गूढकथा भाग ६
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

गूढकथा भाग ६ : ४ खंडहर २-२

मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.

३ खंडहर १-२   ५ कोळी खेकडा १-३

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

मी स्वप्नात जिन्यातील काळोख पाहिला होता. तळघरात काळोख असणार याची मला कल्पना होती.आम्ही दोघांनीही पॉवरफुल टॉर्च घेतले होते.विचारविनिमय करून आम्ही खाली उतरण्याचे ठरविले .मी एकटा असतो तर कदाचित उतरलो नसतो .परंतु एकाला दोघे होतो . शेवटी धीर करून आम्ही जिना उतरायला सुरुवात केली.

तळघर प्रशस्त होते.खाली एकूण चार खोल्या होत्या .प्रत्येक खोलीला दरवाजा होता. दरवाजे कुलूप बंद होते .आत काय आहे ते कळायला मार्ग नव्हता. तळघरात कोणत्यातरी उपायाने वायुवीजनाची व्यवस्था केलेली होती.बंद तळघरात गेल्यावर गुदमरायला होते तसे येथे होत नव्हते. हवा कुठून येते ते पाहण्यासाठी आम्ही हळूहळू मार्गक्रमणा करीत होतो .शेवटी जवळच्या डोंगरावरील एका दगडाजवळ असलेल्या झुडुपातून आम्ही बाहेर आलो .झुडुपाच्या मागे, दगडाच्या मागे प्रवेशद्वार होते .

वाडा प्राचीन होता .अशा मोठ्या वाड्यांमध्ये नेहमीच चोरवाटा ठेवलेल्या असत.शत्रूने,दरोडेखोरांनी , हल्ला केल्यास आपल्याला सुखरूप बाहेर निघून जाता यावे हा हेतू त्यामागे असे.त्याचप्रमाणे संपत्ती विभागून आणि पुरून ठेवण्याची प्रथा होती.देवघर, उंबरठा, तुळशीवृंदावन, इत्यादी ठिकाणी सोने नाणे पुरून  ठेवीत असत.संकटकाळी तळघरात लपून राहण्याची सोय असे .तळघरातही काही संपत्ती लपविली जात असे .तळघरात जाण्यासाठी कदाचित दोन जिने असावेत.एक वाड्यातून असावा दुसरा तुळशीवृंदावनाजवळून असावा.परिस्थितीनुसार तळघरात जाण्यासाठी , दोन मार्ग असावेत असा हेतू त्यामागे असावा .

आता आल्या मार्गाने परत जावे. दरवाजे उघडून आत काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करावा की दुसर्‍या  मार्गाने सहीसलामत घरी परत जावे त्याचा विचार आम्ही करीत होतो.दरवाजामागे बहुधा पुरातन काळातील संपत्ती असावी .ती संपत्ती आम्हाला खुणावत होती.पोलिस चौकीवर जाऊन त्यांना तळघराबद्दल माहिती सांगावी .जर गुप्त धन असेल तर सरकार आपल्याला त्यातून काही टक्के देईल. उगीच धोका स्वीकारू नये.असा विचार आम्ही करीत होतो.आम्हाला कुणी पाहात असेल, आम्हाला कुणी पकडील, आम्हाला दगाफटका होईल असा विचार आमच्या मनात आलाच नाही .आम्ही बेसावध होतो. अकस्मात आम्हाला काही जणांनी मागून पकडले .ते केव्हा आले. कुठून आले ते आम्हाला कळलेच नाही.आमचे हात मागे बांधण्यात आले .आम्हाला त्याच रस्त्याने परत तळघरात आणण्यात आले.   त्यातील प्रमुखाने एक दरवाजा उघडला . आम्हाला खोलीत नेण्यात आले.

त्या खोलीत निरनिराळ्या प्रकारचा माल ठेवलेला होता .हशीम, अफू, चरस, ड्रग्जस, सोने ,दारूगोळा, हत्यारे,  इत्यादी माल चोरट्या मार्गाने आणून येथे लपवून ठेवलेला होता.असा अंदाज आम्ही त्यांच्या बोलण्यावरून केला.आमचे हे लोक काय करणार त्याचा अंदाज आम्हाला आला होता .ते लोक आम्हाला जिवंत सोडणे शक्य नव्हते.  तसेच मरण्यापेक्षा सुटकेची धडपड करावी असा विचार मनोचिकित्सकाने केला.हाताला बांधलेली दोरी सोडवण्यात तो यशस्वी झाला होता .त्याने अकस्मात हल्ला करून एकाच्या हातातील पिस्तूल घेण्याचा प्रयत्न केला .त्यात तो यशस्वी झाला नाही .प्रमुखाने  मनोचिकित्सकाच्या  दोन भुवयांच्या मध्ये  गोळी घालून त्याला ठार मारला.

मला एक खोली उघडून त्यात डांबण्यात आले. भविष्यात माझी अवस्था काय होणार आहे तेही सांगण्यात आले. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पाच भाकऱ्या व पाण्याचा माठ एका कोपऱ्यात आणि मलमूत्र विसर्जनासाठी एक मोठे मातीचे भांडे दुसऱ्या कोपऱ्यात ठेवण्यात आले.माझे बांधलेले हात सोडण्यात आले.मला गुडबाय स्वीट ड्रीमस् असे म्हणून पोलादी दरवाजा बंद करून, बाहेरून कडी कुलूप लावून,ते गुंड निघून गेले.आणि आता मरणाची वाट पाहात येथे मी पडलो आहे .माझ्या स्वप्नाचा असा भयानक शेवट होईल अशी मला स्वप्नात सुद्धा शंका आली नव्हती .

खोलीत कुठूनतरी येणारा मंद प्रकाश आहे .मला उंदरांनी चावल्यामुळे मृत्यू यावा  असे वाटत नाही.उपासमारीने क्षीण होऊन मरावे असेही मला वाटत नाही.कोंडीतून निसटण्याचा कोणतातरी मार्ग उपलब्ध असावा असे माझे अंतर्मन माझी मनोदेवता मला सांगत आहे .यातून सुटण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे.      

भिंत फोडण्यासाठी काही हत्यार उपलब्ध आहे का ते मी पाहात होतो .एखादा लोखंडाचा लहान मोठा तुकडा असता तरी तो मला चालला असता. कुठेही काहीही दिसत नव्हते .मातीचा माठ, मातीचे परळ,मातीचे  मोठे भांडे याचा काहीच उपयोग नव्हता .माझ्या खिशात कोणतीही कठीण वस्तू नव्हती .एवढ्यात मला माझ्या मोबाइलची आठवण झाली .मी पोलिसांना फोन करून कुठे आहे ते सांगू शकलो असतो .फोन वाजू नये म्हणून मी सायलेंटला ठेवला होता.फोनची थरथरही मला जाणवली नव्हती.मी खिशातून फोन काढला .सुदैवाने त्या गुंडांनी माझी झडती घेतली नव्हती .मी काहीही करू शकणार नाही याची त्यांना खात्री असावी .या तळघरात बहुधा  रेंज मिळत नसावी. मी फोन पाहिला. रेंज नव्हती.तरीही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला .मी पोलिसांचा नंबर फिरविला.मी कनेक्ट  होऊ शकलो नाही.

मला सोडवायला कुणीही येणार नव्हते. मलाच प्रयत्न करायला हवा होता .मोबाइल हातात धरून मी भिंतीला कान लावून भिंतीचा प्रत्येक भाग,मोबाइलने ठोकून बघत होतो . कुठेतरी पोकळी आहे असा आवाज येईल,एखादी कळ सापडेल, फटदिशी भिंतीत दरवाजा उघडेल, माझी मुक्तता होईल, अशा आशेत मी होतो.एका भिंतीत पोकळी आहे असे दर्शविणारा आवाज आला .परंतू कळ सापडत नव्हती. चार भिंतीत वाटोळा वाटोळा गरगर फिरून  मी दमून गेलो होतो.तळघर असूनही भिंत दहा फूट उंच होती . माझा हात सात साडेसात  फुटांपर्यंत जात होता. त्यावरील भागात एखादी कळ असली तर ती मला सापडणे शक्य नव्हते.खोलीत उंचावर चढण्याचे कांहीही साधन नव्हते. 

शेवटी हताश होऊन एका  भिंतीला टेकून मी बसलो.ज्या भिंतींमध्ये पोकळी आहे असा आवाज आला होता त्या भिंतीचे मी निरीक्षण करीत होतो .त्या भिंतीत सहा फूट उंचीवर  दोन चौरस लाकडी दांडे टाकलेले होते.भिंतीत पूर्वी असे दांडे फळी टाकण्यासाठी, भिंत बांधताना टाकले जात .हल्ली जसा स्लॅबचा उपयोग होतो तसाच उपयोग त्या फळीचा सामान ठेवण्यासाठी केला जात असे.ज्याला कीड लागू शकत नाही असे लाकूड या कामासाठी वापरले जात असे. लाकडी दांडे होते. वरती फळी नव्हती.

हे दांडे हीच एखादी कळ नसेल ना असा विचार माझ्या मनात आला . माझ्या अंगात नवीन स्फूर्ती आली .मी उठून ते दांडे हलवू लागलो.डावीकडे उजवीकडे गोल फिरविण्याचा प्रयत्न केल्यानंतर, खाली वरती डावीकडे उजवीकडे हलवण्याचा प्रयत्न केल्यानंतर,बाहेर ओढण्याचा किंवा आत ढकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर, काही तरी होईल ,माझी सुटका होईल अशी मला आशा होती .

यातील एक दांडा जसा फळीला आधार  म्हणून वापरता येत होता तसाच तो भिंतीत दरवाजा उघडण्याची एक कळही होता. विविध प्रकारे तो दांडा हलविताना अकस्मात दरवाजा उघडला गेला.माझा आनंद गगनात मावत नव्हता.ती भिंत खूप जाड होती .त्यातूनच एक जिना वरती गेला होता.त्या जिन्याने मी वरती चढत आलो .एका पत्थराने जिन्याचे तोंड झाकलेले होते.पत्थर ढकलून मी पडक्या वाड्याच्या अंतर्भागात आलो. हे त्या वाड्याचे न्हाणीघर  होते.

अत्यंत सावधगिरी बाळगत दबकत दबकत  मी वाड्याबाहेर पडलो .मी कधीही पळालो नसेल अशा वेगाने सुसाट धावत सुटलो .थोड्याच वेळात मी पोलिस स्टेशनमध्ये होतो.माझी सर्व कहाणी मी सांगितली.माझ्या डॉक्टरचे मनोचिकित्सकाचे प्रेत तळघरात,जर त्या गुंडांनी त्याचे काही केले नसेल तर बहुधा असावे हेही सांगितले. 

त्यांच्याजवळ अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत हेही मी सांगितले होते.सशस्त्र पोलिसांच्या दोन तुकड्या निघाल्या .एक वाड्याबाहेर थांबली .दुसरी डोंगरातील  प्रवेश दाराजवळ थांबली.दोन्ही ठिकाणी कांही पोलीस रक्षणासाठी ठेवून ,कांही पोलीस दोन्ही बाजूनी आत शिरले.आंत कुणीही सापडले नाही. मनोचिकित्सकाच्या प्रेताची त्यांनी विल्हेवाट लावलेली असावी. सर्व उलगडा ती टोळी पकडल्यावरच होणार होता.

पोलिसांना जवळजवळ दहा दिवस तिथे दबा धरून बसावे लागले .

टोळीला शंका येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात होती.

शेवटी टोळी पकडण्यात आली . पोलादी दरवाजे उघडण्यात आले .

सर्व माल ताब्यात घेण्यात आला .टोळीचे इतर हस्तकही पकडण्यात आले .

*ती केस जवळजवळ तीन वर्षे चालली होती.कमी जास्त कालावधीच्या  सर्वांना शिक्षा झाल्या .*

*खंडहर केस किंवा पडका वाडा तळघर केस म्हणून ही ओळखली जाते.*

* केवळ सुदैव म्हणून मी त्या भयानक कैदखान्यातून सुटलो*  

* त्या गुप्त जागेबद्दल तळघराबद्दल सतत स्वप्ने  पडण्याचे कारण मला कधीही कळले नाही.*

*निरनिराळया  मनोचिकित्सकांनी प्रयत्न करून त्यांनाही कळले नाही.*

*अनाकलनीय घटना म्हणून माझ्या स्वप्नांकडे पाहिले पाहिजे .*

(समाप्त)

१४/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

. . .