भूत बंगला : पालघरचा किस्सा
भूत कथा. गूढ कथा . Marathi Horror Gudh Katha and bhutachya goshti
नमस्कार मी कुणाल संखे … मी माझे आजोबा भास्कर संखे यांच्या सोबत घडलेला एक किस्सा तुमच्या सोबत share करत आहे …
आम्ही मुळचे पालघरचे … सुमारे ४०-५० वर्षापूर्वी पालघरला आमचा मासेमारी व लाकडाचा व्यवसाय होता . दिवस मासेमारी आणि रात्री लाकड तोडून सकाळी विकायची असा जोड धंदा … गावात भरपूर कुटुंबाचा लाकूडाचा जोडधंदा होता त्यामुळे रात्री जंगलात लाकड तोडायला जाताना पुरुषमंडळी टोळक्या टोळक्या ने जायची .
त्या रात्री अमावस्या होती . थंडीचा महिना चालू होता . त्या दिवशी लाकडाची मोठी order आली होती . order दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचवायची होती . नेहमी प्रमाणे आजोबा जेवण करून रात्री लाकड तोडायला निघाले . थंडी खूप होती म्हणून त्यांनी आपल्या सोबत घोंगडी घेतली . रात्री भूक लागेल त्यामुळे खाण्याची सोय म्हणून थोडे चणे सोबत घेतले .
आजोबा त्यांच्या मित्रांना बोलवायला गेले . सगळे मित्र काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते . ते उद्या दुपारी येणार होते . म्हणून आजोबांनी एकटच जंगलात जायचं ठरवल .
आकाशात अमावस्येच लख्ख चांदण पडल होत . सगळीकडे निरव शांतता होती . वाटेवर एक कुत्रपण दिसत नव्हत . सोबतीला फक्त हवेची एखादी येणारी झुळूकच . आजोबा अशा परिस्थितीत जंगलात शिरले .
जंगलात थोड आत गेल्यावर लाकड मिळणार होती . त्यामुळे आजोबा जंगलाच्या आत आत जातच राहिले . रोजच येण जाण असल्यामुळे वाट बऱ्या पैकी माहित होती . जंगलाच्या थोडं आत गेल्यावर हवीतशी लाकड मिळाली . तेवढ्यात त्याचं लक्ष जर दूर दिसणाऱ्या एका प्रकाशाकडे गेल . तिथ काही लोकांची हालचाल दिसत होती . ते शेकोटी पेटवून काही काम करत होते . आजोबांना वाटल आपल्याच गावच लोक असतील . त्यांना पण घेऊ सोबत लाकड तोडायला .
ते अंधारात झुडपा -झुडपां तून वाट काढत त्या शेकोटी जवळ गेले . जसे ते त्या शेकोटी जवळ पोहोचले त्यांना कळून चुकल की आपण आता मोठ्या अडचणीत येणार आहोत . कारण तिथे शेकोटी भोवती गावची माणसं नव्हती ; तिथे तर बावडीची भूत होती . आणि त्यांनी तिथे रात्री लाकूड तोडायला आलेल्या एका माणसाला मारून टाकल होत …. आणि त्याच प्रेत जवळ ठेऊन ती भूत त्या प्रेताच्या भोवती फेर धरून नाचत होती …
पुढे काय घडल हे सांगण्याआधी बावडीच भूत हा काय प्रकार आहे ते सांगतो . बावडीच भूत म्हणजे विहिरीत राहणार भूत . हे फक्त रात्रीच विहिरीबाहेर पडत . बाकी पुर्ण दिवस ते विहिरीतच बसून राहत . याला सूर्यप्रकाश आणि लोखंडाचा स्पर्श अजिबात सहन होत नाही . हे नरभक्षी असत अशी समजूत आहे . गावाकडची लोक रात्रीच्या वेळेस विहिरीजवळ जाऊ नकोस अस म्हणतात ते बहुतेक या भूतांमुळेच.
तर त्यांनी एका माणसाला मारून टाकल होत . त्याच प्रेत शेकोटी जवळ थिजत पडल होत . ती बावडीची भूत त्या प्रेत भोवती नाचत होती . हे पाहून आजोबांची जामच तंतरली . ते परत मागे पळू पण शकत नव्हते , कारण त्यांना भुतांनी येताना पाहिलं होत . परत पाठी फिरले असते तर भुतांनी त्यांचीपण शिकार केली असती पुढे जायचं म्हटल तर भूत होतीच . पण त्यांनी हिम्मत दाखवली . त्यांनी अंधाराचा फायदा घेतला व जवळची घोंगडी डोक्यापासून गुडघ्या पर्यंत अंगावर घेतली . आणि ते त्या शेकोटीच्या जवळ गेले . भूत जिथे नाचत होती त्याच्या पासून १५-२० फूट लांब जाऊन शांत जमिनीवर बसले .
हे बघून भूतांना वाटल कि हा आपल्यातलाच आहे .
थोड्या वेळाने त्यांचा नाच थांबला . ते आता मेलेल्या माणसाचे तुकडे करून वाटून घेऊ लागले . तसा एक वाटा काढून माझ्या आजोबांजवळ एका भुताने फेकला . आजोबांना काळात नव्हत कि आता काय कराव , ते तर माणसाच मांस खाऊ शकत नव्हते आणि खाल्लं असतं तर त्या भूतांना कळाल असत की आजोबा भूत नाहीत .
त्यांना एक युक्ती सुचली . त्यांनी तो वाटा घेतला आणि भुतांपासून अजून थोड लांब जाऊन बसले . आणि आपल्या खिशातले चणे काढून ते खाऊ लागले . भूतांची खात्री पटली कि हा भूतच आहे कारण भूतच असे विचित्र वागतात . रात्र सरत आली होती . ती ४-५ भूत त्या मेलेल्या माणसाला अख्खा फाडून खात होती . आजोबांकडे त्याचं लक्षही नव्हत . महिन्याभरापासून उपाशी असल्यासारखे ते खात होते .
पहाट होत आली तसं एक भूत म्हणाल " लवकर विहिरीत चला पहाट होत आहे ". हे ऐकून ती सगळी भूत ते उरलेलं प्रेत तसच टाकून जवळच्या विहिरीत पटापट उड्या मारायला लागली .
त्या भुतांनी जशी विहिरीत उडी मारली तशी आजोबांनी विहिरीच्या बाजूला असलेली एक लोखंडी जाळी त्या विहिरीवर टाकली व ती जाळी कोणी काढू नये म्हणून त्यावर एक मोठा दगड ठेवला . ती भूत आता त्या विहिरीतच बंद झाली होती . सकाळी सकळी त्यांनी गावात पोहचून हि रात्रीची घडलेली घटना अख्ख्या गावाला सांगितली . ते प्रेत कोणत्या व्यक्तीच होत हे काही समजल नाही . पण त्यादिवसापासून कोणी त्या विहिरीजवळ रात्रीच जात नाही .
या घटनेला ४० वर्ष झाली . ती विहीर पालघरच्या च्या जंगलात अजून तशीच आहे . ती भूत त्या विहिरीत अडकली ती कायमचीच . पण आता त्या बावडीला लोक भास्कर बावडी म्हणून ओळखतात.