गूढकथा भाग ३ : ४ भुतांचा माळ १-२
मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.
माळ हा शब्द एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना मध्ये जो सपाट भूप्रदेश लागतो त्याला उद्देशून वापरला जातो .हा माळ कित्येक मैल पसरलेला असतो.एका उंच डोंगरांवरील सपाटीला भुताचा माळ असे नाव होते. हा माळ जेमतेम एक चौरस मैल होता.डोंगराची उंची सुमारे एक हजार फूट होती .गिर्यारोहणासाठी आदर्श असा हा डोंगर होता .त्याच्या दोन बाजूला जवळजवळ ताशीव कडे होते .तिसर्या बाजूला चढण्यासाठी सोयीस्कर असा चढ होता.चौथ्या बाजूला चढण्यासाठी किंचित बिकट असा चढ होता.गिर्यारोहणाचे धडे घेण्यासाठी निरनिराळ्या बाजूंचा गिर्यारोहक त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे वापर करीत असत .
अनेक वर्षे या डोंगराचा गिर्यारोहणासाठी वापर केला जात होता .कित्येक वेळा गिर्यारोहक सपाट माळावर तंबू ठोकून रात्रही काढीत असत .रात्री तंबू ठोकून राहणे हाही त्यांच्या गिर्यारोहण शिक्षणाचा एक भाग होता .एकदा काही गिर्यारोहक रात्री या माळावर तंबू ठोकून वस्तीला होते.त्या रात्री त्यांना काही विचित्र अनुभव आले .आकाशात कुठेही ढग नसताना पाऊस पडत होता .विजा चमकत होत्या .ढगांचा गडगडाट ऐकू येत होता .गडगडाटाशिवायही विचित्र आवाज ऐकू येत होते. रात्रभर त्यांना झोप लागली नाही .दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाहतात तो कुठेही पाऊस पडल्याचे काहीही चिन्ह नव्हते .कदाचित एकाला स्वप्न पडले असेल ,भास झाला असेल, परंतु सर्वांना एकच स्वप्न एकच भास कसा काय होईल.त्या सर्वांनी नंतर आपल्याला झालेले भास किंवा आपल्याला आलेले अनुभव इतरांना सांगितले.प्रथम त्यांच्याकडे विशेष लक्ष कुणी दिले नाही .
परंतु गिर्यारोहक रात्री तिथे राहण्याचे टाळू लागले . पुन्हा केव्हातरी एकदा गिर्यारोहकांना तिथे नाईलाजाने थांबण्याची वेळ आली . त्यांनाही तिथे काही विचित्र अनुभव आले .चांदणी रात्र असूनही कुठेही चांदणे पडलेले दिसत नव्हते.काळोखात त्यांना एक जंगी महाल दिसला . त्या महालातून दिव्याचा प्रकाश बाहेर येत होता .महालातून हसण्याचे कुणीतरी नृत्य करण्याचे संगीताचे तबला पेटी सारंगी इत्यादी वाजविल्याचे आवाज येत होते.संध्याकाळी त्यांनी तंबू ठोकले त्यावेळी तिथे महाल नव्हता सकाळी ते उठले त्यावेळी तिथे महाल नव्हता.त्या आवाजाने व प्रकाशात दिसणाऱ्या दृश्याने रात्रभर कुणालाही झोप लागली नाही.
हे सर्व अनुभव वर्तमानपत्रात छापून आले.त्या अगोदरही गिर्यारोहकांना रात्री तिथे थांबल्यावर आलेले अनुभव छापून आले .नंतर डोंगराजवळच्या निरनिराळ्या गावातून कहाण्या सांगण्याला सुरुवात झाली. कुणी म्हणे त्या डोंगरावर रात्री प्रकाश दिसतो. कुणी म्हणे त्या डोंगरावरुन रात्री निरनिराळे भयप्रद आवाज येतात .अजूनही गिर्यारोहक तो डोंगर गिर्यारोहण शिक्षणासाठी आदर्श असल्यामुळे वापर करीत असत .मात्र कटाक्षाने कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी डोंगर उतरून खाली यायचेच अश्या प्रकारे नियोजन करीत असत .
प्रेरक हा असाच एक धाडसी गिर्यारोहक होता.आत्तापर्यंत त्याने निरनिराळे कडे सर केले होते.कोणतेही साहस करण्यास तो मागे पुढे पाहात नसे .या भुतांच्या डोंगराची त्याला कुणीतरी माहिती सांगितली.डोंगरावरील माळाला भुतांच्या कहाण्यामुळे भुतांचा माळ असे नाव पडले होते.नंतर डोंगरावर भुतांचा माळ असल्यामुळे लोकांनी त्या डोंगराचे भुत़ांचा डोंगर असे नामकरण केले होते .
जेव्हा प्रेरकला कुणातरी गिर्यारोहकाने ही माहिती दिली तेव्हा भूत वगैरे काहीही नसते हा सर्व दुबळया मनाचा खेळ आहे असे म्हणून त्याने सांगणार्याची टिंगल उडविली .नंतर तो विषय तिथेच थांबला .कदाचित कुणीतरी त्याच्याजवळ एक रात्र राहून दाखव अशी पैज मारलीही असती .परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही .
प्रेरकची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना.रात्री त्या माळावर तंबू ठोकून राहावे असा निश्चय त्याने केला.एक दोन ओळखीच्या गिर्यारोहकांना त्याने त्याच्या बरोबर येण्यास सुचवले .कुणीही गिर्यारोहक त्यांच्या बरोबर येण्यास तयार होता .परंतु रात्री तिथे राहायचे आहे असे म्हटल्यावर कुणीहि तयार होईना .शेवटी त्याने एकटेच जायचे तिथे तंबू ठोकायचा आणि काय अनुभव येतो ते पाहायचे असे ठरविले .
रात्री राहण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक सामान घेऊन तो निघाला.त्याच्याबरोबर कुणीही यायला तयार नव्हता .हा एकटाच तिथे रात्री राहणार असे ऐकल्यावर सर्वानी त्याला उगीच विषाची परीक्षा कशाला घेतो असे सांगण्यास सुरुवात केली .कुणाचेही न ऐकता तो एकटाच निघाला.दुपारी तीन नंतर त्याने तो डोंगर चढण्यास सुरुवात केली. संध्याकाळी सहाच्या सुमारास तो माळावर आला .
सूर्य अस्ताला जाण्याला अजून एक तास होता.मावळतीची सूर्यकिरणे डोंगरावर पडली होती .उन्हाळा असला तरी उंचावर असल्यामुळे गार वाटत होते. झुळझुळ वारा वाहत होता.एकंदरीत प्रसन्न वातावरण होते .अशुभाचे चिन्ह कुठेही दिसत नव्हते.हळूहळू संध्याकाळ व नंतर रात्र झाली . अजूनही कुठेही काहीही दिसत नव्हते .प्रेरक मनाशी भूत बित सर्व काही झूट आहे म्हणत होता .त्याने बरोबर आणलेले तयार पदार्थ खाल्ले .स्पिरीटच्या दिव्यावर कडक कॉफी करून तो प्याला.स्लीपिंग बॅग वगैरे काढून त्याने झोपण्याची तयारी केली .
एवढ्यात त्याला समोर मंद प्रकाश दिसायला सुरुवात झाली .त्या प्रकाशात त्याला एक महाल दिसत होता .
(क्रमशः)
९/५/२०१९©प्रभाकर पटवर्धन