पाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा : भाग ३
वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगाने नेहमीच सामान्यांचे कुतुहूल जागृत केले आहे. हि एक अशी कथा आम्हाला तंत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. संपूर्ण कथा काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत त्या सर्वांचा आदर आम्ही करतो.
गुरुची पावले मंद झाली. निमुळती वाट आता जवळ जवळ गायब झाली होती. आता झाड झुडुपातून वाट शोधत ते पुढे जात होत. रात्रीच्या शांततेचा भंग करत दुरून कोल्ह्यांचा आवाज ऐकू येत होता. मधूनच कधी कधी एखादे घुबड उडताना दिसायचे. बऱ्याच वेळाने अंगभर काटेरी झाडांचे ओरखडे वगैरे आल्या नंतर गुरुदेवांना जुनाट भूमी सापडली. कदाचित शेकडो वर्षां पूर्वी हि स्मशानभूमी म्हणून वापरात होती. सह्याद्रीच्या जंगलात काय काय रहस्ये होती महावराहाच जाणे. एके काळी जिथे मोठी मोठी शहरे होती तिथे आता वनदेवीचे साम्राज्य होते. राजांचे आलिशान महाल, जिथे रेशमी पडदे पसरले होते तिथे आता फक्त भग्न भिंतीच होत्या आणि त्यावर वेलींचे आवरण. जिथे एके काळी अनावृत्त ललनाची क्रीडा चालली होती तिथे आता माकडे खेळत होती. काळाच्या उदरात सर्व काही जाऊन गडप होते. शुकाने ह्याचा प्रथम दर्शनी अनुभव ह्याच जंगलात घेतला होता.
गुरुदेवांनी एक पायावर उभे राहून मंत्रसाधना केली. गुरुदेव जिथे उभे होते तिथे वडाचे एक विस्तृत झाड उभे होते. अमावास्येच्या काळोखांत सुद्धा ते प्रचंड झाड युद्धभूमीवरील एक काळ्याभोर हत्ती प्रमाणे वाटत होते. गुरुदेवांनी आपल्या हातातील दंड प्रचंड वेगाने फिरविला. कुणी माणसाला इतक्या वेगाने हालचाल करता शुकाने प्रथमच पहिले असेल. हातातील दंड वेगाने फिरवून गुरुदेवांनी दंड जोरांत जमिनीत गाडला. धरणी जणू काही कंप पावली असेल असा भास झाला. आजूबाजूचा सर्व झाडातून झोपलेले पक्षी, वटवाघुळे इत्यादी कर्कश आवाज करत उडून गेले. रात्र पूर्णतः काळीं असली तरी अचानक प्रकाश पसरावा तसे वातावरण निर्माण झाले. प्रकाशाचा स्रोत कुठेच नव्हता पण तरी सुद्धा सर्वकाही पूर्वीपेक्षा फारच स्पष्ट दिसत होते. स्मशानाच्या दूरच्या बाजूला एक पाण्याचा मंद झरा वाहत होता. वटवृक्षाच्या आजूबाजूलाल दगडी बांधकाम दिसत होते. प्रेते अग्नीला देण्यासाठी जागो जागी चौथर्यांचे अंश सुद्धा दिसत होते. किमान १०-१२ प्रेते एका वेळी जाळता येऊ शकतील इतकी मोठी भूमी होती. शुकाने गुरुच्या जवळ जाऊन पायावर लोटांगण घातले. र
क्तसंभव गुरूंचा चेहरा इतका वेळ उग्र होता त्याची चर्या थोडी मंद झाली. गंभीर भाव जाऊन अभय भाव उत्पन्न झाला. आपल्या हातानी गुरूंनी मुद्रा करून आपले मौन तोडले. "भद्र शुक, तुझी इच्छा पूर्ण करण्या साठी मी तुला इथे आणले आहे. काल मी ह्याच जमिनीवर मी हाच प्रयोग पहिल्यांदा केला होता. त्या दिवसापासून आज पर्यंत तो क्षण मी अनेकदा जगलो. अग्नीच्या ज्वाळेवर ज्याप्रमाणे कीटक झेप घेतात त्या प्रमाणे मी ह्या सिद्धीवर झेप घेतली. पण कीटक तात्काळ मरून जातो मी हजारदा मेलो. जीवन आणि मृत्यू ह्यांच्या दरम्यान मी नृत्य केले. काळ जणू काही थांबून गेला आणि त्याच क्षणी जणू काही प्रचंड वेगाने सुद्धा गेला. सर्व सृष्टी जणू काही एकाच वेळी उलगडली आणि नष्ट सुद्धा झाली. युवा रक्तसंभवाला तहान होती, तहान होती शक्तीची, तंत्र विद्येची, विश्वाच्या रहस्यांची, काळाच्या उदरातील खोलीत उडी मारून सर्व काही पाहण्याची आणि मी ते सर्व काही पहिले. माझी तहान भागली नाही उलट वाढली. प्रत्येक रहस्याबरोबर आणखीन रहस्ये दिसत गेली. इंद्रजाल प्रमाणे प्रत्येक अस्तित्वाचे प्रतिबिंब प्रत्येक अस्तित्वात दिसत गेले." गुरु रक्तसंभव भावना विरहित होते. त्यांच्या शब्दांत एक ओढ होती पण चेहरा निर्विकार होता.
हाडामासाचा वाटणारा हा साधारण साधू असाधारण आहे हे शुकानें स्वतःच्या डोळ्यांनी पहिले होते "काल एक युवा अपरिपकव तांत्रिक ज्ञानाच्या गर्वांत इथे आला आणि अज्ञानाच्या अंधाराला घाबरून पळून गेला. आज पर्यंत मी त्यापासून पळत आहे. समाजापासून, मृत्यूपासून मी पळत आहे. " गुरु बोलत होते पण शुकाला समजणे थोडे मुश्किल होते. गुरुदेव नेहमीच कोड्यांत बोलत तर कधी अगदी विचित्र बरळत असत. कधी ना ऐकलेल्या भाषांत ते बोलत तर कधी काही कुणी ना पाहिलेल्या जनावरांचे वर्णन करत. देवी विद्याच्या मते गुरुदेवांना काळाच्या अस्तित्वाचा विसर पडतो कारण ते ध्यानमग्न होऊन काळसंचार करत असतात. ह्याच लोकांत नाही तर अनेक लोकांचं त्यांचे वास्तव्य असते. गुरु जेंव्हा काल म्हणतात ह्याचा दहा हजार वर्षा मागे सुद्धा असू शकतो अशी ताकीद विद्याने दिलेली असल्याने गुरुदेवांचे संभाषण तो तोढे जपूनच समजण्याचा प्रयत्न करीत असे.
पण गुरुदेवांच्या ह्या वागण्याचे त्याला आश्चर्य नव्हते. शुक स्वतः तंत्र साधना करायला लागल्या पासून त्याला काळाचा विसर पडत होता. ध्यानातून तो खोल काळोख्या दरीत पडत होता तर कधी स्वतःला उंच पर्वत शिखरावर उभा असल्याचा भास घेत होता. कधी सापांनी भरलेल्या विहिरींत तर कधी अग्नीत जळून तो मरत आहे असा अनुभव घेत होता. खरे तर त्याला लहान पणा पासून ज्या ज्या गोष्टींची भीत वाटत होती त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्याला येत होता. अनेकदा तर ह्या अनुभवाने त्याची अंगवस्त्रे ओली व्हायची. अश्या परिस्थितीत शेवटी गुरुदेवांनी त्याला विवस्त्र करून माथ्यावरून थंड पाण्याची धार विद्याला सोडयला सांगितले होते. पाणी असते तर शुकाने सहन केले असते पण ते पाणी सुद्धा सिद्ध होते. एका एका थेंबातुन कधी कधी त्याला प्रचंड आनंदाची अनुभूती येत असे तर कधी कधी व्याकुळता. कधी कधी महासागराच्या वादळांत आपण सापडलो आहो असा भास व्हायचा तर कधी जंगली श्वापदे आपल्या मासाचे लचके काढून खात आहेत असा भास व्हायचा.
साधना कठोर होती पण गुरु रक्तसंभव फारच मोठे सिद्ध होते. महावरहाचा कदाचित पृथी तळावरील शेवटचा आणि सर्वांत अनुभवी भक्त रक्त संभव होते. त्यांच्या स्पर्शाने सुद्धा दशकांची प्रगती होऊ शकते असे देवी विद्याचे मत होते. महावारः ह्या दैवताला शुकाने पहिल्यांदाच अनुभवले होते. खूप खूप वर्षांमागे महावराह फार मोठे जागृत दैवत होते पण तो काळ गेला आणि आता नवीन देवांचा काळ उत्पन्न झाला होता. काचेवरील उछवास ज्याप्रमाणे हळू हवेंत विरून जातो तसे महवराहाचे अस्तित्व पृथीवरून दंतकथा बनून नष्ट झाले होते. पण गुरु रक्त संभव मात्र आपली तपस्या करत जिवंत होते. ते किती वर्षे जगले ह्याला हिशोब नव्हता. म्हणे ते जेंव्हा पृथीवर विहार करत होते तेंव्हा पृथीवळ दोन चंद्र होते. आधुनिक तंत्रसाधना आणि महावरहाची तंत्र साधना ह्यांत फार मोठा फरक होता.
महवराहच्या साधनेत आत्म्याचे ९ बंध तोडण्याचे शिक्षण होते. संकोच, काळ, भय, स्मृती, रक्षण, वेदना, प्राण, अस्तित्व आणि सापेक्ष. गुरु रक्तसंभव ९ हि बंध तोडू शकत होते आणि शुकाची साधना ३ बंध वर बंद पडली होती. आणखीन पुढे जाण्याची पात्रता शुकात नव्हती असे गुरुदेवांचे म्हणणे होते. बंध तोडण्यासाठी आपला आत्मा एकाग्र करणे जरुरीचे असते पण जीवित व्यक्तीला आपल्या आत्माचि अनुभूती नसते. त्यामुळे अनेकदा साधक आत्म्या ऐवजी मनाला केंद्रित करतात अश्या साधकांना स्मृती बंध तोंडात येत नाही. आपल्या आठवणी, पूर्वआयुष्य ह्यातून ते मुक्त होऊ शकत नाहीत. शुकाला मुक्त व्हायचे सुद्धा नव्हते कारण तो साधने साठी आला त्याचे कारण त्याच आयुष्यांतील आठवणी होत्या. त्या आठवणी शिवाय त्याला जगायची इच्छा नव्हती.