
गूढकथा भाग ४ : ४ तो कोण होता
मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे नाव कथा इत्यादीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
परिमल गस्त घालण्यासाठी बाहेर पडला होता .परिमल हे नाव एखाद्या सिनेमातील नायकाला जरी शोभून दिसण्यासारखे असले,तरी आपला हा परिमल पोलिसांत होता. परिमल पोलिसांत जरी असला तरी आता गस्त घालण्यासाठी बाहेर पडताना तो साध्या कपड्यातच होता .पोलिसी पोषाखात असल्यावर लोक लगेच व्यवस्थित वर्तन करू लागतात .त्यांचा बेशिस्तपणा, त्यांची कायदा तोडण्याची प्रवृत्ती, मवालेगिरी, गुंडा गर्दी ,लक्षात येत नाही.साध्या नागरी पोशाखात असल्यावर तुमच्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही .अशावेळी बेकायदेशीर प्रवृत्ती बेशिस्तपणा लगेच लक्षात येऊ शकतो .आणि तो आटोक्यात आणणेही शक्य होते.
परिमल पोलीस ऑफिसर होता. रात्री गस्त घालणारे पोलिस आपल्या एरियात गस्त न घालता एकत्र जमून कित्येक वेळा गप्पा मारीत बसतात असा त्याचा अनुभव होता.अश्या वेळी तो त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत असे.मध्यरात्री सर्वत्र शांत वाटले तरी ते तसे असतेच असे नाही.चोर, जुगारी, दारुडे ,अनैतिक व्यवसायातील लोक, उगीचच टाइमपास करीत फिरणारी तरुण मंडळी, हे रात्री जागृत असतात .ते नुसतेच जागे असतात असे नाही तर ते त्यांच्या समाज विघातक कामांमध्ये व्यस्तही असतात.त्यांच्यामुळे समाजाला धोका पोचू शकतो .रात्रीची जागरूक गस्त ही अत्यावश्यक बाब आहे .
कुठे तरुण मंडळी बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसून गप्पा मारीत दारू पीत असतात .केव्हा केव्हा तरुण मुले बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसून गप्पा हाणत असतात .वरवर कदाचित साधी वाटणारी ही मुले चोर असू शकतात .आसपास सामसूम आहे असे पाहून दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याचा त्यांचा इरादा नसेलच असे नाही .अश्या चोर्या अनेक झालेल्या आहेत.अश्या उनाड मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक असते.वेळप्रसंगी त्यांना चार दणके देऊन हाकलून लावणे जरुरीचे असते.काही वेळा त्यांना पोलिस चौकीमध्ये नेवून चौकशी करताना अनेक गुन्हे उघडकीला आले आहेत .
हीच मुले केव्हा केव्हा रात्री सिनेमाहून परत येणाऱ्या मंडळींची छेड काढीत असतात .किंवा त्यांना लुटतही असतात .नुसत्याच मुली असल्या तर ही टवाळ पोरे त्यांच्या खोड्या काढता काढता कोणत्याही थराला वेळप्रसंगी जाऊ शकतात. त्यासाठी सतर्क राहणे डोळे कान उघडे ठेवणे आवश्यक असते .
परिमलचे या सर्व गोष्टींवर साध्या पोशाखात हिंडून लक्ष ठेवणे, चोऱ्या होऊ नयेत ,कुठेही अत्याचार घडू नयेत,हे पाहणे हेच काम होते.परिमल आपले काम व्यवस्थित प्रामाणिकपणे नेहमीच बजावीत असे .
त्याची कामाची वेळ केव्हा रात्री असे तर केव्हा तो दिवसा गस्त घालीत असे .असाच एके रात्री तो नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी बाहेर पडला होता.रात्रीचे बारा वाजले होते .ही वेळ अमानवी अस्तित्वाला बाहेर पडण्यासाठी योग्य असते असे मानतात.आतापर्यंत परिमल रात्रीच्या कोणत्याही प्रहरी गस्तीसाठी बाहेर पडला होता .त्याला केव्हाही कुठेही कसलाही वाईट अनुभव आला नव्हता. आज तो बरोबर बारा वाजता बाहेर पडला होता .
त्याला मोटारसायकलवरून एक व्यक्ती भरधाव येताना दिसली .वेगमर्यादेचे तो उल्लंघन करीत आहे असे स्पष्ट दिसत होते .अश्या वेळी शिटी मारून सहसा कुणी थांबत नाही .आपण आडवे झालो तरच कदाचित थांबण्याचा संभव असतो .त्याने ब्रेक न मारल्यास तात्काळ उडी मारून बाजूला होण्याचे कसब परिमलने आत्मसात केले होते.शंभरातील निदान नव्वद वेळेला लोक ब्रेक मारून थांबत असत.
पूर्ण खबरदारी घेत परिमल त्याला आडवा झाला .त्याचवेळी तो शिटीही मारीत होता . खाडकन ब्रेक मारत मोटरसायकलवाल्याने गाडी थांबविली .परिमलने आपले ओळखपत्र त्याला दाखवून वेगमर्यादेचे त्याने उल्लंघन केल्याचे त्याच्या लक्षात आणून दिले.प्रथम त्याने गाडीचे पेपर्स मागितले.त्याचप्रमाणे त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स मागितले. त्याने दोन्हीही त्याच्या हातात लगेच ठेविले .ती दोन्ही त्याने ना खिशातून काढली ना गाडीच्या डिकीतून काढली.एखादा जादूगार ज्याप्रमाणे हवेतून वस्तू काढतो त्याप्रमाणे त्याने ती दोन्ही डॉक्युमेंट्स जणू काही हवेतून काढल्याप्रमाणे त्याच्या हातात ठेवली .
त्याने त्याच्या सराईत नजरेने ती दोन्ही तपासली त्यामध्ये काहीही चूक त्याला आढळून आली नाही .परिमलने दंड म्हणून त्याच्या जवळ एक हजार रुपये मागितले.तेही त्याने हवेतून काढून त्याला दिले . नोटा तपासून नंतर त्याने त्या खिशात ठेवल्या. परिमलने दिलेली पावती त्याने तशीच हवेत नाहीशी केली.जणू काही अदृश्य स्वरूपात त्याने एखादा कोट घातला होता .त्याच्या खिशातून तो पटापट मागितलेल्या वस्तू काढून देत होता .परिमलने एकदा चौकातील सीसीटीव्ही कडे बघितले .त्यामध्ये याचे फोटो नक्की आले असतील याची त्याला खात्री होती.सीसी टीव्हीकडे बघून त्याने मंद स्मित केले . मोटारसायकलवरील तरुणानेही तसेच गूढ स्मित केले .त्याच्या त्या गूढ स्मिताने परिमल जरा चमकला.त्याचे स्मित आपल्याला गूढ व विचित्र का वाटले ते परिमलच्या लक्षात येईना.
परिमलने परवानगी दिल्यावर तो तरुण भुर्रदिशी मोटारसायकलवरून निघून गेला.त्याच्याकडे बघता बघता तो दिसेनासा झाला .दूरवर त्याची मोटरसायकल दिसत नाहीशी होण्याऐवजी तो थोड्या अंतरावर जणूकाही हवेत विरून गेला. अदृश्य झाला.परिमलला आपण पाहिले ते खरे की खोटे ते लक्षात येईना.त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना.त्याने स्वतःला एक चिमटा काढून बघितला .असा कसा एखादा मनुष्य मोटरसायकलसह अदृश्य होऊ शकतो ते त्याला कळेना .
यशवंत घाडगे निघून गेल्यावर (ड्रायव्हिंग लायसेन्सवर तसे नाव होते)परिमलने नेहमीप्रमाणे एक राऊंड मारली. सर्व काही आलबेल आहे असे पाहून तो पोलीस स्टेशनला परत आला.
दंडाचे पैसे जमा करण्यासाठी त्याने आपल्या खिशातून पैसे बाहेर काढले . हजार रुपये दंड म्हणून पाचशेच्या दोन नोटा त्या घाटगेने दिल्या होत्या.त्याने नोटा नीट पारखून घेतल्या होत्या .आता त्याच्या खिशात दोन पाचशे रुपयांच्या नोटांच्या आकाराचे कोरे तुकडे होते .त्याला आपण नोटा बघून घेतल्या म्हणून शंभर टक्के खात्री होती.त्याचे कोरे कागद कसे झाले ते त्यांच्या लक्षात येईना.त्याने हातचलाखी केली असावी किंवा ज्यावरील प्रिंट नाहीसे होतील असे तुकडे दिले असावेत .तो नामांकित जादूगार असावा .
त्याचा पावतीवरील मोटरसायकल नंबर बघून त्याला नोटीस पाठवावी असा विचार त्याने केला.तो कार्बन कॉपी पाहतो तो तिथेही संपूर्ण कागद कोरा होता .त्याला असे का होत आहे, हे काय चालले आहे, ते अजिबात कळेना .
सीसीटीव्हीमधील फुटेज बघून त्याचा नंबर पाहून त्याला नोटीस पाठवावी असे परिमलने निश्चित केले.त्याने त्या चौकातील सीसीटीव्ही फुटेज मागितले.सीसीटीव्ही फुटेज पाहता त्यात कुठेही तो मोटरसायकलवाला किंवा त्याची मोटारसायकल दिसली नाही.फक्त वेड्यासारखे हातवारे करताना परिमल दिसत होता.
नंबर त्याच्या लक्षात होता.त्याने आरटीओमधून तो नंबर कुणाचा आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला .तो नंबर अजून कुणालाच अॅलॉट केलेला नाही असे लक्षात आले .
परिमलला स्वतःला वेड्यासारखे होऊ लागले.नोटांचे कागद कोरे होणे,रात्री रस्त्यांवरून जाणारी मोटारसायकल मध्येच अदृश्य होणे,सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटरसायकल व त्याचा मालक कुणीही न दिसणे ,त्याने फाडलेल्या पावतीवरील कार्बन कॉपी कोरी होणे, त्याने चेक केलेल्या गाडीच्या पेपर्समध्ये असलेला नंबर मोटारसायकलवर लिहिलेला नंबर प्रत्यक्षात अॅलॉट केलेला नसणे,याचा अर्थ यशवंत घाडगे नावाचा मनुष्य अस्तित्वात असल्याचा त्याची मोटारसायकल अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा शिल्लक राहिला नव्हता .
*या घटनेचा उलगडा अनेक लोक अनेक प्रकारे करू शकतील.*
*काही जण परिमल पक्का थापाड्या आहे असेही म्हणतील
*तर काहीजण हा परिमल थोडी नशा करतो का असेही विचारतील
*कुणीतरी म्हटल्याप्रमाणे थोडी गांजा ओढली की माणसाला नाना प्रकारचे भास होऊ लागतात
*कुणी भुताटकी म्हणतील.
*कुणी परग्रहावरचा माणूस असेही म्हणतील.
*काही जण एकाच विश्वात अनेक विश्वे आहेत .वेगवेगळ्या पातळीवर ती कार्यरत असतात.केव्हा केव्हा त्यांचे आस एकमेकांना छेदतात आणि त्या छेदन बिंदूंवर अशा घटना घडतात.असेही स्पष्टीकरण देतील.
*तेवढय़ापुरत्या त्या व्यक्ती एकमेकांना दिसतात आणि नंतर परत आपल्या विश्वात निघून जातात .खरे काय ते तो देवच जाणे .
* केव्हा ना केव्हा आपल्याला यशवंत घाटगे कुठे ना कुठे भेटेल आणि मग आपण या कोड्याचा उलगडा करू म्हणून परिमल त्याला अजूनही शोधीतच आहे .*
९/८/२०१९©प्रभाकर पटवर्धन