एस्केप फ्रॉम डाऊन अंडर : प्रकरण ३
escape from down under
६ ऑक्टोबरला हवामान पूर्णपणे बिघडलं. बदलत्या हवामानाचा सर्वात प्रथम त्रास जाणवला तो फॉईड कॅव्हर्लीला.
" कॅव्हर्लीचं पोट बिघडलं की हमखास वादळ येत असे !" ओ'केन म्हणतो, " एखाद्या बॅरोमीटर इतकं त्याच्या पोटाचं रिडींग अचूक होतं !"
ओ'केनने वादळाला तोंड देण्याच्या दृष्टीने टँगची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या इंजिन रुममध्ये त्याने पाहणीला सुरवात केली. फ्रँक स्प्रिंगरच्या सूचनेवरुन सर्व नवोदीत अधीकारी तिथे जमा झालेले होते. ओ'केनच्या पाहणीतून त्यांना योग्य तो अनुभव मिळावा असा स्प्रिंगरचा हेतू होता. या अधिका-यांत हँक फ्लॅगनन, एड ब्यूमाँट, मेल एनॉस, डिक क्रॉथ, जॉन ह्यूबेक, पॉल वाईन्स आणि बेसील पिअर्सचा समावेश होता.
ओ'केनने दोन पावलं पुढे टाकली आणि तो थेट खाली इंजीन रुममधे कोसळला ! कोणीतरी इंजीनरुमची हॅच बंद करायला विसरलं होतं ! ओ'केनचा डावा पाय नेमका एका लोखंडी शिडीवर आपटला होता. इतरांच्या सहाय्याने ओ'केन वर आला. पाणबुडीवरील फार्मसीस्ट असलेल्या पॉल लार्सनने त्याच्या पायाची तपासणी केली.
" तुमच्या पायातील काही हाडं मोडली आहेत कॅप्टन !" लार्सनने ओ'केनला सांगीतलं, " मी ती पुन्हा मूळ जागी सेट केली आहेत. परंतु काही दिवस तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल,"
लार्सनने ओ'केनला पेनकिलरच इंजेक्शन दिलं. आपल्या बंक बेडमध्ये पडल्यावर ओ'केनने स्वतःलाच मनसोक्त शिव्या घातल्या. फ्रँक स्प्रिंगरने पाणबुडीची जबाबदारी घेतली. बेडवर पडल्या-पडल्या ओ'केन त्याला इंटरकॉमवरुन सूचना देत होता.
वादळाचा जोर पुन्हा वाढत होता. अद्यापही पाणबुडी पाण्याच्या पातळीवरुनच चालली होती. लाटांच्या मा-याने बाहेर असलेले टेहळे ओलेचिंब झाले होते. ओ'केनने त्यांना पाणबुडीत परतण्याची सूचना दिली. सिनीअर वॉच ऑफीसर लॅरी सॅव्ह्डकीनचा अपवाद वगळता आता पाणबुडीच्या ब्रिजवर कोणीही नव्हतं. सुमारे दहा-बारा फूट उंचीच्या लाटांच्या मा-यात स्वतःचा तोल सावरत ब्रिजवर उभं राहताना सॅव्ह्डकीनला तारेवरची कसरत करावी लागत होती.
वादळाचा जोर आणखीनच वाढला ! ओ'केनने सॅव्ह्डकीनलाही आत बोलावून घेतलं. ब्रीजपासून कोनींग टॉवरकडे जाणारी हॅच घट्ट बंद करण्यात आली.
" पाणबुडीवर आदळणा-या लाटांचा बॅलास्ट टँक्समधून येणारा आवाज भीतीदायक होता ! पण त्यापेक्षाही झंझावाती वा-याचा आवाज निव्वळ थरकाप उडवणारा होता !"
अचानकपणे टँग पूर्णपणे उलटीपालटी झाली !
आपल्या बेडमध्ये असलेला ओ'केन बाहेर फेकला गेला होता. वादळातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला कंट्रोल रुम गाठणं अत्यावश्यक असल्याचं त्याच्या ध्यानात आलं. लार्सनने त्याला आणखीन एक पेन किलरचं इंजेक्शन दिलं. लार्सन आणि स्प्रिंगरच्या आधाराने ओ'केन कंट्रोल रुमच्या दिशेने निघाला.
कंट्रोलरुममध्ये पोहोचलेला ओ'केन जेमतेम उभा राहतो तोच टँगला पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला. यावेळी ओ'केन हवेचा दाब दर्शवणा-या नळकांड्यापासून एक फूट अंतरावर फेकला गेला ! पाणबुडी ६० अंशाच्या कोनात तिरकी झाली होती !
फ्रँक स्प्रिंगरचा तोल जाऊन तो एका इलेक्ट्रीक स्विचबोर्डवर आदळला होता. ११० व्होल्टचा झटका बसताच तो क्षणार्धात तिथून दूर झाला !
सुदैवाने पाणबुडी पुन्हा सरळ झाली !
स्प्रिंगरने एव्हाना कोनींग टॉवरमध्ये जाणारी शिडी गाठली होती. त्याच्यापाठोपाठ ओ'केनन कोनींग टॉवरमधे पोहोचला. चीफ क्वार्टरमास्टर सिडनी जोन्सने पेरीस्कोप पूर्ण वर केला. पाण्याच्या पातळीवर सुमारे पंचावन्न फूट !
ओ'केनने पेरीस्कोपमधून बाहेर नजर टाकली आणि दिसणारं दृष्यं पाहून त्याचे डोळे पांढरे झाले ! सुमारे ६० फूट उंचीची एक प्रचंड लाट पाणबुडीच्या रोखाने येत होती ! हादरलेल्या ओ'केनने पेरीस्कोप खाली घेण्याची आज्ञा दिली. वादळात पेरीस्कोप वाहून गेला असता तर पाणबुडी आंधळी होणार होती !
टँग तुफानी चक्रीवादळात सापडली होती. प्रचंड वेगाने आदळणा-या लाटांचा ब्रिजवर मारा होत होता. एका प्रचंड लाटेमुळे तिचा पुढचा भाग वर उचलला गेला आणि दुप्पट वेगाने पाण्यावर आपटला ! पाणबुडीच्या प्रॉपेलर्सचा पाण्यावर आदळताच जोरदार आवाज येत होता. शक्यं त्या आधाराच्या सहाय्याने पाणबुडीतील प्रत्येकजण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. अनेकांनी आपल्या बंक बेड्सचा आश्रय घेतला होता. कित्येक वर्षांच्या सागर-सफारींतही असा थरकाप उडवणारा वादळी अनुभव कोणालाही आला नव्हता !
जपानी जहाजांच्या हालचाली दिसण्याच्या हेतूने ओ'केनने टँगला पाण्याखाली नेण्याचा विचार केला नव्हता. आता तर पाण्याखाली जाण्यात धोका होता. भरीस भर म्हणून सुमारे १५० मैलांच्या वेगाने पाणबुडी उत्तरेच्या -यूक्यू द्विपसमूहाच्या दिशेने ढकलली जात होती. बेटांवर आदळण्यापासून वाचण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे पाणबुडी खुल्या समुद्राकडे वळवणे. अर्थात यात पाणबुडी पूर्ण उलटून सर्वांनाच जलसमाधी मिळण्याचा धोका नाकारता येत नव्हता !
" ऑल अहेड स्टँडर्ड !" ओ'केनने आज्ञा दिली.
पाणबुडी किती अंशाने कलते आहे हे दर्शवणा-या यंत्रावर सर्वांची नजर खिळली होती.
" पंचवीस डिग्री !" चीफ मोटर मशिनीस्ट मर्व्हीन डी लॅप उद्गारला.
पाणबुडी वळवण्याची वेळ आता येऊन ठेपली होती !
" ऑल अहेड फुल ! राईट फुल रडार !" ओ'केन
नेमक्या याच वेळेला आणखीन एक मोठी लाट पाणबुडीवर येऊन आदळली ! पाणबुडी उलटीपालटी होत खाली जाणार या भीतीने सर्वजण पाहत असतानाच ती हळूहळू पूर्ववत झाली !
" ऑल अहेड टू थर्ड ! रडार पंधरा अंशात वळवा !" ओ'केन गरजला.
आणखीन काही लाटांशी मुकाबला करत अखेर टँग वळवण्यात ओ'केनला यश आलं ! वादळाचं थैमान अद्यापही सुरूच होतं, परंतु पाणबुडीला आता पूर्वीइतके धक्के बसत नव्हते. सुदैवाने कोणालाही कोणतीही इजा झालेली नव्हती. आता पाणबुडी खुल्या समुद्राची दिशा सोडून भरकटणार नाही याची खबरदारी घेणं अत्यावश्यक होतं.
पुढचे पाच तास पाणबुडीतील सर्वजण पाणबुडी वादळापासून दूर समुद्राच्या दिशेने नेण्यात मग्न होते. पाणबुडी वादळाच्या तडाख्यापासून दूर नेण्यास अखेरीस त्यांना यश आलं होतं !
पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये वीस वर्षांचा पीट नॅरोवन्स्की आपल्या बंक बेडवर पडला होता. नॅरोवन्स्कीकडे टॉर्पेडो सोडण्याची कामगीरी होती. टँगवर येण्यापूर्वी तो हॅलीबूट पाणबुडीवर होता. त्यापूर्वी यूएस्एस् स्कॉटवर जर्मन पाणबुडीने केलेल्या टॉर्पेडो हल्ल्यातून तो वाचला होता !