गोष्ट भुताच्या प्रेमाची : भाग ४
ही एका भुताबरोबरच्या प्रेमाची आणि संसाराची गोष्ट.
'हे बघ, हे सगळे कधी होईल तर मी तुला स्पर्श केला तर ना. पण मी तुला वचन देतो कि मी तुला स्पर्श करणार नाही. पण मला तुला पाहायचे आहे' तो ठामपणे म्हणाला.
'बरं येईल मी तुमच्यासमोर. पण अगोदर जेवण तरी करा'
'नाही, तुला बघितल्याशिवाय मी एक घासही घेणार नाही' श्रीकांतने पुन्हा जाहीर केले. एक क्षण, दोन क्षण असा कितीतरी वेळ गेला. कपड्यांची सळसळ ऐकू येत होती. ती इकडून तिकडे गेल्याचे मोगऱ्याच्या वासावरून कळतही होते. पण त्याला दिसत मात्र काहीच नव्हते. त्याचा अधीरपणे वाढतच होता.
'येणार आहेस कि नाही समोर? तो रागावून म्हणाला.
'अहो, जरा धीर धरा. एवढे काय उतावीळ होताय. आम्हा बायकांचं आवरणं, सावरणं काय असतंय तुम्हाला माहीत नाही का?..... ती म्हणाली.
'मला कसं माहित असेल? माझं लग्न कुठंय झालंय अजून' तो हसत म्हणाला.
'मग एखादी छानशी मुलगी शोधा आणि उरकून टाका लग्न' तीही हसत म्हणाली.
'तुला चालेल? श्रीकांतने खोचक शब्दात विचारले. यावर उत्तर न देता ती गप्प झाली. कपड्यांची सळसळ मात्र ऐकू येत होती. श्रीकांतला आता अजिबात दम निघत नव्हता. कधी एकदा ती समोर येतेय असे त्याला झाले होते. अखेर त्याचा अगदी अंत पाहत तिचे शब्द त्याच्या कानावर आले.
'अहो, मी येतेय. पण तुम्ही अगोदर डोळे मिटा पाहू' ती लाडीकपणे म्हणाली.
'वा, हे बरंय. तुला बघायला मी आतुर झालॊय अन तू मात्र डोळे मिटून घ्यायला सांगते आहेस. मी नाही डोळे मिटणार' तो लहान मुलाच्या हट्टाने म्हणाला.
'बरं, राहीलं. नका डोळे मिटू पण मी सांगितलेले लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्याचा आणि माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे' तिने त्याला पुन्हा एकदा आठवण करून दिले.
'बरं, बरं, लक्षात आहे माझ्या. आता ये समोर पटकन' अधीर होत श्रीकांत म्हणाला.
अचानक घरातील सर्व दिवे विझले. अन काही क्षणातच पुन्हा अगदी मंद प्रकाश टाकत पेटले. श्रीकांत अंधारात डोळे फाडून बघत होता. किचनचा पडदा बाजूला झाला. किचनच्या दरवाज्यात एक स्त्री उभी असल्याचे अंधुक दिसत होते. हळूहळू दिवे मोठे होत गेले. आणि 'ती' दृश्यमान झाली. तिथे एक मनमोहक निखळ सौंदर्यवती उभी होती. उंच शिडशिडीत पण अगदी आखीव रेखीव शरीरयष्टी. चेहऱ्यावर एक मार्दव. कुठलाही भडकपणा नाही पण कुणाही पुरुषाला भुरळ घालेल असा त्या चेहऱ्यात एक अवर्णनीय गोडवा होता. श्रीकांत तिच्याकडे बघतच बसला. यावर काही प्रतिक्रिया द्यावी हेही त्याला कळत नव्हते. अगदी स्पेलबाऊंड झाल्यासारखा तो तिच्याकडे पाहत होता. ती अगदी सुमधुर हसत म्हणाली 'झालं ना समाधान?
तिच्या त्या बोलण्याने तो भानावर आला. हे एवढे स्वर्गीय सौंदर्य त्या राजारामच्या भेकड स्वभावामुळे काळाच्या पडद्याआड जात या पिशाच्च योनीत भटकतेय. तिच्याकडे बघत तो म्हणाला 'ये ना जवळ, इतकी दूर का उभी आहेस?........ मंद मंद पावले टाकत ती त्याच्यापासून काही अंतरावर येऊन थांबली. तो सोफ्यावरून उठू पाहताच ती दोन पावले मागे जात हसत म्हणाली. 'अं हं, पुढे यायचे नाही.'
'ओ गॉड, राजारामच्या अगोदर मला का नाही ग भेटलीस? असे म्हणत तो पुन्हा सोफ्यावर बसला.
त्याचा तिच्याकडे बघत बघत गप्पा मारण्याचा हेतू होता. त्याचा तो इरादा ओळखून ती म्हणाली 'आता चलताय ना जेवायला?......
तिच्याकडे बघत तो म्हणाला 'इतके सौंदर्य समोर उभे असताना भूक कशी लागेल? तू अशीच माझ्यासमोर उभी राहा, तुला बघूनच माझे पोट भरेल' मिशिकीलपणे हसत तो म्हणाला.
'यापुढे रोजच मी तुमच्यासमोर असणार आहे. तेंव्हा तुम्ही मला हवे तेवढे पाहू शकाल' आता अगोदर जेवायला चला.' यावर श्रीकांतनेही मग फार आढेवेढे घेतले नाहीत. तो हात धुऊन डायनिंग टेबलवर येऊन बसला. त्याच्या पासून सुरक्षित अंतर राखत तिने ताट वाढत त्याच्या समोर सरकवले. त्याने जेवायला सुरुवात केली खरी पण आपण काय खातोय याचे त्याला अजिबात ध्यान नव्हते. तो तिच्या तोंडाकडे बघत ताटातले पदार्थ संपवत होता. ती ही मंदपणे हसत, लाजत त्याच्या ताटात अजून अजून पदार्थ वाढत होती. बऱ्याचवेळाने त्याला आपल्या पोटाला अगदी तड लागली असे जाणवले. अन त्याने खाणे थांबवले. त्याने ताटातच हात धुतले आणि उठताने त्याला आपण किती खाल्ले असावे याची जाणीव झाली.
'आई ग, अगं किती खायला घातलस, मला अगदी जागेवरून उठावेसे वाटत नाही' पोटावरून हात फिरवत श्रीकांत म्हणाला. अगदी मुश्किलीने चालत तो सोफ्यावर येऊन बसला. बसला म्हणण्यापेक्षा कोसळलाच. तिकडे स्वयंपाकघरात आवराआवर चालल्याचे आवाज येत होते. आवरून ती बाहेर आली कि तिला समोर बसवून मन भरेपर्यंत पाहत तिच्याबरोबर रात्रभर गप्पा मारायच्या असं त्याने मनाशी ठरवले होते. पण भरल्या पोटी त्याचे डोळे गपागप मिटत होते. त्याने प्रयत्न करूनही डोळे उघडे राहत नव्हते, आणि काही क्षणातच तो तिथेच सोफ्यावर गाढ झोपून गेला.
सकाळी त्याला जाग आली ती पुन्हा मोगऱ्याच्या मधुर वासाने. त्याने आजूबाजूला बघितले पण अनुराधा कुठे दिसत नव्हती. क्षणभर त्याला कळेना कि काल जे बघितले ते खरं होते कि स्वप्न? आपण तर सोफ्यावरच झोपी गेलो होतो आता मात्र बेडवर आहोत. पण थोड्या वेळातच त्याच्या मनातील हे सर्व प्रश्न गायब झाले. अनुराधाच्या गूढ शक्तीची प्रचिती त्याला पुन्हा एकदा आली. पण ती दिसत का नाही? त्याने अज्ञातात पाहत विचारले
'अनु, कुठे आहेस तू?' मला दिसत का नाहीस? खळखळून हसण्याबरोबरच तिचा आवाज आला
'अहो, विसरलात काय, मी फक्त रात्रीच तुम्हाला दिसू शकते. आता दिवस उगवला आहे' चला उठा, ऑफिसला जायचं आहे ना? अगदी एखाद्या सुविद्य संसारी स्त्री सारखे तिने त्याला बाथरूममध्ये पिटाळलं आणि चादरींची आपोआप घडी घातली जाऊन ती कपाटात ठेवली सुद्धा गेली.
श्रीकांत आणि पिशाच्च रूपातील अनुराधा यांचा अनोखा संसार सुरु झाला. श्रीकांत अगदी वेळेत बँकेत जात होता. आपले काम इमानदारीत करत होता, आणि कोणाशीही काही संबंध न ठेवता घरी येत होता. कुणी वैयक्तिक काही प्रश्न विचारले तर तो चिडून त्या माणसाला तोडून टाकणारे बोलत होता किंवा काहीतरी थातुरमातुर कारण सांगून वेळ मारून नेत होता. हळूहळू त्याच्या बद्दल एक गूढ वातावरण तयार होत होते. 'तो' बंगला शापित आहे हे सर्वांना माहित होते. त्यामुळे काहीदिवसातच साठे साहेब सुद्धा तिथून बाहेर पडून दुसरी जागा शोधतील असे सर्वांनाच वाटत होते. अल्ताफने तर दुसरा एक चांगल्या वस्तीतील फ्लॅट त्याच्यासाठी शोधूनही ठेवला होता. पण श्रीकांत कडून काहीच तक्रार येत नव्हती. उलट तो जास्तच खुश असल्यासारखा वाटत होता. फक्त तो कोणाशी वैयक्तिक विषयावर बोलत नव्हता. त्यावर असतो एकेकाचा स्वभाव, नाही आवडत काहींना असे विषय' असा सोयीस्कर अर्थ काढत बँकेतील कर्मचारी निवांत झाले होते.
संध्याकाळी बँकेतून आला कि श्रीकांत आणि अनुराधा आवरता आवरता गप्पा मारायचे. कधीकधी तो व्हरांड्यातल्या झोपाळयावर बसून चहा घ्यायचा. अनुराधाही तिथेच जवळपास अदृश्य रूपात वावरत असायची. मोगऱ्याचा वास ही तिला ओळखण्याची खूनच झाली होती. दिवस मावळला कि मात्र ती धुरकट धुरकट रूपातून हळूच मूळ रूपात यायची. त्या वेळेची श्रीकांत आतुरतेने वाट पाहायचा. दिवसेंदिवस ती त्याला अजूनच सुंदर दिसू लागली होती. मूळचीच अनुराधा सुंदर होतीच आणि आता तर तिच्याही मनावर या अनोख्या प्रेमाची धुंदी चढू लागली होती. त्यामुळे तिचे सौंदर्य अजूनच खुलून गेले होते. तशी ती नेहमी साध्या साडीतच वावरायची.
'अनु, तू नेहमी साडीच का वापरतेस? पंजाबी ड्रेस घातलास तर तू अजून सुंदर दिसशील' एकदिवस श्रीकांत तिला म्हणाला.
'आश्रमात १५ वर्षाच्या पुढील मुलींना कम्पलसरी साडीच वापरावी लागायची. मलाही पंजाबी ड्रेस फार आवडत असत. लग्न झाल्यानंतर मी राजारामला म्हणाले सुद्धा कि मला पंजाबी ड्रेस आणून दे. पण त्याने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. 'घरंदाज स्त्री ही साडीतच शोभून दिसते' असं काहीसं पुस्तकी वाक्य टाकून त्याने माझी इच्छा मारून टाकली. नंतर जॉब लागल्यानंतर समाजाच्या वखवखलेल्या नजरा बघून मलाही पटले कि पंजाबी ड्रेस घालणे म्हणजे लोकांच्या नजरा उलट आपल्याकडे वळवून घेणे होईल. मग मी तसा कधी प्रयत्न केलाच नाही.' तिने त्यावर हे लांबलचक स्पष्टीकरण दिले. त्यालाही ते पटले.
'मग आता तुझी ती इच्छा पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. तू ड्रेस वापर, माझ्याशिवाय तर तुला कोणी बघणार नाही'
श्रीकांतने म्हणाला. 'हवे तर मी तुला ड्रेस आणून देतो'
यावर हसत हसत ती म्हणाली, 'त्याची काही गरज नाही' मी हवा तो ड्रेस आणू शकते, आणि घालू शकते'
'पण आम्हाला जर तुला एखाद्या विशिष्ठ ड्रेसमध्ये बघायचे असेल तर' श्रीकांत चावटपणे म्हणाला.
'हूं, तुमच्या अपेक्षा वाढत चालल्यात. पण काही हरकत नाही. तुम्हाला जो ड्रेस आवडेल, त्या ड्रेसकडे पाहून तुम्ही क्षणभर डोळे मिटून घ्यायचे आणि मनात फक्त 'अनु' एवढेच म्हणायचे. तो ड्रेस मला मिळालेला असेल' अनु हसत म्हणाली.
'च्यायला गम्मतच आहे, कसं जमतं हे तुला' श्रीकांतने औत्स्युक्क्याने विचारले.
'त्यासाठी स्वतःच्या जीवाची होळी करून घ्यावी लागते' विषादाने ती म्हणाली. त्याने तिथेच विषय सोडून दिला.
दुसऱ्या दिवशी श्रीकांतने प्रयोग करून बघायचे ठरवले. बँकेत शिरतानेच त्याला समोरच पी.आर.ओ. काउंटरला मालिनी सावंत उभी असलेली दिसली. ही मालिनी मुळातच एकदम मॉड होती, आणि तिचे ड्रेसही मॉडर्न असायचे. ती अजून तिच्या जागेवर बसलेली नव्हती. त्यामुळे श्रीकांतला ती सहजपणे दिसली. तिने हसत श्रीकांतला 'गुड मॉर्निग सर' म्हटले. श्रीकांतने क्षणभर तिला निरखत डोळे मिटले आणि मनात 'अनु' म्हटले. आणि तिला पटकन 'गुड मॉर्निंग' म्हणत तो आपल्या केबिनमध्ये शिरला. रोज एकदम रुक्ष वागणाऱ्या साठे साहेबांनी चक्क आपल्याकडे फक्त पाहिलेच नाही तर 'गुड मॉर्निंग' सुद्धा म्हटले. स्वतःवरच खुश होत ती आपल्या डेस्ककडे वळण्याऐवजी मागच्या बाजूला बसलेल्या शेफालीकडे गेली आणि तिच्या कानात आताचा प्रसंग सांगायला लागली.
श्रीकांत संध्याकाळी खुशीतच घरी आला. पण अजून दिवस मावळला नव्हता. त्याने आपले नेहमीचे प्रोग्रॅम घाईघाईतच उरकले आणि तो रात्र व्हायची वाट पाहत बसला.
'आज स्वारी भलतीच खुशीत दिसतेय. आम्हाला पण कळू दे खुशीचे कारण' अंधारातून तिचा आवाज आला.
'नाही, मी नाही सांगणार. ते आमचं गुपित आहे' असं म्हणत तो हसला. अनुही हसली, पण तिच्या हसण्याचे कारण वेगळे होते. श्रीकांत सोयीस्करपणे हे विसरून गेला होता कि ती एक पिशाच्च आत्मा आणि तिच्यापासून काहीच लपून राहू शकत नव्हतं. पण तिने याची त्याला आठवण करून दिली नाही.
थोड्यावेळात अंधारून आले. त्याने आजूबाजूला पाहिले, कुठे अनु दिसतेय का, पण कुठेच नाही. मग तो बाहेर जाऊन दक्षिण दिशेला बघून खात्री करून आला कि दिवस खरंच मावळलाय. पुन्हा तो आत येऊन तिच्या येण्याची वाट पाहत बसला. पण अनु काही येत नव्हती. शेवटी न राहवून त्याने हाक मारलीच 'अनु, अगं येना, किती वाट पाहायला लावते आहेस?........ आणि हळूहळू किचनच्या दरवाज्यात अनुची धूसर प्रतिमा स्थिर होत होत मानवी रूपात अवतीर्ण झाली. तिला बघून श्रीकांत अवाक झाला. सकाळी बँकेतल्या मालिनीच्या अंगावर होता अगदी तसाच (कि तोच) फिक्कट गुलाबी रंगाचा ड्रेस अनुने घातला होता. तिच्या मूळच्याच घाटदार शरीराला या पंजाबी ड्रेसने अजूनच सौंदर्य बहाल केले होते. तीही लाजत लाजत स्वतःचे रूप त्याच्या डोळ्यातून पाहत होती. तिची जिवंतपणाची अतृप्त इच्छा आज अशा स्वरूपात पूर्ण होत होती. स्त्रीला सुद्धा आपल्या सौंदर्याचे स्वच्छ नजरेने रसग्रहण करणारे आपले माणूस हवेच असते. श्रीकांत अगदी मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता. तिला त्यामुळे अजूनच लाजल्यासारखे होत होते. आणि दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच विचार चमकून गेला. खरंच आपण पाच-सहा वर्षांपूर्वी का नाही भेटलो? पण या जर तर ला आता तरी काही अर्थ नाही हे दोघांनाही काळात होते.
'तुम्ही असेच जर मला बघत राहिलात तर तर...... जा बाई, मला खूप लाज वाटतेय' लटक्या रागाने अनु म्हणाली अन आत पळून गेली. श्रीकांतने मग मनाशी हसतच आपला नेहमीचा ट्रे समोर ओढला. आपण पेग भरला कि ती लगेच काहीतरी स्नॅक्स घेऊन बाहेर येईल म्हणून तो वाट बघत बसला. ती काही आली नाही पण त्याच्या समोर खाऱ्या काजूंची एक प्लेट आपोआप अवतीर्ण झाली. ते बघून तो खट्टू होत म्हणाला 'हे काही बरोबर नाही हं, तू जरी अशी आतच लपून बसणार असशील तर नकोत आम्हाला हे काजू' असे म्हणत त्याने प्लेट बाजूला सारली. त्याचे हे ब्लॅकमेलिंग बघून ती लगेच बाहेर आली 'फारच हट्टी आहेत तुम्ही. तुमच्या आईंनी कसं सांभाळलं असेल तुम्हाला त्यांनाच माहित' असे हसून म्हणत ती समोरच्या सोफयावर येऊन बसली. अचानकपणे आईचा विषय निघाल्यामुळे श्रीकांतची धूसर, बावरली नजर शांत झाली. आणि ते छान गप्पा मारत बसले. काहीवेळाने दोघांच्याही मनातले अवघडलेपण दूर झाले आणि त्यांच्या गप्पांना रंग चढला. बोलता बोलता अनुने हळूच त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा विषय काढला.
'मला सांगा ना, तुमच्या प्रेयसीविषयी. कशी होती ती दिसायला? सुंदरच असणार म्हणा. तुमच्यासारख्या राजकुमाराला पसंत पडली म्हणजे अप्सराच असणार' आम्ही काय बाबा, आपले सर्वसामान्य' अनु म्हणाली.
'अनु, असं नको म्हणू ग. तू खूप खूप सुंदर आहेस. तुझी हेळसांड करणारा तो राजाराम एकदम अरसिक असणार'
बोलता बोलता श्रीकांतचा स्वर अगदी हळवा झाला. 'पल्लवी, दिसायला खूप सुंदर होती असे नाही पण तिच्यात एक जबरदस्त आकर्षण होतं. मनाने खूप चांगली होती.' मला अजूनही वाटतं कि तिने त्या अमेरिकेत असलेल्या मुलाबरोबर स्वतःच्या मनाविरुद्ध घरच्यांच्या दबावाखालीच लग्न केले असणार.'जाऊ दे, ती मला सोडून गेली असली तरी मला तिचा राग नाही. जिथे असशील तिथे ती सुखात राहू दे' ओलावल्या डोळ्यातून अश्रू खाली ओघळू नयेत म्हणून त्याने ब्लेंडर्सचा मोठा सिप घेतला, आणि मागे सोफ्याला टेकून बसला.
त्याची ती कहाणी ऐकून अनुही एकदम हळवी झाली. क्षणभर तिला वाटले कि जाऊन श्रीकांतला मिठीत घ्यावं अन त्याच्या दुखऱ्या मनाला जरा दिलासा द्यावा.' पण क्षणात ती भानावर आली आणि आपल्या अपुर्णत्वाची तिला जाणीव झाली. मग वातावरणातला उदासपना घालवण्यासाठी तिने श्रीकांतची चेष्टा करत विचारले 'मग, आज हा गुलाबी ड्रेस घातलेली कोण ललना दिसली? श्रीकांतचाही मूड लगेच बदलला. त्याने बँकेतील मालिनी बद्दल तिला सांगितले. मग त्यांच्या गप्पा बऱ्याच वेळ रंगल्या.
दुसऱ्या दिवसांपासून त्या दोघांमध्ये अजूनच जरा मोकळेपणा आला. दोघांनीही आहे त्या रूपात एकमेकांचे अस्तित्व मान्य करून टाकले होते. श्रीकांत जाता येता एखाद्या स्त्रीने, मुलीने घातलेला ड्रेस बघून मनात अनुचे स्मरण करायचा आणि संध्याकाळी बरोबरच तसाच ड्रेस घालून अनुराधा त्याच्या समोर असायची. तसा श्रीकांत एक सभ्य गृहस्थ होता. असे मुलींकडे बघणे हे त्याच्या स्वभावात बसत नव्हते. म्हणून मग नंतर तो प्रत्यक्ष कोणाकडे बघण्याऐवजी एखाद्या सिनेमातील हिरॉईनने घातलेला ड्रेस मनात कल्पना करायला लागला. रोजचे त्याचे रुटीन व्यवस्थित चालू होते. लोकांना टाळता टाळता मात्र कधी कधी अडचण व्हायची. तसेही त्याने कोणाशी फार संबंध वाढवले नव्हते त्यामुळे फार प्रॉब्लेम नव्हता, पण अल्ताफभाई, बँकेतील त्याचे सहकारी किंवा काणे मामांसारखे अल्प ओळखीतले पण त्याच्याविषयी आपुलकीने काळजी करणाऱ्या लोकांना उत्तरे देताने मात्र त्याची तारांबळ उडायची. मुळात खोटे बोलायची सवय नसल्याने त्याच्या थापा अनेकदा संशयास्पद वाटायच्या. पण काही अघटित घडल्याचे श्रीकांतकडून कधीच ऐकायला न आल्याने तेही लोक तसे आश्वस्त झाले होते. कदाचित त्या 'अनुग्रह' बंगल्याविषयी उगाचच खोट्या अफवा पसरल्या असतील असेही त्यांना वाटत होते.
असाच एक महिना गेला. पुण्याहून श्रीकांतच्या आईचे पत्र आले तसा श्रीकांत भानावर आला. अनुच्या अनोख्या प्रेमात बुडून जात तो आपल्या आईवडिलांनाही विसरला होता. पंधरा दिवसांनी परत येईल म्हणाला होता पण आता चांगला सव्वा महिना होत आला होता. त्याने आईला पत्र लिहिण्यापेक्षा ट्रॅक कॉल केला आणि मी शनिवारी नक्की येतो म्हणून सांगितले. आईला खुश करण्यासाठी म्हणून त्याने एका शिपायाला सांगून दुकानातून आंबा पोळी, कोकम सरबत, सांडगे असे खास कोकणी पदार्थही मागवून घेतले.
संध्याकाळी घरी आल्यावर त्याने अनुला समोर बोलावले. जवळून आलेल्या मोगऱ्याच्या वासाने तिच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
'अनु, उद्या मी पुण्याला जाणार आहे. आईचे पत्र आलंय आणि तसेही त्यांना भेटून बरेच दिवस झालेत' श्रीकांत म्हणाला. यावर अनु फक्त 'हं' एवढेच म्हणाली. श्रीकांत आवरायला बाथरुमकडे पळाला. आपले आवरून बाहेर येईतो अंधार झाला होता. अनु आपल्या रूपात हजर झाली होती. तिच्याकडे लक्ष जाताच श्रीकांत चमकला. तिने आज अगदी साधासा दिसणारा एक ड्रेस घातला होता. तिचा चेहरा एकदम उदास झाला होता. ती काही बोलतही नव्हती. आपले जाणे तिला आवडले नाही हे श्रीकांतने ओळखले.
'अगं अनु, मला जाणे गरजेचे आहे. आई-बाबा माझी वाट पाहत असतील. आणि दोन दिवसांचा तर प्रश्न आहे' मी सोमवारी परत येतोच आहे' श्रीकांत तिची समजूत घालत म्हणाला. तशी अनु जरा भानावर आली.
'अहो, जा तुम्ही. मलाच कळायला हवंय. ते तुमचे आईवडील आहेत. त्यांचा तुमच्यावर जास्त अधिकार आहे. मी काय, इतकी वर्ष एकटी होते, तर दोन दिवसांनी काय होतंय' अनु मोकळेपणाने म्हणाली.
'ये हुई ना बात' असे म्हणत श्रीकांतही हसला आणि आपली बॅग आवरायला गेला. अनुही आजूबाजूला रेंगाळत होती.
'पण तुम्ही सोमवारी नक्की याल ना, मला करमनार नाही इथे' अनुने तक्रार केली.
'मला तरी कुठे करमनार आहे' असे म्हणत श्रीकांतने बॅग बाजूला ठेवली आणि बाहेर येऊन जेवायला बसला. जेवता जेवता तो म्हणाला 'नाहीतर तू पण चाल ना माझ्या बरोबर, कोणाला कळणारही नाही'
'मला आवडेल यायला पण नाही येऊ शकणार. माझी ही जी काही शक्ती आहे ती फक्त या बंगल्यापरती मर्यादित आहे. इथून बाहेर पडले तर माझ्या सर्व क्रिया निष्प्रभ होऊन जातील' aनऊ पुढेही म्हणाली. 'मी आले तरी ना तुमच्यासमोर येऊ शकेल, ना बोलू शकेल पण त्याहीपेक्षा कुठे एखाद्या मंत्र शक्तीच्या जाळ्यात अडकले तर पुन्हा इथे येऊ शकेल कि नाही याचीही खात्री नाही मला' अनुने शंका बोलून दाखवली.
'अरे बापरे, मग नकोच ती रिस्क' श्रीकांत शहारात म्हणाला. जेवण संपवून तो उठला.
श्रीकांतने सकाळी मुद्दाम दिवस उगवायच्या अगोदरच निघायचे ठरवले होते. लवकर पोहोचू हा उद्देश होताच पण त्यापेक्षा अनु तिच्या दृश्य स्वरुपात आपल्याला निरोप द्यायला हजर असेल आणि जाता जाता तिला डोळे भरून बघता येईल हाच मुख्य हेतू. ठरल्याप्रमाणे तो सकाळी लवकर उठला आणि भरभर आवरलं. तोपर्यंत अनुने तिकडे त्याच्यासाठी डबा तयार करून दिला होता आणि कडक कॉफीही थर्मास मध्ये भरून दिली होती. 'कशाला त्रास घेतलास' असे म्हणत तिचा निरोप घेत श्रीकांतने आपली सँट्रो रस्त्यावर आणली. अणूचे डोळे भरून आले होते. मागे वळून तिला पुन्हा एकदा हात करत श्रीकांतने गियर टाकला आणि त्याची गाडी पुण्याच्या दिशेने पळू लागली.
श्रीकांत घाट चढत होता तेंव्हा नुकताच दिवस उगवत होता. त्याने एक छान जागा बघून गाडी थांबवली. गाडीतून थर्मास काढून त्याने मग मध्ये कॉफी भरून घेतली. गाडीच्या बॉनेटला टेकून उभा राहत त्याने खालच्या हिरव्यागार निसर्गावर नजर टाकली. कॉफीचा पहिला घोट घेताच त्याला अनुची आठवण झाली. काय सुगरण आहे ही, आतापर्यंत तिने जे जे काही खाऊ घातलय ते किती उत्कृष्ट होतं. तो मनाशी तिची अशी तारीफ करत असतानेच त्याच्या अवचेतन मनाने त्याला ढोसलले. 'अरे ती काही जितीजागति स्त्री नाही. एक अतृप्त आत्मा, पिशाच्च आहे ती. लौकिक अर्थाने म्हटलं तर एक चेटकीण. ती जे काही करतेय ते सगळे आभास आहेत, तुला या खऱ्या जगापासून तोडण्याचा तिचा प्रयत्न आहे' हे विचार त्याच्या मनात येताच तो मुळापासून हादरला. खरंच आपण हे जे काही करतोय ते योग्य आहे का? आपण चक्क एका अतृप्त आत्म्याच्या प्रेमात पडलोय.
कॉफी संपवून त्याने पुन्हा गाडीला स्टार्टर मारला आणि तो पुढे निघाला. डोक्यातले विचार मात्र चालूच होते. आज त्याला एकदम निवांत एकटेपण मिळाले होते. त्यामुळे त्याने पहिल्या दिवसापासून घडलेल्या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण आढावा घेतला. 'अनु' ही जिवंत स्त्री नसून ती एक पिशाच्च आहे याबद्दल तर आता काही शंका उरली नव्हतीच. पण तिने पिशाच्च म्हणून आपलं आतापर्यंत काहीही वाईट केलेले नव्हते. उलट सध्या ती आपली जेवढी काळजी घेतंय, बडदास्त ठेवतेय तेवढी लग्नाची बायको सुद्धा ठेवेल कि नाही ही शंकाच होती. शिवाय त्याला तोशिष काहीच नाही. भरतपूरला आल्यापासूनचा त्याचा सर्व पगार आहे तसा त्याच्या खात्यात शिल्लक पडला होता. त्यातून केवळ अल्ताफभाईंना त्याने या महिन्याचे भाडे दिले होते तेवढेच. अनुकडून एक शरीर सुख सोडले तर सुखी संसार म्हणून जे जे आवश्यक आहे ते सर्व त्याच्यापुढे हात जोडून उभे होते. पण तरीही हे काही योग्य नाही. एक मर्त्य मानव आणि पिशाच्च यांचे स्नेहसंबंध हे प्रकृतीच्या नियमाविरुद्ध आहेत. आपण आपल्या मनाला कुठेतरी आवर घातला पाहिजे. हे संबंध वेळीच थांबवले पाहिजे असे त्याला वाटू लागले.
गाडी जसजशी पुढे जात होती तसतसे त्याचे विचारही पळत होते. काहीवेळाने तो 'आपण हे जे काही करतोय ते चुकीचे आहे, आपण तिच्या मोहजालातून बाहेर यायला हवे' या निर्णयापर्यंत आला. सातारा पुणे हायवेवर जरा ट्राफिक वाढल्यावर त्याने मनातले विचार झटकून टाकत ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केले. विचारांच्या गोंधळात त्याला अनुने दिलेल्या डब्याचे आणि जेवायचेही भान राहिले नव्हते. तो दीड वाजण्याच्या सुमारासच पुण्यात अगदी आपल्या घरी पोहोचला. त्याच्या गाडीचा ओळखीचा आवाज ऐकून श्रीकांतचे आई-बाबा, निळकंठराव आणि लतिकाबाई दोघेही पोर्चमध्ये आले. श्रीकांतने बाबांना वाकून नमस्कार केला आणि आईला गाढ आलिंगन दिलं.
'आपलं लेकरू जवळ घेतलं कि आईला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं' डोळे पुसत लतिकाबाई म्हणाल्या
'लेकरू? अगं तीस वर्षाचा घोडा झालाय तो. वेळेत लग्न केलं असतं तर त्यालाही एखादं लेकरू झालं असतं' निळकंठराव चेष्टेने श्रीकांतच्या पाठीवर एक दणदणीत थाप टाकत म्हणाले.
'असू दे, माझं ते छोटं लेंकरूंच आहे' लतिकाबाई खोट्या रागाने म्हणाल्या. सगळेजण आत आले. श्रीकांत म्हणाला 'अगं आई, मला खूप भूक लागलीय, काहीतरी खायला कर पटकन' असे म्हणत तो बाथरुमकडे पळाला. लतिकाबाई आत गेल्या पण श्रीकांतचे बोलणे ऐकून राधा मावशींनी पोळ्यांचे पीठ मळायला घेतलेही होते. लगेच चटचट दोघींनी काम उरकत स्वयंपाक केला. मघाशी पोर्चमध्येच लावलेली गाडी जरा साईडला लावूया म्हणत श्रीकांतकडून चावी घेऊन निळकंठराव बाहेर आले आणि सँट्रो सुरु करून जरा पुढे नेऊन लावली. उतरताने त्याना शेजारच्या शीटवर ठेवलेला जेवणाचा डबा आणि थर्मास दिसला. ते घेऊन ते आत आले. तोपर्यँत श्रीकांत टेबलवर येऊन बसला होता आणि लतिकाबाई त्याला वाढतच होत्या. बाबांनी तो डबा अन थर्मास टेबलवर आणून ठेवला. ते बघताच श्रीकांत एकदम चपापला. आईने तो डबा उघडून पाहत साशंकतेने विचारले 'कोणी रे दिला तुला डबा?
'अगं आई, आमच्या बॅंकेलतील शिपाई आहे ना तोच रोज मला डबा आणून देतो. त्याचे घर माझ्या येण्याच्या रस्त्यावरच आहे. रस्त्यात खाता येईल म्हणून त्याने आजही डबा दिला' श्रीकांतने सारवासारव केली. पण हा तर म्हणतोय पहाटेच निघालोय. इतक्या सकाळी उठून कोण असं डबा करून देणार? आईच्या कपाळावरच्या आठ्यांचे गडद जाळे श्रीकांतला स्पष्ट दिसले. तो पटकन जेवण करून उठला आणि जरा आराम करतो म्हणून बेडरूम कडे निघाला. तसे त्याला थांबवत आई म्हणाली 'श्रीकांत, उद्या सकाळी कुठे बाहेर जाऊ नकोस. आणि जरा यावरून तयार राहा. माझी एक मैत्रीण तिच्या मुलीसह घरी येणार आहे' त्या कशाला येणार हे श्रीकांतला चटकन उमगले. त्याने वैतागून म्हटले 'आई, मी तुला सांगितले ना, मला एवढ्यात लग्न करायचे नाही म्हणून' त्याने बाबांकडे मदतीसाठी पाहिले. त्यांनी आश्वस्त पने मान हलवत त्याला जणू सांगितले 'मुलगी तर बघ, लग्न करायचे कि नाही ही नंतरची गोष्ट' असाह्ययपणे हात उडवत श्रीकांत आत गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी दाखवण्याचा औपचारिक कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. मात्र त्या दोघी निघून जाताच श्रीकांतने आईला स्पष्ट्पणे नाही म्हणून कळवायला सांगितले. खरेतर मुलगी त्याला अगदी साजेशी होती. सुंदर तर होतीच पण हुशारही होती. CA झालेली होती. पत्रिकेत असलेला 'कडक मंगळ' जायची वाट बघता बघता लग्नाला थोडा उशीर झाला होता एवढेच. श्रीकांतच्या मनावर जर अनुराधाचे गारुड पसरलेले नसते तर त्यानेही होकार देऊन टाकला असता. पण याक्षणी मात्र त्याला अनु सोडून कोणत्याही स्त्री बद्दल आकर्षण वाटत नव्हते.
श्रीकांत शरीराने पुण्यात होता खरा पण त्याचं मन मात्र भरतगावच्या बंगल्यातच रेंगाळत होते. येताने 'आपलं काहीतरी चुकतंय' या निष्कर्षावर आलेला श्रीकांत तिच्या विरहाने मात्र विरघळला होता. घडतंय ते चुकीचे आहे कि बरोबर याऐवजी 'जे काही आहे, जसं आहे तसं मला हवंय' या निर्णयाप्रत तो आला होता. त्याने कसाबसा रविवार तिथे काढला अन आईबाबांच्या आग्रहाला न जुमानता परवासारखाच पहाटे पहाटे पुन्हा भरतगावला जायला निघाला. त्याला निरोप देताने लतिकाबाईंचा कंठ अगदी दाटून आला होता.
श्रीकांत मध्ये फारसे कुठे न थांबता बंगल्यावर पोहोचला. दार उघडून आत येताच मोगऱ्याच्या वासाने त्याचे स्वागत केले. तसा त्याचा सहा-सात तासाच्या ड्रायव्हिंगचा कंटाळा कुठल्याकुठे उडून गेला. दिवस असल्याने ती दिसत नव्हती पण अदृश्य रूपात असलेल्या अनुचा आनंद तिच्या हालचालींच्या आवाजावरून कळत होता. तिने त्याच्यासाठी जेवण तयार करून ठेवले होते. जेवण करून झाल्यावर ते गप्पा मारत बसले. श्रीकांतने पुण्यात त्याला दाखवायला आणलेल्या मुलीबद्दल मुद्दामच काही सांगितले नाही. पण अनुच म्हणाली
'मग, कशी वाटली दिसायला सुप्रिया? चपापून त्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि क्षणभराने कपाळावर हात मारून घेत म्हणाला 'तुझ्यापासून काहीच लपून राहू शकत नाही ना? दोघेही मोठयाने हसले.
दुसऱ्या दिवसापासून त्यांचे नेहमीचे रुटीन सुरु झाले. जगापासून लपवून ठेवलेला त्यांचा हा आगळा वेगळा संसार अगदी सुखात चालला होता. जग त्यांच्या मध्यात पडत नव्हते आणि यांनाही जगाशी काही घेणंदेणं नव्हतं. श्रीकांत नियमितपणे बँकेत जात होता, घरी येत होता. रात्र झाली कि अनुही दृश्य स्वरूपात येत होती. तिचं जवळपास असणं त्याला खूप आनंद देत होतं. आजकाल त्याचं पिण्याचं प्रमाण जरा वाढलं होतं. एका पेगवरून तो तीन पेगपर्यंत जाऊ लागला होता. अनुच्या कृपेने बाटली कायम भारलेलीच असायची. अनुराधा त्याला थांबवायचा लटका आग्रह करायची पण पिल्यानंतरचा त्याचा आनंद, त्याच्या मनमोकळ्या गप्पा, त्याचं तिच्या प्रेमात आकंठ बुडून जाणं तिला आवडायचं. जागेपणी मात्र मध्येच त्याला कधीतरी चूक कि बरोबर हा प्रश्न पडायचाच. तिला त्याच्या मनातले सर्व विचार कळायचे. कधीतरी याला जर यातला धोका समजावून सांगणारा, याचे मन वळवणारा कोणी भेटला तर हा आपल्या हातून सुटू शकतो. त्याने जर या बंगल्यातून दुसरीकडे राहायला जायचे ठरवले तर आपण काहीच करू शकणार नाही. आणि तो गेलाच तर पुन्हा आपल्याला या बंगल्यात एकटीनेच वावरावे लागेल.
हा सर्व विचार करून श्रीकांत आपल्या ताब्यात कसा राहील याची अनु अगदी आवर्जून काळजी घ्यायची. रोज रात्री वेगवेगळे सुंदर ड्रेस घालून ती त्याला सामोरी यायची. आपण जास्तीत जास्त सुंदर कशा दिसू यासाठी शक्य ते सर्व करायची. पण हे सर्व करत असताने आपले कपडे किंवा दिसणे हे बिल्कुलही कामुक होणार नाही, शृगांरिक वाटणार नाही याचीही ती काळजी घ्यायची. चुकुन कधी याच्या मनात आपल्या बद्दल शारीरिक आकर्षण निर्माण झाले आणि श्रीकांतने आपल्याला स्पर्श केला तर सगळंच गणित बिघडून जाईल. म्हणून ती मुद्दाम त्याच्याशी जरा मायेने, ममत्वाने बोलायचा प्रयत्न करायची. कधीही आपल्या कुठल्या कृतीतून त्याच्या मनातील कामवासना जागृत होणार नाहीत याची ती काळजी घ्यायची. खरेतर हा मोह तिलाही कधीमधी पडायचा. श्रीकांतसारखा देखणा, सुदृढ तरुण जवळ असताने, आणि आपल्याला तो मनापासून आवडत असूनही आपल्या या अशरिरी कमतरतेमुळे आपण त्याला आपले सर्वस्व देऊ शकत नाही याची तिलाही खंत होती. श्रीकांतच्या मनातही आजकाल कधीतरी तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण व्हायची. ही खरोखरीची आपली पत्नी असती तर? अशा विचारांनी तो उद्युक्त व्हायचा. पण त्याच्यातला सुसंस्कृत माणूस मात्र त्याला वेळीच जाग्यावर आणत होता. आपण तिला स्पर्श केला तर ती कायमची आपल्याजवळून निसटून जाईल याची त्याला भीती वाटायची.
श्रीकांत आणि अनुराधा सर्वतोपरी काळजी घेऊन एकमेकांच्या मर्यादित सहवासात गुंगून गेले होते. पण एकेदिवशी अनर्थ घडलाच!
श्रीकांतच्या ब्रँचला हेडऑफिसची टीम ऑडिट साठी आली होती. लोकांपासून दूर राहायचं म्हणून श्रीकांत पूर्णवेळ स्वतःला कामात गुंतवून घेत होता. कामाशिवाय कोणाशी इतर काहीही बोलत नव्हता. साहजिकच साहेब काम करतात म्हटल्यावर इतर स्टाफ सुद्धा तत्परतेने काम करत होता. तेच सर्व आज फळाला आले होते. श्रीकांत या ब्रँचला आल्यापासून इथला कामाचा सुधारलेला दर्जा, अपटुडेट रेकॉर्ड आणि ग्राहक संख्येत झालेली वाढ ऑडिटर ग्रुपच्या निदर्शनास आली होती. त्यांनी श्रीकांतचे अगदी सर्वांसमोर कौतुक केले होते. या घडामोडीमुळे संध्याकाळी श्रीकांत जरासा उशिरा घरी आला तोच एकदम खुशीत होता. त्याच्या खुशीने अनुही खुशीत आली होती. नेहमीचे आवरणे झाल्यावर सोफयावर निवांत बसत श्रीकांतने आज जरा वेळेअगोदरच साइड् टेबलवरची 'ब्लेंडर्स' उचलली आणि एक छानसा पेग भरला. दिवस मावळला होता. त्यामुळे अनुही लगेच अवतीर्ण झाली आणि तिने तळलेल्या प्रॉन्सची डिश त्याच्यासमोर आणून ठेवली. ती पाहून श्रीकांत अजूनच खुश झाला.
'अनु, तुही बस ना अशी समोर. मला बघू तर दे डोळेभरून' श्रीकांतने रंगात येत तिला विनवले. तीही मग त्याच्या समोरच्या सोफयावर येऊन बसली. आज तिने साडी किंवा पंजाबी ड्रेस न घालता अत्यंत आकर्षक असा नाईट गाऊन घातलेला होता. त्या गाऊनमधे ती अतिशय सुंदर दिसत होती. त्याच्या डोळ्यात होणारे बदल पाहत तिने मुद्दामच ऑफिसचा विषय काढला. श्रीकांतचं भरकटू पाहणारं मन ताळ्यावर आलं. खुशीत येत त्याने आज ऑफिसमध्ये काय काय घडलं, ऑडिटर टीमने कसं त्याचं कौतुक केलं हे अगदी मनापासून सांगितलं. अर्थात अनुला हे सगळं आधीच माहित होतं पण तरीही त्याचा विरस न करता तिने त्याचे सांगणे ऐकून तर घेतलेच पण त्याला भरभरून प्रोत्साहनही दिलं. 'मग आहेच आमचे साहेब तेवढे हुषार' असे म्हणत ती उठली आणि स्वयंपाकघराकडे वळली. तिचा स्वयंपाक तयार होता पण श्रीकांतचा लगेच काही जेवणाचा मूड दिसत नव्हता. टीव्हीवर 'अनिल कपूर-श्रीदेवी' चा लम्हे हा सिनेमा लागला होता. तो पाहत श्रीकांत हळूहळू सिप मारत होता.
एव्हाना त्याचा तिसरा पेग संपला होता. तो जेवायला येत नाही म्हटल्यावर अनुही परत त्याच्यासमोर येऊन बसली. श्रीकांतने आता चवथा पेग भरून घेतला. त्याच्या अडखळत बोलण्यावरून साहेबांना आज जरा जास्तच चढलीय हे अनुने ओळखले. पण त्याला थांबवून त्याच्या आजच्या आनंदाचा विरस करावा असे तिला वाटत नव्हते. त्यांच्या गप्पा आज पुन्हा श्रीकांतच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीवर घसरल्या होत्या. त्यामुळे श्रीकांतच्या जुन्या जखमा पुन्हा खरवडल्या गेल्या होत्या. अन त्याच्या पिण्याचा वेग वाढला होता.
त्याने पाचवा पेग भरायला बाटलीकडे हात नेताच अनु मात्र चपळाईने उठली आणि तिने बाटली उचलून घेतली. पण हीच चपळाई तिला आणि त्यालाही भोवली. ती बाटली उचलतेय असे पाहून श्रीकांत तिच्या हातातून बाटली घेण्यासाठी घाईने उठला पण त्याने अगोदरच भरपूर पिल्यामुळे त्याचा पुढे तोल गेला. तो पडतोय असे पाहून अनु घाबरून गेली आणि सगळे विसरून तिने त्याला आधार देण्यासाठी आपल्या कवेत पकडले.
अजाणतेपणी दोघांचा एकमेकांना स्पर्श झाला. त्याच क्षणी अचानक घरातील लाईट बंद झाले. पावसाळ्याचे दिवस नसूनही काडकन आवाज करत वीज चमकून गेली. बाहेरच्या झाडांमध्ये अनैसर्गिक सळसळ झाली. कुठल्यातरी झाडावर बसलेली वटवाघळं ची ची आवाज करत उडाली आणि सैरावैरा बंगल्याभोवती फिरू लागली. दूर रस्त्याच्या बाजूला रेंगाळणारी दोन-तीन भटकी कुत्री भेसूर आवाज करत इवळू लागली. एकमेकांवर भुंकू लागली.
इकडे अनुने श्रीकांतला पकडले असले तरी तिच्या मिठीत फक्त श्रीकांतचे आभासी विरविरीत अस्तित्व होते. श्रीकांतचे मूळचे धडधाकट शरीर खाली फरशीवर पडले होते. त्याचा प्राण कधीच त्याला सोडून गेला होता. त्याचबरोबर अनुच्या सर्व शक्तीही तिला सोडून गेल्या होत्या. एकमेकांच्या मिठीत बद्ध असलेले अनु आणि श्रीकांत हेही हळूहळू हवेत विरून जात होते. त्यांचे आभासी अस्तित्व अक्राळ विक्राळ रूप धारण करत काहीवेळातच अनंतात विलीन होऊन गेले. आता त्या अंधाऱ्या बंगल्यात फक्त श्रीकांतचे मृत शरीर पडून होते. बाकी सर्व शांत झाले होते.
दुसरा दिवस उगवला पण 'अनुग्रह' बंगला मात्र शांतच होता. दोन-तीन दिवस झाले तरी साठे साहेब बँकेत आलेले नव्हते. सर्व स्टाफ आश्चर्य करत होता. साठेसाहेब कामाच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. त्यामुळे न सांगता असे तीन दिवस गैरहजर राहणे त्यांच्या स्वभावात बसत नव्हते. गोखल्यांना काही राहवले नाही. त्यांनी अल्ताफला फोन केला आणि साठे साहेबांबद्दल काही कल्पना आहे का ते विचारले. अल्ताफलाही काहीही माहित नव्हते. काहीतरी अघटित घडल्याचा विचार दोघांच्याही मनात एकदमच आला.
'गोखले साहेब, मी तिकडे येतोय दहा मिनिटात. तुम्ही कॉर्नरवर येऊन थांबा' असे म्हणत अल्ताफने फोन बंद केला. नवव्या मिनिटालाच अल्ताफची मारुती आल्टो चौकात उभ्या असलेल्या गोखल्यांच्या समोर येऊन उभी राहिली. दोघेही घाईनेच निघाले. मागे कधीतरी श्रीकांतच्या बोलण्यात 'कोकण- किनारा' हॉटेलचे मालक काणे मामांबद्दल उल्लेख आला होता. नरवीर तानाजी चौकात आल्यावर गाडी थांबवून ते मुद्दाम हॉटेलमध्ये गेले. हॉटेलचे मालक काणे मामा काउंटरवर बसलेले होतेच. काणेमामांना पण श्रीकांतबद्दल काही माहित नव्हते. जातायेता तो बऱ्याचदा त्यांना दिसायचा पण गेल्या तीन दिवसात काही दिसला नव्हता. त्यांनाही काहीतरी अभद्र शंका आली. त्यांनी मुलाला काउंटरवर बसायला सांगितले आणि तिघेही अल्ताफ़च्याच गाडीतून 'अनुग्रह' बंगल्याजवळ आले. बंगला एकदम शांत होता. कुठेही काहीही आवाज येत नव्हते. गेट उघडून ते आत आले. श्रीकांतची सँट्रो जागेवर उभी होती. पायऱ्या चढून जात अल्ताफने अगोदर बेल वाजवली, पण आत कुठे काहीच आवाज किंवा हालचाल दिसली नाही. मग त्याने दरवाजा ढकलून बघितला तो आतून बंद होता. त्यांनी बंगल्याला एक चक्कर मारून बघितली. मागचा दरवाजा आणि सर्व खिडक्या आतून बंद होत्या. पुन्हा व्हरांड्यात आल्यावर गोखलेंनी हॉलच्या खिडकीच्या काचेतून आत बघितले. अगोदर काहीच दिसले नाही पण त्यांनी बाजूने डोळ्याजवळ हात नेताच त्यांना आतमध्ये श्रीकांत पालथा पडलेला दिसला. गोखले घाबरून बाजूला झाले. त्याचे ते दचकणे अल्ताफ आणि काणे मामांच्या लक्षात आले. त्यांनाही काचेतून श्रीकांत फरशीवर पडलेला दिसला. पण मनात इतर काही शंका येण्याऐवजी काणे मामा म्हणाले 'अहो साठे साहेब आजारी असतील बहुतेक. बघायला कोणी नाही म्हणून मूर्च्छा येऊन पडले असतील'. मग तिघांनीही दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला. अचानक अल्ताफला आठवले या बंगल्याची एक डुप्लिकेट चावी आपण बनवून घेतलेली होती. ती गाडीतच आहे. त्याने पटकन जाऊन चावी आणली आणि दरवाजा उघडला. ते आत जाताच त्यांना जो तीव्र वास जाणवला त्यावरून श्रीकांत जिवंत नाही हे त्यांना लगेच कळून चुकले. गोखले पुढे होणार तेवढ्यात अनुभवी काणे मामांनी त्यांना हाताला धरून मागे ओढले.
'अल्ताफ, प्रकरण काहीतरी वेगळच दिसतंय. आपल्याला पोलिसांना बोलावले पाहिजे' अल्ताफलाही ते पटले. बंगल्यात काही फोन नव्हता पण काणेमामांच्या हॉटेलमध्ये मात्र होता. दरवाजा आहे तसा बंद करून घेत तिघेही परत कोकण-किनारा ला आले. काणेमामा आणि अल्ताफ तसे मुरलेले होते पण अख्ख आयुष्य बँकेत क्लार्क म्हणून काढलेल्या गोखल्यांना मात्र हे सर्व नवीन होते. त्यांना हुडहुडी भरली होती. उगाच या फंदात पडलो असे त्यांना झाले होते.
हॉटेल व्यवसायामुळे काणेमामांचे पोलीस खात्याशीही चांगले संबंध होते. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करताच तिकडून इन्स्पेक्टर काझी आणि त्यांची टीम निघाली. भरतपूर तालुक्याचे गाव असले तरी छोटे होते. त्यामुळे तिथे फार गुन्हेगारी घडत नसे. त्यातूनही एका चांगल्या बँकेतील मॅनेजरचा संशयास्पद मृत्य म्हटल्यावर वेळ न दवडता इन्स्पेक्टर काझी आपल्या टीमसोबत काणेमामांच्या हॉटेल जवळ आले. त्यांची गाडी येताने पाहताच हे तिघे अल्ताफच्या गाडीत बसले आणि रस्ता दाखवत पुढे निघाले. गोखले खरेतर यायला तयार नव्हते, मी घरी जातो म्हणत होते. पण काणेमामांनी त्यांना समजावून सांगितले.
'हे बघा गोखले साहेब, आम्ही दोघंही तसे लांबचे आहोत. साठे साहेब तुमचे शाखाधिकारी आहेत म्हंटल्यावर तुम्ही हजर राहणे गरजेचे आहे. अन दुसरं बघा, प्रेत पहिल्यांदा तुम्ही पाहिलेय' इन्स्पेक्टरने विचारले अन तुम्ही हजर नसला तर त्यांना उगाच संशय यायचा' ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली. धैर्य गोळा करत गोखले त्यांच्याबरोबर निघाले.
तो सगळा ताफा बंगल्याजवळ आला. अल्ताफने आपल्याजवळ असलेल्या डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि लगेच आपल्याकडे ही डुप्लिकेट चावी कशी आली याचे स्पष्टीकरणही देऊन टाकले. हो, नंतर उगाच संशय नको. इन्स्पेक्टर काझी आत आले. त्यांनी काणेमामा, अल्ताफ आणि गोखल्यांना बाहेरच थांबायला सांगितले होते. प्रेताची अवस्था पाहताच श्रीकांतला मरून दोन-तीन दिवस झालेत हे अनुभवी काझींनी ओळखले. सोबत आलेल्या डॉक्टरांना बॉडी चेक करायला सांगून काझींनी बंगल्याची पाहणी केली. कुठेही काही झटपट झाल्याचे चिन्ह दिसत नव्हते. चोरीचेही लक्षण नव्हते. तसे संशयास्पद काही नसले तरीही इतके नीटनेटके आवरलेले घर, डायनिंग टेबलवर पडलेली जेवणाची भांडी, त्यातील आता खराब झालेले असले तरी एवढे पदार्थ बघून त्यांना या बंगल्यात श्रीकांत व्यतिरिक्त कोणी स्त्री सुद्धा राहतेय हे स्पष्ट्पणे जाणवले. पण इथे एकच बॉडी आहे, मग इथली स्त्री कुठे गेली.
एव्हाना डॉक्टरांनी प्रेताची प्राथमिक तपासणी संपवली होती. इन्स्पेक्टर काझी जवळ आल्याचे पाहून डॉक्टर उठून उभे राहत म्हणाले.
'प्रथमदर्शनी तरी यांचा मृत्यू हृदय बंद पडल्याने झाला असे वाटतेय. पण त्यांच्या चेहऱ्यावर हार्ट अटॅक येताना ज्या वेदना जाणवतात त्या वेदनेची काहीही लक्षणे दिसत नाहीत. शिवाय एकंदरीत त्याची निरोगी शरीरयष्टी पाहता त्यांना हार्ट प्रॉब्लेम असेल असे वाटत नाही. पोस्टमार्टेम झाल्यानंतरच मी नक्की कारण सांगू शकेल.' डॉक्टरांच्या या माहितीनंतर काझींनी बाकीच्या टीमला पुढचे सगळे सोपस्कार करून बॉडी पोस्टमार्टेमला पाठवायला सांगितली. एका कॉन्स्टेबलने वायरलेस वरून ऍम्ब्युलन्स बोलावून घेतली. इतर काही चोकशी करायची म्हटले तर आजूबाजूला अक्षरश: कोणीही नव्हते. मग काझींनी या तिघांकडेच चौकशी केली. तिघेही श्रीकांतच्या काळजीपोटीच इथे आलेत हे त्यांना माहित होते. अल्ताफने या बंगल्याबद्दलचा सगळा इतिहास त्यांना सांगून टाकला. काणेमामा आणि गोखल्यांनी त्याला दुजोरा दिला. काझीही कोकणातलेच होते त्यामुळे त्यांचाही भुताखेतांवर विश्वास होताच. या बंगल्याबद्दल तेही ऐकून होतेच. त्यामुळे त्यांनी या कथेवर विश्वास ठेवला. परंतु या बंगल्याबद्दल सर्व माहित असूनही अल्ताफने ही जागा श्रीकांतला भाड्याने मिळवून दिली याबद्दल अल्ताफची चांगलीच खरडपट्टी काढली. तिथले सर्व उरकून बंगल्याला सील करून सगळे परत फिरले. अल्ताफला खरोखरच फार अपराधी वाटत होते. अल्प ओळख असली तरी श्रीकांतविषयी आपुलकी वाटलेल्या काणेमामांना सुद्धा खूप वाईट वाटत होते. गोखले अजून भेदरलेलेलच होते. त्यांचा काही संबंध नसतानेही त्यांना या पोल्स चौकशीचे दडपण आले होते. नवखा कोणी इन्स्पेक्टर असता तर त्याला गोखलेंचा चेहरा बघून संशय वाटला असता. पण इन्स्पेक्टर काझी चांगले मुरलेले होते. सरळमार्गी मध्यमवर्गीय माणसं पोलिसांना उगाचच घाबरतात हे त्यान्ना माहित होते. त्यामुळे त्यांनी गोखलेंना फार न छेडत वरवर जुजबी चौकशी केली.
दुसऱ्या दिवशी श्रीकांतचे आईबाबा पुण्यावरून आले. लतिकाबाईंचा आकांत पाहून सर्वांचीच मने हेलावून गेली. निळकंठराव मात्र धुराने परिस्थितीला तोंड देत होते. एव्हाना काझींनी पोस्टमार्टेम रिपोर्ट मिळवला होता. डॉक्टरांनी 'हृदय अचानक बंद पडून मृत्यू' असंच निदान केलं होतं. पण हृदय बंद पडण्याचे कारण मात्र त्यांना नक्की सापडले नव्हते. निळकंठराव आणि लतिकाबाईंनीही अगदी स्पष्ट सांगितले होते कि श्रीकांतला हृदय विकारच काय पण इतर कुठलाही आजार नाही. श्रीकांतचे थोडेफार होते ते साहित्य घेऊन दुःखी मनाने ते पुण्याला निघाले. श्रीकांतची डेड बॉडी अँब्युलन्सने पुण्याला पाठवायची व्यवस्था इन्स्पेक्टर काझींनीच केली होती. अकस्मात गूढ मृत्यू असा फाईलवर शेरा मारून इन्स्पेक्टर काझींनी फाईल गाडीच्या सीटवर टाकली आणि ड्रायव्हरला पोलीस स्टेशनकडे निघण्याची खून केली. भरतपुरात आता त्या बंगल्याविषयी गूढ अजूनच वाढले होते. पूर्वीही लोक त्याविषयी काहीबाही ऐकून होते पण आता या घटनेने लोकांनी या बंगल्याचेच काय या भागाचेच नाव टाकले.
या घटनेनंतर बरोबर तेरा दिवस उलटले. त्या संध्याकाळी बंगल्यातील लाईट अचानक लागले. मोगऱ्याचा वास घरभर दरवळू लागला आणि दोन धूसर प्रतिमा तिथे अवतीर्ण झाल्या.हळूहळू त्या दोनीही आकृती गडद होत होत दृश्य रूपात आल्या. त्यातील एक प्रतिमा स्त्री ची होती अर्थात अनुची आणि दुसरी प्रतिमा पुरुषाची म्हणजेच श्रीकांतची होती. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही आवेगाने एकमेकांच्या कुशीत सामावून गेले. आता या बंगल्यातून त्यांना कुठलीही शक्ती बाहेर घालवू शकणार नव्हती. जिवंतपणी नाही पण मेल्यानंतर मात्र श्रीकांत आणि अनुचे मिलन झाले होते...................
समाप्त!
(ता.क.: ही कथा पूर्णपणे काल्पनिक केवळ मनोरंजन याच हेतूने लिहिली आहे. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धाना खतपाणी घालण्याचा किंवा भूतप्रेताच्या अस्तित्वाबद्दल गैरसमज पसरवण्याचा हेतू नाही.)