एस्केप फ्रॉम डाऊन अंडर
स्पार्टाकस Updated: 15 April 2021 07:30 IST

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर : प्रकरण ४

escape from down under

प्रकरण ३   प्रकरण ५

वादळानंतर दोन दिवसांनी टँग फार्मोसा सामुद्रधुनीच्या मार्गावर होती. अचानकपणे दूर क्षितीजावर आकाशात घिरट्या घालणारी एक आकृती दिसली. ओ'केनने सर्वांना खाली येण्याची आज्ञा दिली. अवघ्या मिनीटभरात टँग पाण्याखाली गेली होती. कदाचीत तो एखादा पक्षीही असण्याची शक्यता होती, परंतु फार्मोसा सामुद्रधुनीच्या जवळ कोणताही धोका पत्करण्याची ओ'केनची तयारी नव्हती.

दहा ऑक्टोबरच्या दुपारी एकच्या सुमाराला टँगवरील टेहळ्यांपैकी एकाने जमीन दिसत असल्याची सूचना दिली ! पाणबुडीच्या उजव्या बाजूला दूर अंतरावर योनाकुनी शिमा शिखर दृष्टीस पडत होतं ! रात्र पडण्यापूर्वी फार्मोसा सामुद्रधुनी गाठण्याच्या उद्देशाने ओ'केनने चारही इंजीनांवर पाणबुडी पुढे नेण्याची सूचना केली.

अकरा ऑक्टोबरच्या पहाटे चारच्या सुमाराला ओ'केन आपल्या बेडवर पडला असतानाच ड्यूटीवरील चीफ ऑफीसरचा त्याला निरोप आला. एका जपानी बोटीचा त्याला सुगावा लागला होता.

ओ'केनने कंट्रोलरुम गाठली.

" रेंज १७०००, आपल्याच दिशेने !" जॉन फॉस्टर, टॉर्पेडोमन मेट.

ओ'केनने सकाळ उजाडेपर्यंत वाट पाहीली. उजाडताच ती बोट म्हणजे एक आधुनीक डिझेल फ्राईटर असल्याचं ओ'केनच्या ध्यानात आलं. बिल लेबोल्डच्या सहाय्याने ओ'केन ब्रिजवर पोहोचला. दुर्बीणीतून काही वेळ निरीक्षण केल्यावर ओ'केनने निर्णय घेतला.

" क्लीअर द ब्रीज !"

मिनीटभरातच टँग पाण्याखाली होती.

"डाईव्ह ! डाईव्ह ! बॅटल स्टेशन्स !"

प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेल्या जागी पोहोचला.

पाण्याखाली सुमारे पंचेचाळीस फूट अंतरावर टँग स्थिरावली. टँगच्या रडारचा अँटेना अद्यापही पाण्याच्या वरच होता. रेडीओ रुममध्ये फॉईड कॅव्हर्ली हेडफोन लावून येणारे आवाज टिपत होता. आवाजावरून ती फ्राईटर असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं.

ओ'केनच्या आदेशानुसार फ्रँक स्प्रिंगरने एका विशीष्ट वेगात पाणबुडी आपल्या लक्ष्याकडे नेण्यास सुरवात केली. पेरीस्कोपमधून पाहील्यावर ओ'केनला ती फ्राईटर बंदराच्या दिशेने निघाल्यांचं दिसत होतं.

" मेक रेडी टू फिश ! फॉरवर्ड वन, टू, थ्री. अ‍ॅफ्ट सेव्हन, एट, नाईन !"

पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये पीट नॅरोवन्स्की आणि हेस ट्रकने टॉर्पेडो सोडण्याची तयारी केली.

" ओपन आऊटर डोअर्स !"

नॅरोवन्स्की तयारीत होता. कोनींग टॉवरमध्ये असलेल्या ऑटोमॅटीक फायरींग सिस्टीममध्ये काही बिघाड झालाच तर टॉर्पेडोवर असलेल्या फायरिंग पिनच्या सहाय्याने त्याला तो सोडता येणार होता.

ओ'केन पेरीस्कोपमधून एकाग्रतेने त्या बोटीचं निरीक्षण करत होता. आपला काळ इतक्या जवळ येऊन ठेपल्याची बोटीवरील लोकांना थोडीसुध्दा कल्पना नसावी !

ओ'केनच्या शेजारीच लेफ्टनंट मेल एनॉस टॉर्पेडोचं दिशादिग्दर्शन करण्या-या कॉम्प्यूटरला आवश्यक ती माहीती पुरवत होता.

" स्टँड बाय फॉर कॉन्स्टंट बेअरींग ! अप स्कोप !" ओ'केनने आज्ञा दिली.
" कॉन्स्टंट बेअरींग. मार्क !"
" सेट !"
" फायर !" ओ'केन

स्प्रिंगरने टॉर्पेडो सोडणारा खटका दाबला !

दाबाखालील हवा मोकळी झाली. हिस्स् SS असा आवाज करत दोन टॉर्पेडो सुटले.

सोनारवर टॉर्पेडोचा मार्ग उमटत होता. सव्वीस नॉटच्या वेगाने टॉर्पेडो आपल्या लक्ष्याच्या दिशेने झेपावत होते. सत्तेचाळीस सेकंदात ते बोटीवर आपटले असते.

" .. ४५, ४४, ४३.....१९..१८..१७..."

दोन्ही टॉर्पेडो अचूक निशाण्यावर पोहोचले होते ! १६५८ टन वजनाची जोशो मारु या फ्राईटरवर दोन जोरदार स्फोट झाले. ओ'केनने पेरीस्कोपमधून नजर टाकली. पाठीमागच्या बाजूने बोट बुडण्यास सुरवात झाली. धुराचा पडदा दूर झाल्यावर ओ'केनला पाण्याखाली गडप होणारा बोटीचा पुढचा भाग फक्त दृष्टीस पडला.

ओ'केनने पाणबुडी वर घेण्याचा हुकूम सोडला. ब्रिजवर येऊन दुर्बीणीच्या सहाय्याने त्यांनी बोट बुडालेल्या जागी नजर टाकली. बोटीवरील एकही माणूस वाचल्याची खूण दिसत नव्हती.

जपानी नौदलाच्या अधिका-यांची जोशो मारुचा अपघात पाणसुरूंगामुळे झाल्याची समजूत झाली होती !फार्मोसा सामुद्रधुनीत एखादी पाणबुडी येऊ शकेल यावर त्यांचा अद्याप विश्वास नव्हता. जपान्यांचा हा निष्कर्ष ओ'केनच्या पथ्यावर पडणारा होता. टँगला बेमालूमपणे आपले 'उद्योग' सुरु ठेवता येणार होते !

दुपारी बाराच्या सुमाराला आणखीन एक जहाज दृष्टीपथात आलं !

ओ'केनने दिवसा हल्ला करण्याऐवजी रात्री हालचाल करण्याचा निर्णय घेतला. सुमारे ऐशी फूट खोलीवरुन सात नॉटच्या वेगाने टँगने सत्तावीस मैल त्या जहाजाचा पाठलाग सुरू ठेवला होता. अंधार पडताच बोटीपासून सुमारे चार हजार यार्डांवर टँगने समुद्रपातळी गाठली.

" त्याच्या दिशेने चल !" ओ'केनने हँक फ्लॅगननला सूचना दिली.

रात्री नऊच्या सुमाराला टँग त्या जहाजापासून साडेचारशे यार्डांवर टॉर्पेडो सोडण्याच्या योग्य स्थितीत पोहोचली.

" फायर !"

एकच टॉर्पेडो सरसर पाणी कापत निघाला. जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या दृष्टीने इंजीनरुमच्या दिशेने तो सोडण्यात आला होता.

काही क्षणांतच ७११ टन वजनाच्या ऑईता मारू या फ्राईटरच्या बॉयलरचा प्रचंड स्फोट झाला ! पाण्यावर आगीचा स्तंभच जणू उभा राहीला ! कोनींग टॉवरमधून ब्रिजवर पोहोचलेल्या पहिल्या चार-पाच जणांनाच पाण्याखाली जाणारी ऑईता मारू ओझरती दिसली होती !

अचानक विमानवेधी तोफांचा मारा सुरु झाला. अर्थात त्यांचे गोळे पाणबुडीपर्यंत पोहोचत नव्हतेच ! मुळात पाणबुडीच्या दिशेने ते गोळे झाडण्यात आलेच नव्हते ! जपान्यांना अद्यापही टँगचा पत्ता लागला नव्हता ! चीनमधून आलेल्या अमेरीकन विमानांनी ऑईता मारूवर हल्ला केला असावा अशीच त्यांची समजूत होती. जपान्यांची तशी समजूत असणं अर्थातच ओ'केनच्या पथ्यावर पडणार होतं !

त्या रात्री जपानी गस्तीपथकाच्या बोटी प्रथम दिसल्या ! काही तासांच्या अंतराने दोन बोटी बुडण्यामागे काहीतरी काळंबेरं असावं अशी नक्कीच जपान्यांना शंका आली असावी. ओ'केनने सावधपणे पाणबुडी खोल समुद्राकडे वळवली. सुरक्षीत जागी पोहोचल्यावर सर्वांना विश्रांती घेण्याची त्याने सूचना केली.

त्या रात्री रडारवर आणखीन एका जहाजाची सूचना मिळाली ! ब्रिजवर जाऊन ओ'केनने निरीक्षण केलं असता रेड क्रॉसचं मोठं निशाण असणारी ती एक हॉस्पीटल शिप असल्याचं त्याला आढळलं !

" मी त्याच्यावर हल्ला करणार नाही !"
" कदाचीत हॉस्पीटल शिपच्या आड जपानी सैनीकही असतील !" बिल बेलींजर उद्गारला पण ओ'केन बधला नाही.

ओ'केनच्या या ठाम नकारामागे एक महत्वाचं कारण होतं. तो वाहूवर असताना तिस-या मोहीमेत वाहूवर वेवाक या जपानी तळावर टेहळणीसाठी म्हणून जाताना मश मॉर्टन आणि ओ'केनला एक डिस्ट्रॉयर दिसली. एकापाठोपाठ एक पाच टॉर्पेडो फुकट गेल्यावरही मॉर्टनने सहाव्या टॉर्पेडोच्या सहाय्याने ती डिस्ट्रॉयर उडवली होती.

. . .