधनसामग्रीचा लिलाव करण्यात आला! लिलावात मिळालेल्या पैशांपैकी ३३० डॉलर्स डिअरींग कंपनीला पाठवण्यात आले!

कॅरोल ए. डिअरींगवरील या मांजराच्या पायाला सहा बोटं होती. आजही या मांजराचे वंशज केप हॅट्रेस इथे फिरताना आढळतात. (फ्लोरीडातील की वेस्ट इथे असलेल्या एर्नेस्ट हेमिंग्वेच्या घरात त्याच्या स्नोबॉल या मांजराचे वंशजही अद्याप मुक्तपणे फिरताना आढळतात! या मांजराच्या पायांना सहा ते आठपर्यंत बोटं आहेत!)

कोस्टगार्ड कटर मॅनींगने चीजपीक्स बे आणि नॉर्फोकच्या परिसरात काळजीपूर्वक तपास केला. कॅरोल ए. डिअरींगवर डिझेलमोटरवर चालणारी लाईफबोट होती. तसंच साध्या वल्ह्यांनी वल्हवण्याचीही एक लाईफबोट जहाजावर होती. मात्रं या दोन्ही लाईफबोटींचा काहीही मागमूस लागला नाही. सागरात त्यांचे अवशेष आढळले नाहीत तसेच कोणत्याही किनार्‍याला त्या लागल्याचीही नोंद आढळून आली नाही.

नॉर्फोक बंदरातून इंग्लंडमध्ये मँचेस्टर इथे निघालेल्या तेलाचा टँकर ३६०० टन वजनाच्या तेलाच्या पिंपांसह केप हॅट्रेसपासून जवळच सर्व खलाशी आणि कॅप्टनसह गडप झाला!

अमेरीकन नौदल, कोस्ट गार्ड आणि इतर तीन सरकारी खात्यातील अधिकार्‍यांनी कॅरोल ए. डिअरींगवरील खलाशांच्या बेपत्ता होण्यामागील कारणांचा कसून तपास केला. परंतु एकही खलाशी अथवा त्यांची कोणतीही खूण आढळून आली नाही. मात्रं तपास अधिकार्‍यांपैकी काही जणांची जहाजावरील खलाशी अद्याप जिवंत असून त्यांनी दुसर्‍या देशात आश्रय घेतल्याची पक्की खात्री झाली होती! जहाजावरील कॅप्टनसहीत सर्व खलाशांचे फोटो आणि तपशीलवार माहीती जगातील सर्व देशांना पाठवण्यात आली. परंतु यातूनही काहीही निष्पन्न झालं नाही!

२० मार्च १९२१ ला ओरेगॉन राज्यातील पोर्टलँड इथे सिरील मॅक्लीन नावाच्या एका व्यक्तीला खलाशी असल्याचं प्रमाणपत्रं देण्यात आल्याचं तपासात निष्पन्नं झालं. परंतु सिरील मॅक्लीन हवेत अदृष्य झाल्यासारखा गायब झाला होता! १४ सप्टेंबरला चिलीतील व्हॅल्प्रेसो बंदरातून बाहेर पडणार्‍या एका डॅनीश जहाजावर पीटर सोरेन्सन नावाचा एक खलाशी आढळून आला. याच नावाचा खलाशी कॅरोल ए. डिअरींगवरही असल्याने अमेरीकन सरकारने सोरेन्सनची चौकशी करण्याची चिलीला विनंती केली. मात्रं अशी चौकशी करण्यात आली नाही. सोरेन्सनचं पुढे काय झालं याची डेन्मार्कमध्ये कोणतीही नोंद आढळून आली नाही! ३१ डिसेंबर १९२१ मध्ये ट्रँक्वेबर या दुसर्‍या डॅनीश जहाजातील दोन खलाशी जेन्सन आणि पीटर निल्सन यांची टेक्सासमधील गॅल्व्हस्टन बंदरात चौकशी करण्यात आली. डिअरींगवरील खलाशी गायब झाले त्या कालावधीत आपण दुसरीकडे असल्याचं त्यांनी पुराव्यानिशी सिध्द केलं. त्यांच्या माहीतीची सत्यता तपासण्यासाठी डेन्मार्कहून अधिक माहीती मागवण्यात आली, परंतु ही माहीती कधीच मिळाली नाही! दरम्यान जेन्सन आणि निल्सन गॅल्व्हस्टनमधून अदृष्य झाले ते कायमचेच!

४ मार्च १९२१ ला इतर जहाजांना धोका उत्पन्न होऊ नये म्हणून कॅरोल ए. डिअरींगला डायनामाईट लावून जलसमाधी देण्यात आली.

कॅरोल ए. डिअरींगवरील एकाही माणसाचा कधीही तपास लागला नाही!

*******

कॅरोल ए. डिअरींगवरील खलाशांचं नेमकं काय झालं असावं या विषयी अनेक तर्क मांडण्यात आले.

११ एप्रिल १९२१ मध्ये क्रिस्तोफर कोलंबस ग्रे नावाच्या एका कोळ्याला केप हॅट्रेसच्या समुद्रकिनार्‍यावर एक बाटलीत ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात लिहीलं होतं,

"जहाजाचा ताबा तेलाचा काळाबाजार करणार्‍यांनी घेतला आहे. सर्व चीजवस्तू लुटत आहेत. सर्वजण जहाचाच्या वेगवेगळ्या भागात लपले आहेत. सुटकेची कोणतीही आशा नाही! ज्याला कोणाला चिठी सापडेल त्याने कंपनीच्या मालकांना कळवावं!"

ही चिठ्ठी मिळाल्यावर एकच गोंधळ झाला. कोस्टगार्ड ऐवजी कंपनीच्या मालकांना कळवण्यात चिठ्ठी लिहीणार्‍याचा कोणता हेतू असावा यावर भरपूर उहापोह झाला. मात्रं पुढील चौकशीत हि चिठ्ठी खोटी असल्याचं आणि कोस्टगार्डमध्ये नोकरी मिळावी या हेतूने स्वतः ग्रे यानेच लिहील्याचं निष्पन्नं झालं!

कॅरोल ए. डिअरींगवरील खलाशी चाचेगिरीला बळी पडले असावेत असा एक तर्क मांडण्यात आला. कॅप्टन वॉर्मेलच्या पत्नीचा या तर्कावर पूर्ण विश्वास बसला होता. जहाजावरील खलाशांना चाच्यांनी ओलीस म्हणून ठेवलं असावं अथवा त्यांची हत्या केली असावी असा दावा करण्यात आला, मात्रं या तर्काला निर्णायक पुरावा कोणालाच देता आला नाही.

याच तर्काच्या जोडीला आणखीन एक तर्क लढवण्यात आला तो म्हणजे रशियन / कम्युनिस्ट चाचेगीरीचा! युनायटेड रशियन्स वर्कर्स पार्टी या कम्युनिस्ट संघटनेच्या न्यूयॉर्क इथल्या ऑफीसवर घालण्यात आलेल्या छाप्यात काही वादग्रस्तं कागदपत्रं आढळून आली होती. त्या कागदपत्रांत अमेरीकन जहाजांचं अपहरण करुन ती रशियात नेण्याची योजना आखण्यात आल्याचं आढळून आलं! कॅरोल ए. डिअरींग आणि त्याच सुमाराला नाहीशी झालेली काही जहाजं याच कटाचा भाग म्हणून रशियाला पळवून नेण्यात आली असावीत असा सरकारमधील कम्युनिस्ट विरोधी गटाचा दावा होता. मात्रं तसा कोणताही निर्णायक पुरावा आढळून आला नाही. डिअरींग जहाज अमेरीकेच्याच किनार्‍याला आढळून आलं होतं.

अमेरीकेत दारुबंदी असल्याने चोरट्या दारुची वाहतूक आणि व्यापार करणार्‍यांनी डिअरींगचा ताबा घेतला असावा असा एक तर्क पुढे आला. डिअरींगच्या आकाराचा विचार करता त्यात भरपूर प्रमाणात दारू वाहून नेणं शक्यं होतं. परंतु डिअरींगचा तुलनेने कमी असलेला वेग पाहता ही शक्यता खूपच कमी होती.

सर्वात मान्यता पावलेला तर्क होता तो म्हणजे खलाशांचं बंड! कॅप्टन वॉर्मेल आणि फर्स्ट मेट मेलीन यांच्यातील वाद जगजाहीर होता. त्याचप्रमाणे इतर खलाशांबद्दलही वॉर्मेलने कॅप्टन गुडवीनजवळ अनुद्गार काढले होते. खलाशांनी बंड करुन कॅप्टन आणि इंजिनीयरची हत्या केली आणि जहाजाचा ताबा घेतला असावा. डायमंड शोल्समध्ये जहाज फसल्यावर लाईफबोटीतून किनारा गाठून त्यांनी पळ काढला असावा असा अंदाज व्यक्तं करण्यात आला. केप लुकाआऊट इथे आपल्याशी बोलणारी व्यक्ती कॅप्टन अथवा अधिकारीवर्गापैकी नव्ह्ती अशी कॅप्टन जेकबसनची पक्की खात्री होती. मात्रं खलाशांनी बंड केल्याचा कोणताही निर्णायक पुरावा आढळला नाही.

अमेरीकन सरकारच्या हवामानखात्याने व्हर्जिनीयाच्या पूर्व किनारपट्टीवर झालेल्या वादळाच्या तडाख्यात डिअरींगवरील खलाशी आणि इतर अनेक जहाजे सापडली असावी असं ठाम प्रतिपादन केलं. मात्रं कॅरोल ए. डिअरींग आणि हेवीट ही दोन्ही जहाजं वादळाच्या मार्गापासून दूर होती. त्याचप्रमाणे डिअरींगवरील खलाशांनी घाईघाईत जहाज न सोडता शिस्तबध्दंपणे आपल्या सर्व वैयक्तिक वस्तूंसकट जहाज सोडल्याचं दिसून आलं होतं.

कॅरोल ए. डिअरींगवरील खलाशांचं नाहीसं होणं हे सागरावरील कधीही न उलगडलेलं एक रहस्यं आहे.


संदर्भ :-

Bermuda Triangle - चार्ल्स बार्लीत्झ
The Devil's Triangle - रिचर्ड वायनर
Ghost Ships - रिचर्ड वायनर
Ghost Ship of Diamond Shoals, The Mystery of the Carroll A. Deering - ब्लँड सिम्प्सन
Lo! - चार्ल्स फोर्ट

सर्व फोटो इंटरनेटवरुन साभार

. . .