डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
सौरभ वागळे Updated: 15 April 2021 07:30 IST

डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य : प्रकरण 8

स्वतःला डीटेक्टिव म्हणवणारा अल्फा आणि त्याचा पुस्तकी किडा मित्र प्रभव एक रहस्य कसे उलगडवतात

प्रकरण 7   प्रकरण 9

" अमेझिंग!! " मी भलताच प्रभावित झालो होतो, " जस्ट अमेझिंग!! तुझ्या विचारशक्तीला सलाम आहे अल्फा!! तू एखाद्या निष्णात गुप्तहेरासारखा काम करतोयस. "



ती शनिवारची सकाळ होती. माझ्या कॉलेजला सुट्टी होती आणि अल्फाने त्याच्या कॉलेजला नेहमीप्रमाणे दांडी मारली होती. काल समडोळीहून उशिरा परतल्यानंतर सकाळी आम्ही दोघेही जरा उशीराच उठलो होतो. कालच्या यशामुळे आमचे मन आनंद आणि उत्साहाने भरून आले होते.



" तुला काय वाटले, मी फक्त हवेतच गोळ्या मारत होतो? मी काही एखाद्या निष्णात गुप्तहेरापेक्षा कमी नाहीये बरं का!! "अल्फा नाटकीपणे म्हणाला, " चला. एक गोष्ट तर चांगली झाली. आता इथून पुढे मी माझी ओळख 'एक गुप्तहेर' अशी करून दिल्यावर निदान तू गालातल्या गालात हसणार तरी नाहीस! "



अल्फाने माझ्याकडे बघून डोळा मारला. मला थोडे वरमल्यासारखे वाटले.



" तू मला हसताना पाहिलं होतंस तर. " मी म्हणालो.



" होय. " अल्फा हसून म्हणाला, " असू दे रे. मला काही फरक पडत नाही. सगळ्यांनाच प्रथमदर्शनी मी कोणी गुप्तहेर वगैरे असेन असे वाटत नाही. माझा अवतारच असा विचित्र असतो, त्याला तुम्ही तरी काय करणार! "



मी त्याच्या उभ्या केलेल्या केसांकडे पाहून हसलो.



" बरं. महाशय, आता पुढे काय करायचे आहे, त्याचा विचार करा. " मी म्हणालो.



" सडपातळ, विस्कटलेल्या केसांची व्यक्ती. " अल्फा विचार करीत म्हणाला, " ज्याअर्थी त्या व्यक्तीच्या शरीराला आयोडीनचा वास येत होता, त्याअर्थी तिचा दवाखान्यात वावर असला पाहिजे. शिवाय, पायांत बूट होते, म्हणजे ती कोणी हलकीफुलकी व्यक्ती नसावी. कदाचित एखादा डॉक्टर.. "



" त्यावेळी रखवालदार तुकारामने एका डॉक्टरचे नाव सांगितले होते ना? चेअरमनसाहेबांचे निकटवर्तीय..?? " मला एकदम आठवले.



" डॉक्टर शिंगारे. " अल्फा निर्विकारपणे म्हणाला, " पण काहीही फायदा नाही. अनिल पाटलाने केलेल्या वर्णनाशी डॉ. शिंगारेंची शरीरयष्टी मुळीच जुळत नाही. तो तर चांगला गुबगुबीत माणूस आहे. त्यातच, त्यांना टक्कल आहे. "



" मग? आता काय?? " माझा चेहरा थोडासा पडला. अल्फा विचारांत बुडाला. तितक्यात त्याचा मोबाईल खणाणला.



" हॅलो.. " अल्फा बोलला, " हां बोला सर. "



फोन वाघमारे सरांचाच असणार, मी ताडले. फोनवर बोलतानाच अल्फाचा चेहरा चिंताग्रस्त झाला. मिनीटभरात त्याने फोन ठेवला.



" काय झाले? काय सांगितले वाघमारे सरांनी? " मी कुतूहलाने विचारले.



" सुधाकर लिमयेंची तब्येत ढासळली आहे. " अल्फा म्हणाला, " संग्रहालयाचे चेअरमन. त्यांना जेवणही जात नाहीये म्हणे. आपल्याला त्यांना भेटून यायला हवे. "



" कुठल्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहेत ते? "



" अं हं. हॉस्पिटलमध्ये नाही. घरीच औषधपाणी चालू आहे त्यांच्या. आपण आत्ताच निघूया, आवरून. मार्केट यार्डालगत त्यांचे घर आहे. कोण जाणे, आपल्याला तेथेच कोणीतरी सडपातळसा चेअरमनचा निकटवर्तीय भेटेल कदाचित.. "



अर्ध्या तासातच आम्ही लिमयेसाहेबांच्या घरापाशी होतो. चेअरमनसाहेबांचे घर छोटेखानी, दुमजली आणि सुटसुटीत होते.



" या रे पोरांनो. " दार वाघमारेंनीच उघडले, " वरती चला. लिमये सरांची रूम वरती आहे. आणि हो.. ", वाघमारेंनी अल्फाकडे करड्या नजरेने पाहिले.



" नीट सभ्यपणे वाग. लिमये हे खुप बडे गृहस्थ आहेत. त्यांची तब्येत बरीच खालावली आहे. त्यामुळे रत्नजडित खंजिराबद्दल काही विचारले, तर तपासात बरीच प्रगती आहे, असे सांग. तेवढाच त्यांना धीर मिळेल. "



" हो सर. " अल्फा म्हणाला. बिचाऱ्या वाघमारेंना माहितीच नव्हते, की तपासात त्यांच्या कल्पनेपेक्षाही 'बरीच' प्रगती झाली होती. वाघमारे वरती जाताच अल्फाने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले.



दारालगत असलेला जिना आम्ही चढलो. खालच्या मजल्यावर हॉल व किचन इतकेच होते. घर बऱ्याच वर्षांपूर्वी बांधले असावे. जिन्याच्या पायऱ्या लाकडी होत्या. वरच्या मजल्यावर आणखी दोन खोल्या होत्या. वाघमारे पहिल्या खोलीत शिरले आणि त्यांच्या मागोमाग आम्हीही शिरलो. आतमध्ये जाडेल्या देहाचे, बुटके आणि पांढऱ्या कोटमधले डॉक्टर उभे होते आणि शिवाय श्री सावंत, म्युझियमचे संचालकही तेथे होते.



"या, अल्फा आणि प्रभव. " सावंत म्हणाले. त्यांच्या बाजूलाच पलंगावर एक वृद्ध मनुष्य पहुडला होता. तुरळक, काळे - पांढरे, अस्ताव्यस्त असे केस, सुरकुतलेला आणि मलूल पडलेला चेहरा, खंगलेला देह अशी त्यांची स्थिती त्यांना बसलेला धक्का दर्शवित होती. वय साठीच्या उंबरठ्यावरचे असावे. त्यांना घरातच सलाईन लावले होते.



"लिमये सर, हे दोन तरूण म्हणजे अल्फा आणि प्रभव. वाघमारे सरांचे सहाय्यक. रत्नजडित खंजिराचा छडा लावण्यात हे वाघमारेंची मदत करीत आहेत. " श्री सावंतांनी लिमयेंना सांगितले.



" अच्छा.. " लिमये क्षीण आवाजात म्हणाले, " तपास कुठपर्यंत आलाय मग? काही सुगावा लागला का..? "



" होय सर. काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे आमच्या. आणखी थोडा शोध घेणे आवश्यक आहे. आम्ही गुन्हेगारापासून फार लांब नाही. "



" खुपच छान.. खुपच छान.. " लिमये स्मित करीत म्हणाले, " रत्नजडित खंजिर हा संग्रहालयाचा प्राण आहे. तो त्याच्या मुळ जागी प्रस्थापित झाल्याखेरीज मला काही शांती मिळणार नाही. मी तुम्हाला विनवणी करतो.. कृपया तो खंजीर लवकरात लवकर शोधून काढा आणि तो चोरणाऱ्या दुष्टाला चांगलीच अद्दल घडवा. हे प्रकरण आपल्याखेरीज आणखी कोणाला कळालेले तरी नाही ना? "



" नाही, लिमयेसाहेब. ही गोष्ट आम्ही अतिशय गुप्त ठेवली आहे. " वाघमारे म्हणाले.



" चांगली गोष्ट आहे. " लिमये म्हणाले, " हे प्रकरण पोलीसी अखत्यारीत गेलेले नसल्यामुळे तुम्हाला हवी ती कृती झटकन करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचा तुम्ही फायदा उठवा. उद्या संग्रहालयाच्या तपासणीचा दिवस आहे. त्या तपासणीत जर संग्रहालयातील खंजीर खोटा आहे असे आढळले, तर हाहाकार होईल.. त्यामुळे शक्य तितक्या लवकर पावले उचला. "



" आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आम्ही उद्याच्या आत तो खंजीर शोधून काढू. गुन्हेगाराची रुपरेषा सध्या आमच्यापाशी आहे. फक्त ती व्यक्ती आमच्या नजरेस पडायची बाकी आहे. " अल्फा म्हणाला.



" काय सांगता..?? " विस्मयाने लिमये म्हणाले, " वाघमारे साहेब, तुमची ही मुलं फार तल्लख आणि तरबेज दिसतात! "



" अं.. हो ना.. तसं मी पहिलाच प्लॅनिंग केलं होतं. हे दोघे फक्त त्यानुसार काम करीत राहिले आणि त्यामुळेच आम्ही या प्रकरणात बरेच खोल जाऊ शकलो. " वाघमारे म्हणाले.



" गुड, गुड! समाधानकारक प्रगती आहे. तुम्ही गुन्हेगाराला लवकरच शोधाल, अशी आशा वाटते. " लिमये म्हणाले.



" श्री लिमये, तुम्हाला आता विश्रांतीची गरज आहे. आत्ता थोडा चहा आणि बिस्किटे खाऊन गोळ्या घेतल्यात, तर बरं होईल. " डॉ. शिंगारे म्हणाले.



" मी चहा आणतो." सावंत म्हणाले. ते खाली गेले आणि त्यांनी सर्वांसाठी चहा आणला.



अल्फाने चहा पिता पिता त्या खोलीवर आपली शोधक नजर फिरविली. तशी दाटीवाटीचीच खोली होती ती. उजव्या बाजूला कपाट होते. मधोमध लिमयेंचा पलंग होता आणि डाव्या बाजूला खिडकी होती, ज्यातून सूर्याची किरणे खोलीत प्रवेशत होती. अल्फा खिडकीपाशी गेला. ती खिडकी रस्त्याच्या बाजूला होती आणि रस्त्यावरची सकाळची तुरळक रहदारी तेथून दिसत होती. खिडकीच्या बाजूलाच एक शिडी ठेवली होती आणि ती थेट खालच्या छोट्याशा, लिमयेंनी बनविलेल्या बगीचात उतरत होती. अल्फा पुन्हा मागे वळला, तेव्हा त्याच्या पायांना काहीतरी लागले. ते बुट होते. त्यांवर लालसर मातीची धूळ बसली होती. अल्फाने ते व्यवस्थित बाजूला ठेवले आणि तो पुन्हा खुर्चीपाशी आला.



"चला, श्री लिमये, आम्ही निघतो. " वाघमारे म्हणाले, " तुम्ही विश्रांती घ्या. आम्ही प्रयत्न करतोच आहे. काही हाती लागले, तर डॉ. शिंगारेंकरवी तुम्हाला कळवूच. तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका. "



लिमयेंनी हलकेच मान डोलावली. वाघमारे, अल्फा आणि मी खाली आलो. सावंत आम्हाला सोडायला दारापर्यंत आले.



" मला एक गोष्ट नाही समजली. " अल्फा सावंतांना म्हणाला, " श्री लिमये इतके आजारी असूनही त्यांना घरीच का ठेवले आहे? मला असं म्हणायचंय, की जर ते दवाखान्यात असते, तर अधिक चांगला इलाज होऊ शकला असता. "



" त्यांचा स्वतःचाच हट्ट! " सावंत म्हणाले, " संग्रहालयात ही दुर्घटना घडण्याआधीही श्री लिमये थोडे आजारी होतेच. घरी झोपूनच होते. त्यातच ही बातमी ऐकल्यानंतर त्यांची तब्येत आणखीनच खालावली. आम्ही म्हणतच होतो, की त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायला हवे. पण त्यांनीच विरोध केला. जे काही उपचार करायचे असतील ते घरीच करा, असे ते म्हणाले. म्हणून डॉ. शिंगारेंनी लिमयेंना घरीच सलाईन्स, इंजेक्शन्स पुरविण्याची व्यवस्था केली. "



" ओह. अच्छा. " अल्फा म्हणाला, " ठिक आहे तर. आम्ही निघतो. काही हाती लागले, तर आम्ही तुम्हाला कळवूच. "



आम्ही घराच्या कुंपणाबाहेर आलो. अल्फाचे डोळे साशंक दिसत होते. त्याने आजुबाजुला नजर फिरविली. रस्त्याच्या कडेला, लिमयेंच्या कुंपणालगत लाल माती पसरली होती. अल्फाने क्षणभर तिकडे पाहिले. मग पुन्हा वळून श्री लिमयेंच्या खोलीच्या खिडकीकडे पाहिले. अचानक त्याच्या चेहऱ्यावरचा ताण जाऊन त्याठिकाणी एक वेगळाच तजेला दिसू लागला. वाघाला आपल्या सावजाचा सुगावा लागावा, तसे भाव त्याच्या डोळ्यांत तरळले.



"ते जरा अतीच होतं. " वाघमारे म्हणाले, " 'गुन्हेगाराची रुपरेषा आमच्यापाशी आहे' म्हणे! कसली डोंबलाची रुपरेषा..! त्यांचं फक्त समाधान करायचं होतं आपल्याला, खुष करायचं नव्हतं. बिचारे आता दिवसभर आपल्यासाठी डोळे लावून बसतील, कधी हे गुन्हेगाराला पकडतात म्हणून. तू ना अल्फा, नेहमीच काहीतरी गोंधळ करत असतोस. आता उद्यापर्यंत काही हाती लागलं नाही, तर मी काय उत्तर देऊ त्यांना?? "



अल्फाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. तो अजुनही लिमयेंच्या खिडकीकडेच पहात होता.



" तू ऐकतोयस ना? " वाघमारेंनी विचारले, " हे बघ अल्फा. आपल्याकडे वेळ खुपच कमी आहे. उद्या याच सुमारास खंजीर चोरीला गेल्याची बातमी फुटण्याच्या मार्गावर असेल. आपल्याला झटपट हात हलवायला हवेत. मी हरतऱ्हेने शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. पण यावेळी पोलीस डिपार्टमेंट माझ्या मागे नसल्यामुळे थोडे कष्ट पडताहेत. आजच्या दिवसात काहीतरी आपल्या हाती लागायलाच हवे आहे. आपण लिमये व सावंतांना आश्वासन दिले आहे. त्यांच्या विश्वासाला आपण पात्र ठरले पाहिजे. "



वाघमारेंच्या चेहऱ्यावर चांगलाच तणाव दिसत होता.



" आपण त्यांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरणार आहोत. "अल्फा म्हणाला, " काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या हाती लागलेल्या आहेत, ज्या आम्ही तुम्हाला अजून सांगितलेल्या नाहीयेत. "



" काय सांगतोस? " वाघमारे जवळपास उडालेच, " कधी सांगणार आहेस मग? खंजिरचे पितळ उघडे पडल्यावर?? "



" संपूर्ण माहिती मिळाली, की लगेचच मी तुम्हाला सर्वकाही व्यवस्थित सांगतो. थोडा धीर धरा. आज कदाचित आम्हाला तुमची गरज पडू शकते. मी तुम्हाला फोन करेन आणि तेव्हाच सविस्तर सांगेन. "



" बरं बाबा. ठिक आहे. " वाघमारेंसमोर शांत बसण्याखेरीज पर्यायच नव्हता, " मी तुझ्या फोनची वाट पाहेन. "



इतके बोलून ते निघून गेले. मग अल्फा एकदम मला म्हणाला, " प्रभव, तू दोन मिनिटे इथेच थांब. मी जरा वरती जाऊन येतो. " तो मागे वळला.



" पुन्हा वरती? कशाला?? " मी काही न समजून म्हणालो. पण तितक्यात अल्फा दार उघडून वरती गेलासूद्धा! आणि गेला तसा मिनीटभरातच परतही आला.



" तुला मधुनच काय होते काही समजत नाही बाबा! " मी म्हणालो, " वरती का गेला होतास? "



" अरे, त्या तिघांचेही फोन नंबर घेऊन आलो - सावंत, शिंगारे आणि लिमये. शिवाय डॉ. शिंगारेंना काही विचारायचे होते. "



" काय विचारलेस? "



" श्री लिमये किती दिवसांपासून आजारी आहेत आणि त्यांच्यावर औषधपाणी किती दिवसांपासून चालू आहे, त्याची चौकशी केली. " अल्फा म्हणाला.



" पण त्याच्याशी आपल्याला काय कर्तव्य? असतील थोडे आजारी. तसेही साठीचे दिसतातच की. " मी बेफिकीरीने म्हणालो.



" अरे प्रभव, माझ्या भोळ्या मित्रा, आयोडीनचा वास फक्त डॉक्टर किंवा नर्सच्याच शरीराला यावा, असे काही बंधन नाही. तो रुग्णाच्या शरीरालाही येऊ शकतो..!!! " अल्फा चमचमत्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात म्हणाला. मी 'आ' वासून त्याच्याकडे पाहतच राहिलो...



*



तो पूर्ण दिवस अल्फाची शोधमोहीम सुरूच राहिली. दिवसभर तो रुममध्ये नव्हताच. कुठेकुठेतरी भटकत होता. फक्त दुपारच्या जेवणावेळी तो मेसमध्ये मला भेटला. त्यावेळी तो डॉ. शिंगारेंकडे जाऊन आला होता. शिवाय श्री सावंतांनाही भेटला होता. आणखीही काही कामे शिल्लक आहेत, असे तो म्हणाला. मग पुन्हा गायब झाला. एक मात्र निश्चित होते - अल्फा या प्रकरणाच्या एका अनपेक्षित निष्कर्षाच्या मागावर होता..!!



संध्याकाळी पाचच्या सुमारास जेव्हा अल्फा परतला, तेव्हा माझ्या मॅथ्सच्या दोन एक्सरसाईजेस सोडवून झाल्या होत्या आणि एक मस्त झोपही काढून झाली होती.



"झाली का भटकंती? हवे होते ते मिळाले की नाही? " मी डोळे चोळत अल्फाला विचारले.



" मिळाले की नाही म्हणजे काय! चांगला सुपडासाफच करून टाकलाय मी आज या प्रकरणाचा! खंजिराचा चोर नक्की कोण आहे, याबाबत आता मी बिनधोकपणे बोलू शकतो. पण निघालेला निष्कर्ष धक्कादायक आहे, हे मान्यच करायला हवं. " अल्फा म्हणाला, " खुद्द चेअरमनसाहेबांनीच हा पराक्रम केलेला आहे!! "



" हं.. मला सकाळीच, जेव्हा तुझी नजर चेअरमनांच्या घरावरून साशंकतेने भिरभिरत होती, तेव्हाच वाटले होते, की या पठ्ठ्याला काहीतरी सापडले आहे, काहीतरी खटकले आहे. पण खरंच, हे सत्य मनाला सुन्न करणारे आहे. " मी म्हणालो.



" होय, वादच नाही. " अल्फा म्हणाला, " मी वाघमारे सरांना आत्ताच फोन करून सत्य परिस्थितीची अगदी सुरूवातीपासून माहिती दिली. बाकी कोणालाच मी काही बोललेलो नाहीये. कारण प्रत्येकाला मानसिक धक्के देण्याची माझी मुळीच इच्छा नाहीये. हे प्रकरण जितक्या गुप्तपणे संपेल, तितके चांगले आहे. आपल्यासाठीही आणि ही गोष्ट माहीत असणाऱ्यांसाठीही. "



" पण मला हे समजले नाही, की तुला त्या घरात असे काय दिसले, ज्यामुळे तुझे निशाण श्री लिमयेंवर रोखले गेले? कशावरून तू निष्कर्ष काढलास, की रत्नजडित खंजीर लिमयेंनीच चोरला आहे?? "



मी माझ्या मनात घर करून बसलेला सर्वाधिक कुतूहलाचा प्रश्न विचारला. अल्फा बोलू लागला,



" खरे तर हा निष्कर्ष खूप आधीच निघणे शक्य होते- जेव्हा मी चेअरमनसाहेबांच्या निकटवर्तीयांची माहिती काढत होतो तेव्हा. पण माझा निष्काळजीपणा आणि कमकुवत विचारक्षमतेमुळे आपल्याला इतका विलंब लागला. माझ्या तपासातून एक निकटवर्तीय सुटला होता - स्वतः चेअरमनसाहेबच!! त्यांचा स्वतःइतका निकटवर्तीय कोणीच असू शकणार नाही, हे माझ्या लक्षात यायला हवे होते. साहजिकच त्यांना स्वतःच्या केबिनची इतर कोणाहीपेक्षा अधिक चांगली माहिती असणार. पण श्री सावंतांनी, मंगळवारी रात्री जेव्हा आपण वाघमारे सरांसोबत संग्रहालयात गेलो होतो, तेव्हा सांगितले की, चेअरमनसाहेब आधीपासूनच आजारी आहेत आणि खंजीर चोरीला गेल्याची बातमी ऐकून त्यांची तब्येत आणखीनच बिघडली आहे. त्यामुळे माझ्या मनातून त्यांचा विचारच बाजूला पडला. गुन्हे संशोधनात आपल्या कानावर पडलेले वाक्य न् वाक्य आणि डोळ्यांनी पाहिलेले दृश्य न् दृश्य किती काळजीपूर्वक विचारात घ्यावे लागते, याची प्रचितीच मला यातून आली.



पण लिमयेंना आपण भेटायला गेलो, हे आपले सुदैवच म्हणावे लागेल! माझा निसटलेला धागा मला तेथेच मिळाला. लिमयेंच्या खोलीमध्ये शिरल्यानंतर त्यांच्याकडे पाहूनच माझे डोळे सतर्क झाले. उंच आणि सडपातळ देहयष्टी, बराच काळ बिछान्यावर पडल्यामुळे विस्कटलेले केस आणि आजारपणात रूग्ण घालतात तसे ढगळ कपडे.. अगदी अनिल पाटलाने वर्णन केले होते, तशीच व्यक्ती होती ती. त्यातच खोलीमध्ये आयोडीनचा वास भरून राहिला होता. त्यामुळे हळूहळू माझा संशय अधिकच बळावू लागला. मग मी इकडे तिकडे आणखी काही दिसते का, ते पाहू लागलो. मला खिडकीच्या बाजूला उभी असलेली शिडी दिसली. शिवाय खिडकीच्या खालीच रूममध्ये लिमयेंचे बूट दिसले. बूट हे कधीही दरवाजापाशी असतात, घरात प्रवेशल्यानंतर काढून ठेवायला. पण वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये बूट?? खटकण्यासारखीच गोष्ट होती ही थोडी. शिवाय त्या बूटांवर लालसर मातीची धूळ होती, जी मी खाली आल्यानंतर लिमयेंच्या घराच्या कुंपणाबाहेर पाहिली. याचा अर्थ सरळच होता. लिमये खिडकीतून खाली शिडीवरून उतरून त्या रात्री संग्रहालयात गेले असावेत आणि परतताना त्याच शिडीवरून आत आले असावेत. आत येताना त्यांनी खोलीतच बूट काढून ठेवले आणि नंतर ते तसेच राहिले. याशिवाय आपल्यावर संशय येऊ नये, यासाठी गुन्ह्याच्या दोन दिवस आधीपासून आजारपणाचे आणि झोपून असल्याचे सोंग त्यांनी केले असणार. दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्यास त्यांनी नकार का दिला? अ‍ॅडमिट झाल्यानंतर ते दवाखान्यात सर्वांच्या देखरेखीखाली राहिले असते आणि त्यांना तेथून सर्वांची नजर चुकवून जाणे शक्य झाले नसते.



आणखी एक प्रश्न होता. लिमये खिडकीतून का उतरले? दारातून का बाहेर पडले नाहीत? डॉ. शिंगारेंना भेटल्यानंतर मला याचे उत्तर मिळाले. डॉ. शिंगारेंनी मला सांगितले, की मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता, जेवणानंतर लिमयेंना औषधे आणि इंजेक्शन देण्यासाठी ते त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा लिमये त्यांना म्हणाले, की आता मला उठवत नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला निरोप देण्यासाठी खालपर्यंत येऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही एक काम करा. माझ्या घराला बाहेरून कुलूप लावून जा. दार आतून लावून घेण्यासाठी खाली उतरण्याइतकी माझ्यात शक्ती नाही.



लिमयेंच्या सांगण्याप्रमाणे शिंगारेंनी बाहेरून कुलूप घातले आणि ते त्यांच्या दवाखान्यात एका महत्त्वाच्या अॉपरेशनसाठी निघून गेले. गुन्हा घडण्याच्या वेळी आपण घरीच होतो आणि आपल्याला बाहेर पडणे शक्यच नव्हते, हे दाखविण्यासाठी लिमयेंचा असा सारा खटाटोप. पण इतके करूनसुद्धा शेवटी आपण त्यांना ओळखलेच! गुन्हेगार काही गोष्टींकडे निरुपद्रवी म्हणून दुर्लक्ष करतो आणि त्याच गोष्टी त्याला पकडून देण्यात अतिशय मोठी कामगिरी बजावतात. या प्रकरणातील याचे उदाहरण म्हणजे लिमयेंच्या बेडरूममधले बूट! असो. त्यांनी खंजीर कुठे लपविलाय, याबाबत त्यांनी माहिती सांगणे जास्त आवश्यक आहे. माझ्या तर्कानुसार तो त्यांच्या बेडरूमशिवाय आणखी कोठेही नसेल.. "



" वॉऽऽव!! भन्नाट!! अगदी काही तासांतच तू खंजिराच्या चोराला शोधून काढलेयस अल्फा! " मी तर थक्कच झालो होतो, " आज दिवसभर कुठे कुठे गेला होतास तू? आणि काय काय केलंस? "



" जेवणाआधी अर्थातच मी शिंगारेंना भेटलो आणि त्यांच्याकडून लिमयेंच्या आजारपणाबाबत इत्यंभूत माहिती मिळविली.दुपारी जेवण झाल्यावर मी लिमयेंकडे गेलो. त्यांना विचारले, की मला तुमच्याशी एकांतात काही अत्यंत महत्त्वाचे बोलायचे आहे आणि मी तुम्हाला भेटायला कधी येऊ? त्यांनी आज रात्री साडेआठ वाजता बोलावले आहे. मग वाघमारे सरांकडे गेलो. त्यांना सगळा वृत्तांत कथन केला. माझी अनिल पाटलापासून ते लिमयेंपर्यंतची शोधकथा ऐकून ते हडबडूनच गेले होते. त्यांनी मला लिमयेंच्या घराखाली सव्वाआठपर्यंत येण्याचे आश्वासन दिले आहे. आपण तिघे सोडून इतर कोणालाच ही गोष्ट ठाऊक नाहीये. चार दिवसांच्या अथक, धकाधकीच्या शोधाचा अंत आज होईल, असा मला विश्वास वाटतो.. "



" नक्कीच होईल. तू खरंच एक जिनीयस आहेस अल्फा!! "  मी म्हणालो. अल्फा हसला.



" चल, चल. असे डायलॉग मारून इमोशनल करू नकोस. पुस्तक घे आणि अभ्यास कर आता. संध्याकाळी जायचंय आपल्याला. " असे बोलून अल्फाने चर्चा थांबविली. आता फक्त घड्याळ साडेआठ वाजल्याचे कधी दाखविते, याचीच उत्सुकता होती..!!!



 



. . .