गूढकथा भाग ४
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

गूढकथा भाग ४ : २ पुरुषस्य भाग्यम्

मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.

१ महापुरुष   ३ हिममानवाशी भेट

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे वास्तव परिस्थितीशी कथावस्तू नाव इत्यादी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )

सुभाषचा वाडा फार जुना पेशवेकालीन  होता.हा वाडा त्याच्या पणजोबांच्या पणजोबांनी बांधला होता .पेशव्यांबरोबर कोकणातून जी काही कोकणस्थ चित्पावन मंडळी पुणे येथे आणि नंतर तेथून नाशिक येथे आली त्यातील सुभाष नेने यांचे एक कुटुंब होते.सुभाषचे आजोबा सांगत असत की त्यांचे खापरपणजोबा विसाजीपंत पूर्वी पेशव्यांच्या  सैन्यात होते आणि त्यांनी सैन्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली.त्यांना नाशिकजवळ जहागिरीची सनद मिळाली होती .त्यानी नाशिक तीर्थस्थान पुण्यभूमी म्हणून  येथे वाडा बांधला.तसा जहागिरीच्या ठिकाणीही त्यांचा एक वाडा होता.तिथेही ते अधूनमधून राहत असत .जहागिरीच्या व्यवस्थित देखभालीसाठी तेथे राहणे गरजेचे असे . विसाजीपंत अत्यंत धार्मिक होते .शेवटचे काही दिवस सोडले तर ते जेव्हा नाशिकमध्ये असत तेव्हा रोज कपालेश्वर व काळाराम यांचे दर्शन घेतल्याशिवाय जेवत नसत.त्याशिवाय गंगेवरील अनेक देव देवतांचे दर्शन ते रोज घेत.  ते व नंतरच्या एक दोन पिढ्या मुख्यत्वे  येथूनच  जहागिरीची देखभाल करीत.नंतर त्यांनी जहागिरी विकून टाकली. वाडा शहराच्या जुन्या भागात होता.वाडा जुना झाला होता .तरी अजूनही बळकट होता .सर्वत्र शिसवी व सागाचे लाकूड वापरलेले होते.भिंती भरपूर जाड व भक्कम होत्या .त्यामुळे उन्हाळ्यात गारवा तर थंडीमध्ये उबदार वातावरण असे.

आधुनिक परिस्थितीनुसार वाडय़ाच्या स्वरूपात स्वयंपाकघर माजघर ओटी पडवी इत्यादींमध्ये योग्य ते बदल केले होते.सोफा, वॉशिंगमशीन, उभ्यानी स्वयंपाक करण्याचा ओटा, गॅस, मायक्रोवेव्ह,वातानुकुलीत यंत्र इत्यादी गोष्टी आल्या होत्या.पूर्वीच्या घरांना हल्लींसारखी  प्रत्येकाला स्वतंत्र शयनगृहे नसत.तीही सुधारणा करण्यात आली होती .प्रत्यक्षात वाड्याचे बाह्य स्वरूप जरी तेच राहिले असले तरी अंतर्भागात खूपच बदल झाला होता.  कितीही आधुनिकीकरण केले तरीही त्याचे जुनाट स्वरूप जात नव्हते .तेच त्याच्या पत्नीला व मुलांना खुपत असे.जेव्हा मुले त्यांच्या मित्रांच्या आधुनिक घरात जात त्यावेळी त्यांना आपले जुनाट घर जास्तच खुपत असे.सुभाषच्या पत्नीचीही तीच स्थिती होती.तिचा माहेरचा बंगला अद्यावत होता .तिला तशाच राहणीची सवय होती .तिला पहिल्यापासूनच हा जुनाट वाडा आवडत नसे.आज ना उद्या आपण सुभाषचे मन वळवू आणि अद्यावत घरात  जाऊ याची तिला खात्री होती.तिच्या आग्रहास्तवच सुभाषने या वाड्याच्या अंतर्गत स्वरूपात कितीतरी बदल केले होते . तरीही सुभाषच्या मुलांना व पत्नीला तिथे राहणे आवडत नसे .पूर्वीच्या छोट्याश्या गावाचा विस्तार आता चारी दिशांनी  झाला होता .शहराची तीर्थस्थळ, यात्रास्थळ, राम पदस्पर्शाने पावन झालेली  पवित्रभूमी,ही ओळख जरी अजूनही कायम होती तरी आणखीही अनेक नवीन ओळखी निर्माण होत होत्या. औद्योगीकरण व्यापारीकरण झपाट्याने होत होते.मंत्रभूमीबरोबरच नाशिक यंत्रभूमीही होत होती.नवीन नवीन कॉलनी निर्माण होत होत्या.अनेक मजली आधुनिक स्वयंपूर्ण  वसाहती निर्माण होत होत्या .टुमदार स्वतंत्र बंगल्यात नाही तर निदान एखाद्या आधुनिक टुमदार मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला जावे असे सुभाषच्या पत्नीला सुहासिनीला व मुलांना वाटत असे.त्यांनी अनेक वेळा तसा आग्रह धरला होता. जर ते स्वतःच्या टोलेजंग बंगल्यात गेले असते तर त्यांचा आनंद  शतगुणित झाला असता .शेवटी त्याने आधुनिक स्वयंपूर्ण वसाहतीत एक मोठा फ्लॅट घेतला.घरातील सर्वजण तिथे आपण शक्य तितक्या लवकर  राहायला जाऊया असे म्हणत होते .परंतु सुभाषची चालढकल चालली होती.फ्लॅटचे इंटीरिअर होऊ द्या .फ्लॅटचे कलरिंग होऊ द्या .अजून हे काम राहिले, अजून ते काम राहिले, अश्या काही ना काही सबबी तो काढत होता.

त्याचे बालपण या वाड्यात गेले  होते .त्या रम्य आठवणी त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या होत्या.या जागेतील अडचणी त्याला कळत नव्हत्या असे नाही .मुलांना शाळेत जातायेताना व त्यालाही कामावर जातायेताना खूप अडचणींना तोड द्यावे लागे.मुख्यतः जुन्या गावाबाहेर पडताना प्रचंड  गर्दीला व ट्रॅफिक जामला तोंड द्यावे लागे.हल्ली बरेच रस्ते गर्दीमुळे एकमार्गी झालेले होते .त्यामुळे येताना जाताना अंतर वाढत असे.मोटार स्कूटर दूरवर ठेवावी लागे.वाड्यापर्यंत मोटार किंवा स्कूटर यायला रस्ता नव्हता.गावात मोटर चालविणे बिकट असल्यामुळे त्याने अजून मोटार घेतली नव्हती.  गावाबाहेरील नव्या वसाहतीतील फ्लॅटमध्येही काही गैरसोयी होत्याच .प्रत्येक स्थितीमध्ये काही सकारात्मक तर काही नकारात्मक भाग असतोच .कशाला किती महत्त्व द्यायचे ते ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून राहते.

सुभाष इंजिनिअर होता .एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर तो काम करीत होता .तसे त्याचे उत्पन्न व्यवस्थित होते .कोठेही काही कमी नव्हते .त्याची पत्नीही एका इंग्रजी शाळेत शिक्षिका होती.मुलगा आठवीला तर मुलगी चौथीत होती .  प्रत्येकाच्या अनेक आशा आकांक्षा असतातच .प्राप्त परिस्थितीत त्या सर्वस्वी पुऱ्या होतातच असे नाही .पैसा हे जरी सर्वस्व नसले तरी पैशाशिवाय बऱ्याच गोष्टी अडून राहतात यात काहीही शंका नाही.नवीन फ्लॅटच्या खरेदीत व इंटिरियरमध्ये बराच पैसा गेला .त्यासाठी बँकेचे कर्जही काढले होते .त्याचे हप्ते जात होते .वाड्यामध्ये गरजेनुसार अंतर्गत बदल करतानाही बराच पैसा गेला होता .

शेवटी सर्वांच्या आग्रहास्तव वाडा सोडून फ्लॅटमध्ये जायचे ठरले .वाड्याच्या  तुळया वासे विकले असते तरीही त्या शिसवी व सागवानी लाकडाचा पैसा भरपूर आला असता .शेवटी वाडा विकण्याचे ठरले .एवढ्यात सुभाषला ताप येऊ लागला .तापाचे निदान फ्ल्यू व्हायरल इन्फेक्शन असे झाले .त्यामुळे फ्लॅटमध्ये जाण्याचे लांबणीवर पडले .

एक दिवस तापाच्या गुंगीमध्ये असताना सुभाषला एक स्वप्न पडले.त्याला अापण वाड्यातील एक भिंत खणत आहोत आणि त्यात एक हंडा सापडला असे स्वप्न पडले .

दुसऱ्या दिवशी तेच स्वप्न पुन्हा पडले आज त्याने तो हंडा उघडला त्या हंड्यात पेशवेकालीन सुवर्ण नाणी होती.

त्याने आपले स्वप्न कुणालाही सांगितले नाही .तिसऱ्या रात्री पुन्हा त्याला तेच स्वप्न पडले .या वेळी कुणीतरी  पेशवेकालीन कपडे घातलेला  पुराणपुरुष तो हंडा तुझाच आहे असे आपल्याला सांगत आहे असे स्वप्न  त्याला पडले होते.

तापातून बरे झाल्यावर त्याला अशक्तपणा होता .तो रजेवर होता .थोड्याच दिवसांत त्याची प्रकृती पूर्ववत झाली .पुन्हा एकदा त्याला तसेच स्वप्न पडले . दुसऱ्या दिवशी त्याने पत्नीला विश्वासात घेतले .आपल्याला पडलेली सर्व स्वप्ने त्याने तिला सांगितली.शेवटी भिंत खणून खात्री करून घ्यावी असे ठरले.दुसऱ्या दिवशी मुले शाळेत गेल्यावर त्यांनी ती जाड भिंत खणायला सुरुवात केली .भिंतीमध्ये तीन कोनाडे होते .त्या तीन कोनाड्यांच्या मधल्या कोनाड्यामध्ये त्याने पहारीने खणायला सुरुवात केली.थोड्याच वेळात बरीच भिंत ढासळून बाहेर आली .दगड व मातीचा एक मोठा ढिगारा तयार झाला.रुंद भिंतीत त्याने स्वप्नात पहिल्याप्रमाणे एक मोठा हंडा होता.सुभाष व त्याची पत्नी सुहासिनीने तो हंडा कसा बसा उचलून खाली जमिनीवर ठेवला.त्यावर एक पत्रा सील केलेला होता.छिन्नी हातोडीने तो पत्रा फोडून दूर करण्यात आला.आंत पेशवेकालीन सुवर्णनाणी होती.

पूर्वीच्या काळी चोर दरोडेखोर यांच्या भीतीने धन कुठेतरी गुप्तपणे ठेवले जात असे.तुळस चूल उंबरठा याप्रमाणेच भिंतीमध्येही ठेवले जात असे.पूर्वीच्या वाड्याच्या भिंती जाड असत.उष्णता नियंत्रण हा त्याचा एक उद्देश असे.चोर दरोडेखोर आल्यास त्यांना भिंत फोडण्याला वेळ लागावा, त्रास व्हावा, आवाज व्हावा, आपल्याला जाग यावी, आणि तोपर्यंत आपल्याला मदत मिळावी, असाही हेतू त्यामागे असे . भक्कमपणा व मजबुती हाही उद्देश असे. त्यासाठीच पूर्वीचे दरवाजे भक्कम असत .किल्ल्याच्या दरवाज्यांना तर खिळे ठोकलेले असत .हत्तीने धडक मारून दरवाजा तोडू नये यासाठी ते खिळे असत. 

सुरक्षितता, वातानुकुलता, मजबुती,दरोड्याची पूर्वजाणीव, याप्रमाणेच गुप्तधन ठेवण्यासाठीही जाड भिंतींचा  उपयोग होत असे.मला विश्वास आहे की जर पूर्वीचे वाडे पाडताना नीट लक्ष ठेवले तर त्यातून काही ना काही गुप्त धन प्राप्ती होऊ शकते .अशी धनप्राप्ती अनेकांना झालीही असेल .कुठच्या भिंतीत कोणत्या स्वरूपात धन ठेवले आहे हे वडिलांकडून मुलाकडे सांगितले जात असावे. काही कारणाने काही वेळा ही साखळी तुटत असावी .अनेक बंधू भगिनी त्यांची अनेक मुले यांमध्ये गोतावळा वाढत जातो. कुणाला गुप्तधनाची माहिती सांगावी असाही कदाचित प्रश्न पडत असावा .गरज असेल पडेल तेव्हाच या गुप्त धनाचा उपयोग व्हावा अशी कल्पना असावी .कुणीही केव्हाही चटकन त्याचा वापर करू नये अशीही कल्पना  भिंतीमध्ये गुप्तधन ठेवण्यामागे असावी .पूर्वी बँका नव्हत्या. लॉकर्स नव्हते. अश्यावेळी जाड भिंती लॉकरचे काम करीत असाव्यात.

काही असो त्या वाडय़ाच्या वास्तुपुरुषाने स्वप्नात येऊन सुभाषला ठाव ठिकाणा सांगितलेला असो ,किंवा अन्य काही कारण असो,सुभाषला अकस्मात धनप्राप्ती झाली यात शंका नाही.

*आता त्याच्या कुटुंबाच्या पैश्याने प्राप्त होणाऱ्या अनेक इच्छा सहज पूर्ण झाल्या असत्या*

* त्याला जर धनलाभ झाला नसता तर वाडा विकल्यावर तो मजुरांना किंवा त्या वाडय़ाच्या नवीन मालकाला  झाला असता .*

*परंतु तो लाभ सुभाषला व्हायचा होता .*

*त्याला स्वप्न का पडले याचे विश्लेषण मानसशास्त्रज्ञ अनेक प्रकारे करतील .इतरही अनेक स्पष्टीकरणे असू शकतील .*

*त्याला धनलाभ झाला हेच खरे यालाच "पुरुषस्य भाग्यम्" असे म्हणता येईल.*

५/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

. . .