शेंद्री
अक्षय मिलिंद दांडेकर Updated: 15 April 2021 07:30 IST

शेंद्री : प्रकरण ९ - अंतीम

सायन हॉस्पिटलचा तो रस्ता, अनेक बेवारस, भटक्या आणि उनाड पोरासोरांचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो. समजा त्या क्षणी रस्त्याच्या कडेला एखादा बेघर भिकारी भसाड्या आवाजात गाणं गात असता आणि हार्मोनियम वाजवत असता तरी एकवेळ मी ५-१० रुपयाचे नाणे त्याच्या समोर पसरलेल्या रुमालावर टाकले असते आणि त्याने त्याचे समाधान झाले असते. पण एक छोटासा मुलगा झोपायला जागा नाही म्हणून रडवेला झालेला पाहून माझे मन विषण्ण झाले कारण त्यावेळेस त्याला काय उत्तर द्यावे हे मला कळलेच नाही.

प्रकरण ८  

ते मला आजही नपुसंक म्हणतात आणि आता त्यात वेडा खुनी या अधिकृत विशेषणाची भर पडली आहे.

या असायलमच्या अंधार कोठडीत तितकाच अंधार आहे जितका अंधार आता माझ्या आयुष्यात पसरलेला आहे. मी फक्त दिवस ढकलतोय कारण त्यांनी मला वेडा ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. फाशी दिली असती तर फार बरं झालं असते. ज्योत्नाचा निष्कारण बळी गेला याची सल कायम माझ्या मनात राहील. पण तिला तसल्या  बीभत्स रुपात जगवत ठेवण्यापेक्षा मुक्ती मिळाली हेच बरं झालं. पण मी एवढं स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाहीये. मी आता ठीक आहे. एकटाच बरा आहे. आणि मुख्य म्हणजे समाधानी आहे कारण मी कोणाला भेटत नाही आणि मला कोणी भेटायला येत नाही.

फक्त शेंद्री येतो कधी कधी. खिडकीच्या गजातून उडत उडत त्याला थांबवण्याचा काहीच मार्ग नाहीये. त्याचा चेहरा अजूनही बदामाच्या आकाराचा आणि रेखीव आहे. काळेभोर केस आणि कावळ्यासारखे काळे कुळकुळीत डोळे आता त्याला कोणापासून लपवायची गरज पडत नाही.

कदाचित शेंद्री आजही मला त्याचा बाप मानतो. मी जेवायला बसलो कि येऊन समोर बसतो. मी नकळत त्याला घास भरवतो. त्याच्या काळ्या निर्जीव डोळ्यात कधीच कोणते भाव दिसत नाहीत. आणि तो जेवण झाल्यावर हसून म्हणतो.

“सर, तुम्ही खूप छान आहात सर!”

समाप्त

लेखक: अक्षय मिलिंद दांडेकर

कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

. . .