भुताळी जहाज
स्पार्टाकस Updated: 15 April 2021 07:30 IST

भुताळी जहाज : इव्हान व्हॅसिली

अमानवीय आणि अतिंद्रीय शक्तींबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आपल्याला आलेल्या अनुभवांचं शास्त्रीय स्पष्टीकरण करणं हे कधीकधी अशक्यं होतं आणि रुढार्थाने त्याचं भूतं-खेतं किंवा 'बाहेरचं' असं वर्गीकरण केलं जातं. अर्थात अमानवीय अनुभवांच्या ज्या कहाण्या सांगितल्या जातात त्या प्रत्यक्षात कितपत खर्‍या असतात आणि कोणाच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडलेल्या असतात हा भाग अलाहिदा. गेल्या कित्येक शतकांपासून मानवाने सप्तसागरांत संचार केला आहे. या संचारासाठी वापरण्यात आलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांनी सागराचा तळही गाठलेला आहे. या जहाजांपैकी काही जहाजांवरील खलाशांच्या नशीबी असे अनेक विस्मयकारक आणि उकल न होण्यासारखे अनुभव आले आहेत ज्यांचं कोणत्याही शास्त्रीय कसोटीवर समर्पक असं स्पष्टीकरण मिळालेलं नाही. अशाच काही घटनांचा मागोवा घेणारी ही मालीका.

  यूबी - ६५

इव्हान व्हॅसिली हे जहाज १८९७ मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथे बांधण्यात आलं. जहाजाला ट्रिपल एक्स्पान्शनचे एकच इंजिन होते. जहाजाचा सांगाडा लोखंडी पट्ट्यांपासून बनवण्यात आलेला होता आणि डेक व इतर बांधकाम लाकडाचं होतं. जहाजाच्या साठवणीच्या जागेत एका सफरीत २५०० मैल अंतर कापण्याइतका कोळसा साठवण्याची सोय होती.

सुरवातीची पाच वर्षे बाल्टीक समुद्रातून फिनलंडच्या आखातात इव्हान व्हॅसीली व्यवस्थीत मालाची ने-आण करत होते. या पाच वर्षांच्या काळात जहाजावर कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. १९०३ मध्ये जपानविरुध होऊ घातलेल्या युध्दासाठी रशियन सरकारने ते ताब्यात घेतले आणि व्लाडीव्होस्टॉक इथे युध्दसाहीत्य नेण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली.

उत्तर समुद्रातून निघून अटलांटीक महासागरातून आफ्रीकेच्या पश्चिम किनार्‍याने मार्गक्रमणा करत जहाजाने दक्षिण आफ्रीकेतील केपटाऊन गाठलं. या ठिकाणी जहाजात कोळसा भरण्यात आला. केपटाऊन सोडल्यावर केप ऑफ गुड होपला वळसा घालून पूर्व किनार्‍याने जहाजाने झांजीबार बेट गाठलं. हिंदी महासागरातून पुढे मजल मारण्याच्या दृष्टीने जहाजात जास्तीचा कोळसा भरण्यात आला. आतापर्यंतचा जहाजाचा प्रवास अगदी सुनियोजीत प्रकारे सुरु होता. जहाजाने झांजीबार बेट सोडून हिंदी महासागरात प्रवेश केला

....आणि....

डेकवरील खलाशांना अनेकदा आपल्या आसपास कोणीतरी वावरत असल्याचा भास होऊ लागला. आपल्यावर कोणाची तरी सतत नजर आहे असं प्रत्येकाला वाटत असे. प्रत्यक्षात कोणाच्याही नजरेस काही पडलं नाही तरी आपल्या अवतीभवती कोणतीतरी अज्ञात शक्तीचं वावरत असल्याचं सर्वांनाच जाणवत होतं. वातावरणात येणारी थंड हवेची अनैसर्गिक झुळूक त्या शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होती. मात्रं अद्यापही कोणतीही अप्रिय घटना घडलेली नव्हती.

एका संध्याकाळी पहारा बदलण्याच्यावेळी डेकवरील खलाशांना एक आकृती दिसली! मानवी आकाराच्या त्या आकृतीला स्पष्ट दिसून येतील असे कोणतेही अवयव दिसत नव्हते. पारदर्शक आणि धुरकट दिसणारी ती आकृती रात्रीच्या अंधारात चमकत होती. डेकच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन ती आकृती एका लाईफबोटीमागे अदृष्य झाली.

हा विलक्षण प्रकार पाहून डेकवरील सर्वांचीच पाचावर धारण बसली. परंतु अद्यापही त्या आकृतीने आपला प्रताप दाखवण्यास सुरवात केली नव्हती. मजल-दरमजल करीत जहाज चीनमधील पोर्ट ऑर्थर या मिलीटरी तळापाशी पोहोचलं आणि खलाशांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले.

पोर्ट ऑर्थरला पोहोचण्यापूर्वी आदल्या रात्री एका खलाशाने जोरदार किंकाळी फोडली. त्याला शांत करण्याचा काहीजण प्रयत्न करु लागले. काही क्षणांतच सर्वांनाच आपण काय करतो आहोत याचं भान उरलं नव्हतं! कोणाचाही स्वत:वर ताबा उरला नव्हता. स्वतःला आणि एकमेकांना बदडण्यास त्यांनी सुरवात केली. एका खलाशाने झेंड्याची काठी उपसून इतरांवर हल्ला चढवला! काही वेळ हा गोंधळ असाच सुरु राहीला. अकस्मात अ‍ॅलेक गोविन्स्की या खलाशाने डेकची कड गाठली आणि स्वतःला समुद्रात झोकून दिलं! रात्रीच्या अंधारात अथांग सागरात तो बुडाला.

.... आणि डेकवरील परिस्थिती जादूची कांडी फिरावी तशी पूर्वपदावर आली.

पोर्ट ऑर्थर इथल्या रशियन अधिकार्‍यांनी खलाशांच्या कहाणीवर विश्वास ठेवण्याचं साफ नाकारलं! पूर्वनियोजीत योजनेप्रमाणे जहाज व्लाडीव्होस्टॉक इथे नेण्याचा त्यांनी कॅप्टनला आदेश दिला.

पोर्ट ऑर्थर सोडून जहाजाने पुढचा मार्ग पकडला. सुरवातीच्या दोन दिवसांत काहीही न झाल्याने सर्वांच्याच मनावरील ताण कमी झाला.

तिसर्‍या दिवशी पुन्हा त्या शक्तीने आपली चुणूक दाखवली. डेकवरील खलाशांचा स्वत:वरील ताबा पूर्णपणे उडाला. आपापसांत त्यांची जोरदार भांडणे आणि मारामार्‍या सुरु झाल्या. आपण काय करतो आहोत हेच कोणालाही समजत नव्हतं. काही मिनीटांनी एका खलाशाने समुद्रात उडी घेतली आणि डेकवरील वातावरण अकस्मात निवळलं!

जहाज व्लाडीव्होस्टॉकला पोहोचल्यावर जहाजावरील बारा खलाशांनी जहाज सोडून धूम ठोकली. जहाजावरील अज्ञात दुष्ट शक्तीपासून लवकरात लवकर दूर जाण्याची त्यांना घाई झाली होती. दुर्दैवाने पलायनाचा हा प्रयत्न साफ अपयशी ठरला. बाराही खलाशांना कैद करून जहाजावरील एका केबीनमध्ये डांबण्यात आलं.

व्लाडीव्होस्टॉक इथल्या रशियन अधिकार्‍यांनी कॅप्टनकडे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. जहाजात पुन्हा माल भरण्यात आला आणि ते हाँगकाँगच्या मार्गाला लागलं.

बंदरातून बाहेर पडताच त्या शक्तीने पुन्हा डोकं वर काढलं!

पहिल्या दिवशी रात्री पूर्वीप्रमाणेच डेकवर जी गोंधळाला सुरवात झाली. एका खलाशाने सागरात उडी टाकल्यावरच परिस्थिती मूळपदावर आली. दुसर्‍या रात्रीही तोच प्रकार झाला. तिसर्‍या दिवशी रात्री कोणी समुद्रात उडी टाकली नाही, परंतु एका खलाशाला भितीमुळेच मृत्यू आला!

हाँगकाँग बंदर समोर दिसत असताना जहाजाचा कॅप्टन स्वेन अँड्रीस्ट याने स्वतःला समुद्रात झोकून दिलं!

जहाज हाँगकाँग बंदरात पोहोचताच खलाशांनी जहाजावरून उड्या टाकल्या आणि ते हाँगकाँग आणि आजूबाजूच्या परिसरात लपून बसले. सेकंड ऑफीसर क्राईस्ट हॅन्सन आणि पाच स्कँडीनॅव्हीयन खलाशी तेवढे जहाजावर शिल्लक राहीले होते.

क्राईस्ट हॅन्सन हा अत्यंत धाडसी स्वभावाचा माणूस होता. त्याचा भुता-खेतांवर अजिबात विश्वास नव्हता. त्याने जहाजाचं कप्तानपद स्वीकारलं. अनेक नवीन खलाशांची नेमणूक केली आणि लोकरीने जहाज भरून ऑस्ट्रेलियातील सिडनी बंदरात जाण्यासाठी नांगर उचलला. जहाजावरील नवीन खलाशांपैकी एकालाही जहाजाचा 'इतिहास' माहीत नव्हता.

सुदैवाने सिडनीच्या दिशेने प्रवास बर्‍यापैकी सुरळीत झाला. त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही.

सिडनी बंदरापासून एक दिवसांवर असताना क्राईस्ट हॅन्सनने डोक्यात गोळी झाडून घेतली!

इंजिनरुम मध्ये काम करणार्‍या हॅरी नेल्सनने फर्स्ट मेटच्या सहाय्याने जहाज सिडनीला आणलं. जहाज धक्क्याला लागण्यापूर्वीच नेल्सन वगळता सर्वांनी जहाजावरुन धूम ठोकली.

रशियन सरकारने हॅरी नेल्सनच्या सहाय्याने भुता-खेतांवर विश्वास न ठेवणार्‍या कॅप्टनचा शोध घेण्यास सुरवात केली. लवकरच त्यांना योग्य असा माणूस मिळाला. परंतु आतापर्यंत जहाजाचं इतकं 'नाव' झालं होतं, की इतर खलाशी आणि कर्मचारीवर्ग मिळेपर्यंत चार महिने गेले. जहाजाने सिडनी बंदर सोडलं आणि अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोची वाट धरली.

सुरवातीचा आठवडाभर जहाजाचा प्रवास व्यवस्थित सुरु होता. परंतु पुन्हा पहिल्याप्रमाणेच असंबध्द गोंधळ सुरु झाला. पूर्वीप्रमाणेच डेकवरील खलाशांचा स्वत:वरील ताबा उडाला. परिस्थिती मूळपदावर आल्यावरही दोन खलाशी इतके प्रक्षुब्ध झाले होते, की त्यांना जहाजाच्या तळातील एका केबिनमध्ये बंदीस्तं करून ठेवण्याची वेळ आली! सकाळी दोघंही मृतावस्थेत आढळून आले!

दुसर्‍या दिवशी भुता-खेतांवर अजिबात विश्वास न ठेवणार्‍या कॅप्टनने रिव्हॉल्व्हरची नळी स्वत:च्या तोंडात खुपसून चाप ओढला!

स्वतःवर थोडाफार ताबा असलेल्या खलाशांच्या मदतीने हॅरी नेल्सनने जहाज मागे फिरवून व्लाडीव्होस्टॉकला आणलं.

या वेळी मात्रं हॅरी नेल्सनसंह सर्वांनी जहाज सोडून काढता पाय घेतला. कितीही मोठ्या रकमेचं आमिष खलाशांना जहाजावर परतण्यास प्रवृत्त करू शकलं नाही. जहाजावरील कोणत्याही सामानाचा छोटासा तुकडाही त्यांना नको होता! पुढे पुढे तर जहाजावर पहारा ठेवण्यासही कोणी माणूस मिळेना. उत्कृष्ट स्थितीतील हे जहाज पुढे कित्येक महिने व्लाडीव्होस्टॉक बंदरात तसंच पडून राहीलं.

सागरावरील खलाशांना या शक्तीचा नायनाट करण्याचा एकच उपाय ठाऊक होता.

आग!

१९०७ च्या हिवाळ्यात एका रात्री हे जहाज पेटवून देण्यात आलं! अनेक छोट्या छोट्या बोटींतून जहाजाभोवती कोंडाळं करुन व्होडकाचे घुटके घेत खलाशांनी जहाजाच्या अंत साजरा केला! काही जण आनंदाने गाणे-बजावण्यात मश्गूल झाले होते.

जहाज जळून पाण्याखाली जाण्यापूर्वी अंगावर काटा उभा रहावा अशी एक कर्णभेदक किंकाळी सर्वांना ऐकू आली!

जहाजावर कोणत्या अज्ञात शक्तीचं वास्तव्यं होतं हे मात्रं कधीही, कोणालाही समजून आलं नाही.

संदर्भ :-

Ocean Traingle - चार्ल्स बार्लीझ
Underwater Tales

. . .