भुतांचे स्वानुभव (Horror Experiences)
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

भुतांचे स्वानुभव (Horror Experiences) : ठेवलेली बाई

भुतांचे स्वानुभव. Real horror experiences in marathi that were sent to us by our readers.

भूत आणि प्रेम   अतींद्रिय अनुभव : ती कशी मेली?

मध्यप्रदेश मधील घटना आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनी साठी सरकारने जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु केली आणि नेहमी प्रमाणे शेतकरी, बिल्डर, राजकारणी ह्यांचा गोंधळ सुरु झाला. अश्यांत एका आमदाराच्या फार जवळच्या माणसाचा खून झाला. प्रकरण CBI कडे गेले आणि मी जुनिअर ऑफिसर म्हणून मध्यप्रदेशला गेले. महिला ऑफिसर म्हणून मला जास्त बाहेर जाऊन काम करावे लागत नसे. बहुतेक वेळी महिलाचे स्टेटमेंट घेणे, पोलिसांच्या सोबत बसून त्यांच्याकडून माहिती घेणे आणि रिपोर्ट्स लिहिणे असाच माझा दिनक्रम असायचा. केस इतकी किचकट होती कि जवळ जवळ ५०० लोकांचे स्टेटमेंट घेणे जरुरीचे होते. (नो किडींग).

तर एका फार मोठ्या राजकारणी माणसाचा मध्यंतरी मृत्यू झाला होता (मुख्य खुनाशी विशेष संबंध नव्हता) आणि ह्या माणसाने १२ वर्षे आधी एक फार मोठी शेतजमीन घेतली होती ती अधिग्रहण होत होती. सुमारे ४ कोटी रुपये सरकारकडून त्याच्या मुलांना मिळणार होते. अधिग्रहणाची सूचना सरकारने काढली आणि एक माणसाने ऑब्जेक्शन ठेवले. ह्याच्यामते हा त्या मेलेल्या माणसाचा मुलगा होता. कुणालाही त्या मृत राजकारण्यांच्या दुसऱ्या पत्नीची माहिती नव्हती. औरस संतानांनी ह्यावर फारच मोठा गोंधळ उडवला. गोळी वगैरे चालवली गेली आणि मला त्यांत लक्ष घालावे लागले. DNA टेस्ट वरून सिद्ध झाले कि खरोखरच तो अनौरस संतान होता. ज्या माणसाचा खून झाला होता त्याच्या फोनवरून ह्या अनौरस मुलाला २ महिना आधी दोन फोन गेले होते. म्हणून मी त्याला चौकशी साठी बोलावले.

ह्या मुलाला पूर्वीपासून ठाऊक होते कि तो अनौरस संतान आहे. त्याच्या आईने म्हणे त्या जमिनीच्या बदल्यांत राजकारण्यांशी संबंध ठेवले होते. आईने काही कागदोपत्रावर सही सुद्धा घेतली होती. पण ते कागद कोर्टांत टिकू शकणार नाहीत हे त्याला ठाऊक होते. ४ कोटीच्या जमिनीवर ऑब्जेक्शन आणून किमान ५० लाख तरी उठवता येतील असा त्याचा इरादा होता. त्याची आई स्वतः एका कुप्रसिद्ध ट्रेन दुर्घटनेत मृत झाली होती. मृत राजकारण्याने ह्याला सुमारे २ कोटी रुपये देऊन ठेवले होते आणि इंदोर मध्ये एक फ्लॅट. हा तिथेच राहायचा.

संपूर्ण कथानकांत मला संशयास्पद काही वाटले नाही पण त्या खून झालेल्या माणसाने ह्याला कॉल का केला होता हे त्याला सुद्धा ठीक आठवत नव्हते. खूप प्रयत्न करून सुद्धा दोघांचे लिंक काही मला सापडले नाही. ह्या माणसाचा फोटो मी फाईल मध्ये ठेवला होता फाईल आमच्या फोल्डर मध्ये ठेवली होती. सुमारे ७ दिवस निघून गेले. केस चा तपास माझ्या पुरता तरी संपला होता. पुन्हा दिल्लीला जायची तयारी करत होते.

मी एक दिवस सकाळी आले आणि कोफी मशीनवर कॉफी बनवली. आमच्या सुरक्षे साठी एक हवालदार आमच्या तात्पुरत्या ऑफिस मध्ये राहायचा. निवृत्तीचे दिवस जवळ असल्याने त्याच्या साठी ते काम चांगले होते. मी डेस्क वर बसल्यावर तो जवळ येऊन थोडा घुटमळला. आपल्या हिंदीत "थोडे बोलायचे होते" असे म्हणू लागला. त्याच्या चेहर्या वर थोडी घालमेल होती. अनेकदा स्थानिक पोलीस लोकांना खरी माहिती असते पण वरिष्ठांच्या दबावा मुळे ते आमच्या सारखया बाहेरील लोकां कडे स्पष्ट बोलत नाहीत. हवालदाराला काही तरी महत्वाचे बोलायचे असेल म्हणून मी बाहेर व्हरांडा वर जाऊन त्याच्याशी संवांद साधला.

"मॅडम, तुम्ही कदाचित विश्वास ठेवणार नाहीत पण ... " तो गडबडला.

"सांगा .. निसंकोच बोला. विश्वास नाही ठेवला तरी मी नाखुन कुणालाही सांगणार नाही ... " मी त्यांना विश्वास दिला.

"मी इकडेच एका गल्लीत राहतो. आमच्या बाजूला एक टेलर बाई राहायची. एकटीच होती. एक दिवस ती गायब झाली. काहीही पत्ता नाही. कोणीच नातेवाईक नसल्याने कुणी कंप्लेन सुद्धा नाही केली. मी आपल्या परीने चौकशी करायचा प्रयत्न केला पण काहीही माहिती मिळाली नाही. घरांत जाऊन पहिले तर बाई बॅग घेऊन कुठे तरी गेली असेच पुरावे होते." त्याने सांगितले. ह्या आधी सुद्धा शिंपी बाई एक दोन आठवडे अशीच परगावी निघून जायची पण ह्या वेळी अनेक वर्षे जाऊन सुद्धा तिचा पत्ता नव्हता. तिला सगळे लोक "अक्का" सारख्या जेनेरिक नावानेच हाक मारायचे त्यामुळे कुणाला तिचे पूर्ण कायदेशीर नाव ठाऊक नव्हते. हवालदाराने प्रयत्न करून तिचे पूर्ण कायदेशीर नाव इलेक्शन तोल प्रमाणे बिल्किस खान असे शोधून काढले होते पण त्या नावाने स्थानिक शाखांत बँक अकाउंट नव्हता, पॅन कार्ड नव्हते किंवा सेलफोन नव्हता.

"मग .. " तो नक्की काय सांगतो हे ऐकण्यासाठी माझी उत्सुकुता वाढली होती.

"मागील काही दिवसा पासून खूप विपरीत घडत आहे. तिच्या दुकानांमधून मला विचित्र आवाज ऐकू आले. मी जाऊन पहिले तर कुणीच नव्हते. स्वप्नांत मला हे हाफिस दिसू लागले आणि ती बाई ह्या हाफिस मध्ये आहे असे दिसू लागले." असे सांगून तो माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखू लागला.

चिंता होते तेंव्हा आपले मन आपल्या आठवणी मॅश करून त्याची स्वप्ने बनवते. मला स्वतःला अनेकदा तशी स्वप्ने पडली आहेत. त्यामुळे मी त्याची थट्टा उडवण्याचा प्रश्नच नव्हता. ह्या उलट सब-कॉन्सिअस मनातून कधी कधी आधी नजरेआड झालेल्या गोष्टी पुढे येतात.

"ती स्त्री हाफिस मध्ये नक्की कुठे दिसली ? " मी त्याला विचारले.

त्याने आंत जाऊन आधी माझ्या टेबल कडे इशारा केला आणि नंतर थोड्यदूर वर शेल्फ होते तिथे इशारा केला. ऑफिस मधील ईथर लोक गंधाळून पहा होते पण मी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले आणि त्या शेल्फ जवळ गेले. तिथे पोचताच हवलदारने सरळ एक फोल्डर काढला. त्याच्या बाहेर एक नंबर लिहिला होता. हवालदाराच्या मते हाच नंबर त्याला त्या शिंपी बाईच्या दुकानात टेबलवर लिहिलेला आढळला होता. हवालदाराने सिस्टम च्या बाहेर राहून ह्या मिसिंग बाईवर एक फाईल सुद्धा बनवली होती आणि शक्य असेल ती सर्व माहिती गोळा केली होती. मला थोडी दया आली. कधी कधी मिसिंग पर्सन शोधणे फार सोपे असते. जर माणूस मेळा नसून फक्त पळून गेला आहे तर सेलफोन रिकॉर्डस, बँक रेकॉर्ड्स इत्यादींवरून सहज त्या माणसाचा थांगपत्ता मिळू शकतो.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांत त्या बाईचा फोटो होता. तो पाहताच नक्की प्रकरण काय आहे ते मला समजले. हि बाई त्या अनौरस मुलाची आई म्हणजे त्या राजकारण्यांची ठेवलेली बाई होती. पण माझ्या सर्व पुराव्याप्रमाणे ती इंदोर मध्ये राहत होती. ह्या गावांत तिच्या विषयी कुणालाही काहीही माहिती नव्हती. मी तात्काळ त्या अनौरस मुलाला फोन केला त्याने सुद्धा आपली आई कधीही ह्या गावांत राहिली नाही आणि तिला शिंपी काम अजिबात येत नव्हते असे सांगितले.

मग मी दुसऱ्या अँगल ने विचार केला. जेंव्हा त्याच्या आईचा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला तेंव्हा त्याने तिच्या मृत शरीराची ओळख पटवली होती काय? तिचा देह फारच छिन्न विछिन्न झाला असला तरी चेहरा थोडा तरी पहिला होता. मी हवालदारासोबत शिंपीण बाईच्या घरांत गेले. तिचे कंगवे, आंतले कपडे इत्यादी गोळा केले. ह्या सर्वांची DNA चाचणी केली तेंव्हा समजले कि ह्या अनौरस मुलाची ती मावशी होती. म्हणजे ह्या दोन्ही जुळ्या बहिणी होत्या. मग रेल्वे अपघातांत नक्की कोण मारले गेले ? ठेवलेली बाई हिंदू होती आणि छाया होते.

मी त्या रेल्वे अपघाताची PNR लिस्ट मागवली. ह्या ठेवलेल्या बाई सोबत कोण प्रवास करत होते ह्याची माहिती काढायला. बिल्किस खान हे नाव नव्हते पण छाया सोबत शांती गोयल नावाची महिला प्रवास करत होती. अपघाताच्या रिकॉर्ड प्रमाणे हि महिला गंभीर जखमी झाली नव्हती आणि तिला डिस्चार्ज दिला गेला होता. मी तात्काळ शांती गोयल च्या नावाने इंदोर आणि स्थानिक गावांत तपास सुरु केला.

पुढील माहिती धक्कादायक नव्हती. कुठलाही विशेष कायदा मोडला गेला नसल्याने मी जास्त काही करू शकले नाही आणि स्थानिक पोलिसांना सुद्धा त्यांत विशेष रस नसल्याने हि माहिती प्रकाशित झाली नाही पण झाली असती तर अगदी चित्रपट बनवावा इतकी आश्चर्यकारक होती.

शांती आणि छाया दोन्ही जुळ्या बहिणी होत्या. दोघी पूर्णपणे Nymphomaniac प्रकारच्या होत्या (फार मोठी कामुक भूक). जो राजकारणी मेला त्याचे दोघां बरोबर संबंध होते. दोन्ही जुळ्या बहिणी एकाच बरोबर त्याला आवडायच्या. बिल्किस हे खोटे नाव घेऊन एक बहीण ह्या गावांत राहायची. जेंव्हा जेंव्हा राजकारण्याला गरज असायची तेंव्हा ती बॅग घेऊन सरळ बहिणीकडे जायची. बिल्किस कुठे राहते हे त्या राजकारण्याला सुद्धा ठाऊक नव्हते. राजकारणी शांतीच्या अकाउंट मध्ये पैसे टाकायचा. तर छायाला त्याने जमीन घेऊन द्यायचे वचन दिले होते.

बहुतेक पैसे शांतीच्या अकाउंट मध्ये जायचे. शांती आणि छाया दोघीजणी एकबरोबर सुट्टी घेऊन विविध ठिकाणी फिरून यायच्या. ज्या दिवशी अपघात झाला आणि शांती मृत पावली तेंव्हा छायाने ह्या गोष्टीचा फायदा घेतला. पैसे शांतीच्याच अकाऊंट मध्ये असल्याने ती मेली तर पैसे सुद्धा गायब झाले असते. ह्या शिवाय छायाला आपल्या मुलांत अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याला सुद्धा आता सोडून जायची संधी मिळत असल्याने तिने बहिणीचे नाव धारण करून पळ काढला होता.

ती दिल्ली मध्ये स्थायिक झाली होती. शांती गोयल च्या बँक ट्रांसकशन वरून तिचा पत्ता सहज मिळाला आणि थोडा पोलिसी हिसका दाखवताच तिने संपूर्ण कथा विशद केली.

हवालदाराला हे शांतीचे भूत दिसले का ? कि हवालदाराला काही माहिती होती आणि त्याने भुताचे ढोंग करून मला हि कथा सांगितली ? मला ठाऊक नाही पण ह्या केस मधील सत्य हे कुठल्याही भुताच्या कुठे पेक्षा रोचक होते. आमच्या ऑफिस मध्ये हि कथा एक लिजंड म्हणून मानली गेली होती.
. . .