भयकथा: तुला पाहते रे! : भाग ४
पण मला आकाशातून त्या "नको जाऊस" म्हणून विनंती करत होत्या. मी त्यांचं ऐकलं...ऐकू नाही तर काय करू? मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का? एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच! ते म्हणतील तेच ऐकायचं!
तोपर्यंत मोबाईलमध्ये तिचे काही मेसेज येतच राहिले.
एकटीच_मी: "अरे बिचारा, हासुद्धा इतर मुलांसारखाच निघाला. लगेच याला माझे शरीर बघायचे आहे. आतापर्यंत माझा शरीर विरहित आत्मा वर्षभर खिन्नता आणि विषाद यात तळमळत होता. आता मी पुन्हा जागी झाले आहे आणि सगळ्या पुरुषजातीचा बदला घेणार आहे. मला मुक्ती नकोय! मला भूतयोनीतच राहून बदला घ्यायचाय"
एकटीच_मी: (पुढे टाईप करू लागली)
"मागच्या वर्षी याच दिवशी याच खोलीत काही पुरुषांनी माझा घात केला! पुरुषांनी म्हणजे माझे चांगले ओळखीचे होते ते! मित्र होते नावाला नुसते! त्यांना मित्र म्हणायला लाज वाटते मला.
शेवटी काय सगळे पुरुष सारखेच! स्त्री दिसली आणि थोडी मैत्री झाली की यांना लगेचच तिच्याशी सेक्स करायचा असतो.
फक्त त्याच उद्देशाने मैत्री करतात सगळे पुरुष. काहींना संधी मिळत नाही म्हणून ते काही करत नाहीत आणि काहींना मिळाली रे मिळाली की ते डायरेक्ट... शी!...
मला सांगायला सुद्धा लाज वाटते.
शहरात शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने एकट्या राहणाऱ्या स्त्रीने म्हणून काय कुणाच पुरुषाशी मैत्री करूच नये काय?
माझ्यावर अत्याचार करणारे तर पैशांचे वजन वापरून काही महिन्यांनी सुटले.
माझा न्याय संस्थेवर विश्वास होता म्हणून मी भरकटलेल्या आत्म्याच्या रूपाने निकाल लागेपर्यंत थांबले होते पण ते सगळे "निर्दोष" सुटले...
मात्र त्याच रात्री दारू पिऊन तो आनंद साजरा करतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचा चेंदामेंदा झाला.
माझा काहीही हात नाही बरं का त्यांच्या गाडीला अपघात करण्यात...
निर्दोष सुटले म्हणून त्यांचा राग आल्याने मी फक्त त्यांना जाब विचारायला म्हणून त्यांच्या गाडीसमोर येऊन उभे राहिले होते...
बाकी काही नाही...
उगाच माझ्यावर नाव घेऊ नका हं तुम्ही कुणी!!
हां, माझा चेहरा बघून ड्रायव्हरसहित गाडीत बसलेले ते सगळे असे भयंकर दचकले होते ना, की सांगता सोय नाही! आणि मग ..."