गूढकथा भाग २ : ३ भुलीचे झाड
मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.
कोकण म्हटले की तिथे भुते मुबलक प्रमाणात वावरत असतात असा समज आहे .काही जण तर कोकणातील माणसे हीच भुतासारखी आहेत असे विनोदांने म्हणतात. भुतांचे अनेक प्रकार सांगितले जातात . मेल्यानंतर जर इच्छा अतृप्त असतील तर आत्मा पुढच्या गतीला न जाता घुटमळत राहतो .स्त्री आत्मा स्त्री भूत होतो व पुरुष आत्मा पुरुष भूत होतो असा समज आहे .निरनिराळ्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर कोणत्या भूतांमध्ये त्याचे रूपांतर होते तेही सांगितले जाते . भुतांच्या नावाची यादीही सांगितली जाते .ब्रह्मराक्षस झोटिंग लावसट भुताळी जाखिण मुंजा इ. सरकारी अधिकाऱ्यांची जशी एक उतरंड असते तशीच भुतांची एक उतरंड सांगितली जाते.कोणत्याही प्रकारचे नुकसान हे भुतांमुळे होते असा पूर्वी विशेषत: अशिक्षित स्तरांमध्ये समज होता .अजूनही त्यामध्ये फार फरक पडला नसावा असा माझा समज आहे .प्रत्येक गावात एक देवीचे देऊळ असते व तिथे एक भगत असतो तो यातील तज्ज्ञ समजला जातो तो निरनिराळ्या कारणामुळे आलेल्या लोकांचे निरनिराळ्या प्रकारे समाधान करतो .
माणसाच्या स्वभावाप्रमाणेच काही भुते गमती करणारी असतात किंवा विनोदी असतात. काही आपले संरक्षण करणारी असतात तर काही दगाफटका करणारी नुकसान पोचवणारी असतात. तर काही निर्विष असतात.ती केवळ गंमत करतात तर काही गुंडगिरी करणरी असतात .मनुष्यांच्या प्र
वृत्ती प्रमाणे भुतांची ही प्रवृत्ती निरनिराळी असते .
माझा आज गंमत करणाऱया भुताची गोष्ट सांगण्याचा विचार आहे .हे भूत साधारण मध्यरात्रीच्या सुमारास काळोख्या रात्री भेटते.कोणत्याही सड्यावर (डोंगर माथ्यावरील दगडांचा व थोडा गवताचाअसा उंच सखल भाग) मध्यरात्रीच्या सुमारास काळोख्या रात्री केव्हाही व कोणालाही हे भेटू शकते .ते कोणताही त्रास देत नाही फक्त थोडीशी मस्करी करते .घाटावरही हा प्रकार आढळतो त्याला चकवा असे म्हणतात.बहुधा व्यंकटेश माडगूळकरांची या नावाची एक गोष्ट आहे असे वाटते .
मध्यरात्रीच्या सुमारास सड्यावरून जाताना तुम्हाला रस्ता सापडत नाहीसा होतो .प्रत्येक पायवाट आपल्याला हवी असलेली आहे असे वाटू लागते .माणूस ओसाड सडय़ावर अशाप्रकारे रात्रभर दमेपर्यंत गोलगोल फिरत राहतो व शेवटी दमून बसतो .सकाळ झाल्याशिवाय त्याला आपली योग्य वाट कोणती व आपण कुठे आहोत हे कळत नाही .हे भूत एखाद्या झाडावर असते व रात्रीचा माणूस दिसला की त्याची ते अशा प्रकारे गंमत करते.त्या झाडाजवळून गेल्यावर हा प्रकार सुरू होतो म्हणून त्याला भुलीचे झाड असे म्हणतात.
पावसाळी दिवस होते श्रावण महिना होता गोकुळाष्टमी होती .नारायणाच्या देवळात उत्सव होता .रात्री कीर्तनात कृष्णाच्या जन्माचे आख्यान व शेवटी पाळण्य़ामध्ये कृष्णजन्म असा कार्यक्रम होता .टिल्लू देशमुख म्हणून पावसचे एक कीर्तनकार होते. ते आमच्या शेजार्यांच्या नात्यातीलही होते .त्यांना कीर्तनाला बोलावलेले होते .रात्री कृष्ण जन्म झाला कॉफी पानही झाले. गप्पा टप्पा ही झाल्या.सकाळी त्यांना काहीतरी काम होते त्यामुळे ते व त्यांच्या बरोबरीचे दोनतीन गृहस्थही रात्रीचे पावसला जाण्यासाठी निघाले.आता जाऊ नका विश्रांती घ्या सकाळी लवकर उठून चहा घेऊन जा असे सर्वांनी सांगून पाहिले.तरीही ते सर्व निघाले .त्यांच्या बरोबर दोन तीन चांगले कंदीलही होते .ते गेल्यावर सर्व मंडळी निवांत झोपली .सकाळी उठून पाहतात तो ती सर्व मंडळी दारात हजर. अरे तुम्ही इथे कसे असे विचारता ते म्हणाले आम्ही फार दमून गेलो आहोत .प्रथम आम्ही फ्रेश होतो चहा घेतो व मग सर्व हकीकत सांगतो .
चहा घेऊन झाल्यावर त्यांनी आपली हकिगत सांगण्याला सुरुवात केली .आम्ही इथून निघालो ते घाटी चढलो च पायाखालची वाट असल्यामुळे भराभर चालू लागलो .आम्ही आमच्या मताप्रमाणे बरोबर पावसच्या वाटेवर होतो. साधारण अर्ध्या तासामध्ये पावसचा उतार यायला पाहिजे होता परंतु तो काही आला नाही .आम्ही वाट चुकलेली नाही याची खात्री करून घेतली .आम्ही बरोबर वाटेवरच होतो .आम्ही चाल चाल चाललो परंतु उतार काही येईना .जरा वेळाने वाट चुकलो असे वाटले .पुन्हा आमच्या मताप्रमाणे बरोबर वाट पकडून चालू लागलो .तरीही उतार काही येईना .जरा वेळाने वाट चुकल्यासारखे वाटू लागले म्हणून आम्ही पुन्हा खाणाखुणा पाहून बरोबर रस्ता पकडला व चालू लागलो .थोड्या वेळाने आम्हाला आम्ही उलट्या दिशेने चालत आहोत असे वाटू लागले .म्हणून आम्ही खाणाखुणा पाहून पुन्हा एकदा बरोबर वाट पकडली .आकाशात ढगांची गर्दी मिट्ट काळोख कुठे काही दिसेना .शेवटी दमून वैतागून आम्ही जिथे होतो तिथेच फतकल मारून बसून घेतले.चालून चालून पायाचा भुगा पडला एकही पाऊल पुढे टाकण्याचे अवसान नव्हते .आम्ही झोपेने पेंगुळलेले ओल्या गावात तसेच बसून राहिलो .सकाळी बघतो तो आम्ही तुमच्या घाटीच्या तोंडावरच बसून होतो.घाटी उतरून खाली आलो असतो तर निदान थोडीशी झोप तरी काढली असती .सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली .भुलीच्याझाडावरील भुताने त्यांना घुमघुम घुमविले व व्यवस्थित काळजीपूर्वक घाटीच्या तोंडावर आणून सोडले .उजाडताच आम्ही कुठे आहोत आमच्या लक्षात आले व परत फिरण्याऐवजी येथे येऊन फ्रेश होऊन चहा घेऊन जावे म्हणून घाटी उतरून परत आलो .भुलीच्या झाडावरील भूत मनातून मन:पूर्वक हसत असावे .त्यानंतर बुवा पुन्हा आयुष्यात कधी रात्रीचे सड्यावरून गेले नसावेत !!!!(या घटनेचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देणे शक्य आहे .)खरे काय ते त्या भुतालाच माहिती !!!
२३/६/२०१८©प्रभाकर पटवर्धन