गूढकथा भाग १
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

गूढकथा भाग १ : ५ माझे माझ्याहून तरुण आई वडील

मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.

४ महापुरुष संरक्षित फार्महाऊस  

मी दिवाणखान्यात आरामशीर पाय पसरून बसलो होतो .आज रविवार होता त्यामुळे काहीही धावपळ नव्हती .सौभाग्यवती स्वयंपाघरात काहीतरी खुडबुड करीत होती .माझे वय सुमारे पन्नास वर्षे .मला दोन लहान मुले .मोठा मुलगा वय वर्षे तेवीस .लहान मुलगी वय वर्षे वीस.मी टीव्हीवरील कुठला तरी कार्यक्रम बघण्यात मग्न होतो. एवढ्यात बेल वाजली. माझ्या मुलीने दरवाजा उघडला .एक तरुण मुलगा व मुलगी यांची जोडी दरवाजात उभी होती .ते बहुधा मित्र मैत्रीण असावेत. त्यांनी सुहास परांजपे इथेच राहतात ना म्हणून विचारले .मी होकार दिल्यावर त्यांनी अदबीने आम्ही आत येउं का म्हणून विचारले .मी त्यांना आनंदाने आत या व बसा म्हणून सांगितले .ती जोडी सोफ्यावर संकोचत कडेवर टेकल्यासारखी बसली .मी त्यांचा संकोच ओळखत आरामशीर बसा म्हणून सुचविले . तुमच्या जवळ जरा बोलायचे होते बोलू ना म्हणून त्यांनी परवानगी विचारली.त्यांचे वय सुमारे बावीसच्या आसपास असावे.त्यांचा स्वभाव संकोची वाटत होता .त्यांना काय बोलायचे ते नक्की माहीत होते .परंतु ते कसे बोलावे ते त्यांना कळत नव्हते .

त्यांना बघितल्यावर माझ्या मनात प्रेम दाटून आले .माझे जसे मुलांवर प्रेम होते त्या प्रकारचे ते प्रेम नव्हते .ती दोघेही माझ्या मुलांच्या वयाची होती .असे असूनही आई वडिलांबद्दल जसे प्रेम जिव्हाळा उमाळा दाटून येतो तशी आपुलीक व प्रेम मला आतून जाणवत होते .अशी भावना का वाटत आहे ते माझे मलाच समजत नव्हते .

मी त्यांना नि:संकोचपणे  तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते बोला असे सांगितले .माझा आश्वस्त चेहरा पाहून त्यांना धीर आला .त्यांनी बिचकत बिचकत बोलण्यास सुरुवात केली .

ती दोघे येथील प्रसिद्ध राजगड कॉलेजमध्ये शिकत होती.दोघेही कॉमर्स शाखेमध्ये होती.त्याचे नाव आनंद तो मुंबईचा आहे .ती सुखदा कोल्हापूरची आहे .मुंबई व कोल्हापूर दोनही ठिकाणी कॉलेजेस असूनही ती दोघे येथे पुण्याला शिकायला आली होती असे का झाले ते त्यांचे त्यांनाही माहीत नव्हते.पुण्याची हवा चांगली पुणे एज्युकेशन हब म्हणून कदाचित त्यांच्या आई वडिलांनी त्यांना येथे ठेवले असावे . योगायोगाने एकाच कॉलेजमध्ये त्यांनी अॅडमिशन घेतली. वेगवेगळ्या वर्गात शिकत असूनही त्यांची ओळख झाली .पहिल्यापासूनच त्यांना  एकमेकांबद्दल विलक्षण आकर्षण वाटू लागले.शिक्षण पुरे होताच दोघांनीही लग्न करण्याचा निश्चय केला होता.आम्ही एकमेकाना संपूर्ण अनोळखी असूनही हे सर्व ती दोघे मला का सांगत आहेत त्याचा मला उलगडा होत नव्हता.त्यांना बोलायचे विचारायचे दुसरेच काहीतरी होते परंतु त्यासाठी ते ही प्रदीर्घ प्रस्तावना करीत असावेत असा मला अंदाज आला.त्यांना जे काही विचारायचे होते त्यासाठी ती संकोचत होती .तरीही ती दोघे मला फार जवळची वाटत होती .असे का वाटत होते ते माझे मलाच कळत नव्हते .

त्यांनी पुढे बोलण्याला सुरुवात केली .त्यांचा जन्म जेनेटिक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झाला होता. जन्मानंतर त्यांना त्यांच्या हल्लींच्या आई वडिलांकडे त्यांच्या मागणीप्रमाणे सोपविण्यात आले होते .किंबहुना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांची निर्मिती करण्यात आली होती .जेनेटिक सायन्स क्लोन तयार करणाऱ्या इतके प्रगत झाले होते .ज्याना ते आपले आई वडील समजत होते ते त्यांचे खरे आई वडील नाहीत हे त्यांना अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सांगण्यात आले होते .तरीही त्यांचे दत्तक आई वडिलांवरील प्रेम मुळीच कमी झाले नव्हते .त्याना आपले खरे आई वडील कोण ते जाणण्याची उत्सुकता मात्र होती .त्यांना कुठच्या जेनेटिक लॅबोरेटरी मधून घेण्यात आले ते गुप्ततेसाठी सांगितले जात नव्हते .त्यामुळे त्यांनी तो विषय डोक्यातून काढून टाकला होता .

त्या दोघांनी एक जाहिरात पाहिली ."बेसिक जेनेटिक रिसर्च इन्स्टिट्यूट "या संस्थेची ती जाहिरात होती .ही संस्था फार जुनी जवळजवळ पंचाहत्तर वर्षांची आहे .त्यांना जेनेटिक मटेरियल (वांशिक वस्तू सामुग्री )पाहिजे होते .त्यांना ते पसंत पडल्यास ती संस्था अशा दानासाठी प्रत्येकी पंचवीस पंचवीस हजार रुपये देण्यास तयार होती .या दोघांना पैशाची गरज असल्यामुळे ती दोघे ती जाहिरात पाहून तेथे गेली .

लॅबोरेटरीने नमुना गोळा केल्यानंतर त्यांना असे आढळून आले की हे नमुने त्यांच्याजवळ अगोदरपासूनच आहेत.याचा अर्थ ही दोघे तिथे पूर्वी येऊन गेली आहेत .व पैशाच्या लोभाने पुन्हा तेथे आली आहेत .न सांगता असे करणे हा कायद्यानुसार  फ्रॉड फसवणूक होती .या दोघांनी निक्षून आम्ही प्रथमच इथे येत आहोत असे सांगितल्यावर त्यांनी जास्त कागदपत्र(अर्थात कॉम्प्युटरवर ) पाहिले . ते पाहताना त्यांना असे आढळून आले की सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी असेच नमुने तिथे देण्यात आले होते .ते नमुने मोफत देण्यात आले होते.परंतु एकच अट घालण्यात आली होती.या नमुन्यांचा एकत्रच मुलगा व मुलगी तयार करण्यासाठी वापर करण्यात आला पाहिजे .जेव्हा या नमुन्यांचा वापर करून मुलांना जन्माला घातले जाईल  त्यावेळी मुलगा व  मुलगी एकाच कुटुंबाकडे न देता ते फार दूरवरच्या अंतरावरील कुटुंबांकडे देण्यात यावेत.या सर्व अटी त्या संस्थेने कायदेशीर रित्या मान्य केल्या होत्या .त्या संस्थेने मागणीप्रमाणे सुमारे वीस बावीस वर्षांपूर्वी अशी मुले तयार  करून ज्यांची मागणी होती त्यांना ती दिली. ती आम्ही दोन मुले होय.

प्रथमपासूनच आम्हाला आमचे आई वडील जाणण्याची उत्सुकता होती. परंतू गुप्ततेमुळे आम्हाला ती माहिती कळत नव्हती .ही माहिती अचानक कळल्यामुळे हेच आमचे आई वडील ही आमची खात्री झाली .त्या जेनेटिक रिसर्च इन्स्टिट्यूटने ही माहिती अत्यंत कॉन्फिडेंशियल स्वरूपाची  असल्यामुळे देता येत नाही म्हणून सांगितले .आम्हाला आमचे जन्मदाते कोण हे जाणण्याची उत्सुकता होती .त्यामुळे शेवटी अाम्ही तेथील संशोधक कम क्लार्कला लाच देण्याचा मार्ग अवलंबिला .त्याने दोन नावे व पत्ताआम्हाला दिला म्हणून आम्ही येथे आलो आहोत .आम्हाला आमच्या आई वडीलाना भेटण्याची उत्सुकता आहे . तुम्हीच आमचे वडील आहात का ?

ही सर्व हकीकत या मुलांच्या तोंडून ऐकून मला पूर्वीची हकीकत आठवली .मी उठलो त्यांना आलिंगन दिले आणि त्यांना सांगितले की तुम्ही माझे म्हटल्यास  आई वडील आहात किंवा भाऊ बहिण आहात काहीही असो परंतु तुमचे व माझे अतिशय जवळचे नाते आहे .असे म्हणून मी त्यांना पुढील हकीगत सांगण्यास सुरुवात केली 

माझे आई वडील रायगड कॉलेजमध्ये शिकत होते .तिथेच त्याना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झाले..त्यांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते .शिक्षण पुरे झाल्यावर त्यांनी विवाह केला. त्यानंतर सुमारे पन्नास वर्षांपूर्वी माझा जन्म झाला .पुन्हा एकदा सांगतो माझ्या आई वडिलांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते .पुनर्जन्म आहे की नाही ते माहीत नाही .असल्यास आपल्या पुन्हा गाठी होतील की नाही ते सांगता येत नाही .त्यामुळे त्यांच्या मनात एक विलक्षण कल्पना आली . तुम्ही आता सांगितले अशा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन जेनेटिक मटेरियलचे दान करावे.मुलगा मुलगी तयार करून मागणीप्रमाणे परंतु फार दूर अंतरावर त्यांना देण्यास सांगावे.  तसा कायदेशीर करार करूनच नंतर दान करावे .ती पुन्हा एकत्र येतात की नाही.पुन्हा तोच प्रेमाचा आवेग व आकर्षण त्यांना वाटते की नाही ते त्यांना पाहायचे होते.हा आवेग व आकर्षण आंतरिक आहे की परिस्थितीजन्य आहे ते त्यांना पाहायचे होते .एका अर्थी त्यांना तेच  आयुष्य पुन्हा जगायचे होते .तुम्ही तेच आहात.त्यांची ही इच्छा जगावेगळी मानावी लागेल .कदाचित ही इच्छा विक्षिप्त अनैसर्गिक आहे असेही एखादा म्हणेल .एका अर्थी तुम्ही दोघे भाऊ बहीण आहात.तुम्हाला ते आत्तापर्यंत माहीत नसल्यामुळे एकमेकांबद्दल स्त्री पुरुष आकर्षण तुम्हाला वाटत आहे .आता पुढे काय होईल माहीत नाही .आई वडिलांचा प्रयोग म्हटल्यास सफल झाला आहे असे तुम्हाला पाहून वाटते .माझे बोलणे ऐकून ती दोघे अवाक झाली .त्यांना काय बोलावे ते सुचेना .

एवढय़ात माझी पत्नी बाहेर आली .हे माझे वडील व ही माझी आई अशी मी तिला त्यांची ओळख करून दिली .आम्ही दोघे पन्नाशीतील ही दोघे वीस बावीस वयाची आणि हे माझे आई वडील हे कोडे तिला उलगडेना .ती गोंधळात पडलेली पाहून मी तिला म्हणालो, म्हटले तर ही माझे आई वडील आहेत किंवा माझे भाऊ व बहीण आहेत असे म्हटले तरी चालेल .पुढे मी तिला माझ्या आई वडिलांची इच्छा त्यांनी केलेले जेनेटिक मटेरियलचे  दान. त्यावेळी त्यांनी घातलेली विलक्षण अट.त्यातून त्यांना जे सिद्ध करायचे होते ती जगावेगळी गोष्ट  .ही सर्व समजावून सांगितली .व त्या दोघांसाठी चहा ठेवण्याला सांगितले .

माझ्याकडून ही सर्व हकीकत ऐकल्यानंतर ती दोघे आपल्या लग्नाचा हट्ट सोडतील असे मला वाटत होते .परंतू मी चूक होतो .त्यांचा एकमेकांशी लग्न करण्याचा निश्चय दृढ होता .त्यांनी मला तुमचे आई वडील कुठे आहेत .त्यांना  आम्हाला भेटायचे आहे. असे विचारले.एका अर्थी ते आमचे जन्मदाते आहेत .त्यांचे आम्हाला आशीर्वाद घेतले पाहिजेत .त्यांचा पत्ता आम्हाला द्या.आम्ही त्यांना जाऊन भेटतो. असे ती दोघे म्हणाली..

मी त्यांना तुमची इच्छा मला पूर्ण करता येणार नाही असे सांगितले .माझे आईवडील माझ्या जवळच राहत होते .वडिलांचा सात आठ वर्षांपूर्वी व आईचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला .त्यामुळे तुम्हाला आता त्यांना भेटता येणे शक्य नाही .त्यांना त्यांच्या आई वडिलांना भेटण्याची फार उत्सुकता होती .तेवढ्यासाठीच त्या इन्स्टिट्यूटमध्ये लाच देऊन त्यांनी हा पत्ता मिळविला होता .त्यामुळे त्यांना स्वाभाविक खिन्नता आली .माझ्या आई वडिलांचा प्रयोग यशस्वी झाला होता .परंतु तो पाहण्यासाठी ते दुर्दैवाने जिवंत नव्हते.

त्यांचा लग्नाचा निश्चय दृढ होता.त्या जोडीची उत्सुकता अजूनही संपली नव्हती .त्यांना माझ्या आई वडिलांचे म्हणजेच त्यांच्याही आई वडिलांचे आयुष्य कसे गेले ते जाणून घायचे होते .कारण त्यांचेही आयुष्य त्याप्रमाणेच जाण्याची शक्यता होती .

मी त्यांना माझ्या लहानपणापासूनच्या  आठवत असलेल्या हकीगती सांगण्यास सुरुवात केली.पाच वर्षांपासून मला बरेच काही आठवत होते . आई बाबांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते .एकाला ठेच लागली तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावे एवढेच काय तर त्याच्या अंगठयातून रक्तही यावे एवढे दोघांचे उत्कट प्रेम होते .एकंदरीत आरोग्यसंपन्न आयुष्य त्यांनी घालविले .शेवटची दहा वर्षे वडिलांना अल्झायमरचा विकार झाला होता.आई व आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेत असू .हळूहळू त्यांचा तो विकार इतका बळावला की ते आईला आणि आम्हालाही ओळखत नाहीसे झाले.आणि त्यातच त्यांचा अंत झाला .त्यानंतर आईही फार वर्षे जगली नाही .वगेरे सर्व हकिगत थोडक्यात सांगितली .

मी पुढे त्यांना म्हणालो जर तुम्ही विवाह केलात तर कदाचित  अशाच रोगाला तुम्हाला तोंड द्यावे लागेल.

एकालाच अल्झायमर झाला तर हरकत नाही परंतु जर दोघांनाही अल्झायमर झाला तर फार बिकट परिस्थिती ओढवेल.तसेच तुम्ही भाऊ बहिण आहात .असा विवाह जेनेटिकली कितपत योग्य आहे मला माहित नाही .त्यावर त्यांनी माझ्या म्हणजेच त्यांच्याही आई वडिलांचा फोटो मागितला.तो मी त्यांना आनंदाने दिला .त्यांना पैशाची अडचण कोणत्या कारणासाठी होती तेही विचारले.यथाशक्य त्यांची गरज भागविण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला.

हे सर्व ऐकूनही त्यांचा विवाह करण्याचा निश्चय दृढ होता .त्यांचे परस्परांवरील प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसत होते .माझा निरोप घेऊन ती जोडी परतली. त्यांचा पत्ता मी आवर्जून घेतला.आमच्याकडे तुमचे नेहमीच स्वागत आहे असेही सांगितले . ते दिसत नाहीसे होईपर्यंत मी त्यांच्याकडे दरवाज्यात उभा राहून पाहात होतो .माझ्या आई वडिलांचा प्रयोग यशस्वी झाला होता .दुर्दैवाने तो पाहण्यासाठी ते या जगात नव्हते .त्यांच्या आठवणीने माझे डोळे पाणावले .डोळे पुसत पुसत मी दरवाजा लावला .

म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माझ्या म्हातारपणी माझे तरुण आई वडील (भाऊ बहीण) पाहिले !

१७/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

. . .