हे प्रकरण होऊन आता चार दिवस उलटले होते. अजूनही ऋषिकेशचे डिटेल इंट्रोगेशन झाले नव्हते. तेवढे दिवस तो पोलिस कोठडीतच होता. या चार दिवसात त्याला फक्त ऋचाच भेटायला आली होती. ती त्या्च्यासाठी येताना दरवेळेस काहीतरी खायला आणत होती. त्याने गुन्हा कबुल केल्यामुळे कदाचित त्याच्यासाठी देशपांडे कुटुंबीयांनी वकील पहिला नव्हता. कायद्यानुसार प्रत्येक गुन्हेगाराला गुन्हा सिद्ध होईपर्यंत आपली बाजू मांडायची मुभा असते. कदमांनी याचमुळे क्रिमिनल लॉयर आरती वाघ यांना बोलावले होते.
“नमस्कार, आरती मॅडम या बस चहा थंड काय मागवू...?” कदमांनी विचारलं
“काय म्हणताय कदम साहेब...? काय चालूये तुमच्या राज्यात..? हाच का तो पोरगा?” क्रिमिनल लॉयर अॅडोकेट आरती वाघ म्हणाली. तिने ऋषिकेशकडे एक कटाक्ष टाकला.
ऋषिकेश जेलमध्ये एका कोपऱ्यात बसला होता. त्याच्या शेजारी असलेल्या मठातून पाण्याचे थेंब पडत होते. त्याच्याकडे बघून आरती कदमांना म्हणाली
“हा पोरगा?? कदम तुम्ही शुअर आहात ना?? पाप्याच पितर आहे. खातो-बीतो कि नाही.?? काय रे खातोस का?” असं म्हणून आरतीने ऋषिकेशच बारकाईने निरीक्षण केलं.
ऋषिकेश अजूनही एका ठिकाणी शून्यात बघत होता. मध्ये मध्ये फक्त पाणी प्यायला आणि नैसर्गिक क्रियांसाठी उठायचा.
“मला कंटाळा आलाय मोबाईल हवा होता.” ऋषिकेशने आरतीला सांगितलं
“नाही. मोबाईल मिळणार नाही. पण दुसरा काही हवं तर सांग. वय काय याचं?” तिने ऋषिकेशला विचारून आपला मोर्चा कदमांकडे वळवला.
“मागच्याच आठवड्यात एकवीस पूर्ण झालाय.” कदमांनी सांगितलं.
“याचा कबुलीजवाब कुणी लिहून घेतला?? मल बघायचा आहे. कॉपी द्याल का? कोणाशी बोलला का?.” आरतीने कदमांना विचारलं.
“नाही...! त्याचं डिटेल इंट्रोगेशन व्हायचं आहे. ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी त्याने सांगितला कि खून त्याने केलंय. बाकी तुम्हीच बघाल.” कदम म्हणाले.
आरती वाघ पोलिस स्टेशनमधून निघून गेल्या. दुसरा दिवस उजाडला. आता पोलिस स्टेशनमध्ये नेहमीपेक्षा जास्त लगबग चालू होती. फाईलसचे मोठे-मोठे गठ्ठे टेबलावरून त्या टेबलावर होत होते.
“काय आज साफसफाई मोहीम काढलीय वाटतं, घोरपडे??” फाईल साफ करणाऱ्या घोरपडेच्या पाठीवर थाप मारली.
“थट्टा करताय काय शिंदे? तुम्हाला नाही माहिती का? तुमच्या केसमुळे चालूये हे सगळं....” घोरपडेजरा त्रासून बोलला.
“आत येऊ का सर? काय झालं ? काही नवीन लीड मिळाला का??” शिंदे म्हणाले.
“शिंदे, बसा. मी म्हणलो होतो ना तुला हि वाटते तितकी सोप्पी केस नाही. वाचा.” असं म्हणत त्यांनी एक लाल कापडात गुंडाळलेली फाईल पुढे केली.
शिंदेंनी फाईल वाचायला घेतली. प्रत्येक पान उलटत त्यांनी संपूर्ण फाईल वाचून काढली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
“साहेब हे कितपत खरं आहे. म्हणजे आपल्याकडे नोंद आहे म्हणजे खरच असणार पण ह्यात तर....!” शिंदे बोलता बोलता गप्प झाले.
कदमांच्या केबिनच्या दारावर टकटक ऐकून शिंदेंची तंद्री तुटली. कदमांनी इशाऱ्यानेच आत येण्यास सांगितले. आरती वाघ आत आली. तिच्या हातातली फाईल बघून काहीतरी अजून मोठे खुलासे होणार आहेत असे वाटून कदम म्हणाले.
“आता तुम्ही काय वेगळं शोधून आणलाय का आणि? कि बेलची फाईल आणलीत....?” कदमांनी खुणेनेच आरतीकडे फाईल मागितली.
“होय. तुम्ही तपास केलाच असेलना पाच दिवसात. याची हिस्ट्री कळली का?” आरती म्हणाली.
“कोड्यात बोलू नका तुम्ही. सांगा काय ते.” कदम त्रासून म्हणाले.
“ऋषिकेशची मेडिकल फाईल त्यात जोडलीय. बेल पण फाईल केलीय. सायकोलॉजीस्ट पण येतील थोड्या वेळात. फाईल वाचा म्हणजे आमच्या अशीलाची कथा कळेल.” आरती जरा उपहासाने म्हणाली.
“मी आत येऊ का सर.?” केबिनच्या दारात एक तिशी पस्तिशीचा चाश्मिष माणूस आला होता. स्मित हास्य देत त्याने विचारले.
“या. रेगे सर. माणसंच गोळा करतोय. वकीलबाई आल्या. तुम्ही आलात. आता या पोराचे आई बाबा आले कि आपण चालू करू. शिंदे फोन करा त्यांना आले का बघा.” कदम म्हणाले.
शिंदे केबिन मधुन बाहेर गेले. बाहेर मकरंद आणि प्रतिमा एका बाकावर बसले होते. ऋचाला आज बोलवलं नव्हतं
“चला आता डिटेल तपासणी होणार आहे. तुम्ही दोघा एकत्र चला. आधी साहेबांचा जवाब होईल मग तुमचा.” असं म्हणून शिंदे त्यांना एका खोलीत घेऊन गेले.
ती खोली इतर खोल्यांपेक्षा अंधारी होती. एकच फॅन तोही हळू चालत होता. त्या खोलीच्या एकीकडे एक बाक होता आणि खोलीच्या मध्यभागी टेबल खुर्च्या होती. त्यावर एक टेबल फॅन होता. टेबलाच्या एका बाजूला तीन खुर्च्या होत्या. दुसऱ्या बाजूला एकच खुर्ची होती. ते सगळं दृश्य बघून प्रतिमा जरा घाबरलीच. कदम आणि शिंदे यांच्या बरोबर अजून दोन माणसं तिथे आली होती. प्रतिमाने त्यांना पहिल्यांदाच पहिले होते.
“देशपांडे, हे डॉक्टर रेगे सायकोलॉजीस्ट आहेत. ह्या आरती वाघ तुमच्या वकील.” कदमांनी ओळख करून दिली.
“मकरंद देशपांडे तुम्ही आता बसा खुर्चीत. प्रतिमा देशपांडे तुम्ही बाहेर थांबा यांचा जवाब झाला कि, तुम्हाला बोलावणं पाठवतो. मग या.” कदमांनी सांगितलं. तसं तावडे लेडी कॉनस्टेबल या प्रतिमाला घेऊन बाहेर निघून गेल्या. खोली आता एक खुर्चीत मकरंद बसला होता. समोर कदम, डॉ. रेगे, आरती वाघ बसले होते. त्या अंधाऱ्याखोलीत एक मळभ आली होती.