अनोळखी- एक भयकथा
पल्ल्याड मन Updated: 15 April 2021 07:30 IST

अनोळखी- एक भयकथा : भाग १

भयकथा साभार http://bit.ly/2yUI7Mk

  भाग २

" चला, चला..उतरा लवकर..पंधारवाडी आली.." कंडक्टर मोठ-मोठ्या आवाजात बोलत असतो. नुकताच डोळा लागलेला समीर कंडक्टरच्या आवाजाने गडबडून जागा होतो. डोळे चोळत कंडक्टरकडे बघत बोलतो, " मामा, पंधारवाडी आहे का ही..?? कंडक्टर, " कव्हापासून घसा ताणून ओरडतोय, झोपला व्हतास काय..?? व्हय, पंधारवाडीच हाय ही..उतर पटकन, एसटी सुटल आता.."

“हा-हा.." घाई-घाईतंच बॅग खांद्याला अडकवत समीर बोलतो. एसटीमधून उतरत असताना दरवाज्याच्या बाजूच्याच सीटवर बसलेला एक म्हातारा माणूस समीरला गूढ आवाजात बोलतो, " पोरा..जरा जपून -हा. ही येळ चांगली न्हाय .." समीर त्या म्हाता-याकडे जरा आश्चर्याने बघतंच एसटीमधून उतरतो. फक्तं समीर सोडला तर त्या स्टाॅपवर तेव्हा एकही प्रवासी उतरला नव्हता. समीर उतरल्या बरोबरंच एसटी तिथून निघून जाते. आता रात्रीचे जवळ-जवळ साडेबारा वाजले होते. एसटीला पंधारवाडीला पोहोचायला तब्बल सहा तास ऊशीर झाला होता. त्यामुळे तिथे समीरशिवाय एक चिटपाखरूसुद्धा नव्हतं. आजू-बाजूला तर नुसता अंधारंच पसरलेला होता. रात किड्यांच्या आवाजाव्यतिरिक्त त्यावेळे कसलाच आवाज तिथे शांतता भंग करण्यासाठी नव्हता. कुणी माणूस दिसतय का हे बघण्यासाठी समीर तिथून थोडासा पुढे चालायला लागतो. पण, दूरपर्यंत नजर टाकली तरी त्याला तिथे अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. शेवटी, रात्रं तो एसटी स्टँडवरंच काढायचं ठरवतो. ते एसटी स्टँडसुद्धा नावालाच होतं. एक सिमेंटचा तुटलेला बाकडा आणि त्याच्या बाजूलाच थोडा वाकलेला लाईटीचा खांब, एवढीच काय ती एसटी स्टँड म्हणून केलेली सोय..!! समीर खांद्यावरची बॅग काढत त्या बाकड्यावर येवून बसतो. खिशातून मोबाईल काढून तो नेटवर्क आहे का पहायला लागतो. पण, गाव थोडं आड वाटेला असल्यामुळे मोबाईला रेंज नव्हती. मित्राच्या लग्नासाठी त्याच्या गावी आलेला समीर आजची रात्रं नाईलाजाने का होईना पण, एसटी स्टँडवर एकट्यानेच काढणार होता, निदान असं त्याला तरी वाटत होतं..!!

बराच वेळ झाला होता समीर स्टँडवर बसून. आता रात्रीचे दिड वाजून गेले होते. समीर त्याच्या हातातल्या मोबाईलमध्ये जुने  whatsapp वरचे मॅसेजेस वाचण्यात गुंग झालेला होता. मोबाईलला अजूनही नेटवर्क मिळाला नव्हता. त्यामुळे कोणाचाच फोन आणि मॅसेज त्याला आला नव्हता आणि ना त्यालाही करता येत होता. जुने मॅसेज वाचता-वाजता अचानक त्याला whatsapp वर Unknown no. वरून एक मॅसेज येतो. नेटवर्क नसतानाही समीरला तो मॅसेज आलेला असतो. त्यामुळे त्याला थोडं आश्चर्य वाटतं. नक्की काय मॅसेज आहे हे पाहण्यासाठी समीर मॅसेज open करतो. त्या Unknown no. वरचा मॅसेज असा असतो, " Hi, मी सावित्री. ओळखलंस का मला..?? " हा मॅसेज वाचून समीरला धक्काट बसतो. त्याला तसं कारणही होतं. एकतर नेटवर्क नसताना समीरला मॅसेज आलेला असतो, तोसुद्धा एवढ्या रात्री आणि तेसुद्धा एका मुलीचा मॅसेज. ती मुलगीसुद्धा समीरसाठी अनोळखीच होती. कारण, समीर सावित्री नावाच्या एकाही मुलीला ओळखत नव्हता. एकामागोमाग पडलेल्या प्रश्नाने समीर थोडा हैराण होतो. मनाने खंबीर असल्यामुळे समीरला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं पण, भिती नव्हती वाटत..!!

मोबाईलला नेटवर्क नव्हता त्यामुळे, तिला रिप्लाय कसा करायचा हे त्याला कळत नव्हतं. पण, तिचाही मॅसेज कुठलाही नेटवर्क नसताना आला होता मग, आपणही बघूया Try करून जातोय का मॅसेज, असा विचार समीरच्या डोक्यात तेव्हा घोळत होता. शेवटी विचार करून तो मॅसेज Type करायला लागतो. " Hello, सावित्री. पण, sorry..मी तुला ओळखत नाही. मला वाटतय कदाचित तु चुकीच्या नंबरवर मॅसेज केला आहेस." असा मॅसेज Type करून समीर तिला तो send करतो. त्याचाही मॅसेज नेटवर्कची एक कांडीसुद्धा शिल्लक नसताना तिला पोहोचतो..!!

 (क्रमशः)

लेखक : सतीश रमेश कांबळे
. . .