स्वानुभव आधारित भुतांच्या कथा : मुस्लिम मुलगा आणि प्राचीन मंदिर
काही वाचकांनी आपले अनुभव आम्हाला पाठवले आहेत. आम्ही नावे,स्थळे इत्यादी बदलून त्याचे शब्दांत वर्णन केले आहे.
अनेक भुतांच्या कथा किंवा अतींद्रिय अनुभव वाचक आम्हाला इमेल वरून पाठवत आहेत ..... हा स्वानुभव मात्र खरोखर अद्वितीय आहे. नाव बदलून आणि वाचण्यास सुकर असे शब्दांकन आम्ही केले आहे.
वडिलांची बदली पोलीस निरीक्षक म्हणून एका ग्रामीण भागांत झाली. संपूर्ण पंचक्रोशीत आम्ही एकमेव मुस्लिम कुटूंब होतो. मी १३-१४ वर्षांचा असेंन पण संपूर्ण बालपण एका मुस्लिम कसब्यांतच गेले होते त्यामुळे हे नवीन वातावरण थोडे वेगळे होते. घरी कुणीच विशेष धार्मिक नव्हते तरीसुद्धा महिन्यातून एकदा आम्ही मशिदीत जायचो. आम्ही पूर्वी जिथे राहायचो तिथे धार्मिक तेढ निर्माण होते असे. कुणा हिंदूंची मोटारसायकल मुसलमानाच्या गाडीला कट मारून गेली किंवा कुठे एखादी गाय वाहनाला आदळली अश्या छोट्या छोट्या कारणावरून विनाकारण भांडणे व्हायची आणि माझे वडील पोलीस असल्याने त्यांनाच नेहमी मध्ये पडून ते तंटे सोडवावे लागत. कुठल्याही हिंदू धार्मिक परंपरांत, सणात आपल्याशिवाय जायचे नाही अशी वडिलांची सक्त ताकीद होती. कारण कुठे दंगा वगैरे झाला तर मी त्यात सापडू नये अशी त्यांची भीती होती. त्यामुळे मंदिर किंवा गणेशोत्सव वगैरे मी फार दुरूनच पहिला होता.
पण गावांत बदली झाली आणि सगळे विश्वच बदलले. गावाची एकूण लोकसंख्या जास्त नव्हती पण सुमे १२ किमी वर एक आर्मी बेस होती. त्यामुळे गावांतील लोकांना रोजगार होता. आणि त्यासाठीच एक चांगले पोलीस ठाणे गावांत होते. काम किंवा गुन्हे जवळजवळ शून्य. वडिलांच्या हाताखाली गावातीलच एक एक तरुण आणि एक महिला पोलीस होती.
गावांतील सर्व मंडळींनी आमचे अतिशय प्रेमाने स्वागत केले. आधीच्या अनुभवाप्रमाणे धार्मिक तेढ वगैरे गोष्टी इथे हास्यास्पद वाटत होत्या. वडिलांना सुद्धा गांव आवडला. गावांतील शाळा छोटी असली तरी चांगली होती. सर्व मित्र हिंदू होते. गावांत मांस वगैरे मिळत नसे पण एका तलावातून मच्ची मात्र चांगली मिळत असे. बहुतेक मित्र धार्मिक होते. शाळेत सरस्वती वंदना इत्यादी गोष्टी होत होत्या. माझे हिंदू धर्माविषयी ज्ञान tv वरील धार्मिक कार्यक्रमापुरते मर्यादित होते त्यामुळे माज्यासाठी अनेक गोष्टी नव्याच होत्या. शाळेच्या बाजूला एक मंदिर होते, खरे तर ते म्हणे मंदिर नव्हतेच, गावाचा खरा देव म्हणे मागील टेकडीवर होता पण तिथे पाण्याची काहीही व्यवस्था नसल्याने लोकांनी गावांत एक देऊळ बांधले होते आणि कधी कधीच लोक टेकडीवर जात. मी मंदिराला बाहेरूनच पहिले होते. मला आंत जाऊन देऊळ कसे असते हे पाहायची खूप इच्छा होती पण कदाचित कुणी काही म्हणेल वगैरे असे समजून मी आंत गेलो नाही.
सर्व काही चांगले वाटत असले तरी एक गोष्ट मात्र मला सतावू लागली. ती म्हणजे एक अतिशय भयानक स्वप्न. दररोज न चुकता त्या भयानक दृश्याने मी उठायचो. काळ्या रंगाच्या पायऱ्या आधी स्वप्नात दिसायच्या. अतिशय काळ्याभोर पाषाणी पायऱ्या. आधी फक्त पायऱ्या दिसून मी उठायचो. अम्मीने दोन तीन वेळा मला अपरात्री उठून पाणी पिताना पहिले आणि चौकशी केली पण मी काही सांगितले नाही. नंतर त्या पायऱ्या ओल्या आहेत असे दिसू लागले. काही आठवड्यानंतर त्या पायऱ्या रक्ताने ओल्या झाला आहेत असे दिसू लागले. ते रक्त वेगळेच होते. चॉकलेट च्या जाहिरातीत ते रेशमी चॉकलेट ओतताना दाखवतात ना तसे. त्यात बीभत्सता नव्हती.
स्वप्नांत मी पायर्यांच्या वर काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. पायऱ्या वर जातात आणि तिथे काही तरी आहे हे दिसत होते. एक मानवी आकृती किंवा जनावर असे काही तरी. पण स्पष्ट काहीही दिसत नव्हते. शेवटी मला ती अक्राळ विक्राळ आकृती दिसली. आयुष्यांत मी पुन्हा कधीही इतका घाबरलो नसेन इतका मी घाबरून उठलो आणि अक्षरशः किंचाळू लागलो. वडील तर आपले सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊनच माझ्या खोलीत आले.
मी मला पडणारी स्वप्ने वडिलांना सांगितली. ते सुद्धा चिंतीत झाले. माझ्या अम्मीच्या मते तर घरांत कुणी तरी जीन्न्न होता आणि त्याचाच मला त्रास होत असावा. माझी झोपण्याची खोली बदलण्यात आली. जिन्न सुद्धा नमाज पढतात आणि त्यांच्या जागेवर दुसर्यांनी कुणी कब्जा केल्यास त्यांना ते आवडत नाही. मला ते विचित्रच वाटायचे. ह्या गावांत कुणीही मुस्लिम नाही तिथे जिन्न कसा येऊ शकतो ?
दुसऱ्या दिवशी मला झोपायला सुद्धा भीती वाटत होती. संपूर्ण रात्रभर मी तळमळत जागा राहिलो. अम्मीच्याने हे पाहवेना, तिने सरळ सांगून टाकले कि तावीज घेण्यासाठी ती आपल्या माहेरी जात आहे आणि माझी जबाबदारी वडिलांवर आहे. त्यादिवशी वडिलांनी मला आपल्या सोबत झोपण्यास सांगितले. आम्ही झोपायला जाणार इतक्यांत दारावर थाप पडली. वडील उठून बाहेर गेले तर हवालदार होता. त्याने वडिलांना काहीतरी सांगितले आणि वडिलांचं चेहऱ्यावर आठ्या पडल्या.
ते माझ्याजवळ आले. तू एकटा घरी राहशील का ? त्यांनी विचारले. मी नाकारात्मक मुंडी हलवली. मग बरोबर येतोस का ? थोडे काम आहे. त्यांनी म्हटले. वडिलांसाठी काम म्हणजे इमान होते. मी उठून त्यांच्या बरोबर आलो. त्यांनी पटकन गणवेश चढवला आणि मोटारसायकल वर मला बसवून आम्ही एका व्यक्तीच्या घरी गेलो. कौलारू छोटे घर त्याच्या बाहेर तुळस आणि महेर वर्हांड्यावर चिंताग्रस्त चेहऱ्याने बसलेले दोन बुजुर्ग असा सिन होता. वडिलांनी नमस्कार केला आणि त्यांनी आम्हाला बसायला खुर्ची दिली.
सदर व्यक्ती म्हणजे गांवातील मंदिराचे पुरोहित होते. त्यांचा तरुण मुलगा २ दिवस पासून बेपत्ता होता आणि त्यांच्यासाठी हे पूर्णपणे अनपेक्षित होते. त्यांचा मुलगा त्यांच्याप्रमाणेच मंदिरात जाऊन पूजा करून घरी यायचा. गांवातील सर्व लोक त्यांना ओळखत आणि कुणाशीही शत्रुत्व नव्हते. आम्ही सगळे वऱ्हांडायवरच बसून बोलत होती इतक्यांत घरातील एका वयस्कर महिलेने आम्हाला आंत येऊन गूळ पाणी घ्यायची विनंती केली. वडिलांनी आपले बूट काढले आणि मी त्यांच्यामागे निमूट आंत जाऊन बसलो.
बसून मी पुढे पाहताच माझे अवसान गळाले. मी घाबरलो आणि चेहरा अचानक पांढराफटक पढला. अरे काय झाले ? त्या वयस्कर महिलेने मला विचारले. माझा चेहरा पाहून वडील सुद्धा घाबरले. "तब्येत बरी आहे ना ?" त्यांनी विचारले. मी बोट उचलून भिंती कडे इशारा केला. भिंतीवर पुढे एक भला मोठा फोटो लावला होता. त्यांत मी स्वप्नात पाहिलेली अक्राळ विक्राळ आकृती होती. त्या फोटोकडे पाहून सुद्धा माझे हृदय वेगाने दौडत होते. एका दगडी सिंहासनावर बसलेला अर्धा माणूस आणि अर्धा सिंह आणि त्याच्या मांडीवर असलेले ते प्रेत. कुणालाही खरे वाटणार नाही पण त्या दिवसापर्यंत "नरसिंह" ह्या हिंदू देवतांविषयी मला माहिती शून्य होती. त्याचे चित्र सुद्धा माझ्या लक्षांत कधी गेले नव्हते. पण मी शपथ घेऊन सांगू शकतो कि मी स्वप्नात किंवा त्या दिवशी भिंतीवर पाहिलेल्या चित्रांत मी "चित्र" नाही तर एक प्रत्यक्ष दृश्य पहिले होते. एक खरे अक्राळ विक्राळ स्वरूप, ओढून काढलेली खरी आतडी आणि रक्ताने माखलेले ते शरीर.
माझ्या वडिलांनी सगळी कथा त्या पंडितना सांगितली. त्यांनी सुद्धा रस घेऊन मला अनेक प्रश्न केले. त्यांच्या मते माझ्या स्वप्नात दिसलेल्या पायऱ्या अगदी टेकडीवरच्या पायऱ्यासारखया होत्या. त्यांच्या मते हा योगायोग नसून काही तरी विधिलिखित होते. आपण तात्काळ टेकडीवर जायला पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला वडिलांनी सुद्धा नाईलाजाने त्याला होकार दिला. ते मला मागे राहा म्हणत होते पण मी एकटा राहू इच्छित नव्हतो.
बराच वेळ जंगलातून पायवाटेने आम्ही चालत राहिलो. गांवातील किमान १०-१५ लोक पंडितजिची मदत करण्यासाठी बरोबर आले. एक माणूस २-३ दिवस नाही म्हणजे त्याचे मृत शरीराचं हाती मिळते अशी वडिलांची धारणा होती आणि ते दृश्य आधीच भेदरलेल्या आपल्या मुलाने पाहू नये अशी त्यांची मनोकामना होती पण लोकांचा हुरूप पाहून ते काही बोलले नाही. हवालदाराला त्यांनी माझा सोबत राहायला सांगितले. ते काही माणसे घेऊन पुढे चालत राहिले.
काही वेळाने आम्ही मंदिराजवळ पोचलो. एका कड्याच्या दगडांत कोरलेले ते जुनाट मंदिर होते. त्याच्या पायऱ्या स्वप्नात पाहिलेल्या पायऱ्याप्रमाणेच होत्या. तिथे रक्त नव्हते पण दवबिंदूंनी पायऱ्या थोड्याश्या ओल्या वाटत होत्या. मी भीत भीत वर चढलो. वर मूर्तीच्या समोर मी उभा राहिलो. पुन्हा ते दृश्य पाहावे लागेल म्हणून मी घाबरलो होतो पण प्रत्यक्षांत तसे काहीही घडले नाही. पाषांडाची ती कोरीव मूर्ती इतर मूर्तीप्रमाणेच निर्जीव आणि कलात्मक वाटत होती. माझ्या मनातील भीती सुद्धा गायब झाली होती.
कुणीतरी मोठ्याने आवाज दिला आणि लोक धावत मंदिरायचा मागे गेले. पंडितजींचा मुलगा तिथे पडलेला होता. हवालदाराने माझा हात पकडून मला पुढे जाण्यापासून रोखले. "जिवंत आहे" अशी हाक दुसर्याने कुणीतरी दिली आणि सर्व मंडळीत हर्षोल्लास निर्माण झाला.
पंडितजींचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता म्हणे. कुणीतरी अनोळखी मनुष्याने आपण पत्रकार आहोत आपणाला मंदिर पाहायचे असे असे सांगून ह्याला इथे आणले होते. प्रत्यक्षांत मूर्ती चोरायला मदत केल्यास आपण पैसे देऊ अशी ऑफर त्याला केली. त्याने ती नाकारताच त्याच्यावर हल्ला केला. डोक्यावर दगड मारून तो मेला असावा शी त्या चोराची समजूत झाली असावी. मूर्ती फार मोठी होती आणि त्यामुळे ती चोराने चोराला शक्य झाले नव्हते. अर्थांत पंडितजींच्या मुलाला होश येऊन हे सर्व सांगण्यास अनेक दिवस लागले.
आता ह्या घटनेला दशके उलटून गेली. मी नंतर विदेशांत जाऊन भारतीय आणि जगातील जुनी मंदिरे ह्यावर शोध प्रबंध केला. विदेशांत असलो तरी जेंव्हा जेंव्हा मी भरतीतील जातीयवादी तेढ्याच्या घटना वाचतो तेंव्हा मला आश्चर्य वाटते कि एक फार जुनी संस्कृती असणाऱ्या आपल्या देशांत खरेतर आम्हाला एकत्र बांधून ठेवणारे अनेक धागे आहेत. हे धागे घट्ट पकडून ठेवण्याची गरज आहे.