भूतकथा भाग ५
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

भूतकथा भाग ५ : ३ रहस्यमय बंगला १-२

भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.

२ सिनेतारका २-२   ३ रहस्यमय बंगला १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. ) 

जगदीश ही कशालाही न घाबरणारी एक वल्ली होती. बऱ्याच वेळा जाणून बुजून तो संकटात उडी घेत असे .किंवा संकट आकर्षित होउन त्याच्याकडे येत असे.कारण नसताना आत्तापर्यंत त्याने वेळोवेळी कितीतरी संकटात उडी घेतली होती.रहस्य असल्यास त्याचा छडा लावला होता .केवळ संकट असल्यास त्यातून तो सहीसलामत बाहेर पडला होता .आईवडिलांना पत्नीला त्याचा हा स्वभाव आवडत नसे .चांगला सुरक्षित जीव उगीचच्या उगीच संकटात कशाला टाकायचा असे त्यांचे सांगणे असे .अशी चर्चा घरात सुरू झाली की जगदीश हसून ती टोलवीत असे.काही वेळा तिकडे दुर्लक्ष करीत असे.ऐकून न ऐकल्यासारखे करण्यात तो तरबेज होता.  

मुंबईला अंधेरी येथे त्यांचा मोठा फ्लॅट होता .आई वडील भाऊ बहीण पत्नीसह तो तिथे राहात होता. त्यांचे एकत्र कुटुंब होते .

पीडब्ल्यूडीमध्ये तो वरच्या पोस्टवर इंजिनिअर म्हणून काम करीत होता .औरंगाबादजवळ सरकारी नोकरांसाठी राहण्यासाठी एक मोठी कॉलनी तयार करायची होती.त्यावर प्रमुख म्हणून जगदीशची नेमणूक झाली होती.प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याला तिथे राहायचे होते.

जगदीश राहण्यासाठी जी जागा घेईल  त्याचे भाडे अर्थातच त्याच्या खात्याकडून त्याला मिळणार होते .औरंगाबादला आल्यावर त्याने आपला बाडबिस्तरा एका हॉटेलमध्ये टाकला होता  . तूर्त तो तिथे एकटाच राहत होता.मनासारखी जागा मिळाल्यावर त्याची पत्नी शोभना येणार होती . 

राहण्याच्या जागेचा तपास करीत असताना एका एजंटने त्याला एक बंगला सुचविला .जगदीश जागा बघण्यासाठी एजंट बरोबर गेला . बंगला थोडासा शहराबाहेर परंतु शहराचा विस्तार झाल्यामुळे आता शहरातच होता.शहरात असूनही ती जागा पडीक वाटत होती .बंगला व त्या भोवतालचे आवार दुर्लक्षित होते .झाडी अस्ताव्यस्त वाढली होती .झाडांना वेलीनी वेढून टाकले होते.त्या गर्द झाडीतून दिवसासुद्धा सूर्याचे किरण क्वचितच जमिनीपर्यंत पोहोचत असत .दिवसा काही प्रमाणात ठीक वाटणारी जागा संध्याकाळ झाली की भयाण वाटू लागे. आजूबाजूला चकाचक टुमदार बंगले असताना हा बंगला मात्र दुर्लक्षित जुनाट अशुभ शक्तीनी भारित दिसत होता. आकाशातून पाहिले तर ती जागा एखाद्या डागासारखी दिसत होती .

जी जागा पाहून एखाद्याने तेथून पळ काढण्याचा विचार केला असता तीच जागा पाहून जगदीश खूष झाला.तो एक स्वतंत्र बंगला होता . बंगल्याची रचना जुनाट होती .त्या जागेला आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न मालकाने केला होता .हॉल  किचन डायनिंग रूम अंतर्गत  टॉयलेट असलेल्या बेडरूम्स इत्यादी  व्यवस्था केलेल्या होत्या .आजूबाजूला गर्द झाडी होती .बंगल्यासमोर एक विस्तीर्ण  बागही होती.निगराणी अभावी त्या बागेला अवकळा आली होती . जागा एवढी दुर्लक्षित कशी असा विचार त्यांच्या मनात आला .काही कारणाने असेल मालकांचे दुर्लक्ष म्हणून तो विचार त्याने सोडून दिला .

आपण त्या बंगल्याला टुमदार रूप देऊ .मुंबईला माणसांच्या व इमारतींच्या जंगलात राहून तो कंटाळला होता. एखाद्या  निवांत प्रशस्त एकांत असलेल्या प्रशस्त जागी राहावे असे त्याला मनातून नेहमी वाटत असे.ही जागा आपण सुशोभित आकर्षक करू आणि आईवडिलांना इथे घेऊन येऊ.आपला येथील प्रकल्प संपेपर्यंत पत्नीसह येथे निवास करू.असा विचार त्याने केल।     

जगदीशला बंगला एकदम पसंत पडला .कुठे तरी फ्लॅटमध्ये राहण्यापेक्षा स्वतंत्र बंगल्यात राहावे यासारखे सुख नाही असे त्याचे मत होते . बंगल्याचे भाडे विचारल्यावर एजंटने एक हजार रुपये महिना असे भाडे सांगितले .एवढ्या मोठ्या बंगल्याचे भाडे फक्त एक हजार रुपये ऐकून जगदीशला आश्चर्य वाटले .जागेमध्ये काही तरी न दिसणारा दोष असला पाहिजे त्याशिवाय एवढ्या कमी भाड्यात जागा मिळणे शक्य नाही .असा विचार त्याच्या मनात आला .

जगदीशने त्या एजंटला  त्या जागेचा इतिहास विचारला.पूर्वी येथे कोण कोण रहात होते ते किती दिवस येथे राहिले वगेरे वगेरे माहिती विचारली   .एजंटने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली .एजंट काहीतरी लपवित आहे असा जगदीशला  संशय आला .

खोदून खोदून विचारता शेवटी एजंटने खरी खरी हकीगत सांगितली .या इस्टेटीच्या मालकाने हौशीने ही इस्टेट विकत घेतली होती.स्वतः राहण्याच्या दृष्टीने त्याने या जुनाट बंगल्याला आधुनिक रूप दिले. मालक स्वतः हौशीने येथे राहण्यासाठी सहकुटुंब आला.येथे त्याला अशुभ अदृश्य आत्म्यांचा वास आहे असा अनुभव आला.त्या अशुभ शक्तींचा बंदोबस्त करण्याचा त्याने निरनिराळ्या मार्गांनी प्रयत्न केला .त्यात त्याला अपयश आले .ती इस्टेट विकण्याचा त्याने प्रयत्न केला .कुणीही  योग्य किमतीत ती इस्टेट विकत घेण्यामध्ये रस दाखविला नाही.

नंतर त्याने तो बंगला भाडय़ाने देण्याचे ठरविले . त्या बंगल्यात आत्तापर्यंत चार पाच जण राहून गेले होते .कुणी एक महिना,कुणी दोन महिने, एकच चार महिने  राहिला होता. येथे राहणाऱ्याला काहीतरी विलक्षण अनुभव येतात .त्यामुळे तो घाबरून जातो .शक्य तितक्या लवकर जागा सोडून लोक निघून जातात असा अनुभव आहे .प्रथम या बंगल्याचे भाडे दहा हजार रुपये होते .सहा महिन्यांचा अॅडव्हान्स घेतला जात असे .लोक रहात नाहीत.निघून जातात असे लक्षात आल्यावर मालकाने भाडे क्रमश: कमी करीत नेले .त्याचप्रमाणे अॅडव्हान्सही कमी करीत नेला.आता मालक एक महिन्याचा अॅडव्हान्स व भाडे फक्त एक हजार रुपये एवढ्यावर तयार झाला आहे .

कोणते विलक्षण अनुभव येतात असे विचारल्यावर एजंटने ते मला माहित नाही म्हणून सांगितले.एजंटच्या चेहऱ्यावरून त्याला माहीत आहे परंतु त्याला सांगण्याची इच्छा नाही हे जगदीशच्या लक्षात आले.

त्याने एजंटला विचार करून चार दिवसांत कळवितो असे सांगितले . त्याच्या कामाच्या ठिकाणी औरंगाबादमधील सहकाऱ्यांना त्याने त्या बंगल्याबद्दल विचारले .

प्रथम सर्वांनीच त्याला साहेब तिथे रहायला बिलकुल जाऊ नका म्हणून आवर्जून सांगितले . चांगला बंगला, इतके कमी भाडे, आणि तिथे कां जायचे नाही  त्याचे कारण जगदीशने विचारले .शेवटी त्याला पुढील हकिगत कळली .

ती जागा अशुभ आहे .ती जागा वाईट शक्तीने भारित आहे .तिथे राहणाऱ्याला निरनिराळे वाईट अनुभव येतात.तिथे नीट  झोप येत नाही. तिथे काय काय दृश्ये दिसतात. रात्रीचे निरनिराळे आवाज ऐकू येतात .येथे राहू नको .ही जागा माझी आहे. हट्ट करून येथे राहिल्यास  परिणाम बरा होणार नाही .असे चारी दिशांनी आवाज येतात .काही वेळा काही व्यक्ती प्रकट होऊन तुम्हाला दम देतात.तुमच्या वस्तू घरातल्या घरात इतस्ततः फेकून दिल्या जातात . उदाहरणार्थ स्वयंपाक घरातील वस्तू हॉलमध्ये ,हॉलमधील सोफा स्वयंपाक घरात, वगेरे वगेरे .रात्री बाहेर कुत्री येऊन रडत असतात .त्यांच्या रडण्याचा अावाज ऐकून अंगावरील केस उभे राहतात. तेथे नीट झोप लागत नाही .ताप खोकला इत्यादी आजारांनी भाडेकरू त्रस्त होतात .एक ना दोन प्रत्येकजण वेगळीच कथा सांगत होता .खरे किती खोटे किती अफवा किती काहीच समजत नव्हते.

जागा भयाण आहे. तिथे राहायला जाण्यात शहाणपणा नाही. एवढा मुद्दा सर्वांच्या बोलण्यातून लक्षात आला .

जगदीशने त्या जागेचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला .ब्रिटिश अमलापूर्वी त्या जागी किंवा त्याच्या जवळपास तुरुंग होता .पूर्वी गुन्हेगारांना,कैद्यांना भयाण शिक्षा दिल्या जात .येथे कितीतरी मृत्यू झाले असावेत.त्यांचे आत्मे आक्रोश करीत असणार .असा अंदाज त्याने बांधला.

मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जगदीशचा स्वभाव धाडसी होता .

आपणहून संकटात उडी घेण्याचा त्याचा स्वभाव होता .

* या बंगल्यातील रहस्याचा शोध घेतलाच पाहिजे असे त्याने मनाशी ठरविले .*

*शक्य झाले तर ही जागा संकटमुक्त केली पाहिजे. असा त्याने मनाशी निश्चय केला .*

*मालकाला एजंटमार्फत एक हजार रुपये अॅडव्हान्स देऊन टाकला . हॉटेलातील आपले सामान त्याने त्या  किती तरी अफवा, कथा,असलेल्या जागेत हलविले.*

(क्रमशः)

१०/३/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

. . .